पवित्र शास्त्राचा दृष्टीकोण
अन्य भाषा बोलणे—हे देवाकडून आहे का?
“तात्काळ माझ्या हातांमध्ये एक विचित्र भावना होऊ लागली व ती . . . वाढू लागली! ती जणू एक हजार—जणू दहा हजार—व मग लक्षावधी व्होल्ट विजेप्रमाणे होती . . . जवळपास दोन तास, मला न कळणाऱ्या भाषेमध्ये मी बोललो.”
एका अतिचर्चित प्रथेचा संबंध अनेक लोक ख्रिस्ती उपासनेशी लावतात, त्यातील वर देण्यात आलेला अनुभव हा दाखलेवजा होय. ती प्रथा आहेः अन्य भाषा बोलणे. या विषयाबद्दल पेंटेंकॉस्टल गट तसेच इतर चर्चेसमधील चॅरिसमॅटिक हालचालींशी संबंधित असणाऱ्यांना मोठी आस्था आहे.
पेंटेकॉस्टल होलीनेस चर्चच्या डॉ. व्हिन्सन सायनन यांनी प्रामाणिक उपासकांना अन्य भाषा बोलण्याच्या भूमिकेचा जो संभ्रम वाटतो त्याविषयी जोर दिला. ते म्हणालेः “अन्य भाषांमध्ये बोलणे या गोष्टीमुळे आम्हाला अवघडल्यासारखे होते.” का बरे? डॉ. सायनन म्हणतात की, अन्य भाषांमध्ये बोलण्याचा काही फायदा असल्याचे आज आपल्याला वाटेलच असे नाही. ते पुढे म्हणतातः “आता आपल्याला अवघडल्यासारखे वाटायला लावणारे असले तरी, अन्य भाषा ही देवाने निवडलेली व इतिहासातील विशिष्ट वेळी मंडळीचा विस्तार व पुनरुज्जीवन करण्यासाठी दिलेली देणगी आहे.”—तिरप्या अक्षरवळणाचा प्रकार आमचा.
ती ‘विशिष्ट वेळ’ १९०० वर्षांपूर्वी जे अघटित घडले तेव्हा आली होती.
अन्य भाषा कशासाठी?
तो इ. स. ३३चा पेंटेकॉस्ट होता. एक बदल होऊ घातला होता. प्राचीन यहुदी नियमशास्त्राच्या कराराची जागा एक नवा करार घेणार होता. कोणत्या कारणासाठी? यहोवा देवाच्या उपासनेचा, एक अधिक चांगल्या पद्धतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी. मग, या बदललेल्या उपासना-पद्धतीवर देवाचे आशीर्वाद असल्याचे लोकांना कसे कळणार होते बरे? नीतीमान कल असलेल्या लोकांच्या अंतःकरणास भिडण्यासाठी देव आश्चर्यकारक घटनांच्या आतिषबाजीचा उपयोग करणार होता व यामध्ये अन्य भाषांमधून बोलण्याचाही समावेश होता. त्या नीतीमान लोकांना याद्वारे, त्यांच्या पूर्वजांच्या सर्वसमर्थ देवाची मान्यता खरोखरच येशूच्या शिष्यांवर असल्याचे दिसणार होते.
पेंटेकॉस्टच्या वेळी या भाषांच्या देणगीने आणखी एक हेतू साध्य झाला. येशूच्या काळी छपाई व ध्वनिक्षेपण अस्तित्वात नव्हते. तसेच सर्वसाधारण जनतेमध्ये लेखी वृत्तांत दुर्मिळ होता. या कारणास्तव देवाची इच्छा व उद्देश यांच्याविषयी शुभवर्तमानाचा प्रसार विश्वासू जनांच्या जिव्हेद्वारेच होणार होता. पेंटेकॉस्टच्या सणासाठी आफ्रिका, आशिया व युरोपमधील अनेक देशातून यहोवाचे उपासक यरुशलेमामध्ये आले होते व ते अनेक वेगवेगळ्या भाषा बोलत होते. येशूचे सुमारे १२० शिष्य देखील यरुशलेमात गोळा झाले होते. देवाच्या पवित्र आत्म्याने बल प्राप्त होऊन ते शिष्य वेगवेगळ्या भाषांत बोलू लागले. उपासकांच्या त्या जमावाला शुभवर्तमानाची जणू मेजवानीच मिळाली होती! त्यांना “आपापल्या भाषेत देवाची महत्त्कृत्ये” ऐकता आली.—प्रे. कृत्ये २:५-११.
हा चमत्कार किती परिणामकारक होता? तीन हजार श्रोत्यांनी त्याच दिवशी विश्वास ग्रहण केला! (प्रे. कृत्ये २:४१) दूरदूरच्या आपल्या घरी परतल्यावर या नुकत्याच परिवर्तित झालेल्या लोकांनी “पृथ्वीच्या शेवटापर्यंत“ खऱ्या उपासनेची साक्ष दिली.—प्रे. कृत्ये १:८.
त्या पेंटेकॉस्टनंतर दोन दशकापेक्षा फक्त थोडासा अधिक काळ सरल्यावर पौलाने जाहीर केले की, अन्य भाषांमध्ये बोलण्याची ही देणगी कालांतराने संपेल. (१ करिंथकर १३:८) हे वाजवी का असेल? कारण पेंटेकॉस्टच्या वेळेच्या चमत्कारांनी सुरवातीच्या ख्रिस्ती धर्माला पुष्टी देऊन आपला उद्देश साध्य केला होता व त्यानंतर त्यांची गरज उरली नव्हती.
याच दृष्टीकोणातून आपण सिनाय पर्वतापाशी १,५०० वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टीकडे पाहू शकतो. तेथे, नियमशास्त्र करार हा ईश्वरी उगमाचा आहे याची छाप जमलेल्या लोकांवर बिंबवण्यासाठी देवाने नेत्रदिपक अलौकिक चिन्हे घडवली. या नव्या योजनेचा लोकांनी एकदा स्वीकार केल्यावर ती अद्भुत चिन्हे दिसेनाशी झाली.—निर्गम १०:१६-१९.
आज अन्य भाषा?
आज, अन्य भाषांत बोलण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याचे साहाय्य आपल्याला मिळते असे अनेकांना वाटते. तर मग, याचा तसेच अन्य भाषात बोलण्याची देणगी संपली असल्याचा शास्त्रवचनीय पुरावा यांची कशी सांगड घालता येईल बरे?
बहुधा अन्य भाषांमध्ये बोलण्याचा आजचा प्रकार हा अत्यंत भावनाविवश आवाजांचा उद्रेक असतो, जो सहसा कोणाला कळत नाही. त्या अर्थी तो देवाकडून असणे शक्य नाही. येशूने म्हटले की, धर्माचरण करीत असल्याचा दिखावा करणारे ढोंगी लोक अशा “महत्कृत्यां”शी त्याचे नाव जोडतील, पण अशा “अनाचार करणाऱ्यां’’चा तो अव्हेर करील. (मत्तय ७:२१-२३) शिवाय पौलाने देखील भविष्यकाळाविषयी इशारेवजा भाकित केले की, फसवे चमत्कार किंवा “खोटी महत्त्कृत्ये, चिन्हे” होतील. अशारितीने, “सर्व प्रकारचे अनीतीजनक कपट” हे कपटशिरोमणी, दियाबल सैतानाचे एक वैशिष्ट्य आहे.—२ थेस्सलनीकाकर २:८-१०.
पौलाच्या काळी अन्य भाषांत बोलणे हा एका ग्रीक खोट्या धर्माचा भाग होता, हे तुम्हाला माहीत आहे का? त्यांच्या विधींमध्ये अन्य भाषांमध्ये बोलण्यासह अंगावर जखमा करून घेणे व बेभान नग्न नृत्ये करणे अशाही प्रथा सामिल होत्या. अशाप्रकारातील ऐतिहासिक उदाहरणे स्पष्ट करतात की, अत्यंत अपवित्र अशा प्रभावाखालीच अशा अन्य भाषांचे बोलणे होऊ शकते.
कारणमीमांसा स्पष्टता देते
भावनावेगाने अन्य भाषांमध्ये बोलण्याच्या उगमाबद्दल तुम्हाला अजूनही शंका असल्यास कृपया १ योहान ४:१वर विचार करा. ते म्हणतेः “प्रियजनहो, . . . ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परिक्षा करा.” होय, मदतीसाठी प्रार्थनापूर्वक विनंती तसेच देवाच्या वचनाच्या चिंतनशील अभ्यासाने या गोष्टीची पारख करा. (प्रे. कृत्ये १७:११) आज अन्य भाषांमध्ये बोलणाऱ्या धर्मांना “सर्व सत्या”चे मार्गदर्शन मिळाले आहे की नाही ते पहा.—योहान १६:१३.
पहिल्या शतकात ख्रिस्तीजन अन्य भाषांमध्ये बोलले तेव्हा श्रोत्यांची नैतिक उन्नती झाली. त्यावेळी प्रेरित संदेश स्पष्ट व समजण्याजोगा असण्याची गरज होती.—१ करिंथकर १४:२६-२८.
सध्या पवित्र शास्त्रीय सत्याचा आदर करणाऱ्यांद्वारे निघणारे बोल हे पूर्वीच्या काळी, त्या पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेरित जिव्हांनी दिलेल्या भाषणापेक्षा सरस ठरत आहेत. हे असे का? कारण, ते अधिक जास्त श्रोत्यांना, आज्ञाधारक मानवासाठी ख्रिस्ताच्या हातातील देवाच्या राज्याची घोषणा एका टिकाऊ माध्यमाने करीत आहेत. त्यांचा संदेश पवित्र शास्त्राच्या लेखबद्ध वृत्तांताचा भाग आहे व तसे पाहिल्यास पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी बोललेल्या भाषांपेक्षा अधिकपणे आज पवित्र शास्त्र, संपूर्ण किंवा अंशतः, जवळपास १,८०० भाषांमध्ये उपलब्ध आहे.
[पानांवरील चित्र]
पहिल्या शतकातील ख्रिस्तीजनांना परदेशी भाषांमध्ये साक्ष देण्याची देणगी मिळाली होती