बायबलचा दृष्टिकोन
ख्रिश्चनांनी युद्धविरोधी शांततावादी (पॅसिफिस्ट) असावे का?
“ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीच्या शतकांत, चर्च जसे युद्धविरोधी शांततावादी होते तसे आता पुन्हा एकदा त्यांनी बनण्यास हवे.”—ह्युबर्ट बटलर, आयरिश लेखक.
दुसऱ्या महायुद्धानंतर, युगोस्लाव्हियाला दिलेल्या आपल्या भेटीनंतर ह्युबर्ट बटलर यांनी १९४७ साली लिहिलेल्या, परंतु मागील वर्षापर्यंत प्रकाशित न झालेल्या एका निबंधात वरील शब्द मोठ्या धाडसाने टिपले होते! “युद्धाच्या काळात, ख्रिस्ती चर्चनं ज्याप्रकारे भीषण गुन्ह्यांकडे डोळेझाक केली व ख्रिस्ताच्या शिकवणुकीपासून मार्गभ्रष्ट झाले” ते पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला.
अलौकिक चळवळी अथवा गटांविरुद्ध आवाज उठविण्यास बटलर घाबरत नव्हते. असे करत असताना ते बहुधा कोणालाही हाताशी न धरता एकटेच वक्तव्य करत असत. द आयरिश टाइम्सने ज्यांचे वर्णन, “निश्चितच सर्वात निरापराध आणि निष्कलंक अराजकीय धर्मपंथ” या शब्दांत केले त्या यहोवाच्या साक्षीदारांनी घेतलेल्या धैर्यशील पावित्र्याशी चर्चच्या वर्तनाची तुलना करत असताना त्यांनी निर्भीडपणे आपले मत व्यक्त केले. “युगोस्लाव्हियावरील वृत्तान्त” या आपल्या निबंधात बटलरने लिहिले की, ‘ज्या फसव्या युक्तिवादांद्वारे राजनैतिक आणि धार्मिक वर्तुळातील पुढारी, युद्धास न्यायोचित करतात त्या सर्वांस धूडकावून लावणाऱ्या’ साक्षीदारांनी युद्ध चळवळीत सहभाग घेण्यास नाकारल्यामुळे युगोस्लाव्हियाच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांची न्यायचौकशी होत होती.
तथापि, यहोवाच्या साक्षीदारांना युद्धविरोधी शांततावादी म्हणून संबोधणे शास्त्रवचनीयरित्या यथोचित आहे का? याचे उत्तर, “युद्धविरोधी शांततावादी” या अभिव्यक्तीच्या अर्थावर आधारित आहे. युद्धाच्या काळात, जिवाची तमा न बाळगता शस्त्र स्वीकारण्यास नकार दर्शवणाऱ्या धाडसी साक्षीदारांची प्रशंसा करण्यासाठी बटलरने या संज्ञेचा प्रयोग केला. तथापि, खेदाची बाब अशी, की युद्धाच्या वादळात गुरफटलेल्या बहुसंख्य लोकांचा, युद्धविरोधी शांततावाद्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे, ‘आपल्या राष्ट्राप्रती असणारी आपली जबाबदारी झटकून देण्यास इच्छुक असणारा, नामर्द अथवा विश्वासघातकी’ असा होता. हा दृष्टिकोन यथोचित आहे का?
विरोध—युद्धास की हिंसाचारास
वेबस्टर्स नाईंथ कॉलेजिएट डिक्शनरी म्हणते, की युद्धविरोधी शांततावादी हा असा कोणीतरी आहे जो “संघर्षाचा आणि विशेषतः युद्धाचा कट्टर व क्रियाशील विरोधक होय.” तो शब्दकोश “युद्धविरोधी शांततावाद” याची व्याख्या ‘वादंगे शमविण्याचे माध्यम म्हणून युद्ध अथवा हिंसाचाराचा विरोध; विशेषकरून: नैतिकतेच्या अथवा धार्मिकतेच्या आधारावर शस्त्र धारण करण्यास नाकारणे.’ ह्या व्याख्या आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीतील सत्य मानणाऱ्यांना कशा लागू होणार होत्या?
निःसंदेह, त्यांनी ‘नैतिकतेच्या आणि धार्मिकतेच्या आधारावर शस्त्र धारण करण्यास नकार दिला’ आणि याद्वारे सर्व ‘संघर्ष आणि युद्ध’ यांपासून दूर राहिले. परंतु, त्यांनी असे का केले बरे? कारण त्यांना हे माहीत होते, की येशूने आपल्या अनुयायांना, ते ‘जगाचा भाग नव्हते,’ तसेच “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील” असे सांगितले होते. (योहान १५:१९; मत्तय २६:५२) प्रारंभिक चर्च आणि जग (इंग्रजी) या पुस्तकात एक इतिहासकार म्हणतो: “निदान मॉरकूस ॲयूरेलीअस याच्या अमदानीपर्यंत तरी [सा.यू. १६१-१८०], कोणताही ख्रिस्ती त्याच्या बाप्तिस्म्यानंतर सैनिक होत नव्हता.” जुन्या जगात नवीन जगाचा पाया (इंग्रजी) यामध्ये एक महिला इतिहासकार म्हणते: “आरंभीच्या ख्रिश्चनांची अशी समज होती, की लढाई करणे चुकीचे आहे आणि त्यामुळे, सम्राटाला सैनिकांची तीव्र गरज भासली तरी कोणत्याही सैन्यात ते सेवा करत नसत.”
सुवार्तेचा प्रचार करणे ही ख्रिश्चनांना दिलेली एक कार्यनियुक्ती होती. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) ते हे जाणून होते, की देवाच्या शत्रूंविरुद्ध युद्ध करण्यास, देवाचे दंडाधिकारी होण्याची कोणतीही कार्यनियुक्ती त्यांना देवाकडून मिळाली नव्हती. (मत्तय ५:९; रोमकर १२:१७-२१) बटलरने म्हटल्याप्रमाणे तथाकथित ख्रिस्ती, जेव्हा ‘ख्रिस्ताच्या शिकवणुकीपासून दूर जातात,’ केवळ तेव्हाच ते राष्ट्रांच्या युद्धांत गुरफटतात. मग पाळकवर्ग, सैन्यांना आशीर्वाद देतात आणि संघर्षात गोवलेल्या दोन्ही पक्षांच्या विजयाकरता प्रार्थना करतात. (पडताळा योहान १७:१६; १८:३६.) उदाहरणार्थ, मध्ययुगात, प्रॉटेस्टंट आणि कॅथलिक लोकांनी अनेक रक्तलांच्छित युद्धे लढली आणि परिणामस्वरूपी, ‘याचे जबरदस्त भयकंप पश्चिम युरोपवर होऊन कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट या दोन्ही गटांनी स्वतःस देवाच्या क्रोधाचे माध्यम उद्घोषित केले,’ असे केनथ क्लार्क यानी संस्कृती (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लिहिले. मॅक्लिन्टॉक आणि स्ट्राँग यांचे सायक्लोपीडिया ऑफ बिब्लिकल, थीऑलॉजिकल, ॲण्ड इक्लिसियास्टिकल लिट्रेचर यात म्हटले आहे की, “अशा प्रकारच्या युद्धांना न्यायोचित ठरवण्यासंबंधीच्या वादंगांचा जन्म, नागरी सत्ताग्रहण करण्याच्या लोलुपतेतून झाला असून सुस्पष्टपणे प्राचीन ख्रिस्ती तत्त्व व शुभवर्तमानाच्या एकंदर आशयाच्या विरोधात आहे.”—याकोब ४:४.
संपूर्णतः युद्धविरोधी आहेत का?
तथापि, ‘प्राचीन ख्रिस्ती तत्त्व आणि शुभवर्तमानांचा एकंदर आशय,’ खरे पाहता युद्धविरोधी शांततावादी होता का? याआधी व्याख्या करण्यात आल्याप्रमाणे, आरंभीच्या ख्रिश्चनांना खरोखर युद्धविरोधी शांततावादी म्हणून वर्णिले जाऊ शकले असते का? नाही! का नाही बरे? याचे एक कारण म्हणजे, युद्ध करण्याचा हक्क देवाला असल्याचे त्यांनी जाणले होते. (निर्गम १४:१३, १४; १५:१-४; यहोशवा १०:१४; यशया ३०:३०-३२) याशिवाय, इस्राएल राष्ट्र देवाचे पृथ्वीवरील एकमेव माध्यम होते, तेव्हा त्याच्यावतीने लढण्यास त्यांना अधिकृत करण्याच्या देवाच्या हक्कासंबंधी त्यांनी कदापि वितंडवाद केला नाही.—स्तोत्र १४४:१; प्रेषितांची कृत्ये ७:४५; इब्री लोकांस ११:३२-३४.
पृथ्वीतलावरून दुष्टाईचे निष्कासन करण्याचा देवाला केवळ हक्कच नाही तर न्यायाच्या आधारावर तसे करण्याची त्याला बांधिलकीही आहे. आपल्या जीवनमार्गांत परिवर्तन करण्याविषयी देवाच्या सबुराईच्या याचनांना अनेक दुष्कर्मी कधीच प्रतिसाद देणार नाहीत. (यशया ४५:२२; मत्तय ७:१३, १४) कुकर्म सहन करण्याच्या यहोवाच्या सहिष्णुतेला सीमारेषा आहेत. (यशया ६१:२; प्रेषितांची कृत्ये १७:३०) यास्तव, ख्रिश्चन हे जाणून आहेत, की सरतेशेवटी देव पृथ्वीच्या पाठीवरून दुष्कर्म्यांना काढून टाकल्याशिवाय राहणारच नाही. (२ पेत्र ३:९, १०) बायबल पूर्वभाकीत करते त्याप्रमाणे “प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल: तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गांतून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.”—२ थेस्सलनीकाकर १:६-९.
बायबलचे शेवटचे पुस्तक या संघर्षाचे शब्दचित्रण, ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई’ अथवा हर्मगिदोन असे करते. (प्रकटीकरण १६:१४, १५) ते म्हणते, ख्रिस्त येशू यात पुढाकार घेईल; तो “नीतीने . . . लढतो.” (प्रकटीकरण १९:११, १४, १५) उचितपणे येशू ख्रिस्ताला, “शांतीचा अधिपति” असे संबोधले आहे. (यशया ९:६) परंतु, तो काही युद्धविरोधी शांततावादी नाही. स्वर्गातून देवाच्या सर्व बंडखोर शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी त्याने आधीच स्वर्गात युद्ध लढले आहे. (प्रकटीकरण १२:७-९) “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करण्यासाठी तो लवकरच आणखी एक युद्ध लढणार आहे. तथापि, पृथ्वीवरील त्याचे अनुयायी त्या ईश्वरी न्यायदंडात कोणताही हिस्सा घेणार नाहीत.—प्रकटीकरण ११:१७, १८.
खरे ख्रिस्ती शांतिप्रिय आहेत. जगाच्या लष्करी, राजनैतिक तथा वांशिक संघर्षांसंबंधी ते पूर्णतः एक तटस्थ भूमिका बजावतात. पण खरे पाहता, ते युद्धविरोधी शांततावादी नाहीत. का बरे? कारण सरतेशेवटी, पृथ्वीवर देवाची इच्छा अंमलात आणण्यासाठी येणाऱ्या देवाच्या युद्धाचे ते हार्दिक स्वागत करतात; हे असे एक युद्ध असेल जे विश्व सार्वभौमत्वासंबंधीचा मोठा वादविषय निकालात काढील तथा पृथ्वीतलावरून शांतीच्या सर्व शत्रूंचे कायम उच्चाटन करील.—यिर्मया २५:३१-३३; दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०.
[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]
ख्रिस्ताची कुचेष्टा झाली/The Doré Bible Illustrations/Dover Publications, Inc.