शेजारधर्म गेला कुठे?
लाखो लोकांना असहाय, भीती, कोंदटल्यासारखे किंवा मदतीला जवळपास कोणीच नाही असे वाटते. एक व्यक्ती खेदाने म्हणते, “मी खाते एकटीच, चालते एकटीच, झोपते एकटीच, बोलतेसुद्धा एकटीच.” लोकांच्या मदतीला धावून येणारे आणि परोपकारी वृत्तीचे लोक फार कमी आहेत.
रिटायर झालेली एक व्यापारी स्त्री म्हणाली: ‘आमच्याच मजल्यावर एक विधवा होती; एकदा संध्याकाळी, ती घरी आली आणि म्हणाली, मला एकटं-एकटं वाटतंय. मी स्पष्टच पण कोमल स्वरात तिला सांगून टाकलं की, माझ्याकडे वेळ नाही. मी उगाच तुम्हाला त्रास दिला, सॉरी असं म्हणून ती निघून गेली.’
ती स्त्री पुढे म्हणते: ‘त्या कंटाळवाण्या बाईला मी कसंतरी कटकवलं याचं मला फार बरं वाटलं. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी, माझ्या एका मैत्रिणीने मला फोन केला आणि तुझ्या बिल्डींगमध्ये ज्या बाईने आदल्या रात्री आत्महत्या केली ती बाई तुला ठाऊक आहे का असं विचारलं. होय, तीच ती बाई होती जी माझ्या घरी आली होती.’ नंतर त्या व्यापारी स्त्रीने म्हटले की, त्यामुळे तिला “चांगलाच धडा” मिळाला होता.
बाळांना प्रेम मिळाले नाही की ती झुरून मरू शकतात हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण, मोठ्या लोकांनाही जर प्रेम मिळाले नाही तर तेही मरू शकतात. एक १५ वर्षांची देखणी मुलगी होती; तिने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठीत असे लिहिले होते: “प्रेम म्हणजे एकाकीपणाचा अंत.”
आधुनिक दिवसातली शोकांतिका
वांशिक द्वेषभावाबद्दल एकदोन वर्षांआधी न्यूझवीकने असे म्हटले: “‘आपल्या शेजाऱ्याचा द्वेष कर’ हेच जणू या वर्षाचे घोषवाक्य आहे.” बॉस्निया आणि पूर्वी युगोस्लाव्हियाचा भाग असणाऱ्या हर्जेगोव्हिना येथे युद्ध होत असताना, एक लाखाहून अधिक लोकांना घरदार सोडून जायला भाग पाडले गेले आणि कित्येक हजारो लोकांना ठार मारले गेले. कोणी? “आमच्याच शेजाऱ्यांनी,” असे आपल्या गावातून हाकलून दिलेल्या एका मुलीने दुःखाने सांगितले. “ते सगळे आमच्या ओळखीचे होते.”
“सगळेजण आधी केवढ्या प्रेमाने राहायचे,” असे रुगांडा या गावात राहणाऱ्या ३,००० हुतू आणि तुत्सी लोकांविषयी एक स्त्री म्हणाली. “या गावची कहाणी हीच रवांडाची कहाणी आहे: हुतू आणि तुत्सी खेळीमेळीने राहायचे, आपापसांत लग्न करायचे, हुतू कोण आणि तुत्सी कोण याची पर्वाच त्यांना नव्हती, हा हुतू आहे की तुत्सी आहे हेसुद्धा त्यांना माहीत नव्हते. एका रात्रीत सगळे बदलले” आणि “हत्याकांडे सुरू झाली,” असे द न्यूयॉर्क टाईम्समध्ये म्हटले आहे.
इस्राएलमध्येही, ज्यू आणि अरबी लोक शेजारी शेजारी राहतात, पण त्यांच्यात वैरभाव खूप आहे. या संबंध २० व्या शतकात, उत्तर आयर्लंड, भारत आणि पाकिस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया त्याचप्रमाणे अमेरिकेतल्या विविध जातींमध्ये—संबंध जगभरातच हे घडले आहे.
जातीय आणि धार्मिक द्वेषभावाच्या उदाहरणांना तुटवडा नाही. प्रेमाची ही उणीव अभूतपूर्व आहे.
कोण जबाबदार?
प्रेम करायला शिकवले जाते तसेच द्वेष करायलाही शिकवले जाते. एका लोकप्रिय गाण्याचे बोल असे आहेत की, मुलांना “कोवळ्या वयातच जाते शिकवले/होण्याआधीच सहा, सात, आठ वर्षांचे/की, घरातले करतात द्वेष ज्यांचा त्या सर्वांचा द्वेष करायचा.” विशेषतः आज द्वेषभाव शिकवला जातो. आपल्या सदस्यांना प्रेम शिकवायला चर्चेस तर खासकरून अयशस्वी ठरली आहेत.
ल माँड या फ्रेंच वृत्तपत्रात असा प्रश्न विचारण्यात आला: “बुरूंडी आणि रवांडा येथे एकमेकांवर तुटून पडलेल्या तुत्सी आणि हुतू लोकांना त्याच ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून शिकवण मिळाली होती आणि ते एकाच चर्चमध्ये जात होते असे कोणी म्हणेल का?” नॅशनल कॅथोलिक रिपोर्टर नुसार, रवांडा हे “७० टक्के कॅथोलिक राष्ट्र” आहे.
या शतकाच्या सुरवातीला, पूर्वीय युरोपमधील राष्ट्रांनी नास्तिक कम्युनिस्टवाद स्वीकारला. का? सन १९६० मध्ये, प्राग, झेकोस्लोव्हाकिया येथील एका धर्म शाखेचे डीन म्हणाले: “आपण ख्रिस्ती लोकच कम्युनिस्टवादासाठी जबाबदार आहोत. . . . लक्षात ठेवा की, हे कम्युनिस्ट लोक एकेकाळी ख्रिस्ती होते. न्यायी देवावर त्यांचा विश्वास नाही तर दोष कोणाचा?”
पहिल्या महायुद्धादरम्यान चर्चेसने काय केले त्याचा विचार करा. त्या युद्धाविषयी ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल फ्रँक क्रोझर असे म्हणाले: “आपल्याजवळ रक्तपाताला उत्तेजन देण्यात सर्वात पुढे आहेत ख्रिस्ती चर्चेस आणि आपण त्यांचा वाटेल तसा उपयोग करून घेतला आहे.” नंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर द न्यूयॉर्क टाईम्स म्हणाले: “गतकाळात, कॅथोलिक पादरी वर्गाने नेहमीच आपल्या राष्ट्राच्या युद्धांचे समर्थन केले आहे, सैनिकांवर आशीर्वाद मागून त्यांना विजय मिळावा म्हणून प्रार्थना केल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला तेथील बिशपांनी याच्या उलट घडावे म्हणून जाहीररीत्या प्रार्थना केल्या आहेत.”
तथापि, येशू ख्रिस्ताने आपल्या सर्व व्यवहारांमधून प्रीती प्रदर्शित केली आणि प्रेषित पौलाने तर असे लिहिले: “एकमेकांवर प्रीति करावी, असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे.” (तिरपे वळण आमचे.) (१ थेस्सलनीकाकर ४:९) “खरे ख्रिस्ती येशू ख्रिस्तामध्ये भावंडांसारखे असतात,” असे व्हँकूव्हरच्या सन वृत्तपत्रकाच्या एका लेखकाने लिहिले. “ते एकमेकांना जाणूनबुजून कधीच हानी पोहंचवणार नाहीत.”
यावरून हे स्पष्ट होते की, आज दिसून येणाऱ्या प्रेमहीन वृत्तीला चर्चेस मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. इंडिया टुडे पत्रिकेत प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटले होते: “सर्वात भीषण गुन्हे धर्माच्या नावाखालीच घडले आहेत.” पण, निर्दयी वृत्ती आपल्या पिढीचे विशेष लक्षण बनण्यामागे एक मूलभूत कारण आहे.
प्रेम कशामुळे थंडावले
आपला निर्माणकर्ता त्याचे उत्तर देतो. त्याचे वचन, बायबल यामध्ये आपण सध्या ज्या काळात राहत आहोत त्याला ‘शेवटले काळ’ म्हटले आहे. बायबल भविष्यवाणीनुसार, या काळात लोक “ममताहीन” होतील. शास्त्रवचनांमध्ये ‘युगाची समाप्ती’ असेही म्हटल्या जाणाऱ्या या ‘कठीण दिवसांविषयी,’ येशू ख्रिस्ताने भाकीत केले की, “पुष्कळांची प्रीति थंडावेल.”—२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:३, १२.
म्हणून, आजकाल दिसून येणारा प्रेमाचा हा अभाव याचा पुरावा आहे की आपण या जगाच्या शेवटल्या काळात जगत आहोत. पण, या अधार्मिक लोकांचे जग जाऊन त्या जागी प्रेमाचे वर्चस्व असलेले नवीन धार्मिक जग येईल असाही त्याचा अर्थ होतो ही मात्र आनंदाची गोष्ट आहे.—मत्तय २४:३-१४; २ पेत्र ३:७, १३.
पण असा हा बदल घडेल—लोक प्रेमाने आणि शांतीने राहतील अशा जगात आपण राहू शकू असा विश्वास ठेवायला आपल्याजवळ खरोखरच काही कारण आहे का?