माघार घेऊ नका—व्यस्त असतानाही
१. बायबल अभ्यास घेण्यास काही जण का कचरतात?
१ व्यस्त दिनक्रमामुळे काही जण बायबल अभ्यास घेण्यास कचरतात. बायबल विद्यार्थ्याची काळजी घेण्यास वेळेची गरज असते. अभ्यासाची तयारी करण्यासाठी, तो चालवण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टींवर मात करण्यास त्याला मदत करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. थेस्सलनीकातील लोकांना यहोवाबद्दल सांगण्यासाठी प्रेषित पौल आपला जीवही देण्यास तयार होता असे त्याने सांगितले. (१ थेस्सलनी. २:७, ८) जीवनात व्यस्त असतानाही आपण बायबल अभ्यास कसा घेऊ शकतो?
२. आपले जर यहोवावर प्रेम असेल तर आपण आपल्या वेळेचा उपयोग कसा करू?
२ उपासनेसाठी वेळ द्यावा लागतो: उपासनेसाठी वेळ द्यावा लागतो हे वेगळे सांगायला नको. उदाहरणार्थ, सभांना उपस्थित राहण्यासाठी, सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी, बायबल वाचण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी वेळ काढावा लागतो. एक विवाहित व्यक्ती कितीही व्यस्त असली तरी आपल्या विवाहसोबत्यासाठी वेळ काढते. तर मग, आपण यहोवावर प्रेम करत असल्यामुळे त्याच्या उपासनेसाठी वेळ काढू नये का? (इफिस. ५:१५-१७; १ योहा. ५:३) येशूच्या म्हणण्याप्रमाणे शिष्य बनवणे हा आपल्या उपासनेतील एक महत्त्वाचा भाग आहे. (मत्त. २८:१९, २०) ही गोष्ट लक्षात ठेवली तर आपण कधीही बायबल अभ्यास घेण्याची जबाबदारी स्वीकारण्यापासून कचरणार नाही.
३. परिस्थितीमुळे सेवाकार्यातील दिनक्रमात व्यत्यय आला तरी आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याची काळजी कशी घेऊ शकतो?
३ पण आपल्या दिनक्रमात कामामुळे, आजारपणामुळे किंवा मंडळीतील जबाबदाऱ्यांमुळे व्यत्यय येत असेल तर काय? काही प्रचारकांना कामानिमित्ताने बाहेर जावे लागते तेव्हा ते फोनद्वारे किंवा इंटरनेटद्वारे बायबल अभ्यास घेतात. गंभीर आजारामुळे जे घराबाहेर पडू शकत नाहीत ते आपल्या बायबल विद्यार्थ्याला अभ्यासासाठी घरी बोलवतात. काहींना काही कारणामुळे बायबल अभ्यास घेणे शक्य नसते तेव्हा ते दुसऱ्या एखाद्या जबाबदार प्रचारकाला बायबल अभ्यास घेण्यास सांगतात.
४. बायबल अभ्यास घेण्याच्या कार्यात सहभागी झाल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?
४ इतरांना सत्य शिकवण्यासाठी आपला वेळ व श्रम खर्च करण्यास पौलाला आनंद वाटला. (प्रे. कृत्ये २०:३५) थेस्सलनीकामध्ये आपण किती लोकांना सत्य शिकण्यास मदत केली याचा त्याने विचार केला तेव्हा यहोवाचे आभार मानण्यास तो प्रवृत्त झाला. (१ थेस्सलनी. १:२) आपण जर आपल्या व्यस्त दिनक्रमाला बायबल अभ्यास घेण्याच्या आड येऊ दिले नाही तर सेवाकार्यातील आपला आनंद व समाधान आणखी वाढू शकते.