तिने अनेकांच्या जीवनांवर प्रभाव पाडला
कॅथी रॉबरसन हिचे नोव्हेंबर १९, १९९४ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी अकाली निधन झाले. मरण पावली त्या सप्ताहापर्यंत ख्रिस्ती सभांना ती विश्वासूपणे उपस्थित राहिली होती. वयाच्या नवव्या वर्षांपासूनच कर्करोगाशी ती झगडत होती आणि याची नोंद ऑगस्ट २२, १९९४ अवेक! अंकात “जेव्हा जीवन सोपे नसते” या शीर्षकाखाली करण्यात आली आहे. हा लेख वाचल्यानंतर जगभरातील अनेकांनी टपालाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच कॅथीच्या निडर उदाहरणाने त्यांच्यावर कसा प्रभाव टाकला याचेही त्यांनी वर्णन केले.
युवकांना देवाची सेवा करण्यास उत्तेजन मिळाले
स्पेनच्या लॉईडॉ नामक मुलीने लिहिले: “माझे वय वर्षे १६ आहे आणि कॅथीच्या सहनशीलतेचा अनुभव मी वाचला तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू आले. मला मरणाची भीती वाटत असे; परंतु या लेखामुळे कॅथीचे म्हणणे मी समजू शकले. कॅथीने म्हटले होते, ‘आपण आता जगू किंवा मरू ही बाब महत्त्वाची नसून सार्वकालिक जीवन देण्यास समर्थ असणाऱ्या यहोवा देवाची कृपादृष्टी आपल्यावर आहे किंवा नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे.’”
जपानमधील मारीने लिहिले: “मी जवळजवळ कॅथीच्याच वयाची आहे आणि आम्ही दोघींनी एकाच दिवशी बाप्तिस्मा घेतला यामुळे तिचा अनुभव वाचणे म्हणजे जीवलग मैत्रिणीने उत्तेजनार्थ लिहिलेल्या पत्राचे वाचन करण्यासारखे होते. कॅथीची आशा होती की, तिच्या अनुभवामुळे अनेकजण निरर्थक गोष्टींच्या मागे लागण्याऐवजी यहोवाच्या सेवेमध्ये सुज्ञपणे त्यांच्या आरोग्याचा वापर करण्यास प्रवृत्त होतील आणि यामुळेच मी नियमित पायनियरींग [पूर्ण वेळेची सेवा] सुरू करण्याच्या बेतात आहे.”
इटलीमधील नओमीने देखील तेच लिहिले, निरर्थक गोष्टींच्या मागे लागण्याऐवजी यहोवाच्या सेवेमध्ये युवकांनी त्यांच्या आरोग्याचा सुज्ञपणे वापर करावा, अशी कॅथीची युवकांच्या बाबतीत अपेक्षा होती आणि यामुळे “माझ्यासहित हजारो युवकांना उत्तेजन मिळेल.” नओमीने पुढे म्हटले: “तिला नवीन जगामध्ये पाहण्याची माझी उत्कट इच्छा आहे कारण आताच्या या सर्व गोष्टी त्यावेळी काढून टाकण्यात येतील. माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी लगेचच पायनियरींग सुरू करणार आहे.”
अमेरिका, फ्लोरिडा येथील रशेलने लिहिले, “माझे वय वर्षे १८ आहे आणि मी पायनियर कार्य करण्याचा अलीकडे सारखा विचार करते. ‘जेव्हा जीवन सोपे नसते,’ हा लेख वाचत असताना माझ्यासारखी एक युवती अशा असहाय परिस्थितीमध्ये तग धरून राहते, हे पाहून मला फारच उत्तेजन मिळाले. मी माझ्या आरोग्याचा वापर ‘निरर्थक गोष्टींच्या मागे लागण्याऐवजी यहोवाच्या सेवेमध्ये सुज्ञपणे,’ करावा, असे सांगण्याद्वारे कॅथीने मला प्रेरणा दिली.”
मायक्रोनेशिया, चुक या द्वीपावरील काही मिशनऱ्यांनी लिहिले: “येथील आमचे पायनियर आर्थिक रीत्या गरीब आहेत. तथापि, त्यांच्याकडे जे काही आहे त्याची गुणग्राहकता बाळगण्यास भगिनी रॉबरसनच्या अनुभवामुळे त्यांना मदत मिळाली. ते आर्थिक रीत्या गरीब असले तरी सुदृढ शरीरयष्टी हा त्यांच्याकरता एक आशीर्वादच असून यामुळे त्यांना यहोवाची पूर्ण वेळेची सेवा करण्यास शक्य होते, या गोष्टीची त्यांना जाणीव झाली. त्यांच्याजवळ जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ असण्यासाठी आणि यहोवाच्या सेवेमध्ये त्यांच्या सामर्थ्याचा वापर करण्यासाठी हा लेख त्यांच्याकरता उत्तम स्मरणपत्रच ठरला.”
फ्रान्स येथे पायनियर प्रशालेसाठी उपस्थित असलेल्या १६ विद्यार्थ्यांना मोठ्या उत्साहाने कॅथीला निशिगंधाच्या फुलांचे छायाचित्र पाठवण्याची आणि असे लिहिण्याची प्रेरणा मिळाली की, “आपल्या थोर निर्माणकर्त्यासाठी आपल्या वेळेचा वापर करावा, या तुझ्या आर्जवाचे आम्ही केव्हाही विस्मरण होऊ देणार नाही.”
फ्रान्समधील आणखी एका युवतीने लिहिले: “तारुण्य हे सैतानाचे प्रमुख लक्ष्य असल्यामुळे यहोवाला एकनिष्ठ राहणे कठीण असल्याचे काहीवेळा आम्हाला वाटते. तरी देखील आम्ही अशा प्रकारच्या विलक्षण आणि प्रेरणात्मक गोष्टी वाचतो तेव्हा आम्हाला नव्याने सामर्थ्य आणि उत्साह प्राप्त होतो कारण त्यामुळे कॅथीप्रमाणे इतर अनेक युवा दुःख भोगत असताही सचोटी राखतात, हे आम्हाला ठाऊक होते. किती सुंदर उदाहरण!”
“मी तुझ्याच वयाची असून माझी प्रकृती अगदी उत्तम आहे,” अमेरिका, ओहायो येथील नॅडिन लिहिते. “अनेकदा मी क्षुल्लक गोष्टींना यहोवाकरता असणाऱ्या माझ्या सेवेत आड येण्यास परवानगी देते. तुझा अनुभव वाचल्यामुळे माझ्या जीवनाचे गंभीरपणे परीक्षण करण्यास मला मदत मिळाली त्याचप्रमाणे मी अमूल्य समयाचा किती अपव्यय केला हे सुद्धा मला कळून चुकले. माझ्यासाठी तू प्रवर्तक आहेस.”
ब्राझीलमधील एका युवतीने म्हटले: “तिने माझ्या हृदयाला स्पर्श केला आणि आपल्या देवाची सेवा अधिक पूर्णपणे करण्याची माझी इच्छा जागृत केली.”
एका कॅनेडियन मुलीने लिहिले: “मी १५ वर्षांची आहे. मी यकृतासंबंधित रोगामुळे पीडित असल्याचे दोन वर्षांपूर्वी माझ्या निदर्शनास आले. माझ्या प्रकृतीच्या अशा अवस्थेत मी सुद्धा यहोवाची विश्वासूपणे सेवा करू शकते आणि देवाने अभिवचन दिलेल्या संपूर्ण रोगमुक्त नव्या व्यवस्थीकरणाची मला धीराने वाट पाहण्याची गरज आहे, या गोष्टीची सत्यता मला कॅथी रॉबरसनच्या अनुभवामुळे पटली.”
अमेरिका, न्यूजर्सी येथील जॅनेटने लिहिले: “कॅथीने अनुभवलेले सर्व अडथळे आणि तिने अभिव्यक्त केलेला विश्वास, आपल्या समोर कितीही अडथळे असले तरी यहोवाची जास्तीत-जास्त सेवा करण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा निर्धार करण्यास आपल्याला मदत करतो. माझ्या काही बायबल विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पायनियर सेवा, हे ध्येय ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यास कॅथीच्या अनुभवाचा उपयोग करण्याचा मी विचार करत आहे.”
वृद्धांना सुद्धा उत्तेजन मिळाले
अमेरिका, कॅलिफोर्निया येथील एका स्त्रीने लिहिले: “तू खरोखरच आमच्या जीवनातील दुय्यम गोष्टींना काढून टाकले आहे आणि अत्यावश्यक घटक—यहोवा सोबतचा आपला नातेसंबंध यावर सूक्ष्मपणे लक्ष केंद्रित केले आहे.” ती पुढे म्हणते: “माझे तारुण्य केव्हाच नाहीसे झाले आहे तरीही तुझ्या अनुभवांमुळे तसेच तुझ्या भवितव्याच्या आशेमुळे माझे हृदय हेलावून गेले आणि मला कार्य करण्यास प्रेरणा मिळाली. यामुळे मी प्राधान्यता देत असलेल्या गोष्टींची पुनःपाहणी करण्यास मला मदत ठरली.”
कॅलिफोर्नियाच्या दुसऱ्या पत्रात म्हटले: “मी वाचले आहे त्यानुसार जर्मनी किंवा मलावी वा इतर ठिकाणी बंधू आणि भगिनी छळाला तोंड देतात त्याप्रमाणे तू देखील एका मोठ्या परीक्षेला तोंड दिले आहे. मी ६८ वर्षांची आहे त्यामुळे मी पुष्कळ अनुभव पाहिले आहेत, ऐकले आहेत आणि वाचले देखील आहेत. तुझा अनुभव युवक तसेच वृद्ध लोकांनाही आशीर्वादच आहे.”
अमेरिका, दक्षिण कॅरोलाईन येथील एक स्त्री मान्य करते: “मी काही लहान मूल नाही. माझे वय ७० वर्षांच्या आसपास आहे.” तिने कृतज्ञतेने लिहिले: “तू दुसरा ईयोबच आहे. तुझ्या सहनशीलतेची सर्व तरुण आणि वृद्ध नोंद घेतील अशी माझी आशा आहे.”
आणखी एका पत्राने म्हटले: “कॅथीच्या विश्वासाने आणि निर्धाराने माझ्या हृदयास स्पर्श केला. मी सुमारे ५७ वर्षांची आहे आणि मी निवृत्त होईल तेव्हा यहोवाच्या सेवेमध्ये अधिकाधिक वेळ खर्च करण्याचे माझे एक ध्येय होते; परंतु कर्क असल्याचे अलीकडेच मला समजले. तारुण्यात माझी प्रकृती उत्तम असताना मी यहोवासाठी काही विशेष केले नाही, यामुळे मला आता खेद होतो! यहोवाची सेवा करण्याचा विशेषाधिकार गंभीर आजारामुळे केव्हा हिरावून घेतला जाईल, हे आपल्यापैकी कोणीही आगाऊपणे सांगू शकत नाही.”
एका ख्रिस्ती वडिलाने लिहिले: “विश्वासाची परीक्षा घेणाऱ्या जीवनातील अनपेक्षित उद्भवणाऱ्या घटनांच्या वेळी वाचण्याकरता हा लेख मी एका खास फाईलमध्ये ठेवणार आहे. या व्यवस्थीकरणाचा अंत निकट येतो तसतसे छळाचा ज्यांच्यावर भडिमार होतो अशा मित्रांना उत्तेजन देण्याकरता हा लेख मी मेंढपाळकत्वासाठी तयार केलेल्या माझ्या फाईलमध्येही ठेवणार आहे.”
खरोखरच, आपल्या जगव्याप्त बंधुत्वाचे सदस्य असलेल्यांचा विश्वास आणि धैर्य यामुळे आपल्याला सामर्थ्य मिळते. (१ पेत्र ५:९) कॅथीप्रमाणे आपणही, “ह्यापुढे मरण नाही,” या बायबलच्या अभिवचनाच्या पूर्णतेची वाट पाहात आहोत. (प्रकटीकरण २१:३, ४) “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही,” तेव्हा तो काळ किती वैभवी असेल!—यशया ३३:२४.
[३० पानांवरील चित्रं]
कॅथी रॉबरसन