ख्रिस्ती जीवन
अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्या क्षेत्रात एकमेकांना सहकार्य देऊन प्रचार करणं
लोक जेव्हा आपल्या मातृभाषेत राज्याचा संदेश ऐकतात तेव्हा सहसा ते चांगला प्रतिसाद देतात. आणि म्हणूनच इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी “आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील यहुदी” उपासकांना आनंदाचा संदेश त्यांच्या “मूळ भाषेत” ऐकता यावा यासाठी यहोवाने योजना केली. मग त्या वेळी सामान्यपणे बोलली जाणारी हिब्रू किंवा ग्रीक भाषा त्यांना येत असली तरीही. (प्रेका २:५, ८) आज अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्या क्षेत्रात वेगवेगळ्या भाषेत सभा भरवण्यात येतात. पण त्यांचं प्रचाराचं क्षेत्र कदाचित एकच असेल. मग अशा वेळी वेगवेगळ्या मंडळीचे प्रचारक एकमेकांना सहकार्य करून सर्वांना प्रचार कसा करू शकतात? कारण जर एकाच घरात वेगवेगळे प्रचारक वारंवार गेले तर घरमालक चिडू शकतो आणि प्रचारकांची मेहनतही वाया जाऊ शकते.
सल्ला घ्या (नीत १५:२२): सेवा पर्यवेक्षकांनी एकमेकांशी चर्चा करून सर्व मंडळ्यांसाठी योग्य ठरेल अशी प्रचाराची व्यवस्था केली पाहिजे. जर प्रचाराचं क्षेत्र लहान असेल तर इतर भाषेत प्रचार करणाऱ्या मंडळ्या कदाचित आपल्याला त्यांची भाषा बोलणारी घरं सोडून द्यायला सांगतील. पण जर त्यांचं क्षेत्र मोठं असेल आणि ते नेहमीच प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकत नसतील तर कदाचित ते आपल्याला घरं सोडायला सांगणार नाहीत. पण जर त्यांची भाषा बोलणाऱ्या एका व्यक्तीने आवड दाखवली तर त्याबद्दल आपण त्या मंडळीला माहिती द्यावी अशी त्यांची इच्छा असेल. (संगठित अध्या. ९ परि. ३७) किंवा ते आपल्या मंडळीला त्यांची मदत करायला सांगतील. जर आपल्याला क्षेत्रात त्यांच्या भाषेचे लोक भेटले तर त्यांचा पत्ता आपण त्या मंडळीला द्यावा अशी अपेक्षा ते करतील. अशा लोकांच्या पत्त्यांची नोंद करून ते तिथे प्रचार करतील. (आपली राज्य सेवा २/१४ पृ. ४-५, चौकट) पण काही वेळा असंही होऊ शकतं की एकाच घरात एका पेक्षा जास्त भाषा बोलणारे लोक असतील. प्रचार क्षेत्राबद्दल माहिती गोळा करताना नागरिकांच्या माहितीबद्दल असलेले नियम पाळले जावेत.
सहकार्य करा (इफि ४:१६): तुमच्या सेवा पर्यवेक्षकाने दिलेल्या निर्देशनाचं काळजीपूर्वक पालन करा. तुम्ही अशा व्यक्तीचा बायबल अभ्यास घेत आहात का, ज्याला सहज समजणारी भाषा तुमच्या मंडळीच्या भाषेपेक्षा वेगळी आहे? असं असेल तर तुम्ही त्याची भाषा बोलणाऱ्या जवळच्या एका मंडळीला किंवा गटाला त्याचा बायबल अभ्यास द्या. असं केल्यामुळे तो विद्यार्थी भरभर प्रगती करेल.
तयारी करा (नीत १५:२८; १६:१): तुमच्या क्षेत्रात तुम्हाला दुसरी भाषा बोलणारी व्यक्ती भेटली तर तिला आनंदाचा संदेश सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तुमच्या क्षेत्रात सहसा कोणती भाषा बोलली जाते याचा तुम्ही आधीच विचार करू शकता. तसंच तुमच्या मोबाईलवर त्या भाषेतलं बायबल आणि व्हिडिओ डाऊनलोड करून ठेवू शकता. तुम्ही JW लँग्वेज ॲपवरून त्यांच्या भाषेत अभिवादन कसं करायचं हेदेखील शिकू शकता.