वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ९/८ पृ. १७-१९
  • विवाहात धार्मिक ऐक्य असणे—का महत्त्वाचे आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विवाहात धार्मिक ऐक्य असणे—का महत्त्वाचे आहे?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विवाहाचा उद्देश
  • चांगला विवाह
  • आकर्षण आणि समान नीतिमूल्ये
  • मुलांचं काय?
  • खरोखर “प्रभूमध्ये”
  • विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • विवाह जोडीदार निवडण्यासंबंधी देवाचा सल्ला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • ख्रिस्ती विवाह यशस्वी कसा बनवाल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुमच्या विवाहाकरता उत्तम पाया घालणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ९/८ पृ. १७-१९

बायबलचा दृष्टिकोन

विवाहात धार्मिक ऐक्य असणे—का महत्त्वाचे आहे?

दृश्‍य आहे एका कुटुंबाचे. रात्रीच्या जेवणासाठी कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र येतात. वडील प्रार्थना करत आहेत, पण त्याचवेळी आई मनातल्या मनात दुसऱ्‍याच देवाचे नाव घेत आहे. आता दुसरे कुटुंब पाहा. पत्नी चर्चला जाते, तर पती सिनेगॉगमध्ये. आणि अशीही काही घराणी आहेत की जिथे बाबा मुलांना सॅन्टा क्लॉजविषयी शिकवतात, तर आई हनुक्काविषयी.

आंतरजातीय विवाहांत उल्लेखनीय वाढ होत असल्यामुळे हे चित्र हल्ली सर्रास पाहायला मिळते असे अलीकडील पाहणीवरून दिसून येते. एका सर्वेक्षणानुसार संयुक्‍त संस्थानांत २१ टक्के कॅथलिक, ३० टक्के मॉर्मन्स, ४० टक्के मुस्लिम आणि ५० टक्क्यांहून अधिक ज्यू आंतरजातीय विवाह करतात. शतकांपासून धर्माधर्मांत रुजलेले वैमनस्य आणि त्यामुळे निर्माण झालेल्या असहिष्णूतेवर आंतरजातीय विवाह जणू मातच असे काहींना वाटते. एक स्तंभलेखकाने म्हटले: “आंतरजातीय विवाहांना भरभरून प्रोत्साहन द्यावे.” पण, यावर बायबलचे काय म्हणणे आहे?

लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणजे बायबल, जातीय किंवा वांशिक भेदभावाला प्रोत्साहन देत नाही; उलट देवाचे हे वचन वांशिक समानतेचा पुरस्कार करते. हा मुद्दा स्पष्ट करताना प्रेषित पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) पण, त्याच वेळी यहोवाच्या खऱ्‍या उपासकांनी ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करावे’ असेही बायबल म्हणते. (१ करिंथकर ७:३९) असे का?

विवाहाचा उद्देश

विवाहाचे बंधन हे इतर कोणत्याही बंधनापेक्षा एक अतूट बंधन असावे असा देवाचा मूळ उद्देश होता. (उत्पत्ति २:२४) त्याने पहिला विवाह घडवून आणला तेव्हा त्या दांपत्याला फक्‍त एकमेकांचा सहवास मिळावा इतकेच त्याच्या मनात नव्हते. तर मुलांचे लालनपालन करण्याचे आणि घरासमान असणाऱ्‍या पृथ्वीची देखभाल करण्याचे काम यहोवाने त्यांना दिले, तेव्हा त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांनी एकत्र मिळून काम करावे हे देखील त्याने सूचवले. (उत्पत्ति १:२८) अशाप्रकारे एकमेकाच्या मदतीने देवाची इच्छा पूर्ण करताना त्यांना एकमेकांचा केवळ सहवासच नव्हे, तर निकटच्या, अतूट संगतीचा आनंदही मिळणार होता.—पडताळा मलाखी २:१४.

अप्रत्यक्षपणे याच संगतीच्या संदर्भात येशूने पुढील सर्वज्ञात शब्द उद्‌गारले: “ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले [“जुवाला जुंपले,” NW] आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्तय १९:६) या ठिकाणी, येशूने वैवाहिक बंधनाची तुलना लाक्षणिक अर्थाने ओझे वाहून नेणाऱ्‍या दोन जनावरांना जुंपणाऱ्‍या जुवासोबत केली आहे. ओझे वाहून नेणारी ही दोन जनावरे विरुद्ध दिशेने जाऊ लागल्यास त्यांची किती ओढाताण होईल याची कल्पना करा! अगदी हीच गत, खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाबाहेर विवाह करणाऱ्‍यांची होते; बायबल सिद्धान्तांनुसार जगण्याचा प्रयत्न करत असताना एखाद्याचा विवाहसोबती त्याला सहयोग देत नाही तेव्हा त्याचीही अगदी अशीच ओढाताण होत असल्याचे त्याला जाणवते. आणि म्हणूनच, “विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर एकत्र जुंपले जाऊ नका,” असे जे बायबलमध्ये म्हटले आहे त्यात तथ्य आहे.—२ करिंथकर ६:१४; सुबोध भाषांतर.

चांगला विवाह

वैवाहिक सोबत्यांचे खऱ्‍या उपासनेत ऐक्य असल्यास वैवाहिक बंधन आणखीनच मजबूत होते. एका लेखकाने म्हटले: “एकत्र भक्‍ती करणे हा एका निकोप, आनंदी कौटुंबिक जीवनाचा प्रमुख घटक आहे.” तसेच, उपदेशक ४:९, १० देखील म्हणते: “एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल.”

एखाद्या ख्रिस्ती दांपत्याचे जीवन देवाच्या उपासनेवर केंद्रित असते तेव्हा ते दोघे वास्तविकरित्या नव्हे, तर आध्यात्मिकरित्याही एक होतात. ते एकत्र मिळून प्रार्थना करतात, देवाच्या वचनाचा अभ्यास करतात, सहख्रिश्‍चनांसोबत उपासनेकरता एकत्र येतात आणि आपल्या धार्मिक विश्‍वासाविषयी इतरांना सांगतात तेव्हा खरे तर ते एका आध्यात्मिक बंधनात बांधले जातात; आणि यामुळे त्यांचे वैवाहिक बंधन आणखीन मजबूत होण्यास हातभार लागतो. याबाबतीत एका ख्रिस्ती स्त्रीने म्हटले: “खरी उपासना जीवनाचा मार्ग आहे. तेव्हा, मी कोण आहे आणि काय आहे हे ज्या आधारावर मी म्हणते, तो आधारच ज्याला मान्य नाही अशा व्यक्‍तीशी विवाह करण्याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही.”—पडताळा मार्क ३:३५.

‘प्रभूमध्ये लग्न करणारे’ आचरणाच्या बाबतीत आपला विवाहसोबती येशूचे अनुपालन करणारा असेल अशी अपेक्षा करू शकतात. येशूने ख्रिस्ती मंडळीला प्रेमळपणे वागवले तसे ख्रिस्ती पतीने आपल्या पत्नीला वागवावे अशी त्याला आज्ञा आहे. तसेच, ख्रिस्ती पत्नीला अशी आज्ञा आहे की तिने आपल्या पतीचा आदर करावा. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२५, २९, ३३) या सगळ्या गोष्टी खरे ख्रिस्ती केवळ आपल्या विवाहसोबत्याला खूष करण्यासाठी नव्हे, तर देवाला आनंदविण्यासाठी करतात. कारण, वैवाहिक दांपत्ये एकमेकांना जसे वागवतात त्याबद्दल त्यांना देवाला जाब द्यायचा आहे.—मलाखी २:१३, १४; १ पेत्र ३:१-७.

समान धार्मिक विश्‍वास अनुसरल्याने ख्रिस्ती पतिपत्नींना आपसांतील मतभेद समजूतदारपणे मिटवण्यासही मदत होते. असे करताना ख्रिश्‍चनांनी ‘आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्‍याचेही पाहावे,’ असा सल्ला बायबल देते. (फिलिप्पैकर २:४) प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्या, तरी एकाच धार्मिक विश्‍वासानुसार चालणारे ख्रिस्ती विवाहसोबती त्यांच्यातील मतभेद मिटवण्याकरता मार्गदर्शनासाठी नेहमी देवाच्या वचनाकडे वळतात. (२ तीमथ्य ३:१६, १७) ते असे करतात तेव्हा “एकचित्त व्हा” असा जो सल्ला बायबल ख्रिश्‍चनांना देते त्याचे ते अनुकरण करत असतात.—१ करिंथकर १:१०; २ करिंथकर १३:११; फिलिप्पैकर ४:२.

आकर्षण आणि समान नीतिमूल्ये

पण, अशा या नातेसंबंधासाठी केवळ समान विश्‍वास असून चालत नाही हे मान्य करावेच लागेल. त्यासाठी एकमेकांविषयी आकर्षणही जरूरीचे असते. (गीतरत्न ३:५; ४:७, ९; ५:१०) पण, विवाहाचे बंधन कायम राहण्यासाठी याहीपेक्षा समान नीतिमूल्ये असणे जरूरीचे असते. मनासारखा जोडीदार (इंग्रजी) या पुस्तकानुसार “ज्या दांपत्यांची नीतिमूल्ये सारखी आहेत त्यांना आपला वैवाहिक नातेसंबंध आनंदी, समरस आणि टिकाऊ बनविण्यासाठी अधिक वाव असतो.”

पण, दुःखाची गोष्ट अशी की एकमेकांकडे आकर्षित होणारे लोक आपसांतील गंभीर मतभेद मिटवण्यासाठी कदाचित विवाह होईपर्यंत थांबतील. याची तुलना एखाद्या घराशी केली जाऊ शकते; कल्पना करा, एखादे घर फक्‍त वरवरून सुंदर दिसते म्हणून तुम्ही ते विकत घेता. परंतु, त्या घरात राहायला गेल्यानंतर तुम्हाला कळून चुकते ही घराचा पाया अगदीच कच्चा आहे. अशा डळमळणाऱ्‍या पायामुळे त्या घराबद्दल सुरवातीला तुम्हाला वाटलेले सर्व आकर्षण विरून जाते. त्याचप्रमाणे, एखादी व्यक्‍ती दुसऱ्‍या एका धर्मातल्या व्यक्‍तीकडे आकर्षित होऊ शकते; तिच्या मते हीच व्यक्‍ती आपल्यासाठी योग्य आहे. पण, विवाहानंतर मात्र त्यांच्या नातेसंबंधात अनेक गंभीर समस्या उद्‌भवण्याची शक्यता आहे.

विवाहानंतर उद्‌भवू शकतील असे काही प्रश्‍न विचारात घ्या: सबंध कुटुंबाने उपासनेकरता कोठे जावे? मुलांवर कोणत्या धर्माचे संस्कार करावेत? कोणत्या धर्माला आर्थिक मदत करावी? एका विवाहसोबत्याच्या मते विशिष्ट धार्मिक प्रथा आणि सणवार गैरख्रिस्ती स्वरूपाचे असल्यास ते साजरे करण्याकरता त्याचा विवाहसोबती त्याला जबरदस्ती करेल का? (यशया ५२:११) विवाह म्हटला की थोडीफार तडजोड करावीच लागते. पण, बायबलच्या सिद्धान्तांसंबंधी तडजोड करणे मग ते विवाह टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने असले तरी परमेश्‍वराला मान्य नाही.—पडताळा अनुवाद ७:३, ४; नहेम्या १३:२६, २७.

सुखी वैवाहिक जीवनासाठी काही दांपत्ये स्वतंत्रपणे आपापला धर्म पाळण्याची निवड करतात. पण, खेदाची गोष्ट म्हणजे स्वतंत्रपणे धर्म पाळल्याने विवाहात एक प्रकारची आध्यात्मिक पोकळी निर्माण होते. एक स्त्री जिचे पती वेगळ्या धर्माचे आहेत, ती म्हणते: “आमच्या लग्नाला ४० वर्षं उलटून गेलीत; पण माझ्या नवऱ्‍यानं मला अद्याप समजून घेतलं नाही.” याउलट, “आत्म्याने व खरेपणाने” उपासना करणारे पतिपत्नी आपल्या जीवनात देवाला सर्वात प्रथम स्थान देतात. “तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही,” असे काव्यात्मकरित्या बायबल म्हणते ते खरे आहे.—योहान ४:२३-२४; उपदेशक ४:१२.

मुलांचं काय?

आंतरजातीय विवाह करण्याचा विचार करणाऱ्‍या काही जोडप्यांना वाटेल, की आपण आपल्या मुलांवर दोन्ही धर्मांचे संस्कार करू आणि पुढे मग कोणता धर्म स्वीकारायचा हे त्यांचे त्यांना ठरवू द्यावे. होय, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा कायदेशीर आणि नैतिक हक्क दोन्ही पालकांना आहे आणि सरतेशवेटी मुले आपापला धर्म निवडतातही.a

मुलांनी “प्रभूमध्ये आपल्या आई-बापांच्या” आज्ञेत राहावे असा सल्ला बायबल देते. (इफिसकर ६:१) आणि नीतिसूत्रे ६:२० म्हणते: “माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” एकच धार्मिक विश्‍वास अनुसरणाऱ्‍या पालकांच्या मुलांवर वेगवेगळ्या धार्मिक तत्त्वांचा संस्कार होत नाही तर बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासाठी “प्रभू एकच, विश्‍वास एकच, बाप्तिस्मा एकच” असतो.—इफिसकर ४:५; अनुवाद ११:१९.

खरोखर “प्रभूमध्ये”

यशस्वी विवाहासाठी दोन व्यक्‍तींचे आचारविचार जुळले म्हणजे स्वतःला ख्रिश्‍चन म्हणवणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीशी लग्न करून चालेल का? बायबल म्हणते: “मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणाऱ्‍याने तो जसा चालला तसे स्वतःहि चालले पाहिजे.” (१ योहान २:६) स्पष्टच आहे, की विवाह करण्याचा विचार करणारा ख्रिश्‍चन येशूच्या पदचिन्हावर चालण्याचा मनःपूर्वक यत्न करणाऱ्‍या व्यक्‍तीचीच निवड करील. अशा भावी जोडीदाराने देवाला स्वतःचे समर्पण करून बाप्तिस्मा घेतलेला असेल. तो येशूच्या प्रेमळ व्यक्‍तिमत्वाचे आणि ज्या आवेशाने त्याने देवाच्या राज्याचा प्रचार केला त्याचे अनुकरण करणारा असेल. येशूप्रमाणेच ही व्यक्‍ती देखील आपल्या सबंध जीवनात देवाच्या इच्छेला सर्वाधिक महत्त्व देईल.—मत्तय ६:३३; १६:२४; लूक ८:१; योहान १८:३७.

देवाच्या उपासकांमध्येच एखादा योग्य जोडीदार मिळेपर्यंत थांबून राहणारे लोक आपल्या जीवनात देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यात एक उत्तम नमुना मांडतात. आणि असा नमुना पुढे एका सुखी, समाधानी विवाहास कारणीभूत ठरेल.—उपदेशक ७:८; यशया ४८:१७, १८.

[तळटीपा]

a “बायबलचा दृष्टिकोन: मुलांना स्वतःचा धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे का?” हा एप्रिल ८, १९९७ च्या सावध राहा! अंकातील पृष्ठे १४-१५ वरील लेख पाहा. तसेच, १९९५ साली वॉच टावर संस्थेने प्रकाशित केलेल्या यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी) या माहितीपत्रकातील पृष्ठे २४-५ देखील पाहा.

[१९ पानांवरील चौकट]

वेगवेगळे धर्म आचरणाऱ्‍या कुटुंबांसाठी साहाय्य

आज वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक दांपत्ये धर्मिक दृष्ट्या विभाजित आहेत. काहींनी कदाचित आंतरजातीय विवाह केला असेल. पण, बऱ्‍याच जणांच्या बाबतीत असे घडले आहे, की सुरवातीला दोघेही एकच धर्म अनुसरत होते पण नंतर उभयतांपैकी एकाने दुसरा धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची धार्मिक भिंत उभी राहिली. अशी स्थिती निर्माण होण्यासाठी इतरही कारणे असू शकतात. अर्थात कारणे कोणतीही असली तरीही केवळ धार्मिक मतभेदांपायी विवाहाच्या शपथा मोडणे किंवा त्या क्षुल्लक लेखणे चुकीचे आहे. विवाहसोबती समान धर्म आचरत नसले तरीही बायबल विवाहाच्या पावित्र्याचा आणि स्थायी बंधनाचा आदर करते. (१ पेत्र ३:१, २) प्रेषित पौलाने लिहिले: “जर कोणाएका बंधुची पत्नी ख्रिस्तीतर असली, आणि ती त्याच्याजवळ नांदावयास राजी असली, तर त्याने तिला सोडू नये.” (१ करिंथकर ७:१२) होय, बायबलमध्ये घालून दिलेल्या तत्त्वांचे पालन केल्यास कुठल्याही वैवाहिक जोडप्याला प्रेम, आदर आणि शांती लाभेल यात शंका नाही.—इफिसकर ५:२८-३३; कलस्सैकर ३:१२-१४; तीत २:४, ५; १ पेत्र ३:७-९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा