पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन
राग करणे नेहमीच चुकीचे आहे का?
“राग हा तात्पुरता वेडेपणा आहे.” याप्रकारे, सर्वात तीव्र भावनांपैकीच्या एकाबद्दल होरेस नावाच्या प्राचीन रोमी कवीने एक सामान्य दृष्टिकोन सांगितला. राग हा तात्पुरता वेडेपणा आहे याजशी सर्वजण सहमत नाहीत. तरीसुद्धा, पुष्कळांना तो मूळचा वाईट आहे असे वाटते. सहाव्या शतकातच कॅथोलिक मठवासियांनी “सात महापातके” या प्रसिद्ध यादीचा संग्रह करून रचना केली. यात काही आश्चर्य नाही की, त्या यादीत रागाचेही नाव होते.
त्यांना तसे का वाटले असावे हे पाहणे सोपे आहे. पवित्र शास्त्र म्हणतेच: “राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर.” (स्तोत्रसंहिता ३७:८) तसेच प्रेषित पौलाने इफिसकरातील मंडळीला आग्रहाने विनंती केली: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह दूर करण्यात येवोत.”—इफिसकर ४:३१.
तरीपण, तुम्ही स्वतःशी विचार करू लागाल की, ‘रागाबद्दलच्या पवित्र शास्त्रीय दृष्टिकोनाबाबतीत एवढेच सर्वकाही आहे का? शेवटी, पौलाने देखील असे भाकीत केले नाही का की, आम्ही राहात असलेल्या “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील”?’ (२ तीमथ्य ३:१-५) या काळात लोक ‘क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, ममताहीन’ आहेत. तर मग, या काळात जगताना, थोडे देखील क्रोधिष्ट न होण्याची अपेक्षा खरोखर देव आम्हाकडून करतो काय?
समतोल दृष्टिकोन
या विषयाला पवित्र शास्त्र ज्याप्रकारे हाताळते ते इतके साधे नाही. उदाहरणार्थ, इफिसकर ४:२६ मधील पौलाच्या शब्दांची नोंद घ्या: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका.” राग आपोआपच एक “महापातक” ठरले असते तर, ते चिरकालिक शिक्षेला पात्र असल्यामुळे हे वचन फारच गोंधळविणारे असले असते.
स्तोत्रसंहिता ४:४ मध्ये असे वाचले जाते: “त्याची भीती बाळगा, पाप करू नका.” पौल याचेच अवतरण घेऊन बोलला होता. वाईन्स् एक्सपोसिटरी डिक्शनरी ऑफ बिब्लीकल वर्डस् याप्रमाणे, येथे रा-गाज या इब्री शब्दाचे भाषांतर, “त्याची भीती बाळगा” असे करण्यात आले आहे. त्याचा अर्थ “तीव्र भावनेने थरकापणे” असा होतो. परंतु कोणत्या तीव्र भावनेने? तो राग होता का? स्तोत्रसंहिता ४:४ च्या सेप्ट्यूजीन्ट भाषांतरात, रा-गाज याचे ग्रीक मध्ये “क्रोधिष्ट होणे,” असे भाषांतर केले होते. येथे देखील पौलाला तेच म्हणायचे होते.
पवित्र शास्त्र रागास अनुमती का देईल बरे? कारण सर्वच प्रकारचा राग वाईट नसतो. एका पवित्र शास्त्र टिकाकाराने म्हटल्याप्रमाणे, “मनुष्याचा राग कधीच न्याय्य नसतो व स्वैराचारी[राग]” शास्त्रवचनीय नाही. आर.सी.एच.लेन्सकी या पवित्र शास्त्रीय विद्वानाने, इफिसकर ४:२६ बद्दल असे मत उचितपणे व्यक्त केले: “सर्व प्रकारच्या रागाची मनाई करणारे व प्रत्येक परिस्थितीत संथ शांततेची मागणी करणारे नीतीशास्त्र, ख्रिस्ती नसून आत्मसंयमी आहे.” अशाचप्रकारे प्राध्यापक विल्यम बार्कले यांनी निरिक्षिले: “ख्रिस्ती जीवनात राग असावा परंतु, तो योग्य प्रकारचा राग असावा.” परंतु, “योग्य प्रकारचा राग” याचा काय अर्थ होतो?
नीतीमान राग
शास्त्रवचनात पुनः-पुन्हा यहोवाला राग येत असल्याचे किंवा त्याचा राग व्यक्त करत असल्याचे वर्णन दिले आहे. परंतु, राग हा त्याचा प्रमुख गुण नाही. तथापि, दोन कारणांसाठी त्याचा क्रोध नेहमी नीतीमान आहे. एक म्हणजे, उचित आधाराविना त्याला कधीच राग येत नाही. दुसरे म्हणजे, तो त्याचा राग न्याय्य आणि नीतीमान मार्गाने व्यक्त करतो. त्याचा ताबा कधीच सुटत नाही.—निर्गम ३४:६; स्तोत्रसंहिता ८५:३.
जाणूनबुजून केलेल्या अधार्मिकतेमुळे यहोवा क्रोधिष्ट होतो. उदाहरणार्थ, त्याने इस्राएलांना सांगितले की, त्यांनी निराधार स्त्रिया किंवा मुलांना छळले तर, तो अशांचे ‘गाऱ्हाणे अवश्य ऐकेल.’ त्याने ताकीद दिली: ‘माझा राग भडकेल.’ (निर्गम २२:२२-२४; पडताळा नीतीसूत्रे २१:१३.) येशूला त्याच्या पित्याप्रमाणेच मुलांबद्दल विशेष आपुलकी होती. एकदा, त्याच्या शिष्यांनी चांगल्या उद्देशाने मुलांना त्याच्याजवळ येण्यापासून थांबवले. तेव्हा, “येशूला संताप आला.” त्याने त्या मुलांना कवटाळले. (मार्क १०:१४-१६, NW) लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, “संताप” यासाठी वापरण्यात आलेला ग्रीक शब्द मूलतः “शारीरिक दुखापत किंवा चिडचिडणे” यास सूचित करतो. त्याच्या निश्चितच तीव्र भावना होत्या!
व्यापाऱ्यांनी आणि पैशांची देवाणघेवाण करणाऱ्यांनी येशूच्या पित्याच्या उपासनेच्या घराला “लुटारूंची गुहा” बनवली. ते पाहिल्यावर येशूच्या हृदयात अशाचप्रकारचा नीतीमान संताप निर्माण झाला. त्याने त्यांच्या बैठक्या पालथ्या केल्या. त्यांना तेथून बाहेर हाकून लावले! (मत्तय २१:१२, १३; योहान २:१५) परुशी आणि शास्त्री, मदतीची आवश्यकता असणाऱ्या आजाऱ्यांची चिंता करण्याऐवजी, शब्बाथाच्या कमी महत्त्वाच्या नियमाला अधिक महत्त्व देत होते. तेव्हा, येशूने “त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले.”—मार्क ३:५, फिलिप्स्.
त्याचप्रमाणे, प्राचीन काळातील विश्वासू मोशेला, अविश्वासू इस्राएलांमुळे नीतीमान संताप आला होता. त्यामुळे, त्याने नियम शास्त्राच्या पाट्या आपटल्या. (निर्गम ३२:१९) इस्राएलांनी विवाहाच्या बाबतीत देवाच्या नियमाचा आज्ञाभंग केला तेव्हा, धार्मिक शास्त्री एज्रा इतका चिडला की त्याने त्याची वस्त्रे फाडली व डोक्याचे काही केस देखील उपटले!—एज्रा ९:३.
‘बऱ्याची आवड धरणारे’ सर्वजण ‘वाईटाचा द्वेष करण्यास’ झटतात. (आमोस ५:१५) यास्तव, ख्रिश्चनांनी क्रूरता, ढोंगीपणा, अप्रामाणिकपणा, अविश्वासूपणा किंवा अन्याय पाहिल्यावर त्यांच्या हृदयात नीतीमान राग भरून येतो असे त्यांना वाटेल.
रागाला उचितपणे हाताळणे
पवित्र शास्त्र बहुतेक वेळा रागाची तुलना अग्नीसोबत करते हा कोणता योगायोग नव्हे. अग्नीप्रमाणेच त्याचे विशिष्ट स्थान आहे. तो भयंकर नाशकारक देखील असू शकतो. बहुतेक वेळा, यहोवा व येशूप्रमाणे नसून, मानवांना उचित आधाराविना राग येतो, किंवा ते अयोग्यपणे त्यांचा राग व्यक्त करतात.—पाहा उत्पत्ती ४:४-८; ४९:५-७; योना ४:१, ४, ९.
दुसऱ्या बाजूस पाहता, एखाद्याचा राग दाबून ठेवणे व राग आलाच नाही असा बहाणा करणे, हे देखील धार्मिकतेचे ठरणार नाही. पौलाने दिलेला सल्ला लक्षात ठेवा: “तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” (इफिसकर ४:२६) ‘आपल्या मनाशी विचार करणे,’ कोणा प्रौढ भरवसा ठेवण्यालायक व्यक्तीला आपल्या भावना सांगणे, किंवा चुक करणाऱ्या व्यक्तीला शांतपणे तोंड दिल्याने देखील राग व्यक्त करण्याचे शास्त्रवचनीय मार्ग आहेत.—स्तोत्रसंहिता ४:४; नीतीसूत्रे १५:२२; मत्तय ५:२३, २४; याकोब ५:१४.
यास्तव, निःशंकपणे असे म्हणता येईल की राग करणे हे नेहमीच चुकीचे नाही. यहोवा व येशू दोघेही रागावले होते—व ते पुन्हा रागावतील! (प्रकटीकरण १९:१५) आम्हाला त्यांचे अनुकरण करावयाचे आहे तर, राग न करणे चुकीचे असेल अशा परिस्थितींना देखील आम्हाला तोंड द्यावे लागेल! पवित्र शास्त्रीय सल्ल्याप्रमाणे चालणे हे त्याचे उत्तर असेल. आमच्या भावनांसाठी एक भक्कम आधार आहे, याची आम्ही खात्री केली पाहिजे. आम्ही त्यांस योग्य, ख्रिस्ती पद्धतीने व्यक्त केल्या पाहिजेत. (g94 4/8)
[१४ पानांवरील चित्र]
काईन व हाबेल