र्वांडातील दुर्घटनेत बळी पडलेल्यांची काळजी घेणे
आफ्रिकेच्या मध्यभागी वसलेल्या र्वांडाला “आफ्रिकेचे स्वित्झर्लंड” म्हटले जाते. लोकांनी विमानातून या राष्ट्राची हिरवी वनश्री पाहिल्यावर त्यांना ती एदेन बाग वाटते. यामुळेच र्वांडाला नंदनवन म्हटले आहे यात काही आश्चर्य नाही.
एके काळी, एक झाड कापले तर त्याबदली दोन लावली जात होती. वर्षातला एक दिवस पुनर्वनरोपणाला समर्पित होता. फळ झाडे रस्त्यालगत लावली होती. संपूर्ण राष्ट्रात मुक्त व सोईस्करपणे प्रवास करता येऊ शकत होता. विविध जिल्ह्यातून किगाली राजधानीला जोडणारे रस्ते विशिष्ट प्रकारच्या डांबराचे होते. राजधानी झपाट्याने वाढत चालली होती. साधारण कामगार महिन्याच्या शेवटी त्याचा खर्च भागवण्याइतका पुरेसा पैसा कमवत होता.
र्वांडातील यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती कार्याची देखील भरभराट होत होती. या वर्षाच्या सुरवातीला, राष्ट्रावर वर्चस्व असणाऱ्या जवळजवळ ८० लाख कॅथलिक लोकसंख्येपर्यंत देवाच्या राज्याची सुवार्ता नेण्यात सुमारे २,६०० साक्षीदार व्यग्र होते. (मत्तय २४:१४) साक्षीदार मार्च महिन्यात लोकांच्या घरी जाऊन १०,००० बायबल अभ्यास चालवत होते. शिवाय किगालीत आणि आसपासच्या क्षेत्रात १५ मंडळ्या होत्या.
यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रवासी पर्यवेक्षकांनी नोंद केली: “नोव्हेंबर १९९२ मध्ये मी १८ मंडळ्यांमध्ये कार्य करीत होतो. परंतु मार्च १९९४ पर्यंत, मंडळ्यांची संख्या २७ इतकी वाढली. पायनियरांची (पूर्ण वेळेचे सेवक) संख्या देखील प्रत्येक वर्षी वाढत होती.” शनिवारी, मार्च २६, १९९४ रोजी, ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीची उपस्थिती ९,८३४ इतकी होती.
मग, अचानक र्वांडातील परिस्थिती दुःखदरीत्या बदलली.a
स्थापिलेल्या व्यवस्थेचा अचानक अंत
एप्रिल ६, १९९४ रोजी संध्याकाळी सुमारे ८.०० वाजता, र्वांडा आणि बुरूंडीचे राष्ट्रपती किगालीमध्ये एका विमान अपघातात मरण पावले. ते दोघेही हुतू होते. त्या रात्री राजधानीत पोलिसांच्या शिट्यांचा आवाज सर्वत्र ऐकू येत होता व सर्व रस्ते बंद करण्यात आले. मग पहाटे सैनिक आणि कोयता घेऊन आलेले शस्त्रधारी लोक तुत्सींना मारू लागले. औझान तॉबॉनॉ—किगालीतील यहोवाच्या साक्षीदारांचे शहर पर्यवेक्षक—त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी हे या कत्तलीत मारलेले प्रथम होते.
यहोवाचे साक्षीदार असलेल्या एका युरोपियन कुटुंबाने त्यांच्या अनेक तुत्सी शेजाऱ्यांबरोबर बायबलचा अभ्यास केला होता. हे माथेफिरू खुनी जेव्हा घरोघरी जाऊन लोकांची कत्तल करीत होते तेव्हा त्या भयाण सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांपैकी नऊ जणांनी या युरोपियन लोकांच्या घरात आश्रय घेतला. काही मिनिटातच, जवळजवळ ४० लुटारू घरात शिरले, घरातील सामानसुमानाची तोडफोड करीत होते. दुःखाची गोष्ट म्हणजे, त्या तुत्सी शेजाऱ्यांना ठार मारण्यात आले. परंतु इतर लोक जे त्यांच्या मित्रांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना स्वतःचे जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढण्यास परवानगी मिळाली.
ही कत्तल अनेक आठवड्यांसाठी चालू होती. अंदाजे ५,००,००० किंवा त्याहीपेक्षा अधिक र्वांडातील लोकांना ठार मारण्यात आले. हजारो लोक विशेषकरून तुत्सी, त्यांचे जीव वाचवण्यासाठी पळून गेले. यहोवाच्या साक्षीदारांच्या झाइरे शाखा दप्तराने निवारण साठ्याची गरज असल्याचे फ्रान्समधील त्यांच्या बांधवांना कळवले. झायरे शाखेने म्हटले, “आम्ही एक पेटी भरून जुने कपडे मागितले. फ्रान्समधील बांधवांनी आम्हाला अधिकतर नवीन कपडे व बुटांच्या पाच पेट्या भरून पाठवल्या.” जून ११ तारखेला ६५ टन कपड्यांचा माल पाठवण्यात आला. केनिया शाखेने देखील निर्वासितांसाठी कपडे व औषधे तसेच त्यांच्या स्थानिक भाषेतील टेहळणी बुरूज नियतकालिके पाठवली.
जुलै महिन्यापर्यंत तुत्सींचे वर्चस्व असलेल्या बळाने, ज्याला र्वांडन पेट्रियॉटिक फ्रन्ट म्हणतात, हुतूंचे वर्चस्व असलेल्या सरकारी बळाचा पराजय केला होता. त्यानंतर, हुतू लोक लाखोंच्या संख्येने ते राष्ट्र सोडून जाऊ लागले. २० लाख किंवा त्याहीपेक्षा अधिक र्वांडाच्या लोकांनी घाईघाईने जवळपासच्या राष्ट्रांमध्ये स्थापन केलेल्या शिबिरांमध्ये आश्रय घेतल्यामुळे पुष्कळ गोंधळ उडाला.
त्यांनी एकमेकांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला
किगालीतील यहोवाच्या साक्षीदारांच्या भाषांतर कार्यालयात काम करणाऱ्या सहा जणांपैकी दोघे—ऑनॅनी म्बान्डा व मुकागीसागारा डेनीझ तुत्सी होते. यांना वाचवण्यासाठी हुतू बांधवांनी केलेले प्रयत्न काही आठवड्यांपर्यंत यशस्वी ठरले. परंतु, १९९४ च्या मे महिन्याच्या अंताला या दोघा तुत्सी साक्षीदारांना ठार मारण्यात आले.
यहोवाच्या साक्षीदारांनी धोका पत्करून व अगदी त्यांचे जीवन अर्पण करण्याची तयारी दर्शवून एका वेगळ्याच जातीच्या पार्श्वभूमिच्या त्यांच्या सहख्रिश्चनांना वाचवण्याचा प्रयत्न केला. (योहान १३:३४, ३५; १५:१३) उदाहरणार्थ, मुकॉबॉलीसॉ चॅन्टल एक तुत्सी आहे. ती जेथे राहत होती त्या स्टेडियममध्ये र्वांडन पेट्रियॉटिक फ्रन्टचे सदस्य हुतू लोकांना शोधत आले तेव्हा ती तिच्या हुतू मित्रमैत्रिणींना सोडून देण्यासाठी मध्ये पडली. तिचे हे प्रयत्न पाहून त्या बंडखोरांना अतिशय संताप आला; तरी एकाने असे उद्गार काढले: “तुम्हा यहोवाच्या साक्षीदारांचे बळकट आणि अतुट बंधुत्व आहे. सर्व धर्मांपैकी तुमचाच धर्म उत्तम आहे!”
जातीय द्वेषापासून मुक्त राहणे
परंतु याचा असा अर्थ होत नाही की, आफ्रिकेत शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या जातीय द्वेषातून यहोवाचे साक्षीदार पूर्णपणे मुक्त आहेत. फ्रान्समधील एक साक्षीदार जो निवारण कार्यात भाग घेत होता त्याने परीक्षण केले, “आमच्या ख्रिस्ती बांधवांनी देखील अवर्णनीय कत्तलीला कारणीभूत ठरणाऱ्या द्वेषाने दूषित होण्यापासून सावध राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.
“आम्ही अशा बांधवांना भेटलो ज्यांनी त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कत्तल होत असताना पाहिले होते. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती भगिणीचा विवाह होऊन केवळ दोनच दिवस झाले होते आणि तिच्या पतीला ठार मारण्यात आले. काही साक्षीदारांनी त्यांच्या मुलांना व पालकांना ठार होत असताना पाहिले. एक बहीण जी आता सध्या युगांडात आहे, तिने तिच्या संपूर्ण कुटुंबाचा वध होत असताना प्रत्यक्षात पाहिले, त्यामध्ये तिच्या पतीचा देखील समावेश होता. हे भावनिक आणि शारीरिक दुःखाला अगदी ठळकपणे दाखवते ज्याने यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रत्येक कुटुंबाला स्पर्श केला आहे.”
एकूण ४०० साक्षीदार या जातीय दंगलीत ठार झाले. परंतु त्यांच्यापैकी एकही जण सहसाक्षीदारांच्या हातून मारला गेला नाही. परंतु, रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट चर्चच्या तुत्सी आणि हुतू सदस्यांनी हजारोंची कत्तल केली. पुराव्यानिशी हे शाबीत झाले आहे की, संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार या जगाच्या कोणत्याही बाबतीत युद्ध, क्रांत्या किंवा झगडे यात भाग घेत नाहीत.—योहान १७:१४, १६; १८:३६; प्रकटीकरण १२:९.
वर्णनापलीकडील दुःख
मागील उन्हाळ्यात, संपूर्ण जगभरातील लोक मानवी दुःखाचे सर्वात अविश्वासार्ह चित्रपट आणि चित्रे पाहू शकले. र्वांडाचे हजारो शेकडो लोक शेजारच्या राष्ट्रांमध्ये धावून गेले व सर्वात गलिच्छ परिस्थितीत राहत असल्याचे दिसून आले. फ्रान्समधील एक साक्षीदार निवारण कार्यावर असताना त्याच्या प्रतिनिधीमंडळाने जुलै ३० रोजी पाहिलेल्या परिस्थितीचे वर्णन पुढीलप्रमाणे दिले.
“आम्ही अशा दृश्यांचा सामना केला जी अतिशय भयाण होती. मैलोमैली रस्त्याच्या बाजूला लोकांची मृत शरीरे पडली होती. सामूहिक स्मशानभूमि हजारो शवांनी गच्च भरली होती. आम्ही लोकांच्या मृत शरीरांच्या ढीगातून जात असताना सहन करता येत नव्हती इतकी दुर्गंधी येत होती आणि अशा वासात लहान मुले मृत शरीरांच्या शेजारी खेळत होती. पालकांची शवे पडली होती ज्यांची मुले अजूनही जिवंत होती आणि त्यांच्या पाठीला बिलगून बसली होती. अशी दृश्ये आम्हाला पुन्हा पुन्हा दिसल्यामुळे आमच्या मनावर त्यांचा खोलवर परिणाम झाला आहे. अशी दृश्ये पाहून एखादी व्यक्ती पूर्णपणे असाह्य भावनेने भारावून जाते व त्याने पाहिलेली ती भयानक दृश्ये व नाश यामुळे त्याचे मन उत्प्रेरित न होता राहणारच नाही.”
जुलै महिन्याच्या मध्यात हजारो निर्वासित झाइरे येथे जात असताना, झाइरेतील साक्षीदारांनी सीमेवर त्यांची बायबल आधारित प्रकाशने वर उंचावून धरली जेणेकरून त्यांचे ख्रिस्ती बांधव आणि आस्थेवाईक लोक त्यांना ओळखू शकतील. त्यानंतर र्वांडातील निर्वासित साक्षीदारांना एकत्र करण्यात आले व त्यांना जवळपासच्या गोमा येथील राज्य सभागृहात नेण्यात आले. तेथे त्यांची काळजी घेण्यात आली. वैद्यकीय अनुभव असलेल्या साक्षीदारांनी, पुरेशी औषधे व योग्य सुविधा नसतानाही आजाराने पछाडलेल्यांचा आजार कमी करण्यासाठी खूप कठीण परिश्रम केले.
दुःखासाठी त्वरित प्रतिसाद
शुक्रवारी, जुलै २२ रोजी फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांना आफ्रिकेतून फॅक्सद्वारे वाचवा संदेश (SOS) मिळाला. त्यामध्ये र्वांडासोडून पळालेल्या त्यांच्या ख्रिस्ती बांधवांच्या दयनीय स्थितीचे वर्णन दिले होते. हा मेमो मिळाल्याबरोबर अवघ्या पाच ते दहा मिनिटात, बांधवांनी मालवाहू विमानात निवारण साठा भरण्याचे ठरवले. यामुळे त्यांचा सप्ताहअंत तयारी करण्यातच निघून गेला. ही कामगिरी विशेष उल्लेखनीय होती कारण कमी वेळात इतक्या मोठ्या निवारण साठ्याची तयारी करण्याचा त्यांना मुळीच अनुभव नव्हता.
निवारण निधीच्या गरजेला पुष्कळांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. एकट्या बेल्जियम, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडमधील साक्षीदारांनी १६,००,००० पेक्षा अधिक अमेरिकन डॉलर देणगी दिली. निवारण साहित्य प्राप्त करण्यात आले, त्यामध्ये अन्नसामग्री, औषधे आणि उत्तरजीविका सामग्रीचा देखील समावेश होता. लुवीयॉ, फ्रान्स येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या सुविधांमध्ये या सर्व गोष्टींना पेट्यांमध्ये भरून त्यांच्यावर खूणचिठ्या चिकटवण्यात आल्या. हा माल ऑस्टंड, बेल्जियमला पोहंचवण्यासाठी साक्षीदार रात्रंदिवस काम करीत होते. बुधवारी जुलै २७ रोजी विमानतळावर सुमारे ३५ टन माल एका मालवाहू जेट विमानात भरण्यात आला. दुसऱ्या दिवशी विशेषपणे औषधे असलेला थोडासा माल पाठवण्यात आला. दोन दिवसांनंतर म्हणजे शनिवारी, दुसऱ्या एका विमानाने आजाराला बळी पडलेल्यांसाठी आणखी औषधांचा साठा नेण्यात आला.
फ्रान्समधून काही साक्षीदार व एक वैद्यकीय डॉक्टर, हा मोठा माल तेथे पोहंचण्याआधीच गोमा येथे गेले. जुलै २५, सोमवारी डॉ. हेन्री टॅलट गोमात पोहंचले तेव्हा, २० साक्षीदार पटकीमुळे आधीच मृत्युमुखी पडले होते आणि इतर पुष्कळ लोक दररोजच मरत होते. हा माल सुमारे २५० किलोमीटर दूर असलेल्या बुजुंबुरा, बुरूंडी या मार्गावरून यावयाचा असल्यामुळे तो शुक्रवारी सकाळी म्हणजे जुलै २९ पर्यंत गोमात वेळेवर आला नाही.
आजाराचा सामना करणे
त्या वेळेत, गोमातील ते लहानसे राज्यसभागृह ज्या ठिकाणी होते ते ठिकाण जवळजवळ १,६०० साक्षीदार आणि त्यांचे मित्र यांनी गच्च भरले होते. या सर्व लोकांसाठी एकच प्रसाधनगृह होते आणि पाणी नव्हते; शिवाय त्यांच्याकडे अन्नही कमी होते. ज्यांना पटकीची लागण झाली होती तेही राज्यसभागृहातच राहत होते. मृत्यूच्या घंटेचा नाद वाढत चालला होता.
पटकी रोग एखाद्याला पूर्णपणे निर्जल करून टाकतो. डोळे मंद होऊन खोल जातात. पुनर्जलीकरण उपचार वेळीच चालू केला तर ती व्यक्ती दोन दिवसात बरी होते. यास्तव, उपलब्ध असलेल्या थोड्याशा औषधांचा वापर करून बांधवांना पुनर्जलीकरण देण्यात आले.
याशिवाय, बांधवांचा आजाऱ्यांना दूर ठेवून इतरांना त्याची लागण होऊ न देण्याचा प्रयत्न चालला होता. गोमातील भयंकर परिस्थितीपासून निर्वासितांना दूर नेण्यास ते पाहत होते. त्यांना किवु तळ्याजवळ एक उपयुक्त ठिकाण सापडले जे धूळ व हवेला दूषित करणाऱ्या मृत शरीरांच्या दुर्गंधापासून दूर होते.
तेथे प्रसाधनगृहे खोदण्यात आली व आरोग्याचे कडक नियम बसवण्यात आले. यामध्ये शौचालयातून आल्यावर एखाद्याचे हात ब्लिच व पाण्याने धुणे समाविष्ट होते. ही पावले का उचलली जात आहेत याच्या महत्त्वावर जोर दिला गेला आणि लोकांनी त्यांना या गोष्टींची गरज असल्याचे स्वीकारले. लवकरच या घातक रोगाचा फैलाव होण्याआधी त्याच्यावर आळा घालून तो कमी करण्यात आला.
निवारण साठ्याचा तो माल शुक्रवारी जुलै २९ रोजी आल्यावर गोमातील राज्य सभागृहात एक लहानसे इस्पितळ स्थापन करण्यात आले. जवळजवळ ६० घडीचे प्रवासी पलंग टाकण्यात आले, तसेच जलशुद्धीकरणाची व्यवस्था देखील करण्यात आली. याशिवाय, किवु तळ्याच्या किनाऱ्यावर स्थळ ठोकलेल्या साक्षीदारांकडे तंबू नेण्यात आले. कमी वेळात, त्यांनी सुव्यवस्थित व एका रांगेत तंबू ठोकले होते.
एकाच वेळी सुमारे १५० साक्षीदार आणि त्यांचे मित्र गंभीरपणे आजारी पडले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गोमामध्ये जवळजवळ ४० जण मरण पावले होते. परंतु अनेकांचे जीव वाचवण्यासाठी व होणारा पुष्कळ त्रास थांबवण्यासाठी वैद्यकीय साठा आणि साहाय्य वेळीच आले.
कृतज्ञ, आध्यात्मिक लोक
निर्वासित साक्षीदारांनी त्यांच्यासाठी जे काही करण्यात आले होते त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. इतर राष्ट्रांतील त्यांच्या ख्रिस्ती बांधवांनी दाखवलेल्या प्रीतीमुळे तसेच ते खरोखर एका आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचे आहेत ह्या स्पष्ट पुराव्यामुळे त्यांचे अंतःकरण भरून आले.
हालअपेष्टांमध्ये असताना देखील या निर्वासितांनी त्यांची आध्यात्मिकता टिकवून ठेवली. वास्तविक पाहता, एका निरीक्षकाने पाहिले की, “त्यांना भौतिक मदतीची अत्यंत गरज असताना देखील ते आध्यात्मिक अन्न प्राप्त करण्याविषयी अधिक चिंतित होते असे दिसत होते.” विनंतीप्रमाणे, किन्यार्वांडाच्या र्वांडा भाषेतील तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या बायबल साहित्याच्या ५,००० प्रती विविध निर्वासित छावण्यांमध्ये पाठविण्यात आल्या.b
निर्वासित प्रत्येक दिवशी बायबलच्या एका वचनावर विचारविमर्श करीत, शिवाय त्यांनी मंडळीच्या सभांची योजना केली होती. मुलांसाठी शालेय वर्गांची देखील व्यवस्था करण्यात आली होती. शिक्षकांनी या वर्गांचा फायदा घेऊन, आरोग्याच्या नियमांविषयीच्या सूचना देण्यासाठी आरोग्याच्या नियमांचे पालन करण्यावर त्यांचा बचाव अवलंबून होता यावर जोर दिला.
सतत काळजीची आवश्यकता
गोमाव्यतिरिक्त शेकडो निर्वासित साक्षीदारांनी इतर ठिकाणी स्थळ ठोकले होते, जसे की रुटशुरू शहर. येथील बांधवांना देखील अशाचप्रकारची मदत पुरविण्यात आली. जुलै ३१ रोजी सात साक्षीदारांचे एक मंडळ दक्षिणेकडून गोमातून बुकावूला विमानातून गेले. तेथे जवळजवळ ४५० निर्वासित साक्षीदार होते. त्यांच्यातील पुष्कळ बुरुंडीतील देखील होते. तेथेही पटकीची साथ चालू झाली होती आणि बांधवांपैकी कोणी दगावू नये या हेतूने मदत पुरवली गेली.
दुसऱ्या दिवशी ह्या मंडळाने युवीरा, झाइरेकडे रस्त्याने प्रवास केला. हा प्रवास जवळजवळ १५० किलोमीटरचा होता. या मार्गावर सात ठिकाणी र्वांडा आणि बुरुंडीतील सुमारे १,६०० साक्षीदार होते. ते स्वतःचे संरक्षण कसे करू शकतात याबद्दलच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. मंडळाने केलेल्या संशोधनावरील एका अहवालाने असे म्हटले: “आतापर्यंत जे काही करण्यात आले ती केवळ एक सुरवात होती व आमचे साहाय्य प्राप्त करणाऱ्या ४,७०० व्यक्तींना पुष्कळ महिन्यांसाठी आणखी मदतीची आवश्यकता भासेल.”
अहवालानुसार शेकडो साक्षीदार ऑगस्टपर्यंत पुन्हा र्वांडाला परतले. तरीही व्यावहारिकरीत्या सर्व घरे आणि सामानसुमान लुबाडण्यात आले होते. घरांची आणि राज्य सभागृहांची पुर्नउभारणी करण्याचे आव्हान समोर आहे.
र्वांडातील ती भयंकर परिस्थिती ज्यांनी सोसली त्यांच्यासाठी देवाचे सेवक नित्याने प्रार्थना करीत आहेत. आम्हाला माहीत आहे की या व्यवस्थीकरणाचा अंत जसजसा जवळ येत आहे तशी हिंसा अधिक वाढू लागेल. परंतु संपूर्ण विश्वभरातील यहोवाचे साक्षीदार त्यांची ख्रिस्ती तटस्थता कायम टिकून ठेवतील व त्यांची खरी दया दाखवत राहतील.
[तळटीपा]
a “र्वांडातील दुर्घटना—कोण जबाबदार आहे?” हा डिसेंबर १५, १९९४ चा टेहळणी बुरूज लेख पहा.
b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने प्रकाशित केलेले आहे.
[१२ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
र्वांडा
किगाली
युगांडा
झाइरे
रुटशुरू
गोमा
किवु तळे
बुकावू
युवीरा
बुरूंडी
बुजुंबुरा
[१५ पानांवरील चित्रं]
डावीकडे: तॉबॉनॉ औझान आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली. उजवीकडे: मुकागीसागारा डेनीझ, ही एक तुत्सी होती, हुतू बांधवांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तिला ठार मारण्यात आले
[१६, १७ पानांवरील चित्रं]
वर: गोमातील राज्य सभागृहात आजाऱ्यांची शुश्रूषा करताना. खालून डावीकडे: साक्षीदारांनी जमा केलेला ३५ टनचा निवारण साठा मालवाहू जेट विमानाने पाठविण्यात आला. खाली: साक्षीदारांनी स्थलांतर केलेल्या किवु तळ्याजवळील दृश्य. खालून उजवीकडे: झाइरेतील एका राज्य सभागृहात र्वांडातील निर्वासित