राज्य घोषकांचा वृत्तान्त
अलास्कात देव त्याला वाढवतो
हिम आणि बर्फाच्या पांघरूणाखाली एक चिमुकले बीज फलित होण्याच्या संधीची वाट बघत आहे. तीन महिन्यांच्या अलास्कीय उन्हाळ्याच्या अल्प काळादरम्यान, तीन मिलीमीटर आकारचा कोबीची बी, नव्वद पौंड, म्हणजे ४० किलोग्राम इतकी वाढू शकते! होय, एकेकाळी नापीक, बर्फमय समजली जाणारी ही भूमी आता विपुल प्रमाणात फल उत्पन्न करू शकते.
अलास्कातील आध्यात्मिक शेतीच्या बाबतीत हे खरे ठरले आहे. तेथे, दीर्घकाळाच्या हिवाळ्यात यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य बी पेरण्याचे काम चालूच आहे. पृथ्वीच्या इतर भागांप्रमाणे, देव त्यांच्या सुपीक मनोभूमीतील बी वाढवतो.—१ करिंथकर ३:६, ७.
● स्कूल बसमध्ये, व्हॅनेसा नामक एक तरुण साक्षीदार बहीण, ॲन नावाच्या तिच्या सहविद्यार्थीनीला नेहमी एकटीच बसलेली पाहायची. ॲन दुःखी वाटायची, म्हणून व्हॅनेसाने तिला आपल्या शेजारी बसायला बोलावले. ॲन उगाच दुःखी नव्हती! हृदयविकाराच्या झटक्याने तिच्या आईचा मृत्यू झाला होता आणि थोड्या दिवसांनंतर तिचे बाबा कॅन्सरमुळे मरण पावले होते. म्हणून ॲन अलास्कातील तिच्या नातेवाईकांकडे राहायला आली होती.
एके शनिवारी क्षेत्र सेवेदरम्यान व्हॅनेसा तिच्या नव्या मैत्रिणीच्या घरी जाऊन देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक तिला देऊन आली. सोमवारी शाळेत गेल्यावर ॲन व्हॅनेसाला येऊन भेटली. ॲनचे पुष्कळ बायबल प्रश्न होते आणि व्हॅनेसा त्या सर्वांची उत्तरे तिला देऊ शकली. “तुमच्या सभा कोठे भरतात?” असे ॲनने तिला विचारले. त्याच दिवशी सायंकाळी ॲन राज्य सभागृहातील सभेला पहिल्यांदाच उपस्थित राहिली.
काही दिवसांतच, या १७ वर्षीय अनाथ लेकराला येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे अनेक “बाप, आई” मिळाले. (मत्तय १९:२९) “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनात, आनंदी आणि हसतमुख झालेल्या ॲनने पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन यहोवाला आपले जीवन समर्पित केल्याचा तो प्रसंग किती हर्षविणारा होता!
● अलास्कीय उत्तरध्रुवाकडील विस्तारित प्रदेशाच्या लांब क्षेत्रांत—एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूर वसलेल्या खेड्यांत—१५० जमातींत राज्य बी पेरण्याकरता वॉच टावर संस्थेने दोन इंजिने असलेले विमान वापरले. परंतु, पत्रव्यवहारानेच नियमितरीत्या होणाऱ्या बायबल अभ्यासावर आध्यात्मिक वाढ निर्भर आहे. अनेकांना पत्रव्यवहार करणे जड जात असल्यामुळे, विद्यार्थ्याची आस्था जिवंत ठेवण्याकरता बायबल शिक्षकाने सर्जनशील असण्यास हवे. ते कसे बरे?
कॅथी एडनाबरोबर करीत असलेला बायबल अभ्यास प्रगतीशील होता खरा, परंतु त्या दोघी एकमेकींपासून ६०० किलोमीटर दूर राहत होत्या! अभ्यास सहायकावर नुसते प्रश्न उतरण्याऐवजी, कॅथीने दुसऱ्या एका पानावर अभ्यास सहायकातील प्रश्न लिहिले आणि प्रत्येक प्रश्नाखाली उत्तरे लिहिण्यासाठी थोडी जागा सोडली. एडनाने उत्तरे भरून पाठवल्यावर, कॅथीने तिला आवश्यकतेनुसार एखादा मुद्दा आणखी स्पष्ट करण्यासाठी तिची विवेचने पाठवली. कॅथी म्हणते: “आमच्या ‘अभ्यासासाठी’ मी बुधवार संध्याकाळचा दिवस ठेवला होता आणि इतर बायबल अभ्यास जसे मी नियमितपणे घेत होते तसाच हाही अभ्यास नियमितपणे घेत राहिले. माझा पत्ता छापलेला व स्टॅम्प मारलेला एक लिफाफाही मी एडनाला पाठवला. टपाल पोहंचायला दोन आठवडे लागत असल्यामुळे पत्रव्यवहाराद्वारे होणारा अभ्यास जरा मंदच चालला आहे असे वाटत होते.”
दहा महिने पत्राद्वारे अभ्यास केल्यानंतर अँकरेज येथील प्रांतीय अधिवेशनात कॅथी आणि एडना एकमेकींना समोरासमोर भेटल्या तेव्हा त्यांना झालेल्या आनंदाची कल्पना करा! अलास्कातील दूरवर वसलेल्या अनेक खेड्यांतून आलेल्या बायबल विद्यार्थ्यांना व इतर आस्थेवाईक लोकांना पाहून साक्षीदारांनाही अतिशय आनंद झाला.
कधीकधी आपल्याला वाढ काहीशी मंद वाटू शकते पण, काही ‘बियांना’ सत्याचा प्रकाश मिळाल्यावर लगेच अंकुर फुटतो. सरासरीने, शंभर पेक्षा अधिक यहोवाचे नवे स्तुतीवाहक अलास्कात दर वर्षी बाप्तिस्मा घेत आहेत! त्यांना वाढवल्याबद्दल आम्ही यहोवाला “आभारी आहे,” असे म्हणतो!