वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ७/८ पृ. ३१
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नकली प्रेस्क्रिपशन औषधांबद्दल दक्ष असा
  • हाडांचे व्यापारी
  • वेळेपेक्षा अधिक काही सांगणारी घड्याळे
  • सदोष दृष्टी
  • ऐतिहासिक कापणी
  • सिंगापूरचे विद्यार्थी वरचढ ठरतात
  • शस्त्रक्रियेदरम्यान गरम ठेवलेले रुग्ण
  • अठराविश्‍वे दारिद्र्‌यापासून गडगंज संपत्तीपर्यंत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • माणसे धरणारे अशी सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
सावध राहा!—१९९७
g97 ७/८ पृ. ३१

जगावरील दृष्टिक्षेप

नकली प्रेस्क्रिपशन औषधांबद्दल दक्ष असा

सोळा अब्ज डॉलर्सची वार्षिक विक्री होत असल्यामुळे, नकली औषधांचा व्यापार फोफावत आहे. ला माँड या पॅरिस वृत्तपत्रानुसार, “जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) असा अंदाज करते, की दरवर्षी जगभरात विकली जाणारी निदान ७ टक्के औषधे तरी नकली असतात.” ब्राझीलमध्ये हेच प्रमाण ३० टक्के तर आफ्रिकेत ६० टक्के इतके असावे. नकली औषधांमध्ये मूळ उत्पादनाला क्षीणवून तयार केलेल्या नकली पदार्थांपासून संपूर्णतः निकामी किंवा विषारी पदार्थांपर्यंतची सर्व औषधे समाविष्ट होतात. ला माँड, नायजर येथील एका परिमस्तिष्क ज्वराच्या साथीचे उदाहरण देते, की ज्या ठिकाणी हजारो लोकांना लस टोचण्यात आली पण ते केवळ पाणीच होते हे नंतर उघडकीस आले. त्याचप्रमाणे नायजेरियात, १०९ मुलांना गोठण प्रतिबंधक पदार्थ मिसळलेले सिरप दिल्यावर ती मुले मरण पावली. “काळ्या बाजारात सर्वकाही अधिक माफक किंमतीत मिळत असल्यामुळे इस्पितळेच स्वतःहून त्यांच्याकडे वळतात,” असे ते वृत्तपत्र म्हणते. अनेक देशांमध्ये ढिले किंवा भ्रष्ट कायदेकानून असल्यामुळे या समस्येचे निरसन करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्‍यांच्या नाकी नऊ येण्याची पाळी आली आहे.

हाडांचे व्यापारी

“युद्धग्रस्त काबुलमधील हपापलेले रहिवासी कोंबड्यांच्या खुराकासाठी मानवांची हाडे उकरून ती विकत आहेत,” असे रॉयटर्स वृत्त सेवेचा अहवाल आहे. हाडामध्ये कॅल्शियम, फॉस्फेट आणि कार्बोनेट यांचे अधिक प्रमाण असल्यामुळे प्राण्यांचा खुराक, साबण आणि खाद्य तेल यांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. सुमारे सहा किलो वजनाच्या सापळ्यासाठी ५० सेंटची किंमत मोजली जाऊ शकते; त्या अत्यंत गरीब शहरामध्ये ही रक्कम तुलनात्मकपणे अतिशय मोठी आहे. “हा धंदा चांगला आहे,” असे १४ वर्षांचा फेझदीन म्हणतो. “मी सहसा प्राण्यांची हाडं गोळा करत असलो, तरी मानवांची हाडं इथं लवकर सापडतात.” दुःखाची गोष्ट अशी की, इतक्या वर्षांपासून मुलकी युद्धाने वेढलेल्या या अफगानिस्तानमध्ये खनिजाचे प्रमाण अधिक असलेला हा पदार्थ अगदीच सहजगत्या उपलब्ध आहे.

वेळेपेक्षा अधिक काही सांगणारी घड्याळे

रीउ दे झानेइरु येथे, ७७ विद्यार्थ्यांना विद्यापीठातील प्रवेश परीक्षा देताना डिजिटल घड्याळ्यांच्या साहाय्याने कॉपी केल्याचे उघडकीस आल्यावर अपात्र ठरवण्यात आले असा अहवाल उ ग्लोबु या वृत्तपत्राने दिला. ही घड्याळे टेलिफोन पेजरसारखी चालत होती; पण टेलिफोन नंबर दिसण्याऐवजी त्यांच्यामध्ये परीक्षेतील प्रश्‍नांची अचूक उत्तरे दिसत होती. त्या वृत्तपत्रानुसार, प्रत्येक घड्याळासाठी विद्यार्थ्यांनी १४,००० डॉलर इतकी मोठी किंमत मोजली आहे. मनोरंजक गोष्ट अशी की, १९८७ मध्येसुद्धा इंग्लंड आणि वेल्स येथील शाळा परीक्षा बोर्डांनी शिक्षकांना, संगणकीकृत घड्याळ्यांनी फसवेगिरी करणाऱ्‍या मुलांविषयी दक्ष असण्याचा इशारा दिला होता.

सदोष दृष्टी

अनेक लोक आरशात पाहून प्रतिबिंबित झालेली प्रतिमा—स्वतःचाच चेहरा—स्वीकारतात. पण, बॉडी डाइस्मॉर्फिक विकृती नामक स्थितीत असलेले लोक आरशात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःची सदोष प्रतिमा दिसू लागते. “ही अशी स्थिती आहे, की ज्यामध्ये लोक एकाच अंगाचा विचार करत राहतात आणि तो अंग अतिशय विद्रूप आहे अशी कल्पना करत राहतात, पण खरे पाहता त्यात काहीच दोष नसतो,” असे कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाचे द प्रॉविन्स हे बातमीपत्र म्हणते. न्यूयॉर्क येथील मानसशास्त्रज्ञ एरीक हॉलंडर यांच्या मते, कल्पित दोषांबद्दलचे दुःख इतके तीव्र असू शकते की, ही विकृती असलेले सुमारे २५ टक्के लोक शेवटी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.

ऐतिहासिक कापणी

“चीनच्या इतिहासात पहिल्यांदा, गव्हाच्या शेतींमध्ये यंत्रे मानवापेक्षा वरचढ ठरली आहेत,” असा अहवाल रॉयटर्स वृत्त सेवेने दिला. त्या वृत्तानुसार कापणी करणारी ८,००,००० पेक्षा अधिक यंत्रे उपयोगात आणली होती. सा.यु.पू. १३०० च्या काही समयाआधी चीनमध्ये गहू प्रथम आणला गेला होता, आणि तेव्हापासून आजपर्यंत लहान कौटुंबिक शेतींवर त्याची लागवड—बहुधा हातांनीच—यशस्वीरीत्या केली गेली आहे. चीनची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येतील २० टक्क्यांपेक्षा अधिक आहे पण केवळ ७ टक्के जमीन मशागत करण्याजोगी असल्याने, “कृषी अधिकारी आपल्या राष्ट्रातील यांत्रिकीकरण वाढवण्यास उत्सुक आहेत,” असे अहवाल म्हणतो.

सिंगापूरचे विद्यार्थी वरचढ ठरतात

एकेचाळीस राष्ट्रांतील पाच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी जगभरातील शिक्षणाच्या दर्जाची तुलना करण्यासाठी ९० मिनिटांची एक परीक्षा घेतली. परिणाम? परीक्षेच्या निकालांवरून दिसून येते की, गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये सिंगापूर जगातील सर्वोत्तम विद्यार्थी तयार करत आहे. सिंगापूरनंतर, दक्षिण कोरिया, जपान, हाँग काँग, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, स्लोवाक प्रजासत्ताक, स्वित्झर्लंड, नेदरलंड आणि स्लोव्हेनिया ही राष्ट्रे गणितात नंबर पटकावणारे सर्वोत्तम दहा देश आहेत. सिंगापूर, झेक प्रजासत्ताक, जपान, दक्षिण कोरिया, बल्गेरिया, नेदरलंड, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि इंग्लंड या राष्ट्रांनी विज्ञानात सर्वोत्तम मार्क पटकावले. फक्‍त सुमारे ३४,००,००० लोकसंख्या असलेले राष्ट्र संपूर्ण जगापेक्षा वरचढ कसे ठरू शकले? कदाचित मेहनतीपणामुळे. सिंगापूरमधील विद्यार्थी दररोज गृहपाठ करण्यात सरासरीने ४.६ तास घालवतात, तर आंतरराष्ट्रीय सरासरीचे प्रमाण २ ते ३ तासांचे आहे असे वृत्त एशियावीक देते.

शस्त्रक्रियेदरम्यान गरम ठेवलेले रुग्ण

हवेतील सूक्ष्मजंतूंची वाढ कमी करण्यासाठी थंड ठेवल्या जात असलेल्या इस्पितळातील शस्त्रक्रिया खोल्यांमुळे उलट संसर्गाचा धोका तिप्पट होतो, असा दावा कॅलिफोर्निया विद्यापीठाचे भूलशास्त्रज्ञ डॅनिएल सेस्लर यांच्या नवीन अभ्यासात केला आहे. “जखमेतील संसर्ग हवेतल्या सूक्ष्मजंतूंमुळे होत नाही, तर त्वचेवरील किंवा शरीरातील सूक्ष्मजंतूंचा प्रतिकार करण्याची रुग्णाची शक्‍ती कमी झाल्यामुळे हे होते,” असे डॉ. सेस्लर म्हणतात. थंड शस्त्रक्रिया खोल्यांमुळे रुग्णाच्या शरीराचे तापमान –१६ अंश सेल्सियसपर्यंत कमी होऊ शकते. आणि शरीराचे तापमान कमी झाल्यामुळे ऑक्सिजनयुक्‍त रक्‍ताचा प्रवाह कमी होतो जे की संसर्गाचा प्रतिकार करण्यास आवश्‍यक आहे. सेस्लर यांच्या मते, “शरीर थंड पडते तेव्हा प्रतिकारासाठी जबाबदार असलेल्या पेशी आणि इन्झाइमे निकामी ठरतात.” सेस्लर आणि त्यांच्या सहकर्मचाऱ्‍यांना असे आढळले की, शस्त्रक्रियेच्या दरम्यान ज्या रुग्णांच्या शरीराचे तापमान सर्वसाधारण ठेवण्यात आले त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण तर कमीच होते शिवाय, ज्यांचे शरीर गरम ठेवण्यात आले नव्हते त्या इतर रुग्णांपेक्षा या रुग्णांनी इस्पितळात सुमारे तीन दिवस कमी घालवले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा