वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ७/८ पृ. २८-३०
  • रागावर नियंत्रण का ठेवावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रागावर नियंत्रण का ठेवावे?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अपरिपूर्ण मानवांचा राग
  • ख्रिश्‍चनांना जाब द्यावयाचा आहे
  • राग करणे नेहमीच चुकीचे आहे का?
    सावध राहा!—१९९४
  • स्वतःच्या व इतरांच्या रागावर नियंत्रण ठेवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • राग—तो काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • मला राग का येतो?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-४ (gbr8-4)
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ७/८ पृ. २८-३०

बायबलचा दृष्टिकोन

रागावर नियंत्रण का ठेवावे?

अनिल आणि शीलाच्याa वैवाहिक जीवनाची सुरवातच अभद्र झाली. आपल्या नववधूच्या अंगावर ओरडत अनिलने तिला बजावून सांगितले, “या घरात आता मी म्हणेन तसं वागायचं, हा असा सतरा घंटे उशीर झालेला चालणार नाही, कळलं का?” तिला बसलेल्या ठिकाणावरून न उठू देता तो तब्बल ४५ मिनिटे, तिच्या अंगावर ओरडत राहिला. अशाप्रकारचे अपमानास्पद संभाषण त्यांच्या वैवाहिक जीवनात रोजचाच प्रकार बनला. दुःखाची गोष्ट अशी की अनिलची ही क्रोधाविष्ट वागणूक दिवसेंदिवस वाढतच गेली. रागाच्या भरात तो दारे आपटायचा, टेबलावर हात आपटायचा आणि बेभान होऊन गाडी चालवताना स्टिअरींग व्हीलवरही बुक्क्या मारायचा ज्यामुळे इतरांचाही जीव धोक्यात येत असे.

खेदाने म्हणावे लागते आणि तुम्हालाही याची चांगली कल्पना असेलच की असली दृश्‍ये काही नवीन नाहीत. या माणसाचा राग रास्त होता का, की त्याचा स्वतःवरचा ताबा सुटत होता? राग येणे हे मुळातच अयोग्य आहे का? राग अनियंत्रित झाला आहे हे केव्हा समजावे? तो अनावर झाला आहे हे केव्हा म्हणता येईल?

नियंत्रणात असलेला राग रास्त असू शकतो. उदाहरणार्थ, प्राचीन काळातील दोन अनैतिक शहरे सदोम व गमोरा यांवर देवाचा कोप भडकला होता. (उत्पत्ति १९:२४) का? कारण या शहरांचे रहिवासी हिंसक आणि नीच लैंगिक कृत्ये करायचे आणि यासाठी ते त्या सबंध परिसरात कुविख्यात होते. जसे, नीतिमान लोटाच्या घरी संदेश घेऊन आलेले देवदूत आले असता, काही तरुणांनी आणि त्यांच्यासोबत काही वयस्क माणसांनीही लोटाच्या पाहुण्यांवर सामुहिक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या भयंकर अनैतिकतेमुळे यहोवा देवाला क्रोध येणे अगदी रास्त होते.—उत्पत्ति १८:२०; १९:४, ५, ९.

प्रसंगी, येशू ख्रिस्तावरही त्याच्या पित्याप्रमाणेच क्रोधाविष्ट होण्याची पाळी आली. जेरूसलेम येथील मंदिर खरे तर देवाच्या निवडलेल्या लोकांकरता एक उपासनेचे केंद्र होते. जेथे येऊन लोक देवाला आपले वैयक्‍तिक बलिदान व यज्ञार्पणे देऊ शकतील, जेथे त्यांना देवाच्या मार्गांत चालण्याचे शिक्षण आणि त्यांच्या पापांची क्षमा मिळू शकेल असे एक “प्रार्थनामंदिर” ते असायला हवे होते. जेथे लोकांना देवाशी जणू संभाषण करता येईल असे ठिकाण ते असायला हवे होते. पण त्याऐवजी, येशूच्या काळातील धर्ममार्तंडांनी या मंदिराला ‘बाजारपेठेचे’ आणि ‘लुटारूंच्या गुहेचे’ रूप दिले होते. (मत्तय २१:१२, १३; योहान २:१४-१७) बलिदानासाठी वापरण्यात येणाऱ्‍या प्राण्यांच्या विक्रीतून त्यांना स्वतःला धनलाभ होत असे. ते आपल्या कळपातील लोकांजवळ जे काही होते नव्हते ते सर्व खऱ्‍या अर्थाने बुचाडून काढत होते. त्याअर्थी, देवाच्या पुत्राचे या उपट्यांना आपल्या पित्याच्या घरातून हाकून लावणे पूर्णपणे रास्त होते. येशूचा राग समजण्याजोगा होता!

अपरिपूर्ण मानवांचा राग

काहीप्रसंगी, अपरिपूर्ण मानवांचे क्रोधाविष्ट होणे देखील रास्त असते. मोशेच्या बाबतीत काय झाले ते लक्षात घ्या. इस्राएल राष्ट्राला नुकतीच इजिप्त देशातून चमत्कारिकपणे सुटका मिळाली होती. यहोवाने इजिप्तमधील लोकांना दहा पीडांनी त्रस्त करून इजिप्तच्या खोट्या देवतांपेक्षा आपण सामर्थ्यशाली आहोत हे मोठ्या नाट्यमयरित्या प्रकट केले होते. त्यानंतर त्याने तांबड्या समुद्राला दुभागून, यहुद्यांना पळ काढण्यासाठी वाट करून दिली. पुढे, त्यांना सिनाय पर्वताच्या पायथ्याशी नेण्यात आले आणि येथे त्यांचे एक राष्ट्र या नात्याने संघटन झाले. देवाचे नियम प्राप्त करण्याकरता मध्यस्थाच्या भूमिकेत, मोशे पर्वतावर चढून गेला. इतर नियमांशिवाय, यहोवाने मोशेला दहा आज्ञा देखील दिल्या; या आज्ञा देवाने पर्वतातून कोरलेल्या खडकांच्या पाट्यांवर स्वतः ‘देवाच्या बोटाने लिहिलेल्या’ होत्या. पण मोशे पर्वतावरून खाली आला, तो त्याला काय दिसले? लोक एका सोन्याच्या वासराची उपासना करू लागले होते! ते किती लवकर सर्वकाही विसरले! अवघ्या काही आठवड्यांतच. रास्तपणे, “[मोशेचा] राग भडकला.” त्याने त्या दगडी पाट्या फोडून टाकल्या आणि वासराची ती मूर्तीही नष्ट केली.—निर्गम ३१:१८; ३२:१६, १९, २०.

नंतर, एकदा लोकांनी पाण्याच्या टंचाईविषयी कुरकूर केली तेव्हा मोशे क्रोधित झाला होता. तो इतका बिथरला की ज्या नम्रतेसाठी अर्थात मंदक्रोधपणासाठी तो नावजलेला होता त्याचे देखील त्याला भान राहिले नाही. यामुळे त्याच्या हातून एक गंभीर चूक झाली. इस्राएल राष्ट्राच्या गरजा पुरवणारा या नात्याने यहोवाची स्तुती करण्याऐवजी, मोशे लोकांना अगदी टाकून बोलला आणि आपला भाऊ अहरोन याकडे आणि स्वतःकडे लक्ष आकर्षित करू लागला. यामुळे मोशेला शिक्षा देणे देवाला योग्य वाटले. वाग्दत्त देशात प्रवेश करण्याची संधी मोशेच्या हातून गेली. मरीबा येथे घडलेल्या या घटनेनंतर मोशे क्रोधित झाल्याचा कोठेही उल्लेख आढळत नाही. अर्थातच त्याचे डोळे उघडले असावेत.—गणना २०:१-१२; अनुवाद ३४:४; स्तोत्र १०६:३२, ३३.

देवात आणि मानवांत फरक आहे. यहोवा आपला ‘राग आवरू’ शकतो आणि म्हणूनच त्याला अगदी यथायोग्यपणे “मंदक्रोध” म्हणण्यात आले आहे कारण त्याचा प्रमुख गुण राग नव्हे तर प्रीती आहे. त्याचा राग नेहमी नीतिमत्तेला धरून, नेहमी रास्त, नेहमी नियंत्रणात असतो. (निर्गम ३४:६; यशया ४८:९; १ योहान ४:८) परिपूर्ण मनुष्य येशू ख्रिस्त याने आपला राग व्यक्‍त करताना नेहमी स्वतःवर नियंत्रण ठेवले; त्याला “सौम्य” म्हणण्यात आले. (मत्तय ११:२९) दुसरीकडे पाहता, अपरिपूर्ण मानव, मग ते मोशेसारखे विश्‍वासू पुरुष असले तरीसुद्धा त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे जड गेले.

तसेच, लोक सहसा नंतरच्या परिणामांची हवी तितकी दखल घेत नाहीत. आपला राग अनावर होऊ दिल्यास कदाचित त्यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागेल. उदाहरणार्थ, समजा एखाद्या नवऱ्‍याने आपल्या बायकोवर संतापून, रागाच्या भरात भिंतीवर ठोसा मारून त्याठिकाणी खड्डा पाडला, तर साहजिकच याचे काय परिणाम होतील? मालमत्तेचे नुकसान. शिवाय, त्याच्या हातालाही दुखापत होऊ शकते. तथापि आणखी महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या अशा चिडखोर कृत्यामुळे त्याच्या बायकोच्या मनात त्याच्याविषयी पूर्वीसारखेच प्रेम आणि आदर राहील का? भिंतीची दुरुस्ती काही दिवसांत करता येईल, आणि त्याच्या हाताला झालेली जखम देखील दोनचार आठवड्यांत भरून निघेल; पण त्याला सहजासहजी आपल्या बायकोचा विश्‍वास आणि आदर पुन्हा मिळवता येईल का?

खरे तर बायबलमध्ये, रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळे ज्यांना भयंकर परिणाम भोगावे लागले अशा कित्येक जणांची उदाहरणे आहेत. यांपैकी काही लक्षात घ्या. काइनाला आपला भाऊ हाबेल याची हत्या केल्यानंतर हद्दपार करण्यात आले. शिमोन आणि लेवी यांनी शेखेमच्या पुरुषांची कत्तल केल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना शाप दिला. उज्जीया त्याची चूक त्याच्या नजरेस आणून देणाऱ्‍या याजकांवर क्रोधित झाल्यामुळे यहोवाने त्याला कोडाने पीडित केले. योनाला “राग आला” [“क्रोधाने तापला,” NW] तेव्हा यहोवाने त्याची कानउघाडणी केली. या सर्वांना आपल्या रागाचा जाब द्यावा लागला.—उत्पत्ति ४:५, ८-१६; ३४:२५-३०; ४९:५-७; २ इतिहास २६:१९; योना ४:१-११.

ख्रिश्‍चनांना जाब द्यावयाचा आहे

तशाचप्रकारे, आजदेखील ख्रिश्‍चनांना आपल्या कृत्यांविषयी देवाला आणि काही अंशी आपल्या सहविश्‍वासू बांधवांनाही जाब द्यावा लागतो. राग या अर्थाने बायबलमध्ये वापरलेल्या ग्रीक शब्दांवरून याचा प्रत्यय येतो. सहसा वापरलेल्या दोन शब्दांपैकी एक म्हणजे ओर्जे. या शब्दाचे बहुतेकवेळा ‘क्रोध’ असे भाषांतर केले जाते आणि या शब्दांत जाणीवपूर्वक आणि हेतुपूर्वक, बहुधा सूडभावनेने केलेल्या कृतीचा घटक आहे. म्हणूनच तर पौलाने रोमी ख्रिश्‍चनांना आग्रहाने विनवले: “प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला [ओर्जे] वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.” आपल्या बांधवांविषयी मनात राग बाळगण्याऐवजी, ‘बऱ्‍याने वाइटाला जिंका,’ असे प्रोत्साहन त्यांना देण्यात आले.—रोमकर १२:१९, २१.

सहसा वापरण्यात येणारा आणखी एक शब्द म्हणजे थायमॉस. या शब्दाची ज्यातून उत्पत्ती झाली त्या मूळ शब्दात “वायू, पाणी, जमीन, प्राणी किंवा माणसांच्या प्रक्षुब्ध हालचालींचा संकेत आढळतो.” त्याअर्थी या शब्दाचे पुढीलप्रमाणे वेगवेगळ्या शब्दांत वर्णन करता येईल—“वैर भावनेचा आवेशपूर्ण विस्फोट,” “क्रोधाचा उमाळा,” किंवा “मनाचे संतुलन बिघडवणाऱ्‍या आणि घरात तसेच समाजात भांडणतंटे उत्पन्‍न करणाऱ्‍या वादळी भावना.” आपल्या रागावर नियंत्रण करू न शकणारे स्त्रीपुरुष, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय उफाळून तप्त राख, खडक आणि लाव्हारस ओकणाऱ्‍या ज्वालामुखीसारखे असतात जी माणसाला दुखापत करू शकते, अपंग बनवू शकते आणि त्याचा जीवही घेऊ शकते. थायमॉस या शब्दाचे अनेकवचनी रूप गलतीकर ५:२० येथे वापरण्यात आले आहे; येथे पौल जारकर्म, कामातुरपणा, आणि दारूबाजी यांसारख्या ‘देहाच्या कर्मांसोबत’ (१९ वे वचन) ‘रागाचाही’ [“रागाचे झटके,” NW] उल्लेख करतो. नक्कीच सुरवातीला वर्णन केलेल्या—अनिलच्या वर्तनाला—‘रागाचा झटकाच’ म्हणता येईल.

तर मग, ख्रिस्ती मंडळीसोबत सहवास राखणारे जे लोक इतरांच्या जिवाला आणि मालमत्तेला धोकेदायक ठरतील अशी हिंसक कृत्ये वारंवार करतात, अशांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जावे? अनियंत्रित क्रोध घातक असून तो सहज हिंसाचारात रूपांतरीत होऊ शकतो. यामुळेच, “जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल,” हे येशूचे म्हणणे यथातथ्य होते. (मत्तय ५:२१, २२) पतींना सल्ला देण्यात आला आहे: “आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, व तिच्याशी निष्ठुरतेने [“रागाच्या भरात कटुतेने,” NW] वागू नका.” “रागीट” असणारा मंडळीत पर्यवेक्षक बनण्यास पात्र नाही. म्हणूनच, जे आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत अशांना मंडळीकरता अनुकरणीय उदाहरण समजण्यात येऊ नये. (कलस्सैकर ३:१९; तीत १:७; १ तीमथ्य २:८) खरे तर, व्यक्‍तीची प्रवृत्ती, वागण्याची पद्धत, आणि इतरांच्या जिवाला झालेल्या नुकसानाची तीव्रता लक्षात घेऊन अनियंत्रित रागाच्या झटक्यांचा प्रतिकार न करणाऱ्‍याची मंडळीतून हकालपट्टीही होऊ शकते—केवढा भयंकर परिणाम!

सुरवातीला ज्याच्याविषयी सांगण्यात आले होते त्या अनिलने कधी आपल्या भावनांवर ताबा मिळवला का? तो ज्या भयंकर वेगाने संकटाकडे वाटचाल करत होता त्या मार्गावरून तो कधी मागे फिरू शकला का? खेदाने म्हणावे लागते, पण त्याची ओरडाओरड तेवढ्यावरच थांबली नाही, उलट धक्काबुक्की करण्यापर्यंत त्याची मजल गेली. पूर्वी तिच्याकडे बोट दाखवणारा आता त्याच बोटाने तिला अक्षरशः वेदना होईपर्यंत टोचू लागला. तिच्या शरीरावर सहज दिसेल अशा ठिकाणांवर तो तिला दुखापत करण्याचे मोठ्या चलाखीने टाळायचा आणि अशा तऱ्‍हेने तो आपल्या दुर्वर्तनावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असे. पण पुढे तर तो, लाथाबुक्क्या मारणे, केस ओढणे आणि याहूनही नीच प्रकार करू लागला. आता शीला अनिलपासून विभक्‍त झाली आहे.

हे सर्व टाळता आले असते. अशाच प्रकारच्या परिस्थितींत असणाऱ्‍या कित्येकांनी यशस्वीपणे आपल्या रागावर ताबा मिळवला आहे. येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण उदाहरणाचे अनुकरण करणे खरोखर किती महत्त्वाचे आहे. एकदाही अनियंत्रितपणे क्रोधाविष्ट होण्याचा त्याच्यावर दोष लावता येणार नाही. त्याचा राग नेहमी नीतिमत्तेला धरून होता; त्याचा स्वतःवरचा ताबा कधीच सुटला नाही. पौलाने आपल्या सर्वांना हा सुविद्य सल्ला दिला: “तुम्ही रागावा, परंतु पाप करु नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” (इफिसकर ४:२६) मानव याअर्थी आपल्या मर्यादा आणि आपण जे पेरतो तेच उगवते हे सत्य, नम्रपणे मान्य करून रागाला आळा घालणेच यथायोग्य आहे.

[तळटीप]

a नावे बदलण्यात आली आहेत.

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

दाविदाला जिवे मारण्याचा शौलाचा प्रयत्न/The Doré Bible Illustrations/Dover Publications, Inc.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा