१९१४ नंतरचे जग
१९२९-१९३४ जागतिक मंदी व पुन्हा युद्धाकडे वाटचाल
“अमेरिकेचे नशीब कधी बलवत्तर झाले असेलच तर ते त्या दिवशी.” १९२९ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हर्बट हूवर यांनी पदग्रहणाची शपथ घेतली त्या दिवसाचे वर्णन, इतिहासकार डेव्हिड ए शॅनन यांनी वरील शब्दात केले. शॅनन यांनी खुलासा केला की, “ते वर्ष शांतीचे होते, युद्धाचे ढग क्षितिजावर दिसत नव्हते, परदेशात अमेरिकेची संपत्ती वाढत होती व त्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमनशिबी असलेल्या जगाच्या भागातील परिस्थिती बदलत होती.”
तथापि, हूवर यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शेवटी “देशभर जनतेच्या मनःस्थितीत आमूलाग्र बदल झाला होता, आशावादाऐवजी निराशावाद, आततायीपणा व मोठ्या प्रमाणावर हताशपणा आला होता.” असे झाले तरी काय?
‘काळा गुरुवार’—एका युगाचा अंत
बुधवार, ऑक्टोबर २३, १९२९ रोजी सकृतदर्शनी काहीही कारण नसताना अनेक दलाल न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात अधिक किंमतीचे शेअर्स विकू लागले. दुसऱ्या दिवशी, गुरुवारी, आपल्या शेअर्सची किंमत आणखी उतरण्यापूर्वी ते विकण्यास उत्सुक असलेल्या भागधारकांनी शेअर बाजारात भाऊगर्दी केली. त्यामुळे एका आठवड्यात शेअर्सचे १५ अब्ज डॉलर्सचे व पुढील काही महिन्यात आणखी अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले. अशी ही महामंदीची सुरवात झाली.
कोठे चुकले याची कारणमीमांसा करताना अर्थशास्त्रज्ञांनी व इतिहासकारांनी अनेक मते मांडली आहेत. पण त्यातील एकाने सूचित केल्याप्रमाणे, मंदीची अनेक कारणे “भरभराटीच्या दुसऱ्या दशकात खोलवर रुजलेली होती,” हे उघड आहे. त्यांची भरभराट “डळमळीत पायावर आधारलेली असल्याने . . . शेअर बाजाराच्या कोसळण्यामुळे . . . त्यामागील आर्थिक ऱ्हास एकाएकी उघडकीस आला.”—द युनायटेड स्टेटस् इन द ट्वेंटियथ सेंच्युरी, पृष्ठ १०, १२.
कशानेही का असेना, गाजणाऱ्या दुसऱ्या दशकाची मादक वर्षे संपली होती. तसेच त्यांनी आणलेल्या मादक आशाही संपल्या होत्या. एफ् फ्रीडेल व एन् पोलॅक म्हणतातः “१९२९ मधील शेअर बाजाराच्या मोठ्या अधःपतनाने (कल्पनांचा) बुडबुडा फोडला.” ते पुढे म्हणतातः “विपुलतेला ओहोटी लागल्यावर लाखोंची उपासमार झाली. दुसरे दशक जणू काल्पनिक करमणूक वा क्रूर थट्टा, अनैतिक रंगेलपणाचा काळ, संपत्तीच्या हव्यासाचे युग वाटू लागले.”—अमेरिकन इशूज इन द ट्वेंटियथ् सेंच्युरी, पृष्ठ ११५.
एकाएकी लाखो बेरोजगार झाले. कर्ज घेतलेल्या लोकांनी उधारीवर घेतलेल्या गोष्टी गमावल्या. त्यात घरेही गमावली. खर्च कमी करण्यासाठी कुटुंबे एकत्र राहू लागली. शेअर्सचे भाव पडल्याने पाहता पाहता संपत्ती होत्याची नव्हती झाली. धंदे बसले. हजारो अमेरिकन बॅका बंद झाल्यावर आलेल्या आत्महत्त्यांच्या लाटेने देशाला धक्का बसला. “रक्कम नाही,” या कारणास्तव अनेक चेक न वटण्याची, एका विनोदी कलाकाराला सवय झाली होती. परंतु आता “बँक नाही” या कारणाने ते परत येतात असे सांगितल्याने त्याला सभागृहातून खूप टाळ्या मिळाल्या.
या आर्थिक फटक्याचा विस्तार जगव्याप्त होता. तसेच त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे होते. “प्रत्येक देशावर तसेच सामाजिक, राजनैतिक, घरगुती व आंतरराष्ट्रीय अशा जीवनाच्या प्रत्येक पैलूवर या आर्थिक अनर्थाचा परिणाम झाला.” असा दावा द युनायटेड स्टेटस् ॲण्ड इटस् प्लेस इन वर्ल्ड अफेअर्स १९१८-१९४३ हे पुस्तक करते.
या दरम्यान जपानमधील युद्ध-तज्ञ या आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवत होते. द न्यू एनसायक्लोपिडिआ ब्रिटानिका म्हणतेः “१९२९च्या महामंदीमध्ये लष्करी विजयाने राज्यविस्तार केल्याने जपानचे आर्थिक प्रश्न सुटतील असा विचार प्रचलित झाला.” तिसऱ्या दशकाच्या सुरवातीला असलेल्या अस्थिर वातावरणामुळे या युद्धतज्ञांना इतका अधिकार मिळवता आला की, मुलकी शासनाच्या मंजुरीविनाही मांचुरियावर चाल करून फक्त पाच महिन्यात ते त्याला जिंकू शकले. लीग ऑफ नेशन्सने आक्रमक असा ठपका ठेवल्यावर, मांचुरियातून माघार घेऊन नव्हे, तर लीगमधून अंग काढून घेऊन जपानने त्याचे उत्तर दिले.
अहंभाव!
सुखविलासावर भर देऊन व भौतिकवादाचा पुरस्कार करून गाजणाऱ्या दुसऱ्या दशकाने धर्मनिष्ठेची गळचेपी करणाऱ्या अहंभावनेची जोपासना केली. वर उल्लेखलेल्या द युनायटेड स्टेटस् ॲण्ड इटस् प्लेस इन वर्ल्ड अफेअर्स १९१८-१९४३ या इतिहासाच्या पुस्तकाने म्हटल्याप्रमाणे “१९२९ मध्ये सुरु झालेल्या या आर्थिक भूकंपा”ने ही भावना अधिक स्पष्ट केली. ती कशी? कारण त्या मंदीने “समाजहिताची काही जाणीव असलीच तर तिचा नाश केला व इतरांवर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करून प्रत्येक कुटुंबाला आपल्या बचावावर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त केले. प्रत्येकाने आपल्यापुरतेच पहावे, आपली कातडी वाचवावी, इतरांचे काहीही होवो!”
व्यक्तींमध्ये अशी अहंकारी, आत्मकेंद्रित, बेपर्वा वृत्ती तिरस्करणीय समजली जाते. परंतु राष्ट्रप्रेमाच्या बुरख्याखाली असली भावना राष्ट्रांमध्ये अनेकदा योग्य समजली जाते व कधी कधी इष्ट मानली जाते. त्या महामंदीने अशा वृत्तीला खत-पाणी घातले.
इतिहासकार हर्मन ग्रामल म्हणतात की, “लीग ऑफ नेशन्समध्ये प्रकट होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामंजस्य व सहकाराच्या वृत्तीला त्या जागतिक आर्थिक संकटाने प्राणघातक टोला दिला” व त्यामुळे “देशांमध्ये अहंकाराच्या बेलगाम वाढी”ला वाट मोकळी झाली. ते म्हणतातः “लोकसमुदाय स्वसंरक्षणाच्या विचाराने भांबावतो. तशी बहुसंख्य राष्ट्रांनीही स्वसंरक्षणाच्या भावनेपोटी गैरवाजवी—पण समजण्याजोगी—बेपर्वाई दाखवली.”—यरुपा झ्वीसचेन डेन क्रिजन (युद्धातील युरोप), पृष्ठ २३७.
काही वर्षानंतर नाझी जर्मनीच्या हेन्रिच हिमलर यांनी दिलेल्या भाषणामध्ये ही वृत्ती जितकी उघडपणे व्यक्त झाली तितकी बहुधा इतर कोठेही दिसली नसेल. ते म्हणालेः “आपल्या रक्ताच्या लोकांना प्रामाणिकपणा, समंजसपणा, विश्वासूपणा व मैत्री जरूर दाखवली पाहिजे; इतर कोणालाही नव्हे. एखाद्या रशियन अथवा झेक माणसाचे काय झाले यात मला थोडाही रस नाही. रा समृद्धीत राहतात की, गुरांप्रमाणे उपासमारीने मरतात यात मला रस एवढाच की, आपल्या संस्कृतीला ते दास म्हणून हवे आहेत. रणगाडेविरोधी खड्डे खणताना १०,००० रशियन स्त्रिया श्रमामुळे कोसळल्या यात, जर्मनीसाठी तो रणगाडाविरोधी खड्डा पूर्ण होण्यापुरताच मला रस आहे.”
व्यक्ती व राष्ट्रे, दोन्ही असा अहंभाव व “आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर” प्रीती करण्याच्या देवाच्या नियमाला अनादर दाखवत असताना शांती साध्य करणे वा टिकवणे कसे शक्य आहे? (लूक १०:२७) पवित्र शास्त्र स्तोत्रसंहिता ११९:१६५ मध्ये म्हणतेः “तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते.” परंतु अशा प्रीतीची उणीव असल्याने राष्ट्रांना एका नव्या युद्धाच्या भरीस पाडणे सहज शक्य झाले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे प्रीतीची कमतरता व अहंभाव हे दोन्हीही, सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या दिवसां”चे वैशिष्ट्ये ठरणार होते.—२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:३, १२.
माणसाने कोणावर भरवसा ठेवावा?
युद्धाच्या धुमश्चक्रीच्या १९२०च्या दशकात लोकांनी देवाकडे पाठ फिरवली होती. जगाच्या, उघडपणे खालावणाऱ्या स्थितीने त्यांना देवाकडे वळवले का? काही वेळा वळवले खरे. यहोवाचे साक्षीदार सांगत असलेल्या संदेशाला अनेक लोकांनी प्रतिसाद दिला. (“यहोवाचे साक्षीदार” हे नाव वॉचटावर संस्थेशी संबंधित असलेल्या ख्रिस्ती लोकांनी १९३१ मध्ये स्वीकारले.) परंतु देवावर नव्हे तर “प्रख्यात” माणसांवर भरवसा ठेवून राष्ट्रांनी प्रतिसाद दिला नाही.
उदाहरणार्थ, १९३०च्या दशकाच्या सुरवातीस, भारतात महात्मा गांधींना मुलकी असहकाराच्या तीव्र अहिंसक चळवळीने वाढता पाठिंबा मिळत होता. ते भारताला ब्रिटीश सत्तेपासून स्वतंत्र करू इच्छित होते. यामुळे स्थिर व शांत भारत निर्माण होऊ शकेल अशी अनेकांची आशा होती. पण, तसे घडले का?
त्याच वर्षी चीनचे राष्ट्राध्यक्ष चॅग-काय-शेक मेथडीस्ट चर्चचे सभासद झाले. त्यांनी ख्रिस्ती धर्म पत्करल्यामुळे चीन व पाश्चिमात्य तथाकथित ख्रिस्ती राष्ट्रांमधील संबंध अधिक जवळचे होतील अशी आशा अनेकांना वाटली. तसे झाले का?
१९३२ मध्ये व्हॅटिकन पुरस्कृत समारंभामध्ये मुसोलिनीने आपल्या सत्तेची दहा वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा साजरा केला. तेथे मिळालेल्या पोपच्या आशीर्वादाने धार्मिक इटालियन लोक, त्यांचा नेता व त्यांच्या भूमीला अबाधित सुरक्षा व संरक्षणाची हमी मिळेल अशी अनेकांची आशा होती. तसे झाले का?
तसेच १९३२ मध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांनी गाडी रुळावर आणण्यासाठी आपल्या देशबांधवांना न्यू डील [नव्या व्यवस्थे] चे वचन दिले होते. एका वर्षानंतर त्यांनी अमेरिकेच्या निःशस्त्रीकरणाचा आराखडा बनवला व युद्धाची सर्व शस्त्रे नाहीशी करण्याचे आवाहन जगाला केले. अनेकांना आशा वाटली की या न्यू डीलमुळे बेरोजगारी व गरिबी यांचा अंत होईल व शांती प्राप्त होईल. तसे झाले का?
१९३३ मध्ये हिटलर जर्मनीचे नवे चान्सलर झाले. त्यानंतर लवकरच, त्यांनी दिलेले तथाकथित शांतीचे भाषण, त्यांच्या काही उत्तम भाषणातील एक होते. त्यामध्ये, “सध्याची सामाजिक व राजनैतिक प्रणाली कोसळण्यास कारणीभूत” होणारा “अनिर्बंध वेडेपणा” या शब्दात युद्धाचा धिःकार केला गेला. “अनाक्रमणाचा कोणताही गंभीर करार करण्यास जर्मनी तयार आहे; कारण आक्रमण करण्याचा जर्मनीचा विचार नसून फक्त सुरक्षितता मिळवण्याचा आहे,” असे म्हणत त्यांनी रूझवेल्ट यांच्या सूचनेला अनुसरून जर्मनीच्या निःशस्त्रीकरणाच्या तयारीवर भर दिला. अशा धोरणाने जर्मन देशाचा आत्मसन्मान व प्रतिष्ठा पुन्हा स्थापन होतील, आणि शांतीच्या मार्गाने त्यांच्या स्फूर्तिदायक नेत्याची सत्ता हजार वर्षे टिकण्याची हमी मिळेल, अशी अनेकांची आशा होती. पण तसे झाले का?
आणि तशीच ती “मोठी” संस्था, लिग ऑफ नेशन्स होऊन गेली. तिच्याबद्दल मे १५, १९३२च्या वॉचटावर मासिकाने म्हटलेः “पाळकांच्या सल्ल्यानुसार जगातले राजे लीग ऑफ नेशन्समध्ये एकत्र झाले आहेत. गोंधळात पडलेल्या व यातनापीडित जगाला सध्याच्या पेचातून सोडवण्यासाठी ते लिग ऑफ नेशन्समध्ये व माणसाच्या चातुर्यावर भरवसा ठेवतात.” ही लिग खरोखरच जगाला त्याच्या पेचातून सोडवील अशी आशा अनेकांना वाटत होती. यात यहोवाचे साक्षीदार सामील नव्हते. मग, तसे झाले का?
दोन हजार वर्षाहून अधिक पूर्वी स्तोत्रकर्त्याने लिहिलेः “प्रतिष्ठित माणसांवर अवलंबून राहू नका; यर्त्किचित मर्त्य असल्याने ते साहाय्य करू शकत नाहीत.” सिंहावलोकनाने, या शब्दांच्या विद्वत्तेशी तुम्ही सहमत होणार नाही का?—स्तोत्रसंहिता १४६:३, मोफॅट.
मंदी आलीच नसती तर . . .
युनायटेड स्टेटस् ॲण्ड इटस् प्लेस इन वर्ल्ड अफेअर्स १९१८-१९४३ या पुस्तकाचे लेखक म्हणतात की, “तिसऱ्या दशकातील सर्व घडामोडी व वळणांची जबाबदारी मंदीवर टाकणे मूर्खपणाचे ठरेल.” तरीही ते कबूल करतात की, “परंतु, त्या खडतर वर्षांतील चणचण व असुरक्षिततेने रंगभूमी सजवली, प्रभावी संवाद करणारे नट पुरवले, शोकांत कथानकाला भव्य दृष्यांची भर घातली व प्रेक्षकांना वाहवा करण्यास नवे नायक व छी-थू करण्यास नवे खलनायक दिले.” जर मंदी आली नसती तर दुसरे महायुद्ध होण्याची शक्यता नव्हती असे अनुमान ते काढतात.
परंतु, जागतिक मंदी आली, व दुसरे महायुद्धही झाले. यावरुन, जी शांती टिकवण्यासाठी लिग ऑफ नेशन्सची स्थापना झाली होती ती साध्य करण्यात धार्मिक पाठिंबा असतानाही लिग ऑफ नेशन्स अपयशी झाली हे उघड आहे. अगदी सुरवातीपासूनच या लिगची शंभर वर्षे भरली होती; परंतु ती पटकन् मरणार नव्हती, तर हळूहळू कोलमडत मरणार होती. (g87 3/22)
[पानांवरील चौकट]
गाजलेल्या इतर घटना
१९२९—हॉलिवुडमध्ये ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् ॲण्ड सायन्सेस् तर्फे पहिल्यांदाच (ऑस्कर्स) पारितोषिके देण्यात आली
१९३०—प्लूटो ग्रहाचा शोध लागला
१९३१—चीनमधील पुरात ८,००० पेक्षा अधिक मरण पावले व २ कोटी ३० लाख लोक बेघर झाले
निकारागुआमधील भूकंपात २००० पेक्षा अधिक मरण पावले
त्या काळातील जगातील सर्वात उंच इमारत, न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिर्ल्डिग पूर्ण झाली
१९३२—न्यूट्रॉन व ड्युटेरियम (जड हायड्रोजन) यांच्या शोधामुळे न्यूक्लिअर भौतिकशास्त्र अस्तित्वात येण्यात मदत झाली
१९३३—जर्मनीने लिग ऑफ नेशन्समधून अंग काढले; हिटलर चान्सलर झाल्याची घोषणा; डाचोमध्ये राजकीय गुन्हेगारांचा पहिला तुरुंग (कॉन्सन्ट्रेशन कॅम्प) उघडला; जर्मनी व व्हॅटिकन यांच्यामधील समेटावर हस्ताक्षऱ्या; बर्लिनमध्ये अनिष्ट पुस्तकांची जाहीर होळी
१९३४—गुंडगिरीशी लढण्यासाठी अमेरिकेत एफ. बी. आय. (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) चे संगठन
जवळपास ९०,००० सैनिकांच्या चिनी लाल सैन्याचा येनानकडे लॉग मार्च सुरु
[पानांवरील चित्र]
थोडक्याच काळात लाखो बेरोजगार झाले
[पानांवरील चित्राचे श्रेय]
A. Rothstein/Dover