यहोवा पुरवत असलेल्या सांत्वनाचे सहभागी होणे
“तुम्हाविषयीची आमची आशा दृढ आहे; कारण आम्हाला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहा तसे सांत्वनाचेहि सहभागी आहा.” —२ करिंथकर १:७.
१, २. अलीकडील काळात ख्रिश्चन बनलेल्यांनी काय अनुभवले?
सध्याच्या टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या वाचकवर्गापैकी अनेक जण देवाच्या सत्याच्या ज्ञानाअभावी लहानाचे मोठे झाले. कदाचित तुमच्या बाबतीतही हे खरे असेल. असे असल्यास, तुमचे ज्ञानचक्षु उघडू लागले तेव्हा तुमच्या मनात आलेल्या भावनांची आठवण करून पाहा. उदाहरणार्थ, मृतजन यातना सहन करत नाहीत तर बेशुद्धावस्थेत आहेत हे तुम्हाला पहिल्यांदा कळून आले तेव्हा तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडला नव्हता का? तसेच, मृतांसाठी असलेल्या आशेविषयी अर्थात, देवाच्या नव्या जगात अब्जावधी लोक पुनरुत्थित होतील याविषयी जेव्हा तुम्ही शिकलात, तेव्हा तुम्हाला सांत्वन लाभले नव्हते का?—उपदेशक ९:५, १०; योहान ५:२८, २९.
२ दुष्टतेचा अंत करून या पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर करण्याविषयीच्या देवाच्या अभिवचनाबद्दल काय? याबद्दल तुम्ही शिकला, तेव्हा त्यातून सांत्वन प्राप्त करून तुमचे मन उत्सुक अपेक्षेने भरले नाही का? कधीही न मरता त्याऐवजी, येणार असलेल्या पृथ्वीवरील परादीसमध्ये बचावून जाण्याच्या आशेविषयी पहिल्यांदा माहिती मिळाली तेव्हा तुम्हाला कसे वाटले? तुम्ही रोमांचित झाला असाल यात शंका नाही. होय, यहोवाच्या साक्षीदारांद्वारे आता सबंध जगात प्रचार केल्या जाणाऱ्या, देवाच्या सांत्वनदायक संदेशाचे तुम्ही प्राप्तकर्ते झाला होता.—स्तोत्र ३७:९-११, २९; योहान ११:२६; प्रकटीकरण २१:३-५.
३. देवाचा सांत्वनदायक संदेश इतरांना देणाऱ्यांना देखील क्लेश का भोगावा लागतो?
३ तथापि, तुम्ही बायबलचा संदेश इतरांना देण्याचा प्रयत्न केला तेव्हा, “सर्वांच्या ठायी विश्वास . . . नाही” हे देखील तुम्हाला कळून आले. (२ थेस्सलनीकाकर ३:२) तुम्ही बायबलच्या अभिवचनांवरील आपला विश्वास प्रकट केल्यामुळे कदाचित पूर्वीच्या तुमच्या काही मित्रमैत्रिणींनी तुमचा उपहास केला असेल. यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करत राहिल्यामुळे तुम्हाला छळ देखील सोसावा लागला असेल. तुमच्या जीवनास बायबल तत्त्वांच्या एकवाक्यतेत आणण्यासाठी तुम्ही बदल करू लागला तसतसा हा विरोध आणखीनच तीव्र झाला असेल. देवाचे सांत्वन स्वीकारणाऱ्या सर्वांवर सैतान व त्याचे जग जो क्लेश आणतात त्याचा तुम्हाला अनुभव येऊ लागला.
४. नवीन आस्थेवाईक लोकांना क्लेश भोगावा लागल्यास ते कदाचित, कोणत्या विविध प्रकारे प्रतिक्रिया दाखवू शकतात?
४ दुःखद बाब अशी की येशूने भाकीत केल्याप्रमाणे या क्लेशामुळे काही जण अडखळतात व ख्रिस्ती मंडळीसोबत सहवास राखण्याचे बंद करतात. (मत्तय १३:५, ६, २०, २१) काही जण ते शिकत असलेल्या सांत्वनदायक अभिवचनांवर आपली नजर खिळवून धीराने क्लेश सोसतात. कालांतराने ते यहोवाला आपले जीवन समर्पित करतात व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे अनुयायी या नात्याने बाप्तिस्मा घेतात. (मत्तय २८:१९, २०; मार्क ८:३४) अर्थातच, बाप्तिस्मा घेतल्यावर क्लेश संपुष्टात येत नसतो. उदाहरणार्थ, अनैतिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला लैंगिकरित्या निर्दोष राहणे, एक कठीण संघर्ष असल्याचे भासू शकतो. इतरांना सत्य न मानणाऱ्या कौटुंबिक सदस्यांकडून निरंतर विरोधाला तोंड द्यावे लागते. कोणत्याही प्रकारचा क्लेश असला तरीसुद्धा, देवाला समर्पित असे जीवन जगण्यासाठी जे विश्वासूपणे यत्न करतात ते एका गोष्टीबद्दल खात्री बाळगू शकतात. अत्यंत व्यक्तिगतरित्या, ते देवाचे सांत्वन व मदत अनुभवतील.
“सर्व सांत्वनदाता देव”
५. पौलाने सोसलेल्या असंख्य संकटांसोबत त्याने आणखी काय अनुभवले?
५ देव पुरवत असलेल्या सांत्वनाबद्दल प्रेषित पौल अत्यंत कृतज्ञ होता. आशिया व मासेदोनिया येथील अतिशय संकटमय अनुभवानंतर, करिंथच्या मंडळीने त्याच्या वाग्दंडाच्या पत्राला सुयोग्य प्रतिसाद दिल्याचे ऐकल्यावर त्याने मोठे समाधान अनुभवले. यामुळे त्यांना दुसरे पत्र लिहिण्याची त्याला चालना मिळाली; या पत्रात स्तुतीची पुढील अभिव्यक्ती आहे: “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो.”—२ करिंथकर १:३, ४.
६. आपण २ करिंथकर १:३, ४ येथे आढळणाऱ्या पौलाच्या शब्दांतून काय शिकतो?
६ हे शब्द पुष्कळ काही सांगून जातात. आपण त्यांचे विश्लेषण करू. पौल जेव्हाजेव्हा त्याच्या पत्रांत देवाची स्तुती अथवा त्याला आभार व्यक्त करतो तेव्हातेव्हा सहसा आपल्याला आढळते की तो ख्रिस्ती मंडळीचे मस्तक असणाऱ्या येशूबद्दलही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. (रोमकर १:८; ७:२५; इफिसकर १:३; इब्री लोकांस १३:२०, २१) यास्तव, पौल स्तुतीची ही अभिव्यक्ती, “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता” (तिरपे वळण आमचे.) यास संबोधतो. यानंतर, त्याच्या लिखाणात पहिल्यांदाच तो “करुणाकर” म्हणून भाषांतरित केलेली एक ग्रीक संज्ञा उपयोगात आणतो. ही संज्ञा, कोणा दुसऱ्याच्या कष्टाबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका शब्दापासून येते. अशा प्रकारे क्लेश सोसत असलेल्या आपल्या विश्वासू सेवकांतील कोणाही संबंधाने देवाच्या करुणामय भावनांचे पौल वर्णन करतो—अशा करुणामय भावना, ज्या त्यांच्यासाठी दयाळूपणे कार्य करण्यास देवाला प्रवृत्त करतात. शेवटी पौलाने यहोवास “करुणाकर पिता” (तिरपे वळण आमचे.) म्हणण्याद्वारे त्याला या वांच्छनीय गुणाचा उगम मानले.
७. यहोवा “सर्व सांत्वनदाता देव” आहे असे का म्हटले जाऊ शकते?
७ देवाची ‘करुणा,’ क्लेश भोगत असलेल्यास समाधान देते. यास्तव, पौलाने यहोवाचे “सर्व सांत्वनदाता देव,” असे म्हणून वर्णन केले. अशा प्रकारे, सहविश्वासूंच्या दयाळूपणातून आपल्याला थोडेबहुत सांत्वन मिळाले तरीपण सांत्वनाचा उगम या नात्याने आपण यहोवाची आस धरू शकतो. सर्व प्रकारचे खरे व चिरकालिक सांत्वन देवाकडूनच येते. शिवाय, त्यानेच मानवास त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले व याकरवी आपल्यालाही सांत्वनकर्ते होण्याची क्षमता दिली. तसेच, स्वतः देवाचा पवित्र आत्मा त्याच्या सेवकांना, सांत्वनाची गरज असलेल्यांबद्दल करुणा दाखविण्याची चालना देतो.
सांत्वनकर्ते होण्यासाठी प्रशिक्षित
८. देव स्वतः कधीही आपल्यावर संकटे आणत नसला तरीसुद्धा धीराने क्लेश भोगल्यामुळे आपल्यावर त्याचा कोणता लाभदायक परिणाम होऊ शकतो?
८ यहोवा देव त्याच्या विश्वासू सेवकांवर येणाऱ्या विविध संकटांना अनुमती देत असला तरीसुद्धा, तो स्वतः ही संकटे कधीही आणत नाही. (याकोब १:१३) तथापि, आपण धीराने क्लेश भोगत असताना त्याने पुरवलेले सांत्वन, आपल्याला इतरांच्या गरजांबद्दल अधिक संवेदनशील होण्याचे प्रशिक्षण देते. कोणत्या परिणामासह? “ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याहि संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे.” (२ करिंथकर १:४) अशा प्रकारे, आपण येशूचे अनुकरण करून “सर्व शोकग्रस्ताचे सांत्वन” करत असताना, सहविश्वासूंसोबत व आपल्या सेवेत आपल्याला भेटतात अशांसोबत, यहोवाच्या सांत्वनाचे परिणामकारक सहभागी होण्यासाठी तो आपल्याला प्रशिक्षित करतो.—यशया ६१:२; मत्तय ५:४.
९. (अ) धीराने यातना सोसण्यासाठी आपल्याला कशाची मदत मिळेल? (ब) आपण आपल्यावर येणारे क्लेश विश्वासूपणे धीराने सोसतो तेव्हा इतरांना कशाप्रकारे सांत्वन लाभते?
९ पौलाने ख्रिस्ताद्वारे देवाकडून मिळालेल्या विपुल सांत्वनाच्या मदतीने आपल्या असंख्य यातना धीराने सोसल्या. (२ करिंथकर १:५) देवाच्या अमूल्य अभिवचनांवर मनन करण्याद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरता प्रार्थना करण्याद्वारे व आपल्या प्रार्थनांची कशाप्रकारे देवाकडून उत्तरे मिळतात याचा अनुभव घेण्याद्वारे आपण देखील विपुल सांत्वन अनुभवू शकतो. त्याकरवी यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे निरंतर समर्थन करण्यासाठी व दियाबल खोटा असल्याचे शाबीत करण्यासाठी आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल. (ईयोब २:४; नीतिसूत्रे २७:११) कोणत्याही प्रकारचा क्लेश विश्वासूपणे धीराने सोसल्यानंतर आपण पौलाप्रमाणेच सर्व श्रेय यहोवास द्यावे, ज्याच्या सांत्वनाकरवी ख्रिश्चनांना संकटात विश्वासू राहता येणे शक्य होते. विश्वासू ख्रिश्चनांनी धीर धरल्यामुळे त्याचा संपूर्ण बंधुत्वावर एक सांत्वनदायक परिणाम होतो व त्यामुळे ‘जी दुःखे ते सोसतात, ती सहन करण्यासाठी’ इतरही दृढसंकल्पी बनतात.—२ करिंथकर १:६.
१०, ११. (अ) प्राचीन करिंथच्या मंडळीला कोणत्या कारणांमुळे यातना सोसाव्या लागल्या? (ब) पौलाने करिंथच्या मंडळीला कशाप्रकारे सांत्वन दिले व त्याने कोणती आशा व्यक्त केली?
१० सर्व ख्रिश्चनांना भोगाव्या लागणाऱ्या यातना करिंथकरांच्या वाट्यालाही आल्या. त्याशिवाय, त्यांना एका अपश्चात्तापी जारकर्म्यास बहिष्कृत करण्यासाठी सल्ला देणे आवश्यक होते. (१ करिंथकर ५:१, २, ११, १३) ही कारवाई न केल्यामुळे तसेच तंटा व फुटींना आळा न घातल्यामुळे मंडळीवर नामुष्की आली होती. परंतु, शेवटी त्यांनी पौलाचा सल्ला लागू केला व खरा पश्चात्ताप दाखवला. यासाठी, त्याने त्यांची प्रेमळपणे प्रशंसा केली व त्याच्या पत्राला त्यांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे आपल्याला सांत्वन लाभल्याचे सांगितले. (२ करिंथकर ७:८, १०, ११, १३) बहिष्कृत केलेल्या व्यक्तीनेही पश्चात्ताप केला होता असे दिसते. यामुळे पौलाने त्यांना सल्ला दिला की त्यांनी “त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाही तर तो दुःखसागरात बुडून जावयाचा.”—२ करिंथकर २:७.
११ पौलाच्या दुसऱ्या पत्रामुळे करिंथच्या मंडळीस खात्रीने सांत्वन मिळाले असावे. हा त्याच्या उद्देशांपैकी एक होता. त्याने स्पष्ट केले: “तुम्हाविषयीची आमची आशा दृढ आहे; कारण आम्हाला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहा तसे सांत्वनाचेहि सहभागी आहा.” (२ करिंथकर १:७) आपल्या पत्राच्या शेवटास पौलाने आर्जविले: ‘तुम्हाला सांत्वन मिळत राहो, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील.’—२ करिंथकर १३:११.
१२. सर्व ख्रिश्चनांना कशाची गरज आहे?
१२ यातून आपण केवढा महत्त्वाचा धडा शिकू शकतो! ख्रिस्ती मंडळीच्या सर्व सदस्यांनी, देव आपल्या वचनाकरवी, आपल्या पवित्र आत्म्याकरवी व आपल्या पृथ्वीवरील संघटनेकरवी पुरवत असलेल्या “सांत्वनाचेहि सहभागी” होण्याची गरज आहे. बहिष्कृत झालेल्यांनी पश्चात्ताप करून आपला अयोग्य मार्ग सुधारला असल्यास त्यांनाही सांत्वनाची गरज असू शकते. यास्तव, ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने’ त्यांना मदत करण्यासाठी एक दयाळू तरतूद प्रस्थापित केली आहे. वर्षातून एकदा दोन वडील विशिष्ट बहिष्कृत लोकांना भेट देऊ शकतात. कदाचित, ते आता बंडखोर मनोवृत्ती दाखवत नसतील किंवा गंभीर पापात गुरफटलेले नसतील व परत घेतले जाण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याकरता त्यांना मदतीची गरज असेल.—मत्तय २४:४५; यहेज्केल ३४:१६.
पौलाचा आशियातील क्लेश
१३, १४. (अ) आशियामध्ये अनुभवलेल्या एका कठीण क्लेशाच्या काळाचे पौलाने कसे वर्णन केले? (ब) पौलाच्या मनात कोणती घटना असावी?
१३ करिंथच्या मंडळीने येथपर्यंत ज्या प्रकारचे दुःख सोसले होते त्याची तुलना, पौलास सोसाव्या लागलेल्या असंख्य क्लेशांसोबत करता येणार नाही. याच कारणास्तव, तो त्यांना आठवण करून देऊ शकला: “बंधुजनहो, आशियात आम्हावर आलेल्या संकटांविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले; फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हास सांगत होते; आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवीत आहे, आणि तो आम्हाला ह्यापुढेहि सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.”—२ करिंथकर १:८-१०.
१४ काही बायबल अभ्यासकांचे असे मत आहे की पौल इफिस येथे झालेल्या दंगलीबद्दल बोलत असावा; या दंगलीत पौलासहित त्याच्या प्रवासातील दोन मासेदोनियाकर सोबती अर्थात गायस व अरिस्तार्ख यांचाही जीव जाण्याचा संभव होता. या दोन ख्रिश्चनांना जबरीने एका नाटकगृहात नेण्यात आले जेथे लोकांची एकच गर्दी होती; “सुमारे दोन तासपर्यंत, इफिसकरांची अर्तमी थोर, अशी सर्वांची एकच आरोळी झाली.” शेवटी नगराचा एक अधिकारी त्या जमावास शांत करण्यात यशस्वी झाला. गायस व अरिस्तार्ख यांचा जीव जोखमीत पडल्यामुळे पौलास फारच मनस्ताप झाला असावा. खरे तर, त्या धर्मवेड्या जमावाची समजूत घालावी असे पौलाच्या मनात होते परंतु, त्याला असे करून आपला जीव धोक्यात घालण्यापासून अडवण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये १९:२६-४१.
१५. कदाचित कोणत्या भयंकर प्रसंगाचे १ करिंथकर १५:३२ येथे वर्णन केलेले असावे?
१५ तथापि, पौल या घटनेपेक्षा कितीतरी भयंकर अशा प्रसंगाचे वर्णन करत असावा. करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात पौलाने असा प्रश्न केला: “मनुष्यस्वभावाप्रमाणे म्हणावयाचे तर इफिसांत मी श्वापदाबरोबर लढाई केली ह्यात मला काय लाभ?” (१ करिंथकर १५:३२) याचा अर्थ असा होऊ शकतो की पौलाचे जीवन केवळ पाशवी मानवांकडूनच नव्हे तर इफिसच्या क्रिडांगणावर अक्षरशः हिंस्र पशूंकडूनही धोक्यात आले होते. काहीवेळा गुन्हेगारांना रक्तपिपासू लोकांच्या देखत हिंस्र पशूंसोबत लढावयास भाग पाडले जाई. पौलाने अक्षरशः हिंस्र पशूंना तोंड दिले होते असे त्याचे तात्पर्य असल्यास, दानीएलास जसे शब्दशः सिंहाच्या तोडांतून वाचवण्यात आले होते तसेच त्यालाही एका निर्घृण मृत्यूपासून शेवटच्या क्षणी चमत्कारिकपणे वाचवण्यात आले असावे.—दानीएल ६:२२.
आधुनिक काळातील उदाहरणे
१६. (अ) पौलाने सोसलेल्या क्लेशांविषयी यहोवाचे अनेक साक्षीदार का सहानुभूती दाखवू शकतात? (ब) विश्वासामुळे मृत्यू पावलेल्यांसंबंधाने आपण कोणती खात्री बाळगू शकतो? (क) काही ख्रिश्चन मृत्यूच्या विळख्यातून थोडक्यात बचावतात तेव्हा याचा इतर ख्रिश्चनांवर कोणता चांगला परिणाम झाला आहे?
१६ आधुनिक काळातील अनेक ख्रिस्ती जन पौलाने सोसलेले क्लेश समजू शकतात. (२ करिंथकर ११:२३-२७) आज देखील, ख्रिश्चन त्यांच्या “शक्तीपलीकडे अतिशयच दडपले” गेले आहेत व अनेकांनी अशा प्रसंगाना तोंड दिले आहे जेव्हा आपण “जगतो की मरतो असे” त्यांना वाटले. (२ करिंथकर १:८) काही तर खुनी समूहांच्या व क्रूर छळणाऱ्यांच्या हातून मृत्यूमुखी पडले आहेत. आपण खात्री बाळगू शकतो की देवाच्या सांत्वनदायक सामर्थ्यानेच त्यांना धीराने सोसण्यास समर्थ केले व त्यांची आशा स्वर्गीय असो किंवा पार्थिव असो, त्या आशेच्या पूर्णतेवर आपली अंतःकरणे व नजर केंद्रित करून ते मरणाला सामोरे गेले. (१ करिंथकर १०:१३; फिलिप्पैकर ४:१३; प्रकटीकरण २:१०) इतर काही प्रसंगी, यहोवाने हालचाल केली व आपल्या बांधवांना मृत्यूच्या विळख्यातून बचावण्यात आले. ज्या लोकांना अशा प्रकारे बचावण्यात आले त्यांचा “मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा” आणखीनच बळावला आहे यात शंका नाही. (२ करिंथकर १:९) नंतर, देवाचा सांत्वनदायक संदेश इतरांना देताना ते अधिक खात्रीने बोलू शकले.—मत्तय २४:१४.
१७-१९. र्वांडा येथील आपले बांधव देवाच्या सांत्वनात सहभागी झाले आहेत हे कोणत्या अनुभवांवरून दिसून येते?
१७ अलीकडेच, र्वांडातील आपल्या प्रिय बांधवांना पौल व त्याच्या सोबत्यांसारखाच अनुभव आला. अनेकांनी त्यांचे जीव गमावले परंतु त्यांचा विश्वास मोडण्यास सैतानाच्या प्रयत्नांना यश आले नाही. उलटपक्षी, या देशातील आपल्या बांधवाना अनेक खास मार्गांनी देवाच्या सांत्वनाचा अनुभव आला आहे. र्वांडा येथे राहाणाऱ्या तुत्सी व हुतू यांच्या जातीयसंहाराच्या काळात, तुत्सींचा जीव वाचवण्यासाठी काही हुतूंनी आपले जीव धोक्यात घातले आणि तुत्सींनीही हुतूंना संरक्षण दिले. काहींना तर त्यांच्या तुत्सी सहविश्वासूंना वाचवल्यामुळे जहालमतवाद्यांकडून जिवे मारण्यात आले. उदाहरणार्थ, गाहीझी नामक एका हुतू साक्षीदाराने चांताल नामक एका तुत्सी भगिनीस शरण दिल्यामुळे त्यास मारून टाकण्यात आले. चांताल हिचा तुत्सी पती झाँ यास एका दुसऱ्या ठिकाणी शारलॉट् नामक एका हुतू भगिनीने आसरा दिला होता. ४० दिवसांपर्यंत झाँ व आणखी एक तुत्सी बंधू एका मोठ्या धुराड्यात लपून राहिले व ते रात्री फक्त काही वेळाकरता बाहेर येत असत. या सबंध काळात, शारलॉट् हिने एका हुतू सैन्य शिबिराजवळ राहात असूनही, त्यांना अन्न व निवारा पुरवला. या पानावर तुम्ही पुनर्मिलन झालेल्या झाँ व चांतालचे एक चित्र पाहू शकता; प्रिस्क व अक्विला यांनी पौलासाठी केल्याप्रमाणे त्यांच्या हुतू सहउपासकांनीही त्यांच्यासाठी “आपला जीव धोक्यात घातला,” याबद्दल ते अतिशय कृतज्ञ आहेत.—रोमकर १६:३, ४.
१८ आणखी एक हुतू साक्षीदार, रुआकाबूबू, याची तुत्सी सहविश्वासूंचा जीव वाचवल्याबद्दल ईनटारमारा या वृत्तपत्राने प्रशंसा केली.a त्यात म्हटले होते: “यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक रुआकाबूबू नामक इसम देखील आहे, जो ठिकठिकाणी त्याच्या बांधवांना (सहविश्वासू एकमेकांना असेच संबोधतात) आश्रय देत राहिला. दमेकरी असूनही, त्यांच्यासाठी भोजन व पिण्याचे पाणी नेण्यासाठी त्याची दिवसभर खटपट चालत असे. तथापि, त्याला देवाने असाधारण सामर्थ्य बहाल केले.”
१९ निकॉडेम व आतानॉझी या आस्थेवाईक जोडप्याचे उदाहरण देखील विचारात घ्या. जातीय संहाराचा उद्रेक होण्यापूर्वी, हे विवाहित जोडपे ऑल्फोन्स नामक एका तुत्सी साक्षीदारासोबत बायबलचा अभ्यास करत होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी ऑल्फोन्सला आपल्या घरात लपविले. नंतर त्यांना जाणवले की त्याला घरात ठेवणे धोक्याचे होते कारण त्यांच्या हुतू शेजाऱ्यांना त्यांच्या या मित्राविषयी माहीत होते. म्हणून निकॉडेम व आतानॉझी यांनी ऑल्फोन्सला त्यांच्या अंगणातील एका खड्ड्यात लपविले. त्यांनी असे केले हे चांगलेच झाले कारण त्यांचे शेजारी अक्षरशः दररोज ऑल्फोन्सला शोधण्यासाठी येऊ लागले. या खड्ड्यात २८ दिवसांपर्यंत पडलेले असताना ऑल्फोन्स बायबलच्या अहवालांवर मनन करत असे; उदाहरणार्थ, राहाबचा अहवाल, जिने यरीहोतील आपल्या घराच्या छतावर दोन इस्राएली पुरुषांना लपविले होते. (यहोशवा ६:१७) आपल्या हुतू बायबल अभ्यासकांनी आपल्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घातला याबद्दल कृतज्ञ असणारा ऑल्फोन्स, आजही र्वांडा येथे सुवार्तेचा उद्घोषक या नात्याने सेवा करत आहे. निकॉडेम व आतानॉझी यांच्याबद्दल काय? ते आता यहोवाचे बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार असून आस्थेवाईक लोकांसोबत २० बायबल अभ्यास चालवतात.
२०. यहोवाने र्वांडातील आपल्या बांधवांना कशाप्रकारे सांत्वन दिले आहे, तथापि त्यांपैकी अनेकांना अद्यापही कशाची गरज आहे?
२० र्वांडा येथे जातीयसंहार सुरू झाला त्यावेळेस या देशात सुवार्तेचे २,५०० प्रचारक होते. शेकडो लोकांचा एकतर जीव गेला किंवा त्यांना देशातून पलायन करणे भाग पडले तरीसुद्धा, साक्षीदारांच्या संख्येत वाढ होऊन आता ती ३,००० हून अधिक झाली आहे. देवाने आपल्या बांधवांना खरोखर सांत्वन दिले याचा हा स्पष्ट पुरावा आहे. यहोवाच्या साक्षीदारांमधील अनेक अनाथ मुले व विधवा यांबद्दल काय? साहजिकच, हे अद्यापही क्लेश भोगत आहेत व त्यांना सांत्वनाची निरंतर गरज आहे. (याकोब १:२७) देवाच्या नवीन जगात पुनरुत्थान होईल तेव्हाच त्यांचे अश्रू पूर्णपणे पुसले जातील. तथापि, त्यांच्या बांधवांच्या मदतीमुळे व ‘सर्व सांत्वनदात्या देवाचे’ उपासक असल्यामुळे, ते जीवनास यशस्वीपणे तोंड देण्यास समर्थ आहेत.
२१. (अ) आणखीन कोणकोणत्या ठिकाणी आपल्या बांधवांना देवाच्या सांत्वनाची आत्यंतिक गरज भासली आहे व कोणत्या एका मार्गाने आपण सर्वजण साहाय्य करू शकतो? (“युद्धाच्या चार वर्षांदरम्यान सांत्वन” या शीर्षकाची पेटी पाहा.) (ब) सांत्वनाची आपली गरज पूर्णपणे केव्हा भागवली जाईल?
२१ एरित्री, सिंगापूर व भूतपूर्व युगोस्लाव्हिया यांसारख्या इतर अनेक ठिकाणी, आपले बांधव क्लेश असूनही निरंतर यहोवाची सेवा विश्वासूपणे करत आहेत. अशा बांधवांना सांत्वन मिळावे म्हणून नियमित प्रार्थना करण्याद्वारे आपण त्यांना मदत करावी. (२ करिंथकर १:११) तसेच, येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने देव, खऱ्या अर्थाने “[आपल्या] डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील” तोपर्यंत आपण विश्वासूपणे धीर धरावा. असे केल्यास, यहोवा त्याच्या नीतिमत्त्वाच्या नव्या जगात जे सांत्वन पुरवील त्याचा आपण पूर्णार्थाने अनुभव घेऊ शकू.—प्रकटीकरण ७:१७; २१:४; २ पेत्र ३:१३.
[तळटीपा]
a जानेवारी १, १९९५ टेहळणी बुरूज च्या अंकातील पृष्ठ २६ वर रुआकाबूबूची मुलगी डेबोरा हिचा अनुभव सांगण्यात आला होता; हुतू सैनिकांच्या एका ताफ्याने तिची प्रार्थना ऐकली तेव्हा त्यांच्या अंतःकरणाला पीळ पडल्यामुळे हत्या होण्यापासून त्या कुटुंबाचा बचाव झाला.
तुम्हाला माहीत आहे का?
◻ यहोवाला “सर्व सांत्वनदाता देव” असे का म्हटले आहे?
◻ आपण क्लेशांविषयी कोणता दृष्टिकोन बाळगण्यास हवा?
◻ आपण कोणासोबत सांत्वनाचे सहभागी होऊ शकतो?
◻ आपली सांत्वनाची गरज कशाप्रकारे पूर्णपणे भागवली जाईल?
[१७ पानांवरील चित्रं]
झाँ व चांताल हे तुत्सी साक्षीदार असूनही, त्यांना र्वांडा येथील जातीयसंहारादरम्यान हुतू साक्षीदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी लपवले
र्वांडा येथे यहोवाचे साक्षीदार अजूनही देवाचा सांत्वनदायक संदेश त्यांच्या शेजाऱ्यांना देत आहेत