तरुण लोक विचारतात . . .
मला राग का येतो?
“मला संताप आला की मी भडकतो, व तुम्हाला माझ्याजवळ यावेसे वाटणार नाही. . . . माझा चेहरा लाल होतो . . .कधी कधी मी नुसता ओरडत सुटतो.” —११ वर्षांचा इव्हॅन.
तुमची बहीण तुमचे आवडते ब्लाऊज खराब करते. तुमचे शिक्षक परिक्षेत तुम्हाला कमी मार्क देतात. तुम्हाला अगदी जरुर असताना तुमचा हेअर-ड्रायर बिघडतो. अनेक युवकांमध्ये अशा अगांतुकपणामुळे, अन्यायामुळे व गैरसोयीमुळे संतापाची लाट उत्पन्न होते.
हेल्थ मासिकातील डॉ. जॉर्जिया विटकिन-लॅनॉईल यांचा लेख स्पष्ट करतो की, “एखाद्या संतापजनक घटनेला मेंदू प्रतिक्रिया देतो तेव्हा स्वायत्त मज्जासंस्था जागृत होते. मूत्रपिंडाजवळील ग्रंथींचा स्राव रक्तात मिसळू लागतो. त्यामुळे हृदयाचा व श्वसनाचा वेग वाढतो, आणि साठवलेली साखर उर्जा उत्पन्न करण्यासाठी मोकळी करण्यास उत्तेजन मिळते.”
याचा परिणाम काय होतो? डॉ. विटकिन-लॅनॉईल पुढे म्हणतातः “आपल्या स्रावाच्या प्रभावाखाली येऊन आपण जी क्रिया करतो ती बहुधा फाजिल होते. आपण किंचाळतो, द्वेषपूर्ण अर्धसत्याचा भडिमार करतो, मारतो, मोडतो, नाश करतो वा रागाने जागा सोडून जातो.” तसेच टीन नियतकालिकातील एका लेखानेही तसेच मत दिले की, संतापामुळे “जे म्हणण्याचा तुमचा हेतु नसतो अशा गोष्टी तुम्ही बोलता, मित्र गमावता—आणि तुम्हाला आतमध्ये शारीरिक यातनाही होतात.”
तुम्ही कधी संतापला होता का? तर मग, तसे करणारे तुम्ही एकटेच नाही. आपल्यापैकी अनेकांप्रमाणे निश्चित तुम्हालाही नंतर अगदी लाज वाटली असेल व ‘मी तसे का केले?’ असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. खरोखर आपला राग आवरणे काहींना इतके कठीण का जाते? तसे करण्याने काही फायदा होईल का?
आपण का संतापतो?
वेळोवेळी आपण संतापू शकतो याचे अंशतः कारण म्हणजे आपली घडण “देवाचे प्रतिरुप” अशी झालेली आहे. (उत्त्पती १:२७) देवही स्वतः संतापू शकतो! उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने म्हटलेः “वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.”—रोमकर १:१८.
पण हे लक्षात घ्या की, यहोवा देवाचा क्रोध नीतीमत्ता व न्यायावरील प्रीतीमुळे निर्माण होतो. देवाचा क्रोध म्हणजे नुसता ‘त्याचा पारा चढणे’ नव्हे. तो आपल्या संतापावर संयम ठेवतो व नीतीच्या मार्गाने त्याला प्रकट करतो. अशा रितीने, जगव्याप्त प्रलयाने त्याने एका दुष्ट जगावर नाश आणला तेव्हा परिस्थिती त्याच्या आवाक्याबाहेर गेली नाही. तर त्याने “नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले.” (२ पेत्र २:५) या कारणामुळे, यहोवाचे वर्णन “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्यचा सागर,” असे करता येते.—निर्गम ३४:६.
देवाने माणसांना त्याच्या स्वरुपात निर्माण केलेले असल्यामुळे आपल्यामध्ये न्यायाची अंतःस्थ जाणीव असते. त्यामुळे अयोग्य वागणूक मिळाल्यास वा अन्याय झाल्यास साहजिकच आपला पारा चढत असल्याचे जाणवते. ही गोष्ट पवित्र शास्त्रीय काळामध्ये अनेक धार्मिक लोकांच्या बाबतीत घडली.
उदाहरणार्थ, इस्राएल राष्ट्राचा नेता, मोशे याच्याविरुद्ध अनेक लोकांनी बंड पुकारल्यावर तो संतापला. (गणना १६:१, १५) शिवाय, येशू ख्रिस्तानेही संताप व्यक्त केला! देवाच्या आराधनालयामध्ये लोक व्यापार करत असल्याचे नजरेस आल्यावर, चिडून त्याने आज्ञा केलीः “ही येथून काढून घ्या. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” (योहान २:१३-१६) अशा रितीने ख्रिश्चन माणसाने सात्विक संताप व्यक्त करणे उचितच आहे.
पण खेदाची गोष्ट अशी की, आपला बहुतेक राग सत्प्रवृत्त नसतो. पवित्र शास्त्राने म्हटल्याप्रमाणे आपण “सर्व पापवश” आहोत. त्यामुळे ते पुढे म्हणतेः “नीतीमान कोणी नाही, एकही नाही.” (रोमकर ३:९, १०) यास्तव, आपले स्वतःचे अपूर्णत्व, आणि इतरांच्या उणीवा ही विफलतेची प्रभावी कारणे आहेत. तरुण स्टिफनी म्हणतेः “कधी कधी लोक तुम्हाला अतिशय क्षुब्ध करतात.”
परंतु आपण अनेकदा विनाकारणच चिडतो. यहोवाला सर्व गोष्टी दिसतात. पण कोणत्याही बाबतीत आपल्या दृष्टीला पडणाऱ्या गोष्टींवर मर्यादा असते. (इब्रीयांस ४:१२, १३) उदाहरणार्थ, विद्वान शलमोनाने म्हटलेः “कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीतीसूत्रे १५:१) तथापि, कधी कधी तो “शब्द” निरागसपणे उच्चारलेला असतो वा अवेळी केलेली कोटी असते अथवा खेळीमेळीचे चिडवणे असते. ते न समजल्याने आपण रागावतो.
शेवटी, स्वभाव वेगवेगळे असतात हा देखील एक मुद्दा आहेच. शिवाय आपल्यातल्या काहींचा इतरांपेक्षा रागाकडे अधिक कल असतो. एक युवक म्हणून, तारुण्यसुलभ नवीन वासना व इच्छांवर ताबा ठेवण्यास तुम्ही नुकतेच शिकू लागला असाल. तुम्हाला स्वतःविषयी खात्री नसेल व टीकेला फाजिल महत्त्व द्याल. आपल्या भावनांवर निदान काही अंशी ताबा मिळेपर्यंत, विशेषतः आपल्या कुटुंबाकडून सहजपणे डिवचले जाल. १५ वर्षांच्या लॉरीने कबूल केले की, “माझ्या बहिणीवर मी संतापते. वेड्यासारखे काहीतरी बोलून अथवा मी म्हटलेल्या प्रत्येक गोष्टीला सुधारून मला कसे डिवचावे हे ती जाणते.” अशाचप्रकारे तुम्ही व तुमच्या पालकांमध्ये तणाव उत्पन्न होऊ शकतो.
खरे पाहता, तुम्ही रागाला वाट दिली तर कोणतीही गोष्ट तुम्हाला राग आणू शकते. तेव्हा, प्रश्न हा आहे की, या संतापाच्या भावनेला तुम्ही कसे हाताळता?
अनावर राग
रिचिंग युवर टीनएज् हे पुस्तक म्हणतेः “राग शहाणपणाने कसा व्यक्त करावा ते अनेक लोकांना माहीत नसते.” काही लोक बालिश हट्ट करतात. काही शाब्दिक वा शारीरिकरित्या हिंसक बनतात. इतर काही बाहेरून शांत परंतु आतून खदखदत असतात. एका तरूण स्त्रीने म्हटल्याप्रमाणे, “मला राग येतो तेव्हा आरडाओरड करीत नाही; मी भावनाशून्य व अबोल होते.” आणखी काही जण, राग आला म्हणजे आपल्या वाहनात बसतात व ते हवे तसे चालवून आपला राग शमवतात.
हा अनावर राग क्वचितच विधायक असतो. याले विश्वविद्यालयातील अध्यापक गॅरी श्वार्टझ् म्हणतात की, रागामुळे “हृदयावर होणारे परिणाम इतर कोणत्याही भावनेपेक्षा—भयापेक्षाही—अधिक तीव्र व दीर्घ काळ टिकणारे असतात.” ड्यूक विश्वविद्यालयाचे डॉ. रेडफोर्ड बी. विल्यम्स् म्हणालेः “अनेक लोकांनी केलेल्या अभ्यासावरुन आता असे सूचित होते की, बरेचसे अकाली मृत्यु वैरभावाशी संबंधित असल्याचे दिसतात.” प्रत्येक डिवचणीमुळे ‘संतापाचा भडका’ उडवण्याची सवय नक्कीच हितकर नव्हे. “शांत हृदय देहाचे जीवन आहे,” अशी एक प्राचीन म्हण आहे.—नीतीसूत्रे १४:३०.
शिवाय बेलगाम संतापामुळे एखादी वाईट स्थिती अधिकच बिघडत असते. बलात्कार झालेल्या एका मुलीच्या शिमोन व लेवी नावाच्या दोन भावांचा पवित्र शास्त्रामधील वृत्तांत आठवा. त्यांना ही गोष्ट कळताच अतिशय संताप आला हे समजण्यासारखे आहे. पण त्यांनी आपला राग कसा व्यक्त केला? पवित्र शास्त्र म्हणते की, त्याला कारणीभूत असलेल्या तरुणाची, त्याच्या कुटुंबातील व गावातील पुरुषांसह निर्दयपणे कत्तल करण्याइतक्या घटना त्यांनी घडवून आणल्या!—उत्त्पती अध्याय ३४.
अनेक वर्षांनी, याकोब या त्यांच्या पित्याने मृत्युशय्येवर असताना या हिंसक घटनेची आठवण केली. मुलांनी घेतलेल्या संतप्त सूडाबद्दल त्याने त्यांची वाखाणणी केली का? नाही. उलट, त्याने त्यांच्या संतापाचा धिःक्कार केला कारण “तो भयंकर आहे” तसेच त्यांनी दाखविलेला क्रोध “निष्ठुर” आहे असे त्याने म्हटले. (उत्त्पती ४९:७) होय, संतापाने तोल जाऊन त्यांनी केलेले कृत्य मूळ डिवचणीपेक्षाही वाईट होते! त्यांनी विधायक असे काहीही साध्य केले नाही; आपला लौकिक मात्र धुळीस मिळवला!
यास्तव, “शीघ्नकोपी मूर्खपणा करतो,” असे जे नीतीसूत्रामध्ये म्हटले आहे त्यात काही आश्चर्य नाही. (नीतीसूत्रे १४:१७) डिवचलेल्या स्थितीमध्ये क्वचितच कोणी समतोल विचार वा कृती करू शकतो. संतप्त व्यक्ती क्वचितच ख्रिस्ती मार्गाने अन्यायाचे निवारण करते. या कारणामुळे याकोब या पवित्र शास्त्र लेखकाचे हे शब्द खरे ठरतातः “माणसाच्या रागाने देवाच्या नीतीमत्वाचे कार्य घडत नाही.” (याकोब १:२०) आकांत-तांडव, अपमानास्पद बोलणे, रुसणे-फुगणे यांनी उलटा परिणाम होतो.
आपल्यावर अन्याय करणाऱ्यावर शाब्दिक फैर झाडण्याने त्यावेळी बरे वाटते हे खरे. पण, जर ती व्यक्ती विशेषतः तुमचा मालक, शिक्षक वा पालक असल्यास बहुधा नंतर त्याचा तुम्हाला पश्चाताप होतो. (पडताळा उपदेशक १०:४.) यामुळे नीतीसूत्रे २९:११ म्हणतेः “मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध [संतापून] व्यक्त करतो. पण सूज्ञ तो मागे आवरून ठेवितो.”
[पानांवरील संक्षिप्त आशय]
आपले स्वतःचे अपूर्णत्व, आणि इतरांच्या उणीवा ही विफलतेची प्रभावी कारणे आहेत
[पानांवरील चित्र]
आपला पारा चढविणे योग्य आहे का?