तरुण लोक विचारतात . . .
या आजारपणाला मी कसं तोंड देऊ शकतो?
जेसन केवळ १८ वर्षांचा होता, पण त्याची सर्व ध्येये जणू असाध्य होती असं भासत होतं. ख्रिस्ती सेवक म्हणून पूर्ण-वेळेची सेवा करण्याची त्याची मनसा होती, पण मग त्याला क्रॉन्स रोग असल्याचं कळालं—हा एक वेदनामय आणि अशक्तपणा आणणारा आतड्यांचा विकार आहे. आज मात्र जेसन आपल्या या परिस्थितींना यशस्वीरित्या लढा देत आहे.
कदाचित तुम्हाला देखील एखादा गंभीर आजार असेल. आधीच्या अंकात, सावध राहा! ने तुमच्यासारख्या तरुणांना तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांबद्दल चर्चा केली होती.a तुम्ही आपल्या परिस्थितीला यशस्वीरित्या तोंड कसं देऊ शकता त्याचा आपण विचार करू या.
सकारात्मक मनोवृत्ती
कोणत्याही आजारपणाला यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी सकारात्मक मनोवृत्तीची गरज आहे. बायबल म्हणते: “मनुष्याचे चित्त आपली व्याधि सहन करिते; पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल?” (नीतिसूत्रे १८:१४) पण उदास, निराशावादी विचार आणि भावनांमुळं बरं होणं आणखीनच कठीण होऊन बसतं. जेसनला याची प्रतीती आली.
सुरवातीला, जेसनला राग यासारख्या नकारात्मक भावनांशी लढा द्यावा लागला ज्यामुळं तो खिन्न होत असे. त्याला कशामुळं मदत मिळाली? तो सांगतो: “टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांमधील खिन्नतेवरील लेखांमुळं मला सकारात्मक मनोवृत्ती राखायला खरोखर मदत मिळाली आहे. आता मात्र मी प्रत्येक दिवसापुरताच विचार करतो.”b
अशाच तऱ्हेने १७ वर्षांची कार्मेनसुद्धा जीवनातल्या सकारात्मक गोष्टींकडे पाहायला शिकली. तिला दात्र-कोशिका पांडुरोग झालेला असला तरी, ती आपल्याला आनंदविणाऱ्या क्षणांचा जास्त विचार करते. “माझ्यापेक्षाही ज्यांची स्थिती बिकट आहे आणि मला जे काही करता येतं ते देखील करू न शकणाऱ्यांचा मी विचार करते,” असं ती म्हणते. “आणि मग मी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं बरी आहे असं मला वाटतं.”
नीतिसूत्रे १७:२२ म्हणते: “आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय.” काहींना वाटेल की, गंभीर आजारपण असताना हसणं हे उचित नाही. पण चांगल्या प्रकारच्या विनोदामुळं आणि सुखद सहवासामुळं तुम्हाला तजेला मिळेल आणि जगण्याचीही इच्छा वाढेल. खरं म्हणजे, आनंद हा ईश्वरी गुण असून देवाच्या आत्म्याच्या फळांपैकी एक आहे. (गलतीकर ५:२२) तुम्ही आजारी असला, तरी तो आत्मा तुम्हाला आनंदी राहण्यास मदत करील.—स्तोत्र ४१:३.
समजून घेणारा डॉक्टर शोधणे
तरुण लोकांना समजून घेणारा डॉक्टर असला तर त्याचा अधिक फायदा होतो. तरुण व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक गरजा सहसा प्रौढ व्यक्तीच्या गरजांपेक्षा वेगळ्या असतात. ॲश्लीला जेव्हा मारक ब्रेन ट्यूमरसाठी उपचार घ्यायला इस्पितळात जावं लागायचं तेव्हा ती केवळ दहा वर्षांची होती. ॲश्लीचे डॉक्टर तिच्यासोबत अगदी प्रेमळपणाने आणि तिला समजेल अशा तऱ्हेने वागायचे. स्वतःच्या बालपणातील आजारपणामुळंच त्यांना डॉक्टर बनण्यास प्रेरणा कशी मिळाली हे त्यांनी तिला सांगितलं. जो उपचार दिला जाणार होता त्याची माहिती त्यांनी तिला प्रेमळपणानं पण स्पष्टरित्या दिली ज्यामुळं काय होणार हे तिला माहीत होतं.
तुम्हाला व तुमच्या पालकांना, तुमचा आदर करतील आणि तुमच्या गरजा समजून घेतील अशा डॉक्टरांकडे जायला आवडेल. काही कारणास्तव, तुम्हाला मिळत असलेल्या उपचारामुळं यथायोग्यपणे तुम्हाला अस्वस्थता जाणवत असल्यास, तुमच्या पालकांजवळ मनमोकळेपणानं आपल्या चिंतांविषयी सांगा.
आपल्या प्रकृतीसाठी झटा!
तुमच्या आजारपणावर सर्व तऱ्हेने मात करण्याचा प्रयत्न करणंही अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ, तुमच्या स्थितीविषयी होता होईल तितकी माहिती गोळा करा. “ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करितो,” असे एका बायबल नीतिसूत्राचं निरीक्षण आहे. (नीतिसूत्रे २४:५) ज्ञानामुळं अज्ञात गोष्टींबद्दलची भीती नाहीशी होते.
शिवाय, माहीतगार तरुण आपल्या उपचारात अधिक गोवलेला असेल आणि आणखी उत्तमरित्या सहकार्य देईल. उदाहरणार्थ, आपल्या डॉक्टरांच्या संमतीविना आपण एखादं औषध घेण्याचं थांबवू नये हे त्याला कळेल. वर उल्लेखिलेल्या कार्मेनने त्याचप्रमाणे तिच्या पालकांनीही दात्र-कोशिका पांडुरोगाची माहिती देणारी पुस्तकं वाचून काढली. त्यांना जी माहिती मिळाली त्यामुळे कार्मेनला जास्तीत जास्त मदत मिळेल असा वैद्यकीय उपचार तिला देण्यास त्यांना साहाय्य मिळाले.
तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल तर तुमच्या डॉक्टरांना विशिष्ट प्रश्न विचारा—हवंच तर अनेकदा विचारा. तुमच्या मते डॉक्टरांना जे ऐकायचंय ते सांगण्याऐवजी तुमचा काय विचार आहे आणि तुम्हाला काय वाटतं ते प्रामाणिकपणे सांगा. बायबल म्हणते त्याप्रमाणे, “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.”—नीतिसूत्रे १५:२२.
ॲश्ली एके वेळी आपल्या आजारपणाविषयी बोलेनाशी झाली. ती फक्त आपल्या आईला त्याविषयी सांगायची. तेव्हा एका सुज्ञ समाज सेविकेनं तिला एकान्तात विचारलं: “तुझ्यापासून काही लपवलं जातंय असं तुला वाटतं का?” ॲश्लीला अगदीच तसंच वाटत असल्याचं सांगतिलं. मग त्या स्त्रीनं ॲश्लीला तिचे वैद्यकीय अहवाल दाखवले आणि त्यांचं स्पष्टीकरणही दिलं. डॉक्टरांनी फक्त ॲश्लीच्या पालकांशी बोलण्याऐवजी तिच्यासोबत देखील काही वेळ बोलावं असंही तिनं डॉक्टरांना सांगितलं. सरतेशेवटी, आपलं मन मोकळं केल्यामुळे ॲश्लीला आवश्यक असलेली मदत मिळू शकली.
तुमच्या आसपासच्या लोकांकडून पाठिंबा
कुटुंबाचा एखादा सदस्य गंभीररीत्या आजारी असतो, तेव्हा सगळं कुटुंब त्यात गोवलं जातं ज्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज असते. ॲश्लीचं कुटुंब आणि ख्रिस्ती मंडळी तिच्या मदतीला धावून आले. ती इस्पितळात होती त्यावेळी मंडळीत याविषयी वारंवार आठवण करून दिली जात होती. मंडळीतले सदस्य तिला नियमितपणे भेट द्यायचे आणि त्या कुटुंबाचा दिनक्रम सुरळीत होईस्तोवर त्यांनी घरकामात आणि स्वयंपाक करण्यात मदत केली. ॲश्ली जास्त आजारी नसायची तेव्हा मंडळीतली लहान मुलं तिला भेटायला इस्पितळात जायची. याचा केवळ ॲश्लीलाच नव्हे, तर तिच्या लहान मित्रमैत्रिणींना देखील फायदा झाला.
परंतु, इतरांनी मदत देण्याचा प्रयत्न करण्याआधी, तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे हे त्यांना कळायला हवं. कार्मेन आपल्या पालकांकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून भावनिक आणि आध्यात्मिक पाठिंब्याची अपेक्षा करते. त्याचप्रमाणे, तिच्यासारखा ख्रिस्ती विश्वास बाळगणाऱ्या शाळेतल्या लहान मुलांकडूनही ती सहकार्याची अपेक्षा करते. कार्मेन म्हणते: “त्यांचं सतत माझ्यावर लक्ष असतं आणि माझी काळजी घेतली जात असल्यासारखं मला वाटतं.”
तुमची शाळा कदाचित मदतदायी ठरणारा काही वैद्यकीय आणि आर्थिक सल्लाही देत असावी त्याचप्रमाणे वैयक्तिक मदतही देत असावी. उदाहरणार्थ, ॲश्लीच्या शिक्षिकेनं तिच्या वर्गाला ॲश्लीला पत्र लिहायला आणि तिची भेट घ्यायला उत्तेजन दिलं. तुमच्या शिक्षकांना जर तुमच्या अडचणी समजत नसतील, तर तुमच्या पालकांनी तुमच्या स्थितीविषयी शाळेतल्या अधिकाऱ्यांशी आदराने चर्चा करावी हे कदाचित आवश्यक असेल.
मन आणि शरीराचा सुज्ञ उपयोग करा
आजारी असताना, आहे नाही ती शक्ती बरी होण्यात घालवण्याऐवजी तुम्हाला काहीच करणं जमत नसेल. तुम्ही पूर्णतः क्षीण झाला नसला, तर तुम्ही अनेक फायदेकारक गोष्टी करू शकता. आपल्या प्राणाकरता झटताना कसे वाटते (इंग्रजी) या आपल्या पुस्तकासाठी संशोधन करताना लेखिका जिल क्रेमेंट्स यांनी जे निरीक्षिले त्यावर त्यांनी अशी टिपणी केली: “मी दोन वर्षे इस्पितळात ये-जा करत असताना कित्येक लहान मुलांना टीव्ही पाहण्यात दंग असलेलं पाहून मला त्यांची कीव यायची. या तरुणांना वाचन करण्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. इस्पितळ म्हणजे, मानसिक व्यायाम करण्याचे उत्तम ठिकाण आहे.”
तुम्ही कोठेही असला, अर्थात, घरी अथवा इस्पितळात, तरी तुमच्या बौद्धिक क्षमतांना व्यायाम देण्यामुळं तुम्हाला बरं वाटू शकतं. पत्र लिहिण्याचा किंवा कविता करण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलात का? चित्रकला किंवा चित्र रंगवण्याचा? तुमच्या परिस्थितीस अनुकूल असल्यास, एखादे वाद्य वाजवायला का शिकू नये बरं? आरोग्याच्या दृष्टीनं मर्यादा असल्या, तरीही अनेक शक्यता आहेत. निश्चितच, सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे, देवाला प्रार्थना करण्याची आणि त्याचे वचन अर्थात बायबल वाचण्याची सवय तुम्ही लावून घेऊ शकता.—स्तोत्र ६३:६.
तुमच्या प्रकृतीला उचित असल्यास, योग्य त्या शारीरिक कार्यहालचालीत सामील झाल्यानेही तुम्हाला बरं वाटू शकेल. म्हणूनच, सहसा वैद्यकीय सुविधांमध्ये तरुण रुग्णांकरता फिझिकल थेरपीचे कार्यक्रम असतात. बहुतेक वेळा, आवश्यक व्यायामामुळं फक्त बरं होण्यासच नव्हे तर तुम्हाला प्रसन्न वाटायलाही मदत मिळते.
निराश होऊ नका!
इतकं दुःख सोसावं लागत असतानाही, येशू देवाला प्रार्थना करत होता, त्याने त्याच्यावर भरवसा ठेवला आणि वेदनेचाच विचार करत बसण्याऐवजी स्वतःच्या आनंदमय भवितव्याचा विचार केला. (इब्री लोकांस १२:२) त्यानं आपल्या दुःखमय अनुभवांमधून धडा घेतला. (इब्री लोकांस ४:१५, १६; ५:७-९) त्यानं मदत आणि प्रोत्साहन स्वीकारलं. (लूक २२:४३) आपल्या स्वतःच्या गैरसोयीवरच लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यानं इतरांच्या भल्यावर लक्ष केंद्रित केलं.—लूक २३:३९-४३; योहान १९:२६, २७.
तुम्ही अत्यंत आजारी असला, तरीही तुम्ही इतरांसाठी प्रेरणा ठरू शकता. एका शाळेच्या अहवालात ॲश्लीची बहीण अबिगेल हिनं लिहिलं: “मला माझ्या बहिणीचं भरभरून कौतुक करावंसं वाटतं. तिला इस्पितळात जाऊन आयव्ही घ्यावे लागतात आणि कितीतरी इंजेक्शनं घ्यावी लागतात तरीपण तिचा हसराच चेहरा असतो!”c
जेसनने आपली ध्येये मात्र सोडलेली नाहीत, त्याने फक्त काही फेरफार केलेत. आता, देवाच्या राज्याच्या प्रचारकांची अधिक गरज आहे तेथे सेवा करणं हे त्याचं ध्येय आहे. जेसनप्रमाणे, तुम्हाला देखील कदाचित हवं ते करणं शक्य नसेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वतःच्या मर्यादांप्रमाणे जगण्यास शिकावे; अतिसंरक्षणही करू नये किंवा एकदम निष्काळजी देखील होऊ नये. आपल्या तर्फे सर्वोत्तम देता यावे म्हणून यहोवावर बुद्धी आणि शक्तीसाठी निर्भर व्हा. (२ करिंथकर ४:१६; याकोब १:५) त्याचप्रमाणे, लक्षात ठेवा, ही पृथ्वी एकदा परादीस बनेल आणि त्यावेळी “‘मी रोगी आहे’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) होय, एके दिवशी तुम्ही पुन्हा एकदा निरोगी व्हाल!
[तळटीपा]
a सावध राहा! मे ८, १९९७, पृष्ठे २२-२४ पाहा.
b पाहा टेहळणी बुरूज (इंग्रजी), ऑक्टोबर १, १९९१, पृष्ठ १५; मार्च १, १९९०, पृष्ठे ३-९; आणि सावध राहा! (इंग्रजी), ऑक्टोबर २२, १९८७, पृष्ठे २-१६; नोव्हेंबर ८, १९८७, पृष्ठे १२-१६.
c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य पुस्तक, पृष्ठे ११६-२७ देखील पाहा.
[२६ पानांवरील चित्र]
ॲश्लीची थोरली बहीण अबीगेल तिच्या धैर्याचे कौतुक करते