वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ५/८ पृ. २२-२४
  • मलाच एवढं आजारपण का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मलाच एवढं आजारपण का?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘पण मलाच का?’
  • भयाचा सामना करणे
  • आजारी असण्यामधील अडचण
  • डॉक्टरांकडे जाणं—काही मजा नव्हे
  • या आजारपणाला मी कसं तोंड देऊ शकतो?
    सावध राहा!—१९९७
  • जेसन वर्ल्डस: तुम्ही यहोवाची सेवा करता तेव्हा खऱ्‍या अर्थाने जिंकता
    बायबलमुळे जीवन बदलतं
  • गंभीर आजार होतो तेव्हा . . .
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • कौटुंबिक सदस्य आजारी असतो तेव्हा
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ५/८ पृ. २२-२४

तरुण लोक विचारतात . . .

मलाच एवढं आजारपण का?

जेसन १३ वर्षांचा होता तेव्हा बेथेलमध्ये म्हणजेच ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात एक न एक दिवशी पूर्ण-वेळेचा सेवक होण्याचा त्यानं संकल्प केला होता. त्यानं एक लाकडी पेटी तयार केली आणि तिला तो बेथेल बॉक्स म्हणायचा. त्याला बेथेलमध्ये गेल्यावर उपयोगी पडतील अशा वस्तू तो त्यात गोळा करू लागला.

पण, जेसन १८ वर्षांचा झाल्यावर केवळ तीन महिन्यातच त्याला क्रॉन्झ रोग असल्याचं निदान करण्यात आलं—हा आतड्यांचा त्रासदायक, वेदनामय विकार आहे. “माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला,” तो आठवून सांगतो. “मला काहीच सुचेना, मी बाबांच्या कामाच्या ठिकाणी फोन लावला आणि ढसढसा रडलो. मला चांगलीच जाणीव होती की, बेथेलला जाण्याचं माझं स्वप्न तरी मातीत मिळालं होतं.”

“सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे” याचे मूळ कारण आजारपण आहे. (रोमकर ८:२२) आजारी लोकांमध्ये अगणित तरुणांचाही समावेश आहे. पुष्कळ तरुण लोक सरतेशेवटी बरे होतात. पण, इतरांना असाध्य अथवा काहींना जीवघेणे आजार सोसावे लागतात. युवकांना होणाऱ्‍या आजारांपैकी दमा, मधुमेह, दात्र-कोशिका पांडुरोग, सांसर्गिक रोग, अपस्मार, मानसिक आजार आणि कर्करोग हे आजार आहेत. काही युवकांना तर एका पेक्षा अधिक रोग होतात.

‘पण मलाच का?’

आजारपणामुळं मानसिक आणि भावनिक तणाव तर येतोच पण त्यासोबत शारीरिक त्रासही होतो. उदाहरणार्थ, आजारपणामुळे तुम्हाला पुष्कळ महिने शाळेत जाता आलं नाही, तर अभ्यासात तुम्ही मागे पडालच पण लोकांसोबत मिळणं-मिसळणं नसल्यामुळं तुम्हाला एकटेपणाही जाणवेल. १२ वर्षांच्या सन्‍नीला इस्पितळात राहावं लागत असल्यामुळं शाळा चुकवावी लागते तेव्हा, तो चिंता करत बसतो, ‘माझे वर्गसोबती काय करत असतील? आज शाळेत काय काय चाललं असेल?’

त्याचप्रमाणे, तुम्ही खूपच आजारी असल्यामुळं ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू शकत नाही किंवा बायबलही वाचू शकत नाही तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढीवर परिणाम होत असल्याचं तुम्हाला जाणवेल. अशा अवस्थेत, तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक भावनिक व आध्यात्मिक आधार हवा असतो. सुरवातीला, तुम्ही कदाचित रोगाचे निदान कबूल करणार नाही. नंतर, तुम्हाला राग येईल कदाचित स्वतःवरही चीड येईल आणि हे आजारपण टाळता आलं असतं असा तुम्ही विचार करू लागाल. ‘देवानं माझ्यावर हे संकट का येऊ दिलं?’ असं ओरडून विचारावसं तुम्हाला वाटेल. (पडताळा मत्तय २७:४६.) खरं म्हणजे, थोडीफार खिन्‍नता तुम्हाला निश्‍चितच जाणवेल.

शिवाय, आपण खास प्रयत्न केला म्हणजेच आणखी चांगले वागण्याचा प्रयत्न केला तर देव आपलं आजारपण काढून टाकील अशी कल्पनासुद्धा एखादा युवक करू लागेल. परंतु, अशाप्रकारचा विचार केल्याने फक्‍त निराशाच हाती लागेल कारण आज चमत्कारिकपणे कोणाला बरं करण्याचं आश्‍वासन देव देत नाही.—१ करिंथकर १२:३०; १३:८, १३.

आपण मरणार नाही—देव ‘मोठे संकट’ आणील तेव्हा आपण जिवंत असणार अशी कदाचित तुम्ही आशा केली असेल. (प्रकटीकरण ७:१४, १५; योहान ११:२६) असं असल्यास, तुम्हाला जीवघेणा आजार जडलाय हे कळाल्यावर तुम्हाला कदाचित आणखीनच धक्का बसेल. आपण यहोवाला दुखावण्याजोगं काही काम केलंय का असं तुम्हाला वाटू लागेल किंवा आपल्या सचोटीची खास परीक्षा घेण्याचं देवाच्या मनात आहे असा विचार तुम्ही कदाचित कराल. परंतु, हे योग्य निष्कर्ष नाहीत. “देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही,” असे देवाचे वचन, बायबल म्हणते. (याकोब १:१३) आजारपण आणि मृत्यू या सद्य मानवी स्थितीच्या दुर्दैवी घटना आहेत आणि आपण सर्व ‘कालवश व दैववश आहोत.’—उपदेशक ९:११.

भयाचा सामना करणे

एखादा गंभीर आजार झाल्यामुळं आयुष्यात पहिल्यांदा तुम्हाला खूप भीती देखील वाटेल. जीवनाशी झगडताना तुम्हाला कसे वाटते (इंग्रजी) या पुस्तकात गंभीर आजार असलेल्या १४ युवकांना काय वाटलं ते सांगण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, दहा वर्षांच्या ॲन्टॉनला दम्याच्या जोरदार झटक्यात आपण मरणार अशी भीती वाटत होती. बोन कॅन्सर असलेल्या १६ वर्षांच्या एलिझाबेथला आपण झोपलो तर पुन्हा उठणारच नाही अशी भीती होती.

पण, काही युवकांना मात्र विचित्रच प्रकारची भीती असते—कुणीही आपल्याशी लग्न करणार नाही किंवा आपल्याला नंतर कधीच निरोगी मुलं होणार नाहीत अशी भीती. इतर युवकांना, आपला रोग आपल्या कुटुंबाच्या सदस्यांना लागेल अशी भीती लागून राहते; त्यांचा हा रोग संसर्गजन्य आहे की नाही याकडे त्यांचं लक्ष नसतं.

हा आजार स्थिरावला किंवा सध्या त्याचा त्रास होत नसला, तरी त्याचा पुन्हा झटका आला तर परत एकदा भीती वाटू शकते. तुम्हाला अशाप्रकारची भीती वाटली असल्यास ती किती खरी असते हे तुम्हाला ठाऊक आहे. पण सुदैवाची गोष्ट म्हणजे, सुरवातीला मनाला ग्रासून टाकणाऱ्‍या नकारात्मक भावना कालांतराने शमतात. मग, तुम्ही अधिक रास्तपणे स्वतःच्या परिस्थितीचे निरीक्षण करू शकता.

आजारी असण्यामधील अडचण

“तरुण असताना आपण सगळं काही करू शकतो असं आपल्याला वाटतं,” असं आधी उल्लेखिलेला जेसन म्हणतो. “मग अचानक गंभीर आजारपणामुळं तो विचार खोटा असल्याचं तुम्हाला जाणवतं. आपल्याला एका रात्रीत म्हातारं झाल्यासारखं वाटतं कारण आपल्याला जास्त हालचाल करता येत नाही.” होय, नवीन मर्यादांना तोंड देणे कठीण वाटू शकतं.

शिवाय, दुसऱ्‍यांना तुमची परिस्थिती कळत नाही तेव्हा आणखीनच मोठी अडचण निर्माण होते असं जेसनला आढळलं. जेसनच्या आजाराला “अदृश्‍य आजारपण” म्हटलं जाऊ शकतं. त्याला पाहून तो आजारी असल्यासारखा वाटत नाही. जेसन सांगतो, “मला अन्‍न पचत नाही म्हणून मला अधिक वेळा खावं लागतं आणि इतरांपेक्षा माझं खाण्याचं प्रमाणही जास्तच आहे. पण तरीही, मी सुकडाच आहे. आणि, काही वेळा तर मी इतका थकून जातो की दुपारपर्यंत मला डोळे उघडं ठेवणंसुद्धा कठीण जातं. पण मी खादाड आहे किंवा आळशी आहे असं लोक माझ्याबद्दल बोलतात. ते म्हणतात: ‘तुला जमू शकतं हे तुला ठाऊक आहे. तू तर प्रयत्न सुद्धा करत नाहीस!’”

जेसनला लहान भावंडं आहेत आणि आधी तो त्यांना बॉल खेळायला न्यायचा तसं आता काहीच का करू शकत नाही हे ते नेहमीच समजून घेत नाहीत. जेसन म्हणतो, “पण मला ठाऊक आहे, की मला काही लागलं-खुपलं तर बरं व्हायला पुष्कळ आठवडे लागतील. ते स्वतःच्या दुखण्यांशी माझ्या आजाराची तुलना करतात आणि म्हणतात, ‘तो उगाच स्वतःकडं लक्ष वेधण्यासाठी नाटक करतोय.’ जास्तीत जास्त त्यांना पाय मुरगळ्याचा त्रास होतो म्हणून माझ्या दुखण्याबद्दल त्यांना काडीची कल्पना नाहीय.”

तुमच्या आजारपणामुळं कुटुंबाला त्रास होत असल्यास, तुम्हाला दोषभावना वाटेल. तुमच्या पालकांनाही दोषी असल्यासारखं वाटेल. जेसन म्हणतो, “माझ्या दोन्ही पालकांना वाटतं की त्यांच्याकडूनच मला हा आजार मिळाला असावा. आपल्याला आजार आहे असं मुलांनी स्वीकारलं तर बहुधा ते जमवून घेतात. पण पालकांना जास्त कठीण जातं. माझे पालक वारंवार माझ्याकडं माफी मागतात. त्यांना दोषी वाटू नये म्हणून मला सतत माझ्या परीनं सर्वंकश प्रयत्न करावे लागतात.”

डॉक्टरांकडे जाणं—काही मजा नव्हे

नेहमी नेहमी डॉक्टरांकडं जावं लागत असल्यामुळं चीड येऊ शकते. त्यामुळं आपण निकामी आणि दुर्बल आहोत असं तुम्हाला वाटू शकतं. इस्पितळात तुमच्या नंबराची वाट पाहत बसणं सुद्धा नकोनकोसं होऊ शकतं. हृदयविकार असलेला १४ वर्षांचा जोसेफ म्हणतो, “तुम्हाला . . . एकटं-एकटं वाटतं आणि तुमच्याबरोबर कुणी असतं तर किती बरं झालं असतं असं वाटतं.” पण दुःखाची गोष्ट म्हणजे, काही युवकांना अशाप्रकारचा आधार त्यांच्या पालकांकडूनही मिळत नाही.

वैद्यकीय तपासणींमुळं अधिकच राग येऊ शकतो. स्पष्ट सांगायचं तर, काही तपासण्या करायला मुळीच आवडत नसतं. मग, त्यानंतर पुन्हा रिझल्ट मिळेपर्यंत कित्येक दिवस आणि आठवडे हुरहूर लागून असते. पण लक्षात ठेवा: वैद्यकीय तपासणी ही काही शाळेतल्या परीक्षेसारखी नसते; तुम्हाला एखादी शारीरिक समस्या आहे म्हणजे तुम्ही कुठे तरी उणे पडता असा त्याचा अर्थ होत नाही.

खरं म्हणजे, तपासणीमुळं मदतदायी माहिती मिळू शकते. तपासणीमुळं, तुमच्या आजारावर सहजगत्या इलाज होण्यासारखा आहे असं निदर्शनास येऊ शकतं. किंवा, तसं नसलं, तरी असा विकार सहन कसा करावा हे तपासणीवरून कळण्यास मदत होऊ शकते. शेवटी, तुम्हाला ज्याची शंका होती तो आजार नाही असंही त्यावरून दिसून येऊ शकतं. म्हणून स्वतःच्या परिस्थितीबद्दल काहीही निष्कर्ष न काढण्याचा प्रयत्न करा.

उलट, जास्त चिंता करत बसल्यानं तुम्ही अधिकच थकून जाल. बायबल म्हणते: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते.” (नीतिसूत्रे १२:२५) त्याउलट, आपण आपल्या चिंता देवाला सांगाव्यात असं तो आमंत्रण देतो. तो आपली काळजी करतो आणि होता होईल तितक्या उत्तमपणे आपल्या समस्येचा सामना करायला तो आपल्याला त्याचं मार्गदर्शन आणि बुद्धी देईल असा भरवसा आपण केला पाहिजे.—स्तोत्र ४१:३; नीतिसूत्रे ३:५, ६; फिलिप्पैकर ४:६, ७; याकोब १:५.

आपल्या निर्माणकर्त्या यहोवा देवाने नीतिमत्त्वाच्या नवीन जगाचा उदय करण्यास तरतूद केली आहे हे जाणून आपण आनंदी होऊ शकतो. तो तर मेलेल्यांना उठवून त्यांना देखील त्या नवीन जगाचा आनंद उपभोगण्याची संधी देईल. बायबल आश्‍वासन देतं की, त्या वेळी, “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४.

तोपर्यंत, तुम्हाला गंभीर आजार सहन करावा लागेल. तरीसुद्धा, आपल्या परिस्थितीला यशस्वीरित्या तोंड देण्याकरता तुम्ही पुष्कळ व्यावहारिक गोष्टी करू शकता. यांची चर्चा आम्ही भावी लेखात करू.

[२३ पानांवरील चित्र]

तुम्ही कदाचित विचाराल, ‘देवानं माझ्यावर हे संकट का येऊ दिलं?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा