वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ६/८ पृ. १८-२१
  • टास्मानिया लहान बेट, विलक्षण कथा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • टास्मानिया लहान बेट, विलक्षण कथा
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • टास्मानिया “साम्राज्याचे कारागृह”
  • एक संपूर्ण जमात नामशेष
  • टास्मानियाची दृश्‍यमान तफावत
  • द्वीपाचा अधिक प्रशांत चेहरामोहरा
  • छळाच्या प्रदेशातून आध्यात्मिक परादीसकडे
  • पट्टेरी लांडगा तुम्ही पाहिला आहे का?
    सावध राहा!—१९९५
  • तरुणांच्या मृत्यूची शोकांतिका
    सावध राहा!—१९९८
  • निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची माझी इच्छा कायमची तृप्त होईल
    सावध राहा!—१९९८
  • यहोवानं मला त्याच्या इच्छेनुसार करण्यास शिकवलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
सावध राहा!—१९९७
g97 ६/८ पृ. १८-२१

टास्मानिया लहान बेट, विलक्षण कथा

ऑस्टेलियातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

“दक्षिण समुद्रांत, आमच्या हाती लागलेला हा अव्वल प्रदेश असल्यामुळे, शिवाय अन्य कोणत्याही युरोपीय राष्ट्रास याचा थांगपत्ता नसल्यामुळे, [आमचे] माननीय गव्हर्नर जनरल ॲन्टोनी व्हॅन डीमेन्सलँड यांच्या सन्मानार्थ आम्ही त्यांचे नाव या प्रदेशास दिले आहे.” नोव्हेंबर २५, १६४२ रोजी, टास्मानिया बेट अर्थात ऑस्ट्रेलियाचे दुसरे सर्वात लहान राज्य,a डच गृहस्थ आबेल टास्मान यांच्या दृष्टीस पडले त्याच्या दुसऱ्‍या दिवशी त्यांनी वरील शब्द उद्‌गारले. येथे टास्मानला काहीच लोकवस्ती दिसली नाही, परंतु दूरवरील आगीचा धूर आणि जवळपासच्या वृक्षांच्या खोडांवर १.५ मीटरच्या अंतरावर पाडलेल्या खाचा मात्र त्यांच्या दृष्टीस पडल्या. त्यांनी लिहिले, ज्यांनी ह्‍या खाचा पाडल्या असतील, त्यांच्याठायी एकतर चढण्याची विलक्षण पद्धत असावी अथवा ते दानव असावेत! खरे तर, ह्‍या खांचा चढण्यासाठीच पाडल्या गेल्या होत्या.

त्यानंतर १३० वर्षांपर्यंत, म्हणजे फ्रेंच गृहस्थ मारयॉन ड्यूफ्रेन आणि इंग्रज गृहस्थ टोबिअस फर्नो यांच्या भेटीपर्यंत, महासागरी समन्वेषकांच्या मार्गनिर्देशक पुस्तकातून व्हॅन डीमेन्सचा प्रदेश लोप पावला. १७७७ साली कॅप्टन कुक आले आणि ड्यूफर्नोप्रमाणे त्यांनीही बेटावरील या असामान्य लोकांशी, अर्थात ॲबोरिजिन्सशी (मूळचे रहिवासी) सलोखा केला. तथापि, त्यांची ही भेट जणू एका शोकांतिकेची सुरवातच म्हणावी: “काही राष्ट्रांसाठी [कुक], संस्कृती व धर्माचा मार्ग दाखविणारे होता, [पण] या जमातीसाठी [ॲबोरिजिन्स] मात्र ते मृत्यूचा अग्रदूत ठरले,” असे टास्मानियाचा इतिहास (इंग्रजी) यात जॉन वेस्ट्‌स म्हणतात. या शोकांतिकेमागे कोणते कारण दडले होते बरे?

टास्मानिया “साम्राज्याचे कारागृह”

काळ्यापाण्याची शिक्षा अथवा हद्दपारी, ही ब्रिटिशांची शिस्त लावण्याची पद्धत होती आणि टास्मानिया, शिक्षा झालेल्यांसाठी असलेली ब्रिटनची एक वसाहत बनली. सन १८०३ ते १८५२ सालापर्यंत, सुमारे ६७,५०० पुरुष, स्त्रिया आणि सात वर्षांएवढ्या लहान लहान चिरमुड्यांना देखील—प्रार्थना पुस्तके चोरण्याच्या क्षुल्लक गुन्ह्यापासून ते बलात्कार करण्याच्या मोठ्या गुन्ह्यासाठी इंग्लंडहून टास्मानियात हद्दपार करण्यात आले होते. तथापि, बहुतेक गुन्हेगार वसाहतवाल्यांसाठी अथवा सरकारी प्रकल्पांवर काम करत असत. द ऑस्ट्रेलियन एन्सायक्लोपिडीया म्हणतो, “१० टक्क्यांहून कमीजणांनी . . . शिक्षा झालेल्यांसाठी असलेल्या वस्तीची हवा कधी खाल्ली असावी, आणि जे अनेकजण या वस्तीत राहिले तेही अगदी अल्पावधीसाठीच.” टास्मान द्वीपकल्पावरील पोर्ट आर्थर ही, शिक्षा झालेल्यांसाठी असलेली एक प्रमुख वस्ती होती तरी, सर्वात निब्बर गुन्हेगारांना मात्र, “यातनेच्या प्रथेस समर्पित असलेले” माक्वारी हार्बर येथे धाडण्यात येत असे. ह्‍या बंदराच्या अरूंद प्रवेशद्वारास, नरक द्वार हे भयसूचक नाव लाभले.

हा ऑस्ट्रेलिया आहे (इंग्रजी) या पुस्तकात डॉ. रुडॉल्फ ब्रॉश, प्रथमावस्थेत असलेल्या या वसाहतीची आणखी एक प्रमुख बाजू—तिची आध्यात्मिकता, खरे तर तिच्यातील आध्यात्मिकतेची उणीव स्पष्ट करतात. ते पुढीलप्रमाणे लिहितात: “अगदी सुरवातीपासूनच, ऑस्ट्रेलियात [अर्थात यात टास्मानियाही आलाच] धर्माची हेळसांड व उपेक्षा होत होती, आणि आपल्या स्वतःच्या हव्यासापोटी प्रशासनामार्फत धर्माचा जास्तीत जास्त उपयोग-दुरुपयोग केला जात होता. वसाहतीची स्थापना चक्क प्रार्थनेशिवाय झाली आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कधीकाळी झालेला पहिला धार्मिक विधीही मागून आलेली एक कल्पना असावी.” एका बाजूला उत्तर अमेरिकेतील तीर्थ यात्रेकरू चर्चेसची बांधणी करत असता, दुसऱ्‍या बाजूला “दक्षिण जगतातील [ऑस्ट्रेलियातील] मूळचे रहिवासी, चर्चला उपस्थित राहणे एक कंटाळवाणी बाब समजून त्यांस चक्क आग लावून मोकळे झाले,” असे टास्मानियाचा इतिहास म्हणतो.

आधीच रोगट असलेल्या ह्‍या नैतिकतेला रमच्या विपुलतेमुळे तर पुढे आणखीनच प्रादुर्भाव झाला. इतिहासकार जॉन वेस्ट्‌स यांच्या मते “नागरिक आणि सैनिक या दोघांकरता, रम म्हणजे समृद्धीचा एक मार्ग” होता.

तथापि, अन्‍नपाण्याची काहीवेळा टंचाई असे. अशा वेळी, ॲबोरिजिन्सनी भाल्यांनिशी जनावरांची जी शिकार केली तीच शिकार, मुक्‍त झालेले गुन्हेगार बंदुकींनी करत असत. साहजिकच, ताणतणाव वाढत गेले. आता या स्फोटक संमिश्रणात, श्‍वेत जातीय अहंभाव, रमची विपुलता आणि विसंगत सांस्कृतिक भेदभाव यांची भर घाला. युरोपीय लोक सीमा रेखांकित करून कुंपणे बांधतात तर ॲबोरिजिन्स शिकार करतात व भटकंती करून अन्‍न गोळा करतात. आता विस्फोट होण्याकरता केवळ एका ठिणगीचीच कमी होती.

एक संपूर्ण जमात नामशेष

ही ठिणगी मे १८०४ मध्ये पेटली. लेफ्टेनन्ट मूर यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने ॲबोरिजिनल पुरुष, स्त्रिया आणि बालकांच्या एका मोठ्या शिकारी गटावर, अन्यायाने बेछूट गोळीबार करून अनेकांना ठार मारले व जखमी केले. भाले व अश्‍मांविरुद्ध, बंदुकींच्या गोळ्या—हे “काळे युद्ध” आता पेटले होते.

ॲबोरिजिन्सच्या हत्याकांडामुळे अनेक युरोपीय लोकांना जबरदस्त हिसका बसला. गव्हर्नर, सर जॉर्ज आर्थर इतके व्यथित झाले होते की, ‘सरकारने अजाणपणे ॲबोरिजिन्सची केलेल्या नुकसानाची भरपाई’ करण्यासाठी अक्षरशः काहीही करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. यास्तव, त्यांना ‘एकत्र करून’ त्यांस ‘सुधारण्याचा’ कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. “काळी रेषा” म्हटलेल्या एका मोहिमेत सुमारे २,००० सैनिक, वसाहतवाले आणि गुन्हेगार, ॲबोरिजिन्सची धरपकड करून सुरक्षित स्थानी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जंगलांमध्ये घुसले. परंतु, ही कामगिरी एक लज्जास्पद अपयश ठरली; ते केवळ एका स्त्रीला व एका मुलालाच धरू शकले. मग, जॉर्ज ए. रॉबिनसन नामक एका प्रमुख मेथडिस्ट व्यक्‍तीने समेट घडवून आणण्यासाठी नेतृत्त्व केले आणि ते परिणामकारक ठरले. ॲबोरिजिन्सने त्याच्यावर विश्‍वास ठेवला व उत्तर टास्मानियातील फ्लिंडर्स बेटावरील पुनर्वसनास होकार दर्शविला.

ऑस्ट्रेलियाचा इतिहास (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात मॉरजोरी बर्नार्ड, रॉबिनसनच्या साध्यतेविषयी म्हणते: “तथापि, त्यांना स्वतःला या वास्तविकतेचा काहीएक थांगपत्ता नसावा, परंतु त्यांच्या समेटात एक विश्‍वासघातकी हेतू दडलेला होता. या दुर्दैवी मूळच्या रहिवाश्‍यांचे बॅस सामुद्रधुनीमधील फ्लिंडर्स बेटावर विभागणी करून रॉबिनसनला त्यांचा रक्षक म्हणून नेमले गेले. हे रहिवासी झुरत गेले व शेवटी मृत्यूच्या खाईत लोटले गेले.” बंदुकीच्या गोळ्यांपासून ते निसटले तरी राहणीमान व खाण्या-पिण्यातील सक्‍तीच्या फरकामुळे ते काही निभावले नाहीत. एक माहितीसूत्र म्हणते की, “सन १९०५ साली होबार्ट तेथे मरण पावलेली फॅनी कॉकरेन स्मिथ ही अखेरची शुद्ध रक्‍ताची टास्मानियन ॲबोरिजिन होती.” यावरील अधिकारसूत्रांचे मतप्रवाह विविध आहेत. काहीजण, सन १८७६ साली होबार्ट येथे मरण पावलेल्या ट्रयूगॉनीनी या स्त्रीचा तर इतर जण, सन १८८८ साली कांगारू बेटावर मरण पावलेल्या स्त्रीचा उल्लेख करतात. टास्मानियाच्या ॲबोरिजिन्सचे रक्‍तसंकरित वंशज अद्यापही जिवंत असून सुस्थितीत आहेत. मानवजातीच्या अपरिमित दुर्व्यवहारांच्या यादीत या कथेस उचितपणे, “राज्यातील सर्वात मोठी शोकांतिका” असे संबोधले गेले आहे. शिवाय, “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो,” बायबलच्या या सत्यासही दुजोरा देते.—उपदेशक ८:९.

टास्मानियाची दृश्‍यमान तफावत

आज तुम्ही संग्रहालये, वाचनालये किंवा तुरुंग यांच्या भग्नावशेषांना भेटी दिल्याशिवाय या सुंदर बेटावरील योद्ध्‌यांच्या पहिल्या युद्धाची प्रचिती तुम्हाला येणार नाही. रोम, सापोरो आणि बोस्टन, विषुववृत्तापासून उत्तरेकडे जितक्या अंतरावर आहेत तितक्याच अंतरावर विषुववृत्तापासून दक्षिणेस टास्मानिया आहे. या बेटावरील कोणतेही स्थान, समुद्रापासून ११५ किलोमीटरपेक्षा अधिक नसले तरी याच्या इतिहासाप्रमाणेच त्याच्या भौगोलिक इतिहासासंबंधीही अगदी सुस्पष्ट तफावत दिसून येते.

टास्मानियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४४ टक्के जंगलप्रदेश आणि २१ टक्के राष्ट्रीय उद्यानांनी व्यापले आहे. हे अगदीच दुर्मिळ प्रमाण आहेत! लघु टास्सी हकीगत पुस्तक (इंग्रजी) यानुसार “जगभरातील समशीतोष्ण अरण्य क्षेत्रांत, अखेरचे, सर्वात अफाट, जसेच्या तसे टिकून राहिलेले क्षेत्र म्हणजे पश्‍चिम टास्मानियाचे जागतिक निसर्गसंवंर्धन वारसा क्षेत्र, हे होय.” मत्स्यांनी समृद्ध असलेले—वर्षा व हिमाने पोषित असलेली सरोवरे, नद्या आणि धबधबे—केवळ काही वृक्षारण्यांचाच उल्लेख करायचा झाल्यास, पेन्सिल देवदारू, निलगिरी, मिर्टल, शिशू, ससाफ्रास, चिवट, सेलरी-टोप्ड पाईन व ह्‍यूऑन पाईनची वृक्षारण्ये हिरवीगार ठेवतात. मध्य-पश्‍चिम पठारावरील उंच मैदानांवरून डोळ्यांत भरणारा देखावा, शिवाय तेथील बहुतेक वेळा हिमाच्छादित असलेली शिखरे, निसर्ग प्रेमींना राहून राहून आकृष्ट का करतात याविषयी काही एक आश्‍चर्य वाटू नये.

परंतु, “जागतिक निसर्गसंवर्धन वारसा” संरक्षण हे काही कोणत्याही संघर्षाशिवाय अस्तित्वात आले नाही. तसेच, पर्यावरण हितचिंतक गटाचा अद्यापही, खाणकाम, कागद उत्पादन व जलविद्युत-शक्‍ती हितचिंतक गटाच्या विरोधात, आतल्या आत जळफळाट होत आहे. चंद्रसदृश्‍य असलेले क्वीन्सटाउन अर्थात खाणकामाचे शहर, साधनसंपत्तींच्या अविचारी शोषण परिणामांची कटू स्मृती जागविते.

येथील मूळचे प्राणी—विशेषकरून पट्टेरी लांडगा किंवा टास्मानियन टायगर, अर्थात एक पिंगट, श्‍वानसदृश्‍य शिशुधान प्राणी देखील धोक्यात आहेत. त्याच्या पाठीवरील व पार्श्‍वभागावरील काळ्याभोर पट्ट्यांमुळे त्याला टायगर हे नाव पडलेले आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की या रोडक्या, बुजऱ्‍या मांसाहारी प्राण्याने, पोटाची खळगी भरण्यासाठी कोंबड्या व मेंढ्यांवर ताव मारण्यास सुरवात केली आहे. त्याच्या विध्वंसावर लावलेल्या किमतीमुळे १९३६ पर्यंत हा प्राणी नामशेष झाला.

आणखी एक टास्मानियन शिशुधान म्हणजे टास्मानियन डेव्हिल अद्याप तग धरून आहे. आपल्या प्रबळ जबड्यांचा व दातांचा उपयोग करून, सहा ते आठ किलोग्रॅम वजनाचा व कुजलेले मांस खाणारा हा मांसाळ प्राणी, शरीर, कवटी इत्यादींसहित एका संपूर्ण मृत कांगारूला फस्त करू शकतो.

लहान शेपटी असलेला समुद्रपक्षी अथवा मटनबर्ड यासाठीही टास्मानिया विख्यात आहे. टास्मानियाच्या समुद्रापासून सुरू करून व अक्षरशः संपूर्ण पॅसिफिक समुद्रास प्रदक्षिणा घालून आल्यानंतर दर वर्षी तो आपल्या रेतीच्या बिळाकडे परततो—एक अशी अजब कामगिरी ज्याचे श्रेय खरोखर, त्याच्या रचनाकारास व निर्माणकर्त्यास जायला हवे.

याच्या स्वतःच्या रात्रिंचर वसाहतींच्या आसपास आणखी एक पक्षी—पाण्याखाली “उडणारा”—प्रेमळ, एक किलोग्रॅम, लहान चोचीचा, लोकरीचा गोळा, ज्यास फेरी पेंग्विन म्हणतात तो राहतो. पेंग्विनपैकी सर्वांत लहान पक्षी सर्वाधिक कल्लोळ माजवणारा असतो! त्यांच्या हालचालींची तीक्ष्णता वैविध्यपूर्ण असून त्यांचा किलकिलाट आणि शरीराच्या हालचाली काही वेळा तर अगदीच विकोपाला जातात. प्रेममय मूडमध्ये असताना एकमेकांसाठी असणाऱ्‍या प्रेमासक्‍तीची खात्री करण्यासाठी यांची एक जोडी एखादे द्वंद्वगीतही गाते. तथापि, खेदाची बाब अशी, की यांपैकी अनेक, मासे पकडण्याच्या कोळ्यांच्या जाळ्यांमुळे, सांडलेल्या तेलामुळे, खाद्यासारख्या वाटणाऱ्‍या प्लास्टिकच्या वस्तूंमुळे मारले जातात, अथवा कुत्रे व रानमांजरांचे भक्ष्य बनतात.

द्वीपाचा अधिक प्रशांत चेहरामोहरा

केंद्रीय पठाराच्या किनाऱ्‍यावरून, उत्तर किंवा पूर्वेस दृष्टी टाकल्यास, लागवड केलेली चॉकलेटी रंगाची शेते, नागमोडी नद्या व ओढे, दुतर्फा झाडीचे रस्ते आणि हिरव्यागार कुरणांवर इतस्ततः विखुरलेल्या मेंढ्या व गुरेढोरे, हा टास्मानियाचा अधिक नयनरम्य चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल. उत्तरीय नगर लिलीडेलच्या आसपास जानेवारी महिन्यादरम्यान, संपूर्णतः फुललेल्या लवेंडरच्या बागा, या ग्राम्य चित्रांत रमणीय सुगंध व फिकट जांभळा रंग भरतात.

ज्यांमुळे टास्मानियाला, द ॲपल आइल हे नाव पडले आहे त्या सफरचंदांच्या बागांपासून फार दूर नसलेल्या डरवेंट नदीच्या तीरांवर वसलेले, सुमारे १,८२,००० लोकसंख्या असलेले होबार्ट, हे राजधानीचे शहर आहे. यावर १,२७० मीटर उंच असलेल्या विशाल काळसर वेलिंग्टन पर्वताचा वरचष्मा आहे. एका निरभ्र दिवशी, बहुतेकवेळा हिमाच्छादित असलेला हा पर्वत, खाली वसलेल्या शहराचे एक विहंगमावलोकन प्रदान करतो. सन १८०३ साली लेफ्टेनन्ट जॉन बोवेन आणि ४९ जणांचे त्यांचे पथक व ३५ गुन्हेगार यांनी रिझ्डन कोवच्या किनाऱ्‍यावर पाऊल ठेवले तेव्हापासून आता होबार्टचा चेहरामोहरा बदलला असून त्याने चांगलीच मजल मारली आहे. हे खरे, की शिडांच्या नौका व पुरातन जहाजे काळाच्या प्रवाहात विस्मृतीत बुडाल्या आहेत; तरी वर्षांतून एकदा सिडनी-ते-होबार्ट येथे होत असलेल्या दमछाक क्रीडानौका शर्यतीत, रंगतदार मोठ्या त्रिकोणी शिडांच्या डोड्या व प्रवाहरेखित नौकापृष्ठे, दाद देणाऱ्‍या समुहासमोरून भरधाव वेगाने धावून थेट होबार्टच्या केंद्रस्थानी येऊन थबकतात, तेव्हा मात्र त्या जुन्या कालखंडातील आठवणींना उजाळा मिळतो.

छळाच्या प्रदेशातून आध्यात्मिक परादीसकडे

लॉन्सेस्टन येथे भरलेल्या १९९४ “ईश्‍वरी भय” प्रांतीय अधिवेशनातील २,४४७ प्रतीनिधींपैकी जेफ्री बटरवर्थ हा प्रतीनिधी आठवणी ताज्या करतो: “अख्ख्या टास्मानियात, जेमतेम ४० साक्षीदार होते ते दिवस मला अजूनही आठवतात.” आता मात्र तेथे २६ मंडळ्या व २३ राज्य सभागृहे आहेत.

“परंतु, काळ नेहमीच इतका चांगला नव्हता” असे ते पुढे म्हणतात. “उदाहरणार्थ, १९३८ साली खांद्यांवर मागे पुढे दोन जाहिरातींचे फलक घालून टॉम किटो, रॉड मॅकविली आणि मी, आम्ही सगळे, ‘वास्तविकतेला तोंड द्या’ या जाहीर बायबल व्याख्यानाची जाहिरात करत होतो. हा, लंडनहून एका रेडिओ नेटवर्कमार्फत प्रसारित होणारा, खोट्या धर्माला झोंबणारा दंभस्फोट होता. मी माझ्या साथीदारांपाशी आलो तेव्हा पाहतो तर, युवकांची एक टोळी त्यांच्यावर दांडगाई करत होती. आणि पोलिसही मख्खपणे उभे राहून सगळा खेळ पाहत होते! मी मदत करण्यास धावलो आणि मलाच एक जोराचा दणका बसला. मग एका गृहस्थानं मागून माझा शर्ट धरून मला ओढत बाजूला नेलं. माझ्यावर हात उचलण्याऐवजी तो मोठ्यानं ओरडला, ‘या लोकांच्या नादी लागू नकोस!’ मग अगदी मऊ शब्दांत तो पुटपुटला: ‘मित्रा, मीही एक आयरिश आहे, त्यामुळं छळ सहन करणं कसं असतं हे मलाच माहीत आहे’”

यहोवाने त्या सुरवातीच्या पायनियरांना आशीर्वादित केले, कारण सध्या ४,५२,००० लोक असलेल्या या बेटाच्या कानाकोपऱ्‍यात देव राज्याची सुवार्ता पोहंचली आहे. मूळचे गुन्हेगार व ॲबोरिजिन्स यांच्या वंशजांपैकी अनेकजण, एका निर्मळ पृथ्वीतलावर सर्वांचे—कृष्णवर्णीय व श्‍वेतवर्णीय—जे सुरवातीच्या त्या निष्ठुर काळात गतप्राण झाले होते, त्यांचे स्वागत करण्याच्या प्रत्याशेकडे दृष्टी लावून आहेत; कारण “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल” अशी प्रतिज्ञा बायबल करते. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) हे परिवर्तन इतके सर्वांगीण असेल की, “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार [देखील] नाहीत”—यशया ६५:१७.

[तळटीपा]

a नोव्हेंबर २६, १८५५ साली टास्मानिया हे नाव अधिकृतरित्या स्वीकारण्यात आले. न्यू साउथ वेल्स हे सर्वात जुने राज्य होय.

[१९ पानांवरील चित्रं/नकाशा]

वरती: क्रेडल पर्वत व डव सरोवर

वर उजवीकडे: टास्मानियन डेव्हिल

खाली उजवीकडे: नैर्ऋत्य टास्मानियातील वर्षावन

टास्मानिया

ऑस्ट्रेलिया

[चित्राचे श्रेय]

टास्मानियन डेव्हिल आणि टास्मानियाचा नकाशा: Department of Tourism, Sport and Recreation – Tasmania; ऑस्ट्रेलियाचा नकाशा: Mountain High Maps® Copyright © 1995 Digital Wisdom, Inc.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा