वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ९/८ पृ. २६-२८
  • शिडी वापरा पण जरा जपून!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शिडी वापरा पण जरा जपून!
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शिडी ठीक आहे ना?
  • घ्यावयाची काळजी
  • तुम्ही “सुखरूप” असावे हीच यहोवाची इच्छा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • सूचना कुठून आल्या?
    जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न
  • सध्याची सुरक्षा सर्वकाळची सुरक्षा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
सावध राहा!—१९९९
g99 ९/८ पृ. २६-२८

शिडी वापरा पण जरा जपून!

आयर्लंडमधील सावध राहा! नियतकालिकेच्या बातमीदाराकडून

पॉलला अंगणातला गेलेला बल्ब बदलायचाय, वरच्या मजल्याच्या खिडक्या बाहेरून साफ करायच्यात. कितीतरी वेळा बायकोनं त्याला आठवण करून दिली, पण त्याची मात्र टाळाटाळ. का? तर शिडीवर चढून ही कामं करणं म्हणजे जिवावरचा प्रसंग.

पॉलची ही भीती रास्तच होती. कारण शिडीमुळे होणारे अपघात घातक, प्रसंगी प्राणघातकही असू शकतात याची पूर्ण कल्पना त्याला होती. अशा दुर्घटना अनेकदा घडतात याचं कारण शिडी वापरताना लोक नीट विचार करत नाहीत.

बल्ब बदलण्याकरता, खिडक्या साफ करण्याकरता शिडीवर चढण्याआधी पॉलने कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? पुढे सुचवलेल्या दहा गोष्टी लक्षात घेतल्यानं त्याला हे काम सुरक्षितपणे करता आलं.

शिडी ठीक आहे ना?

१ योग्य शिडीचा उपयोग करा. शिडी फारच लहान असल्यास काम करताना तुम्हाला हात जास्त ताणावा लागेल आणि शिडी खूपच लांब असल्यास तुम्हाला ती भिंतीला नीट टेकवता येणार नाही आणि हे धोकेदायक ठरू शकते. माळ्यावर जाण्यासाठी घडीच्या शिडीचा (घोड्याचा) उपयोग करू नका. त्याउलट माळ्याला कायमचीच एक शिडी बसवून घ्या किंवा केव्हाही काढता येईल, लावता येईल अशा साध्या शिडीचा उपयोग करा.

२ शिडी नीट तपासून पाहा. तुम्ही शिडी घराबाहेर ठेवता का? ओलाव्यामुळे लाकडी शिड्या फुगतात, तर उन्हामुळे त्या संकुचन पावतात. शिवाय, शिडी जुनी झाल्यानंतर तिच्या पायऱ्‍या खिळखिळ्या होऊन ती स्थिर उभी राहू शकत नाही. लाकडी शिडीच्या पायऱ्‍यांना भेगा पडल्या आहेत का किंवा त्या कुजू लागल्या आहेत का? सहसा, प्रत्येक लाकडी पायरीला आधार देण्यासाठी सळई असते. ही सळई घटट्‌ बसलेली आहे का? पायऱ्‍यांना बसवलेले स्क्रू आणि रिबीट ढिले पडून त्यांवर गंज तर चढला नाही ना? सोईनुसार लांब किंवा लहान करता येणाऱ्‍या शिड्यांना चाके आणि दोरखंडही लावलेला असतो. मग ही चाके खराब तर झाली नाहीत ना? दोरखंड तुटायला तर आला नाही ना? तो पुरेसा लांब आहे ना? शिडी वापरण्यापूर्वी या सर्व गोष्टी नीट पाहा; काही रिपेअरींग वगैरे करायचे असल्यास पटकन करून घ्या.

पायऱ्‍यांवरून घसरू नये म्हणून त्यांवर सहसा खाचा पाडलेल्या असतात. पण या खाचांमध्ये जमा झालेली माती काढायला विसरू नका. शिडी स्थिर राहावी म्हणून तिच्या पायांना खाली पॅड्‌स असले पाहिजेत. मग शिडीला हे पॅड्‌स आहेत का आणि तेही चांगल्या स्थितीत आहेत का ते पाहा.

३ शिडी वाहून नेताना दक्षता बाळगा. एखाद्या वाहनातून नेताना शिडीसाठी असलेल्या फळीवर ती गच्च बांधून ठेवा किंवा मग एखाद्या ट्रेलरने नेताना निदान दोन ठिकाणी तरी ती बांधून ठेवा. शिडी मोठी असल्यास तिचा काही भाग वाहनाच्या बाहेरच राहील त्यामुळे मागून येणाऱ्‍या वाहनांना सावध करण्यासाठी त्या भागावर एखादे निशाण लावा.

एखादी शिडी वाहून नेण्यासाठी दोन व्यक्‍ती असल्यास सगळ्यात उत्तम. पण, तुम्हाला ती एकट्यानेच वाहून न्यायची असल्यास ती आडवी करा आणि शिडीच्या आतून एक हात घालून ती खांद्यावर घ्या आणि दुसऱ्‍या हाताने तिचा तोल सांभाळा. शिडीचं पुढचं टोक कुणाला धडकू नये म्हणून ते डोक्याच्या जरा वर राहील अशा पद्धतीनं शिडी धरा. एक मात्र लक्षात ठेवा, की शिडीचा जेवढा भाग पुढे आहे तेवढाच मागेही असावा. चित्रपटात, एखाद्याच्या डोक्यावर शिडी आपटल्याचे दृश्‍य दाखवतात तेव्हा लोकांना खूप हसू येतं. पण, प्रत्यक्षात मात्र हा गंभीर अपघात ठरू शकतो; शिवाय, तुमच्या हातून दुसऱ्‍याला लागले असेल तर त्याला लागलेल्या दुखापतीसाठी तुम्हाला भुर्दंडही बसेल. तेव्हा ते कधीच हास्यास्पद नसतं.

शिडी उभी वाहून नेताना तिचा सगळा भार खांद्यावर घ्या. एका हाताने ती उचला आणि खांद्याच्या वरून दुसऱ्‍या हाताने शिडीचा तोल सांभाळा. त्याच वेळी वरून गेलेल्या तारांकडे, विजेच्या खांबांकडे आणि जाहिरात फलकांकडे दुर्लक्ष करू नका.

४ शिडी नीट लावा. सुरक्षिततेकरता शिडीचा कल एका बाजूला जाता कामा नये, तर ती नेहमी ७५ अंशाच्या कोनात उभी करावी.

५ शिडीला खाली आणि वर चांगला आधार द्या. शिडीचं वरचं टोक तुम्ही कुठे टेकवता त्याकडे लक्ष द्या. ज्यावर शिडी टेकवली जाते तो भाग स्थिर आणि त्यावरून ती घसरणार नाही असा असावा. शिडी कधीच काचेवर किंवा प्लॅस्टिकवर टेकवू नये. शक्य असल्यास, ती एखाद्या पक्क्या ठिकाणी बांधून ठेवा; असे करताना शिडीचं वरचं टोक, शिडी टेकते त्या जागेपासून तीन फूट वर असू द्या.

दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही शिडीवर चढता तेव्हा पहिल्यांदा शिडीचं वरचं टोक बांधून घ्या. शिडीचं वरचं टोक बांधण्याकरता तुम्ही वर चढता आणि काम झाल्यानंतर बांधलेले टोक सोडवून खाली उतरता तेव्हा त्यात थोडाफार धोका असतो. तेव्हा या दोन्ही वेळी खाली कुणाला तरी शिडी पकडायला सांगा. पण शिडी १५ फूटाहून लांब असते तेव्हाच असं करणं उपयोगाचं आहे.

इमारतीजवळची जमीन उताराची असल्यास काहीतरी वजनदार शिडीच्या पायाशी लावा किंवा खालची पायरी बांधून घ्या. जमीन पक्की पण ओबडधोबड असल्यास मधल्या भागात काहीतरी भरून ती सपाट करून घ्या. आणि ती भुसभुशीत, मऊ असल्यास लाकडी फळीवर किंवा त्यासारख्या एखाद्या वस्तूवर शिडी उभी करा.

घडीच्या शिडीचा उपयोग करण्यापूर्वी तिचे चारही पाय जमिनीवर घट्ट बसलेले आहेत, तिचे दोन्ही भाग पूर्णतः फाकले आहेत, त्या दोन्ही भागांमधली अडकवणी नीट लागली आहे का ते पाहा.

घ्यावयाची काळजी

६ बूट कसे आहेत ते पाहा. शिडी चढण्याआधी तुमच्या बुटाचे तळवे ओले तर नाहीत ना याची खात्री करा. घसरू नये म्हणून त्यांवरील माती काढा.

७ सामान काळजीपूर्वक वाहा. चढताना दोन्ही हात शिडीवर राहावेत म्हणून शक्यतो तुमच्या बेल्टला असलेल्या होल्डरमध्ये हत्यारे ठेवा. एखादी अवजड वस्तू वर नेण्यासाठी शिडीचा उपयोग टाळा, पण ते शक्य नसल्यास वर चढताना तुमचा मोकळा हात नेहमी शिडीवर असू द्या. घाईगडबड करू नका तर, सावकाश चढा.

विजेवर चालणाऱ्‍या उपकरणाचा वापर करताना दोन्ही हातांचा उपयोग करू नका. उदाहरणार्थ ड्रिलिंग मशीन वापरताना तिचे ड्रिल मध्येच अडकू शकते किंवा ते मशीन हातांतून निसटू शकते; त्यामुळे तुमचा तोल जाऊन तुम्ही खाली पडाल. विजेचे उपकरण वापरत नसताना ते कधीच “चालू अवस्थेत” ठेवू नका; अन्यथा चालू अवस्थेतच ते खाली पडण्याची शक्यता आहे.

८ इतरांचाही विचार करा. तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी काम करता तेव्हा लोकांना चटकन दिसेल अशा ठिकाणी शिडी लावा आणि तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी लोकांनी ये-जा करू नये म्हणून तेवढा भाग बंदिस्त करा. तुम्ही एका कोपऱ्‍यातून दुसऱ्‍या कोपऱ्‍यात शिडी हलवता तेव्हा बाकीच्या लोकांना याची कल्पना नसते हे लक्षात असू द्या. म्हणून असे करताना लोकांना सावध करा तसेच कुणी वाटेत नाही तेही पाहा.

शिडीवर असताना तुमच्यापाशी एखादे उपकरण असल्यास नेहमी लक्षात असू द्या की एखादा लहानसा स्क्रू ड्रायव्हर देखील उंचावरून खाली पडल्यास दुखापत होऊ शकते. तुम्हाला थोडा वेळ कुठे जायचे असल्यास आणि तुम्ही शिडी बांधून ठेवली नसल्यास तिच्यापाशी कोणाला तरी तोपर्यंत उभे करा किंवा शिडी काढून ती आडवी करून ठेवा. पण, शिडी तशीच उभी ठेवून जाऊ नका.

९ तुमच्या तब्येतीचा विचार करा. शिडीवर योग्य गती राखून आणि तोल सांभाळूनच चढावं लागतं. तेव्हा तुम्हाला बरं वाटत नसल्यास, मळमळत असल्यास किंवा चक्कर येत असल्यास शिडीवर चढू नका.

१० जपून चढा. शिडीचा नेहमी जपून उपयोग करा. एकाच वेळी दोन किंवा अधिक लोकांना शिडीवर कधीच चढू देऊ नका. जोराचा, सोसाट्याचा वारा असताना शिडीवर कधीच चढू नका. घडी करता येणाऱ्‍या शिडीच्या सर्वात वरच्या पायरीवर किंवा एखाद्या लांब शिडीच्या बाबतीत वरून चौथ्या पायरीच्या वर कधीच उभे राहू नका. सोईनुसार कमी-जास्त करता येणारी शिडी केव्हाही आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढवू नका; निदान तीन तरी पायऱ्‍या एकमेकांवर बसलेल्या असाव्यात. स्वतःची नको तितकी ओढाताण कधीच करून घेऊ नका. शिडीवर असताना तुम्ही जास्त ओढाताण केल्याने तोल जाऊन तुम्ही खाली पडाल. हात पोहंचत नसल्यास शिडीवरून खाली उतरून ती सोईस्कर ठिकाणी लावा, त्यामुळे काम उरकण्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल; पण वेळ वाचवून अपघाताला आमंत्रण देऊ नका. समोर पाहून शिडीवर चढा.

अर्थात, तुम्ही कितीही दक्षता घेतली तरी शिडीचा उपयोग करताना धोके ते असणारच. पण या सल्ल्यांचा उपयोग केल्याने तुम्ही हे धोके काही प्रमाणात टाळू शकता. पॉलला या सल्ल्यांचा निश्‍चितच फायदा झाला. त्यांनुसार काम केल्यानं तो आपल्या अंगणात नवीन बल्ब बसवू शकला. पण खिडक्यांचं काम? तो ते काम कदाचित नंतर कधीतरी . . . करणार आहे!

[२६, २७ पानांवरील चित्रं]

१ योग्य शिडीचा उपयोग करा

२ शिडीची स्थिती पाहा

३ शिडी वाहून नेताना दक्षता बाळगा

४ शिडी नीट लावा

५ शिडीला खाली आणि वर चांगला आधार द्या.

६ बूट कसे आहेत ते पाहा

७ सामान काळजीपूर्वक वाहा

८ इतरांचाही विचार करा

९ तुमच्या तब्येतीचा विचार करा

१० जपून चढा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा