वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ६/८ पृ. १४-१७
  • मधमाशीपालन याचा “गोड” किस्सा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मधमाशीपालन याचा “गोड” किस्सा
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “दररोजच्या चमत्कारांचा” काळजीवाहू
  • यशस्वी मधमाशीपालनासाठी महत्त्वपूर्ण घटक
  • नानाविध उत्पादने
  • “उपजतः बुद्धीमान”
  • मध—मधमाशीकडून मानवाला भेट
    सावध राहा!—२००५
  • तुम्हाला ऑस्ट्रेलियातील स्टिंगलेस बीझ पाहायच्यात का?
    सावध राहा!—२००१
  • मधमाशी केव्हा मधमाशी नसते?
    सावध राहा!—१९९८
  • मध सुमधूर औषध
    सावध राहा!—२००२
सावध राहा!—१९९७
g97 ६/८ पृ. १४-१७

मधमाशीपालन याचा “गोड” किस्सा

ग्रीसमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

अरुणोदयाचा संधिप्रकाश, हळुवारपणे आपले अंधूक किरण असमंतात उधळतो. पहाटेच्या या शीतल, धूसर वातावरणात एक उचलयान ट्रक, पर्वतपायथ्याशी, रस्त्याच्या कडेला हळूच येऊन थांबतो. मग हातमोजे, बूट, कापडी अंगरखे आणि जाळीदार, रुंद कडा असलेल्या हॅट्‌स परिधान करून दोन अंधूक, अस्पष्ट अशा आकृत्या त्यातून बाहेर पडतात. काहीशा सावध, पण तितक्याच चौकस हालचालींनिशी ते असंख्य लाकडी पेट्या ट्रकमध्ये चढवतायेत. राजरोसपणे मालावर हात मारणारे हे काही चोर तर नाहीत? नाही, हे तर आपल्या प्रिय मधमाश्‍यांच्या सैन्यदलांची उत्तम काळजी वाहणारे अनेक मधमाशीपालक असून, मकरंदजनक वनस्पती असलेल्या दुसऱ्‍या एका इष्ट स्थलाच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी ते सुसज्जित आहेत.

मधमाशीपालक हे खास प्रकारचे लोक असून एका विशिष्ट कीटकासोबत असणाऱ्‍या त्यांच्या परस्पर-कृतिशील ऋणानुबंधाचे त्यांना अप्रुपच वाटते. एकीकडे, आर्थिकदृष्ट्या सर्व कीटकांत सर्वाधिक बहुमोल असणारी, तथा मध आणि मेणाची उत्पत्ती करणारी व बहुसंख्य वैविध्यपूर्ण पिकांचे परागण करणारी ही मधमाशी असते. आणि दुसरीकडे, मधमाश्‍यांची देखभाल करून हातातोंडाशी गाठ बांधणारे व या क्षुद्र प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणारे लोक असतात; तसेच यांच्यापैकीच एकाने म्हटले त्याप्रमाणे, “मधमाश्‍यांना अंतर्बाह्‍य जाणणारे” असे हे लोक असतात.

“दररोजच्या चमत्कारांचा” काळजीवाहू

मधमाशीपालक होणे अगदी साधेसोपे वाटेल: मधमाश्‍यांच्या वसाहतींनी युक्‍त असलेली अनेक पोळी हस्तगत करा, त्यांस मकरंदजनक स्थानात ठेवा आणि मग काय, केवळ काही महिन्यांनंतरच त्याचे उत्पन्‍न गोळा करा. परंतु, हे इतके सोपे नाही. वस्तुतः, यात कोणकोणत्या गोष्टी गोवलेल्या आहेत याची माहिती करून घेण्यासाठी आम्ही जॉन आणि मॉरिया या दोन पेशेवाईक मधमाशीपालकांशी समरसून गप्पा मारल्या; जीव की प्राण असणाऱ्‍या या आपल्या व्यवसायाबद्दल ते दिलखुलासपणे आमच्याशी बोलले.

एका उघड्या पोळ्याकडे झुकत जॉन उद्‌गारतो: “मधमाशीपालन म्हणजे जणू दररोजच्या चमत्कारांचा साक्षात्कार होणे. मधमाश्‍यांचे सर्वोत्कृष्ट रचनात्मक सामूहिक जीवन, प्रागतिक दळणवळणाची कौशल्ये आणि अत्युत्तम कार्यपद्धती यांचे कोडे अद्याप कोणालाही उलगडलेले नाही.”

पेशेवाईक मधमाशीपालनाचा मूळ इतिहास उलगडताना जॉन असा उल्लेख करतो, की अतिप्राचीन काळी वृक्षांच्या ढोलीत आणि इतर खबदाडींतील मधमाश्‍यांच्या वसाहतींचा नाश करून मधमाशीपालक मध काढत असत. तथापि, १८५१ साली लोरेंन्झो लोरेन लँगस्ट्रॉथ या अमेरिकेतील मधमाशीपालकाच्या निदर्शनास आले, की मधमाश्‍या ह्‍या मेणाच्या फण्यांमध्ये सुमारे ६ मिलिमीटरचे अंतर ठेवत असतात. यास्तव, मानव-निर्मित लाकडी पेट्यांचा उपयोग केला जाऊ शकत होता ज्यांत फण्यांच्या चौकटींमध्ये इतकेच अंतर राखले जाऊ शकते. आता, वसाहतीला न दुखावता पोळ्यांतून एकेक चौकट बाहेर काढून त्यातला मध व मेण जमा करणे शक्य झाले.

जॉन पुढे म्हणतो: “यशस्वी मधमाशीपालनासाठी तुम्हाला तुमच्या मधमाश्‍यांच्या वसाहतींसाठी निस्सीम प्रेम असले पाहिजे. तुम्ही जणू तुमच्या मधमाश्‍यांचे जनकच आहात आणि माझा असा विश्‍वास आहे, की त्यांनाही असंच वाटतं आणि तुम्हाला ते तसा प्रतिसादही देतात. हिवाळ्याच्या कठीण काळात तुम्ही त्यांचे डॉक्टर, त्यांचे काळजीवाहू तसेच त्यांचे भरणपोषण करणारेही बनता.”

मॉरिया यास दुजोरा देते: “एक उत्तम मधमाशीपालक, बहुधा ८ हजार ते ८० हजार मधमाश्‍या असलेल्या पोळ्यावर, केवळ एक कटाक्ष टाकताच त्याबद्दल पुष्कळ काही सांगू शकतो. तुम्ही अनुभवी असल्यास, पोळे उघडताच त्यांचा निव्वळ गुंजारव तुम्हाला हे सांगेल, की वसाहतीची भरभराट होत आहे का, ती उत्पादक आणि सुखी आहे का; भुकेलेली आहे का, राणी माशीच्या मृत्यूमुळे ती ‘अनाथ’ तर झाली नाही ना; काही अनिष्टामुळे ती अस्वस्थ झाली आहे का, अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगू शकता.”

यशस्वी मधमाशीपालनासाठी महत्त्वपूर्ण घटक

“मधमाशीपालक पोळे जेथे ठेवतो त्या जागेची विचारपूर्वक निवड करणे फार महत्त्वाचे आहे. मधमाश्‍यांना अन्‍न मिळू शकेल अशी सपुष्प कुरणं धुंडाळण्यासाठी आम्ही जिवाचं रान करत असतो,” असे स्पष्टीकरण जॉन देतो.

“आपल्या वसाहती उद्युक्‍त ठेवण्यासाठी मधमाशीपालक मोहरलेली संत्र्यांची अथवा बासवूडची वृक्षेही शोधतात. उन्हाळ्यात आणि शरद ऋतुत, पाईन तथा देवदारू वृक्षांनी संपन्‍न असलेले क्षेत्र, स्पष्ट लालसर रंग असलेला उत्तम श्रेणीचा मध तयार करण्यास मदत करील; या मधाचा बाजारात उत्तम खप होतो. मोहरलेल्या जंगली थाइमची शेते उत्तम दर्जाचा मध तयार करण्यासाठी उपयुक्‍त असून मधमाशीपालक यास मधराजा असे संबोधतात. व्हाईट क्लोवर, यलो स्वीट क्लोवर आणि अल्फाल्फा यांवर देखील मधमाश्‍या आपले अन्‍न शोधतात.”

यात व्यवहारज्ञान असणे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. मॉरिया पुढील स्पष्टीकरण देते: “आपण जर डोंगराळ प्रदेशात मधमाश्‍यांच्या पोळी ठेवल्या तर त्या डोंगराच्या पायथ्याशी ठेवणे फायदेकारक आहे. यामुळे, मधमाश्‍या उंचसखल भागांत उडतात, फुले असलेल्या झाडांना भेटी देतात आणि मग—मकरंदाचे ओझे घेऊन—उतारावरून आपल्या पोळ्यांकडे सहजासहजी उडत येऊ शकतात. पोळी, उंचीवर अथवा झाडांवर ठेवली असती तर मधमाश्‍यांची दमछाक होऊन वसाहतीच्या उत्पन्‍नावर विपरित परिणाम पडला असता.”

मधोमध वसलेली राणीमाशी असलेली पोळीची एक चौकट अलगदपणे वर धरत जॉन म्हणतो: “वसाहतीच्या कल्याणात आणि उत्पन्‍नात, राणीमाशीचा असलेला सिंहाचा वाटा प्रत्येक मधमाशीपालकास ज्ञात आहे. ज्या पोळ्यातील राणीमाशीची अंडी घालण्याची क्षमता कमी होते आणि अतिअल्पच मध उत्पन्‍न होतो त्या राणीमाशीस मारून टाकणे अथवा तिला बदलणे जरूरीचे होते. तरुण राणीमाशा असलेल्या वसाहती सर्वाधिक मध उत्पन्‍न करतात. तसेच, आम्हाला नवीन वसाहती निर्माण करायच्या असतात, तेव्हा आम्ही मधमाश्‍यांनी युक्‍त असलेले एक सदृढ दुमजली पोळे घेऊन वरच्या-खालच्या पेट्या विलग करतो. एका निम्म्या भागात राणीमाशी असल्यामुळे दुसऱ्‍या निम्म्या भागात, एका तरुण फलित राणीमाशीस आम्ही ठेवतो. बाहेर फुलांचा हंगाम येईपर्यंत, नवीन राणीमाशी अंडी घालून कामकरी माश्‍यांनी पोळे भरून टाकते.”

मधमाशीची आयुर्मर्यादा किती असते बरे? असे म्हणतात, की एका कामकरी माशीची जीवनमर्यादा तिच्या निरलस वृत्तीच्या अगदी विरुद्ध असते. उन्हाळ्यात अन्‍नासाठी फुलांच्या शोधात, एखादी माशी ताशी काही २१ किलोमीटरच्या गतीने, सुमारे १५ तास प्रती दिवशी उडत असल्यामुळे ती केवळ सहा आठवडेच जगते. हिवाळ्यात, माश्‍या प्रती दिवशी फक्‍त दोन ते तीन तास कार्य करत असल्यामुळे तो काळ त्यांच्यासाठी तितका काही धावपळीचा नसतो; यास्तव, कित्येक महिने त्या तग धरून राहतात.

नानाविध उत्पादने

मधमाशीपालनाचा उल्लेख करताच आपल्या मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे, मध. हा गोड, चिकट द्रव पदार्थ, खरे तर कामकरी माशीने रूपांतरित केलेला मकरंद असतो. एक व्यावसायिक पोळे दर वर्षी सरासरी २९ किलोग्रॅम इतके मधोत्पादान करते. मधमाश्‍यांच्या कार्यापासून मिळणारे आणखी एक बहुमोल उपउत्पादन म्हणजे मेण हा पदार्थ. मधामाश्‍यांचे एक पोळे काही पाच ते सहा वर्षांपर्यंत उपयुक्‍त असते. तोपर्यंत, त्यावर वास्तव्य करून असलेले विविध सूक्ष्म जीव व परजीवींमुळे त्याचा रंग काळवंडतो व ते बदलणे आता आवश्‍यक असते. निकामी झालेल्या पोळ्यांवर, मेणासाठी प्रक्रिया केली जाते. गाळलेल्या प्रती टन मधाच्या मागे अदमासे ९ ते १८ किलोग्रॅम इतके मेणाचे व्यावसायिक उत्पन्‍न भरते.

राणीमाशी, कामकरी माशी आणि नरमाशी यांच्या वाढीस उपयुक्‍त असणारी प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि स्निग्ध पदार्थ यांचा प्रमुख उद्‌गम म्हणजे—परागकण—अनेक शारीरिक रोगांवरील एक नैसर्गिक औषध म्हणूनही काही लोक याचा उपयोग करतात. एका वर्षात एक पोळे, याची सुमारे ५ किलोग्रॅम उत्पत्ती करू शकते. आपल्या पोळ्याची डागडुजी करण्यासाठी, तसेच अनाहूतपणे आत शिरलेला प्राणी अतिशय मोठा असला व त्याला बाहेर काढणे शक्य नसल्यास, त्याला बंदिस्त करण्यासाठी मधमाश्‍या, प्रोपोलिस ह्‍या पदार्थाचा उपयोग करतात.

प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे, आपण स्वाद घेत असलेल्या अन्‍नाचा एकचतुर्थांश भाग, धान्यांचे परागसिंचन करण्याच्या मधमाश्‍यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. सफरचंदे, बदाम, कलिंगड, आलुबुखार, पेयर, काकडी आणि इतर नानाविध फळे, परागसिंचनाकरता मधमाश्‍यांवर अवलंबून असतात. बिया असलेले धान्य तसेच गाजर, कांदे आणि सूर्यफुले देखील त्यांच्यावरच अवलंबून असतात. अल्फाल्फाचे परागसिंचन करून त्याचे रुपांतर पशूखाद्यात करणाऱ्‍या मधमाश्‍यांचा, मांस आणि दुग्धशाळा उत्पादनांवरही परिणाम होतो.

“उपजतः बुद्धीमान”

मधमाश्‍यांची सामाजिक रचना, त्यांच्या जटिल सामूहिक जीवनाचा आश्‍चर्यकारक विकास तसेच अत्युच्च प्रतीची त्यांची दिशाबोध क्षमता आणि दळणवळण राखण्याची क्षमता समजून घेण्याची आपली अक्षमता लक्षात आणून, मॉरिया उद्‌गारते: “मला वाटतं, बहुतेक मधमाशीपालकांचा देवावर विश्‍वास आहे.” मधमाश्‍यांचा अभ्यास करून त्यांची काळजी वाहणारे बव्हंशी लोक या गोष्टींचे श्रेय या वास्तविकतेस देतात, की मधमाश्‍या “उपजतः बुद्धीमान” असतात; अर्थात आपला महान सृष्टीकर्ता, यहोवा देव याने दिलदारपणे ही उपजत बुद्धी त्यांच्यात घातली आहे.—पडताळा नीतिसूत्रे ३०:२४.

[१६ पानांवरील चौकट/चित्र]

फुलांपासून तुमच्या टेबलावर

शेतातली मधमाशी फुलांतून मकरंद गोळा करते

फुलांकडे जाताना, मधमाश्‍या आपल्या मधु-जठरात अर्थात त्यांच्या जठराच्या विस्तारित भागात मकरंद साठवतात. हे मधु-जठर भरण्यासाठी मधमाशीला वैयक्‍तिक पुष्पकांकडे १,००० ते १,५०० खेपा कराव्या लागतात.

पोळ्यातील मधुकोठीत मकरंदाचा साठा केला जातो

पोळ्यात परत आल्यावर शेतातील माशी आपल्या मधु-जठरातले द्रव्य तरुण कामकरी माशीच्या तोंडात घालते. मग कामकरी माशी ह्‍या मकरंदाचा साठा एका मधुकोठीत करून त्याचे रुपांतर मधात करण्यासाठी योग्य ती कार्ये पार पाडते.

मधमाशीपालक मधमाश्‍यांच्या पोळ्यातून मध काढतो

मधुकोशातील लाकडी चौकटीत भरलेले मेण खरडून काढण्याकरता तो एक तापवलेला चाकू वापरतो. मग, या चौकटी मध-उत्सर्गक यंत्रात टाकल्या जातात, जेथे केंद्रोत्सारक प्रेरणेने त्यांतील मध बाहेर टाकला जातो.

बरणी अथवा वेगवेगळ्या भांड्यांत मध भरला जातो

मधाच्या बरणीवर असणाऱ्‍या लेबल्समुळे हे समजते, की माश्‍यांनी कोणकोणत्या वनस्पतींवरून अन्‍न गोळा केले आहे. बरणी जर पारदर्शक असेल तर मधाच्या रंगावरून त्याचा दर्जा अजमावता येतो.

स्वास्थ्यासाठी मध चांगला असतो!

शरीरात मधाचा सहजासहजी परिपाक होऊन त्वरित त्याचे रूपांतर उर्जेत केले जाते. माहितीसूत्रे दाखवून देतात, की भाजलेल्या त्वचेवर मधाचा लेप गुणकारी असतो, शिवाय इतर विविध शारीरिक जखमांकरता देखील उपयोगी असतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा