र्वांडातील दुर्घटना कोण जबाबदार आहे?
“२३ वर्षीय हितीयेसी या मेकॅनिकचे डोके फोडण्याआधी त्याच्यावर हल्ला करणाऱ्या एकाने म्हटले, ‘तुला मरावेच लागेल कारण तू एक तुत्सी आहेस,’” असे यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टने सांगितले.
एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान र्वांडाच्या त्या लहानशा मध्य आफ्रिकन राष्ट्रात किती तरी वेळा अशाचप्रकारचे दृश्य घडत होते! त्या वेळी र्वांडाची राजधानी किगाली या शहरात आणि आजूबाजूला यहोवाच्या साक्षीदारांच्या १५ मंडळ्या होत्या. त्या शहराचे पर्यवेक्षक तॉबॉनॉ औझान हे एक तुत्सी होते. तो, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि शामी नावाची त्याची नऊ वर्षांची मुलगी हे चौघेजण ज्यावेळेला या हिंसेचा उद्रेक झाला तेव्हा तेथे बळी पडलेल्यांपैकी प्रथम होते.
र्वांडात कित्येक आठवड्यांसाठी—दररोज हजारो लोकांची हत्या करण्यात येत होती. “मागील सहा आठवड्यांमध्ये, २,५०,००० पेक्षा अधिक लोक, जातिसंहार व सूडामुळे मारले गेले. १९७० च्या दशकाच्या मध्यात कॅम्बोडियाच्या खमेर रुझच्या रक्तरंजित शुद्धीकरणात मारले गेलेल्यांपेक्षा ही संख्या, किती तरी पटीने जास्त आहे,” असे वर उल्लेखलेल्या वार्तापत्रकाने मे महिन्याच्या मध्याला म्हटले.
टाईम नियतकालिकाने म्हटले: “नात्सी जर्मनीची आठवण करून देणाऱ्या एका दृश्यात, ५०० लोकांच्या एका गटातून मुलांना ठार मारण्यात आले. कारण ते तुत्सी लोकांप्रमाणे दिसत होते. . . . बुटारेच्या दक्षिणेकडील शहराच्या नगराध्यक्षाची पत्नी एक तुत्सी होती म्हणून हुतू शेतकरीवर्गाने त्याच्यासमोर दोन निवडी मांडल्या. त्याने जर त्याच्या बायकोच्या कुटुंबाला म्हणजे तिचे पालक आणि तिची धाकटी बहीण या तिघांना ठार मारण्यासाठी त्यांच्या हवाली केले तर तो त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांना वाचवू शकतो. आणि त्याने ही अट मान्य केली.”
किगाली येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या भाषांतर कार्यालयात सहा जण काम करत होते. चौघे हुतू आणि दोघे तुत्सी होते. ऑननी म्बॉन्डॉ व मुकागीसागारा डेनीझ हे दोघे तुत्सी होते. लोकसेना व लुटारू या घरात आले तेव्हा हुतू आणि तुत्सी एकत्र राहतात हे पाहून अतिशय क्रोधित झाले. ते म्बॉन्डॉ व डेनीझला ठार मारण्यास इच्छित होते.
हुतू बांधवांपैकी इमॅन्युएल न्गीरंट नावाचा बांधव म्हणाला, “ते त्यांच्या स्फोटगोलकातून मेख काढू लागले व त्यांच्या शत्रूंना आमच्यामध्ये ठेवल्यामुळे आम्हाला मारण्यात येईल अशी धमकी देऊ लागले. . . . त्यांना पैशाची मोठी रक्कम हवी होती. आमच्या हातात जितके पैसे होते तितके आम्ही त्यांना दिले. पण त्यांना काही त्याचे समाधान वाटले नाही. म्हणून त्याची भरपाई होण्यासाठी ते जे काही वापरू शकतील अशा सर्व वस्तू घेऊन जाण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी नेलेल्या वस्तुंमध्ये आमच्या भाषांतर कामाचे एक लॅपटप कम्प्युटर, आमचे फोटोकॉपीयर, आमचे रेडिओ, आमचे शूज आणि अशा अनेक वस्तू होत्या. आणि अचानक आमच्यातील कोणालाही न मारता ते निघून गेले. पण जाताना सांगून गेले की ते पुन्हा येतील.”
पुढील काही दिवसांसाठी, हे लुटारू सारखे येत राहिले, आणि प्रत्येक वेळी हुतू साक्षीदार या लुटारूंपुढे त्यांच्या तुत्सी मित्रांना सोडून देण्याची भीक मागत राहिले. शेवटी, जेव्हा म्बॉन्डॉ व डेनीझला तेथे राहणे अतिशय धोक्याचे झाले तेव्हा एका जवळपासच्या शाळेतील इतर तुत्सी निर्वासितांबरोबर राहण्याची त्यांची व्यवस्था करण्यात आली. या शाळेवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा म्बॉन्डॉ व डेनीझ तेथून निसटून पळाले. ते, रस्त्यावर रचलेल्या अनेक अडथळ्यांना यशस्वीपणे पार करू शकले परंतु शेवटी, एका अडखळणावर सर्व तुत्सी लोकांना बाजूला घेण्यात आले आणि म्बॉन्डॉ व डेनीझला ठार मारण्यात आले.
ते सैनिक पुन्हा एकदा भाषांतर कार्यालयात आले तेव्हा तुत्सी साक्षीदार निघून गेल्याचे पाहिल्यावर त्यांनी हुतू साक्षीदारांना जबर मार दिला. तेवढ्यात बाजूलाच एका उखळी तोफेचा स्फोट झाला आणि बांधव त्यांचे जीव वाचवू शकले.
संपूर्ण देशात ही हत्या चालू होती. मृतांची संख्या जवळजवळ पाच लाखापर्यंत पोहंचली. कालांतराने, र्वांडाच्या ८० लक्ष रहिवाश्यांपैकी २० ते ३० लक्ष किंवा त्यापेक्षा अधिकांनी त्यांची घरे सोडली. अनेकांनी जवळपासच्या झायरे व टान्झानिया शहरांमध्ये आश्रय घेतला. काही शेकडो यहोवाचे साक्षीदार मारले गेले आणि इतर पुष्कळ जण शहराच्या बाहेर असलेल्या छावण्याकडे पळ काढणाऱ्यांमध्ये होते.
अशाप्रकारे लोकांची ही अभूतपूर्व कत्तल व निर्गम कशामुळे सुरू झाला? याला टाळता आले असते का? या हिंसेचा उद्रेक होण्याआधी परिस्थिती कशी होती?
हुतू आणि तुत्सी
र्वांडा आणि त्याच्या शेजारच्या बुरूंडी राष्ट्रात हुतू लोकांची वस्ती आहे. हे लोक सामान्यपणे ठेंगणे पण मजबूत बांटू लोक आहेत. तर, तुत्सी साधारपणे उंच, आणि सावळे आहेत ज्यांना वाटुसी असेही म्हटले जाते. या दोन्ही राष्ट्रांमध्ये ८५ टक्के हुतू लोकांची वस्ती आहे आणि १४ टक्के तुत्सी लोकांची वस्ती आहे. या दोन्ही जातीत १५ व्या शतकापासून खटके उडत होते असे अहवाल आहेत. तरीही, अनेक वेळा हे लोक शांतीने एकत्र राहिले आहेत.
“आम्ही एकमेकांसोबत शांतीने राहत होतो,” असे २९ वर्षांच्या एका विवाहित स्त्रीने म्हटले. ही स्त्री झायरेच्या पूर्वेकडील काही किलोमीटर्सच्या अंतरावर असलेल्या रुगांडा नावाच्या एका खेड्यात राहणारी होती. या खेड्यात ३,००० हुतू आणि तुत्सी लोक राहत होते. परंतु, एप्रिलमध्ये हुतू लोकांच्या टोळीने त्या खेड्यातील जवळजवळ सर्वच तुत्सी लोकांना ठार मारले. त्याविषयी द न्यूयॉर्क टाईम्सने असे वर्णन दिले:
“या खेड्याची कथा र्वांडाच्या कथेसारखीच होती: हुतू आणि तुत्सी एकत्र राहत होते, त्यांच्यात आंतरजातिय विवाह होत होते, कोण कुठल्या जातीचा आहे याची पर्वा नव्हती किंवा कोण हुतू आहे व कोण तुत्सी आहे हे देखील त्यांना माहीत नव्हते.
“आणि अचानक परिस्थिती बदलली. एप्रिलमध्ये, संपूर्ण राष्ट्रात हुतू जमाव खवळला आणि जेथे कोठे त्यांना तुत्सी लोक दिसतील तेथे त्यांना ठार मारू लागले. ही कत्तल चालू झाली तेव्हा, तुत्सी लोक आश्रयासाठी चर्चमध्ये पळाले. तेथेही जमाव त्यांचा पाठलाग करत आला आणि आश्रयस्थान समजले जाणारे चर्च, रक्ताने माखलेली स्मशानभूमी झाले.”
ही कत्तल कशामुळे घडली होती? एप्रिल ६ तारखेला किगाली येथे र्वांडा आणि बुरूंडी या दोन्ही राष्ट्रांच्या अध्यक्षांचा विमान कोसळल्यामुळे मृत्यू झाला होता. ही दुर्घटना या कत्तलीला कारणीभूत होती. ते दोघेही हुतू होते. या घटनेमुळे केवळ तुत्सी लोकांचीच नव्हे तर त्यांना दया दाखवणाऱ्या हुतू लोकांची देखील कत्तल करण्यात आली.
त्याचवेळी, बंडखोर गटांमधील झगडे अधिकच वाढत गेले—तुत्सींचे वर्चस्व असणारा आर.पी.एफ (र्वांडन पॅट्रियॉटिक फ्रॅन्ट) गट—व हुतू वर्चस्व सरकार बळ. जुलैपर्यंत आर.पी.एफने सरकारी बळाचा पराजय करून किगाली तसेच र्वांडाच्या अधिकांश भागावर सत्ता मिळवली होती. सूडाच्या भीतीने, जुलैच्या सुरवातीला शेकडो, हजारो हुतू लोक राष्ट्र सोडून पळून गेले.
कोण जबाबदार आहे?
ही हिंसा अशी अचानक एप्रिल महिन्यात का उसळली याचे स्पष्टीकरण विचारल्यावर, एका तुत्सी शेतकऱ्याने म्हटले: “हे सर्व या वाईट नेत्यांमुळे झाले.”
होय, अनेक शतकांपासून, राजकीय नेत्यांनी त्यांच्या शत्रूंबद्दल लबाड्या पसरवल्या आहेत. “ह्या जगाचा अधिकारी” दियाबल सैतान, याच्या मार्गदर्शनाखाली, जागतिक राजकर्त्यांनी स्वतःच्या लोकांना दुसऱ्या जातीच्या, वंशाच्या किंवा राष्ट्राच्या लोकांविरूद्ध लढण्यास व त्यांना ठार मारण्यास चेतवले आहे. (योहान १२:३१; २ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९) र्वांडातील परिस्थिती काही वेगळी नव्हती. द न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले: “राजकर्त्यांनी वारंवार जातीय निष्ठा व जातीय भयाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला आहे—हुतूंना सरकारवर नियंत्रण ठेवण्याचे; तर तुत्सींना बंडखोरी बळाला पाठिंबा देण्याचे उत्तेजन दिले.”
र्वांडातील लोकांची एकमेकांमध्ये पुष्कळ साम्यता असल्यामुळे, त्यांनी एकमेकांचा द्वेष करून कत्तल करण्याची अपेक्षा कोणीही करू शकत नाही. “हुतू आणि तुत्सी लोक एकच भाषा बोलतात आणि सर्वसामान्यपणे एकाच प्रकारच्या परंपरा अनुसरतात. आंतरजातिय विवाहाच्या अनेक पिढ्यांनंतर, त्यांच्या शारीरिक घडणेतील फरक—उंच आणि काटकूळे तुत्सी, ठेंगणे आणि मजबूत हुतू—इतका नाहीसा झाला आहे की स्वतः र्वांडातील लोकांना, अमुक अमुक व्यक्ती हुतू आहे की तुत्सी आहे याचीच खात्री नाही,” असे रेमंड बॉनर या वार्ताहराने लिहिले.
तरीही, अलिकडच्या प्रचाराच्या सरबत्त्याचा अविश्वासार्ह परिणाम झाला आहे. याचे उदाहरण देताना, आफ्रिकन राईट्स गटाचे संचालक ॲलेक्स डी वॅल म्हणाले: “आर.पी.एफची सत्ता असलेल्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना रेडिओवरून सांगण्यात येते की तुत्सी सैनिकांना शिंगे व शेपट्या आहेत आणि त्यांचे डोळे अंधारात चमकतात. परंतु जेव्हा या शेतकऱ्यांनी तुत्सींना पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले कारण रेडिओवरून त्यांचे जे वर्णन दिले होते त्याप्रमाणे ते नव्हते.”
राजकीय नेतेच केवळ लोकांच्या विचारसरणीला आकार देत नाहीत तर त्यामध्ये धर्माचाही हात आहे. र्वांडातील मुख्य धर्म कोणते आहेत? या दुर्घटनेबद्दल ते देखील जबाबदार आहेत का?
धर्माची भूमिका
द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ (१९९४) र्वांडाबद्दल म्हणते: “बहुतेक लोक रोमन कॅथलिक आहेत. . . . रोमन कॅथलिक आणि इतर ख्रिस्ती चर्च बहुतेक प्राथमिक व माध्यमिक शाळा चालवतात.” वास्तविक पाहता, राष्ट्रीय कॅथलिक वार्ताहर (इंग्रजी) या वर्तमानपत्राने र्वांडाला, “७०% कॅथलिक राष्ट्र” असे संबोधले.
ग्रेट ब्रिटनचे निरीक्षक (इंग्रजी) हे वर्तमानपत्रक र्वांडातील धार्मिक परिस्थितीचा पुरावा देऊन असे वर्णन देते: “१९३० च्या दशकामध्ये, चर्च जेव्हा शैक्षणिक व्यवस्थेचा ताबा मिळवण्यासाठी झगडत होते तेव्हा, कॅथलिकांनी तुत्सी सत्तेला आपले मत दिले तर प्रोटस्टंट लोकांनी जाच सहन करणाऱ्या बहुसंख्य हुतू लोकांसोबत मैत्री केली. १९५९ मध्ये, हुतू लोकांनी सत्ता बळकावली आणि अतिशय वेगाने कॅथलिक व प्रोटस्टंट लोकांचा पाठिंबा मिळवला. प्रोटस्टंट लोकांनी हुतू बहुसंख्येला दिलेला पाठिंबा तसाच कायम राहिला आहे.”
उदाहरणार्थ, प्रोटस्टंट चर्च नेत्यांनी या कत्तलीचा धिक्कार केला का? निरीक्षक (इंग्रजी) याला असे उत्तर देते: “दोन चर्चसदस्यांना [अँग्लीकन] विचारण्यात आले की मुलांचा शिरच्छेद करून त्यांची शरीरे र्वांडातील चर्च दालनात सोडणाऱ्या खुन्यांचा ते धिक्कार करतात का.
“त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. ते प्रश्नांना टाळत होते, ते खवळले आणि बेचैन झाल्यामुळे त्यांचा आवाज वाढला व र्वांडाच्या या दुर्घटनेचे खोलवर लपलेले मूळ प्रकट झाले—ज्या राजकीय नेत्यांनी हत्येचा प्रचार केला व रक्ताचे पाट वाहिले आहेत अशा लोकांचे, अँग्लीकन चर्चचे सर्वात जुने सदस्य निरोपे म्हणून काम करत होते.”
खरेच, र्वांडातील ख्रिस्ती धर्मजगताचे चर्च इतर ठिकाणच्या चर्चपेक्षा काही वेगळे नाहीत. उदाहरणार्थ, पहिल्या जागतिक महायुद्धात राजकीय नेत्यांना त्यांनी दिलेल्या पाठिंब्याविषयी, ब्रिटिश ब्रिगेडिअर जनरल फ्रँक पी. क्रोझर म्हणाले: “ख्रिस्ती चर्च हिंसेला भडकवणारे सर्वात उत्तम उत्पन्नकर्ते आहेत व आम्ही आमच्या फायद्याकरता त्यांचा मुक्तपणे उपयोग केला.”
होय, जे काही घडले त्यामध्ये धार्मिक नेत्यांचा देखील खूप मोठा वाटा आहे! जून ३, १९९४ च्या राष्ट्रीय कॅथलिक वार्ताहर (इंग्रजी) वर्तमानपत्रकाने बातमी दिली: “पोप यांचे म्हणणे आहे की आफ्रिकन राष्ट्रात चालणाऱ्या या झगड्यात ‘एक वास्तविक व खरा जातिसंहाराचा समावेश आहे, व दुर्दैवाने कॅथलिकही यासाठी जबाबदार आहेत.’”
स्पष्टपणे, चर्च, यशया २:४ आणि मत्तय २६:५२ या वचनांवर आधारित असलेले खरे ख्रिस्ती तत्त्व शिकवण्यास अपयशी ठरले आहेत. फ्रेंच वर्तमानपत्रक ली मॉन्ड याच्यानुसार एक पाळक दुःखाने म्हणाले: “ते एकमेकांचे भाऊ आहेत याची जरा देखील त्यांना आठवण नसून ते एकमेकांची कत्तल करत आहेत.” र्वांडाच्या आणखी एका पाळकाने कबूल केले: “शतकापासून प्रीती आणि क्षमेबद्दल प्रवचने दिल्यावरही ख्रिश्चनांना इतर ख्रिश्चनांनी मारले. जितके शिकवले गेले होते ते सर्व व्यर्थ गेले.” ली मॉन्डने विचारले: “बुरूंडी आणि र्वांडा येथे चाललेल्या युद्धात भाग घेणाऱ्या तुत्सी आणि हुतू लोकांना सारख्याच ख्रिस्ती मिशनऱ्यांनी शिकवले व ते एकाच चर्चला जात होते हा विचार कोण टाळू शकेल?”
खरे ख्रिस्ती वेगळे आहेत
येशू ख्रिस्ताचे खरे अनुयायी “एकमेकांवर प्रीती करावी” या त्याने दिलेल्या आज्ञेचे अनुकरण करतात. (योहान १३:३४) येशू किंवा त्याचा एखादा प्रेषित हातात कोयता घेऊन कोणाला ठार मारत आहे याची तुम्ही कल्पना तरी करू शकता का? अशी निर्दयी हत्या करणारे “सैतानाची मुले” म्हणून ओळखले जातात.—१ योहान ३:१०-१२.
यहोवाचे साक्षीदार, दियाबल सैतानाच्या हाताखाली असणाऱ्या जगाच्या राजकर्त्यांनी चेतवलेली युद्धे, क्रांत्या किंवा इतर कोणतेही दंगे यात भाग घेत नाहीत. (योहान १७:१४, १६; १८:३६; प्रकटीकरण १२:९) उलट, यहोवाचे साक्षीदार एकमेकांसाठी खरी प्रीती प्रदर्शित करतात. म्हणूनच, कत्तल होत असताना, हुतू साक्षीदारांनी त्यांच्या तुत्सी बांधवांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे जीव धोक्यात घातले.
तरीही, अशा दुर्घटनांमुळे आपण आश्चर्यचकित होण्याची काही गरज नाही. ‘युगाच्या समाप्ती विषयी’ येशूने केलेल्या भविष्यवाणीत त्याने भाकीत केले: ‘तेव्हा लोक तुम्हास जिवे मारतील.’ (मत्तय २४:३, ९) आनंदाची गोष्ट म्हणजे, येशू खात्री देतो की मृतांच्या पुनरुत्थानासमयी विश्वासू जणांची आठवण करण्यात येईल.—योहान ५:२८, २९.
तोपर्यंत, र्वांडा तसेच इतर ठिकाणच्या सर्व यहोवाच्या साक्षीदारांनी, एकमेकांवर प्रीती करून स्वतःला ख्रिस्ताचे शिष्य शाबीत करण्याचा दृढनिश्चय केला आहे. (योहान १३:३५) सोबतचा “निर्वासित छावण्यातील साक्षीदार” हा अहवाल दर्शवतो त्याप्रमाणे या सध्याच्या कठीण परिस्थितीतही त्यांची प्रीती एक साक्ष देत आहे. येशूने त्याच्या भविष्यवाणीत जे म्हटले त्याची आपण सर्वांनी आठवण करावी: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.”—मत्तय २४:१३.
[२९ पानांवरील चौकट]
निर्वासित छावण्यातील साक्षीदार
या वर्षाच्या जून महिन्यात, १,३०० पेक्षा अधिक साक्षीदार आणि त्यांचे सोबती निर्वासित छावण्यात होते. झायरेतील, गोमॉ येथे २,३७६ बुकावूत ४५४ व युवीरॉत १,५९२ जण होते. शिवाय टान्झानियात, बेनकोत सुमारे २३० लोक होते.
निर्वासित केंद्रांपर्यंत पोहंचणे इतके सहजसोपे नव्हते. ६० साक्षीदार असलेल्या एका मंडळीने, टान्झानियातील निर्वासित छावण्यांकडे जाण्यासाठी एक सुरक्षित मार्ग, रूसूमो पूल पार करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तेथून जाण्याची परवानगी न दिल्यामुळे ते एक आठवड्यासाठी नदीच्या काठावर इकडेतिकडे भटकत राहिले. त्यानंतर त्यांनी लहान होडींनी जाण्याचे ठरवले. त्यांनी ती नदी पार केली व काही दिवसांमध्येच सुरक्षितपणे टान्झानियातील छावणीत पोहंचले.
इतर राष्ट्रातील यहोवाच्या साक्षीदारांनी खूप मोठ्या निवारण मालाची व्यवस्था केली. फ्रान्समधील साक्षीदारांनी जवळजवळ शंभर टनचे कपडे आणि नऊ टन शूज गोळा केले. त्यासोबत पौष्टिक अन्नाचा साठा व औषधे देखील जेथे अधिक गरज होती तेथे पाठवण्यात आले. परंतु या निर्वासित छावण्यातील बांधव अनेकवेळा प्रथम एक बायबल, टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! ही नियतकालिके मागत होते.
झायरे आणि टान्झानियातील साक्षीदारांनी त्यांच्या स्थलांतरीत केलेल्या बांधवांना दाखवलेली प्रीती पाहून अनेक निरीक्षक प्रभावीत झाले. काही निर्वासित म्हणतात, “तुमच्या धर्माच्या लोकांनी तुम्हाला येऊन भेटी दिल्या, परंतु आमच्या पाळकाने अजूनपर्यंत आम्हाला येऊन भेट दिली नाही.”
छावण्यांमध्ये सर्व जण त्यांची ऐक्यता, सुव्यवस्थितपणा आणि प्रेमळ वृत्तीमुळे साक्षीदारांना ओळखू लागले. (योहान १३:३५) नोंद घेण्याजोगी एक गोष्ट म्हणजे, साक्षीदारांना टान्झानियातील बेनको येथे असलेल्या छावण्यातील २,५०,००० लोकांतून सहसाक्षीदारांना शोधण्यास केवळ १५ मिनिटे लागली.