डाकमुद्राविद्या मनोवेधक छंद व मोठा व्यापार
सावध राहा! नियतकालिकाच्या ब्रिटनमधील बातमीदाराकडून
डाकमुद्राविद्या किंवा पोस्टाची तिकीटे गोळा करणे याला “जगाचा सर्वात मोठा छंद” असे म्हटले जाते. ब्रिटिश डाक सुधारक सर रोलँड हिल (१७९५-१८७९) यांच्या मते, सर्वात पहिली तिकीटे ‘कागदाच्या केवळ चिटोऱ्या होत्या ज्याला मागून एक चिकट पदार्थ लावलेला होता व ज्या व्यक्तीला ती वापरायची होती तो त्या तिकीटांच्या त्या चिकट पदार्थाला थोडेसे ओले करून पत्राच्या मागील बाजूला ती चिकटवून देऊ शकत होता.’ त्यांच्या या ‘कागदाच्या चिटोऱ्या’ इतक्या प्रसिद्ध झाल्या की आज डाक तिकीटांना संपूर्ण जगभरात दळणवळणाच्या मार्गाला बदलवणारा शोध असे म्हणून त्यांची प्रशंसा केली जाते.
संग्राहक आणि विक्रेता यांच्यासाठी तिकीटांच्या किंमतीचा फरक वास्तविकतेत शून्यापासून लाखो रूपये किंवा त्याहून अधिक डॉलरच्या खगोलशास्त्रीय रक्कमेत होऊ शकतो. डाक तिकीटे इतकी सर्वसामान्य असताना हे कसे शक्य होऊ शकते? तसेच ते इतके अपीलकारक आणि मौल्यवान कशामुळे आहेत?
असाधारण पेनी ब्लॅक
टपालखर्च आगाऊ देण्याला चित्रित करणाऱ्या, हातांनी छापलेल्या पहिल्या तिकीटांचा शोध विल्यम डॉकव्रॉ या व्यापाऱ्याने लावला. त्याने १६८० मध्ये लंडन पेनी पोस्टची सुरवात केली. ग्रहणगृहात ठेवून दिलेल्या टपालावर दुहेरी रेषेचा त्रिकोणी डाक शिक्का मारण्यात येई. त्या शिक्क्यावर पेनी पोस्ट पेड ही अक्षरे कोरलेली होती. शिक्का मारल्यावर डॉकव्रॉच्या संदेशवाहकांसाठी हे टपाल पाठवण्यास तयार होते. परंतु इतर संदेशवाहक आणि हमालांनी या व्यवस्थेला अगदी जोराने विरोध केला कारण त्यांना वाटले की त्यांची उपजिविका यामुळे धोक्यात होती. सरकारच्या पोस्ट ऑफिसने देखील डॉकव्रॉचे पोस्ट त्यांच्या मक्तेदारीचे उल्लंघन करणारे असे पाहिले.
एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत तरी, डाक सुधारणा करणाऱ्यांना संपूर्ण राष्ट्रात पेनी डाक उपलब्ध करण्यात यश मिळाले नाही. मे १८४० मध्ये, सर्वात पहिले चिकटवायचे डाक तिकीट ब्रिटनमध्ये विक्रीला आले आणि लवकरच पेनी ब्लॅक म्हणून प्रसिद्ध झाले. (चित्र पहा.) तिकीटांच्या कडांवर छिद्रे नव्हती व त्यांना वेगळी करण्यासाठी फाडावे लागत होते.
१८४३ मध्ये, संपूर्ण राष्ट्राच्या उपयोगासाठी उत्तम अशी चिकटणारी तिकीटे काढण्यात ब्रिटननंतरचे दुसरे राष्ट्र ब्राझील होते. हळूहळू इतर राष्ट्रांनी त्यांच्या अंतर्देशीय टपालाच्या वापरासाठी ते घेतले. नंतर, समुद्रपार पोचवणीला सुलभ करण्यासाठी, जागतिक डाक संघ निर्माण झाला. आज युनिवर्सल पोस्टल युनियन संयुक्त राष्ट्राची खास एजन्सी आहे. याचे मुख्यालय बर्न, स्वित्झर्लंड येथे आहे.
संग्रह कथा सांगतात
आंतरराष्ट्रीय दळणवळण जसजसे वाढत गेले तसे प्रत्येक राष्ट्राने विविध तिकीटांची रचना करून ती छापली. काहींना स्मृतिप्रीत्यर्थ असे म्हटले जाते जे विलक्षणीय घटना आणि लोकांचे उदाहरण देतात; इतरांना तात्पुरते असे म्हटले जाते, कारण त्यांचा उपयोग मूल्यांच्या शृंखलेत विविध डाक गरजा भागवण्यासाठी नियमितपणे केला जातो. अनेक वर्षांपासून सुमारे ६०० डाक मंडळाने दरवर्षी अंदाजे १०,००० नवी तिकीटे काढली. संग्राहक आणि जो व्यक्ती केवळ करमणूक म्हणून तिकीटांचा संग्रह करण्यात आनंद मिळवतो या दोघांना आजपर्यंत काढलेल्या अडीच लाख विविध तिकीटांमध्ये त्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडी मिळतील!
स्पष्टपणे, इतक्या प्रमाणातील व विविधतेतील तिकीटे असताना, आजपर्यंत काढलेल्या प्रत्येक प्रकारच्या तिकीटाची एक प्रत स्वतःसाठी मिळण्याची अपेक्षा एकही संग्राहक करू शकत नाही. उलट, पुष्कळ जण विषयाच्या अनुरोधाने तिकीटे गोळा करतात. कृषी, प्राणी, अंटार्टिका, मधमाश्या, बायबल, पक्षी, पूल, गुहा, चित्रपट, कोळसा, राष्ट्र, ऊर्जा, एस्परॅन्टो, युरोप, अग्नी, उड्डाण, फुले, अळंबे, भूशास्त्र, उद्योग, औषधे, संगीत, ऑलम्पिक खेळ, छायाचित्रण, डाक सेवा, रेड क्रॉस, धर्म, अंतराळ, खेळ, परिवहन, संयुक्त राष्ट्र आणि हवामान हे सर्व संग्रहक विषय आहेत. तुम्हाला हव्या त्या विषयावरील तिकीटे आहेत.
इतर संग्राहक तिकीटांच्या विविधतेवर एकाग्र असतात. यामध्ये काय गोवलेले आहे? पुन्हा एकदा पेनी ब्लॅककडे पहा. तुम्हाला तिकीटाच्या खालच्या कोपऱ्यात छापलेली अक्षरे दिसतात का? सुरवातीला, कागदाच्या एका पानावर २० आडव्या ओळीत १२ अशी एकूण २४० तिकीटे छापली जात होती. वरच्या ओळीतील पहिल्या तिकीटावर AA, शेवटल्या तिकीटावर AL आणि अशाप्रकारे २० व्या ओळीच्या सुरवातीला आणि शेवटी TA आणि TL अशी वर्णानुक्रमे अक्षरे छापली जात होती. ही अक्षरे प्लेटमेकींगच्या (मुद्रण करता येईल असा मुद्रणप्रतिमेचा तयार पत्रा) शेवटल्या टप्प्यांत तिकीटावरील नकाशाच्या कोपऱ्यातील चौकोनात हाताने छापले जात. पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याला जर पुष्कळ पत्रांवर चिकटवलेल्या तिकीटांवर याप्रकारची दोन अक्षरे आढळून आली तर ती बनावट असल्याचा त्याला संशय येई.
अंदाजे ६ कोटी ८० लाख पेनी ब्लॅक तिकीटे काढण्यात आली असली तरी, आज एका संग्राहकाकडे न वापरलेले एक पेनी ब्लॅक तिकीट आहे जे काहीसे दुर्मिळ व मूल्याचे आहे—त्याचे मूल्य कदाचित ४,२०० डॉलर पासून ६,८०० डॉलर पर्यंत असू शकते.
कलाकृतींमध्ये बारीकसारीक विविधतेव्यतिरिक्त, वेगवेगळ्या मुद्रणाच्या पत्र्याद्वारे कागदावर छापलेली विविध जलचिन्हे (कागदावरील फिकट कलाकृती जी उजेडात धरल्यावर त्यावरील जलचिन्हे दिसू शकतात) तसेच विविध संख्येची छिद्रे (तिकीटाच्या कडेवर केलेली छिद्रे) या सर्व गोष्टी विशेषज्ञ संग्राहकांमध्ये आस्था जागृत करतात. यश मिळवण्यासाठी विशेषज्ञांना तिकीटे काढण्यासाठी लागणारे चिमटे (तुमच्या बोटांचा कधीही उपयोग करू नका!) व विशालक काच यांच्यापेक्षा अधिक काही हवे आहे. छिद्रण-मापक, छिद्रांतील फरक यांचा तपास लावतात; अतिनील दिवे, तिकीटांवरील खराबी, न दिसणारे फॉसफोरसेन्स आणि इतर लहानसहान गोष्टी दाखवतात.
काही विशिष्ट संग्राहक तिकीटावरील कलाकृती आणि छपाईच्या चुकांबद्दल विशेष आस्था दाखवतात. त्यांना वाटते, की त्यांच्याकडे अशा काही मोठ्या गोष्टी आहेत ज्या इतर संग्राहकांकडे नाहीत. किंमतीतील फरकाचा जरा विचार करा. १९९० च्या अंदाजांप्रमाणे, १८४१ मधील पेनी रेड तिकीटावर A हे अक्षर नव्हते, म्हणजेच पानावरील दुसऱ्या ओळीच्या पहिल्या तिकीटावर ही चूक झाली होती. या तिकीटाचे मूल्य चूक नसलेल्या अशाच तिकीटाच्या १,३०० पटीने अधिक होते!
तिकीटे मोठा व्यापार आहेत
आजकाल तिकीटाचा छंद गुंतवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांना आकर्षित करत आहे. खरा गुंतवणूक करणारा, विक्रेत्यानुसार एखाद्या विशिष्ट कालावधीत ज्यांची किंमत नक्कीच वाढेल त्या सर्वात उत्कृष्ट प्रकारच्या दुर्मिळ तिकीटांचे संग्रह विकत घेतो. गुंतवणूकीची मुदत भरते तेव्हा, विक्रेता त्याच्या ग्राहकाने धारण केलेल्या संग्रहांना, उपलब्ध असलेल्या सर्वात जास्त किंमतीत विकण्याचे काम हाती घेतो. “फिकट, सुवाच्य डाकेचे शिक्के टपालाने वापरण्यात येणाऱ्या तिकीटांसाठी जरूरीचे आहेत—बहुधा सर्वात सामान्य तिकीटे, उत्कृष्ट किंवा असामान्य डाकेचा शिक्का असलेल्या तिकीटांच्या तुलनेत दुर्मिळ असतात व ते तत्सम अधिमूल्याच्या योग्यतेचे आहेत. तिकीटाची उत्तम स्थिती एखाद्या तिकीटाच्या मोलासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते,” असे तिकीट अधिकारी जेम्स वॉटसन लिहितात.
१९७९ मध्ये लंडनच्या डेली मेलने अहवाल दिला, की “मागील पाच वर्षांमध्ये, उत्कृष्ट तिकीटांचे मूल्य (१८४० पासून १८७० पर्यंतच्या तारखेचे) शेअर्स व गुंतवणूकीच्या इतर प्रकारांपेक्षा आणि अनेक बाबतीत स्थावर किंमतींपेक्षा अधिक वाढत आहे.” १९७४ मध्ये सात दुर्मिळ तिकीटांच्या एका संग्रहाची ८४,७०० डॉलर असलेली किंमत ३०६,००० डॉलर इतकी वाढली आहे.
१९९० मध्ये, एका टाईम इंटरनॅशनल जाहिरातीने असा अहवाल दिला: “तिकीटांच्या गुंतवणूकीच्या किंमतीत बराच चढउतार झाला आहे. १९७० च्या दशकामध्ये किंमती इतक्या वेगाने वाढल्या, की सट्टेबाजी लोक गुंतवणूक केलेल्या तिकीटांच्या संग्रहाकाच्या दुर्मिळ तिकीटांपासून फायदा मिळण्याची अपेक्षा बाळगून होते. परंतु लंडनने १९८० मध्ये तिकीटांचे जागतिक प्रदर्शन मांडले तेव्हा त्यांच्या आशांचा चुराडा झाला व सट्टेबाजी लोकांना आढळून आले, की संग्राहकच बाजाराला मागून आधार देणारे लोक होते व त्यांनी अगदी हुशारीने त्यातून अंग काढून घेतले होते. ‘गुंतवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या संग्रहांचा हिशेब करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना दिसून आले, की पुष्कळ तिकीटांना समजले जात होते तेवढी ती दुर्मिळ नव्हती,’ ” व ते त्यांनी अपेक्षिलेला फायदा मिळवण्यास अपयशी ठरले. तिकीटांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा किती मोठा इशारा आहे!
यास्तव मग, संग्राहक किंवा डाकमुद्राविद्या जाणणारे या नात्याने, समतोल राखा. तिकीटांचा आनंद लुटा. त्यांच्यापासून—जगाविषयी, त्याच्या भूगोलाविषयी, लोकांविषयी आणि संस्कृतींविषयी शिका. संग्रह करण्याच्या छंदाला तीव्र मनोगंड होऊ देऊ नका. काळजीपूर्वकतेने तिकिटांतील तुमच्या आस्थेचे मूल्यमापन जीवनातील अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींबरोबर मापून पाहा. (g95 1/8)
[१८, १९ पानांवरील चित्रं]
पेनी ब्लॅक
[२० पानांवरील चित्रं]
ऑस्ट्रिया, स्पेन आणि ब्रिटनमधील तिकीटे