प्रचार करण्यासाठी नवीन लोकांना प्रशिक्षित कसे करावे?
१. पहिल्यांदा प्रचार करण्याचा तुमचा अनुभव कसा होता?
१ घरोघरच्या प्रचार कार्यात तुम्ही पहिल्यांदा भाग घेतला होता तो दिवस तुम्हाला आठवतो का? कदाचित तुम्ही खूप घाबरलेले असाल. पण जर तुम्ही तुमच्या अभ्यास घेणाऱ्यासोबत किंवा इतर प्रचारकासोबत प्रचार कार्य केले असेल, तर त्यांची मदत मिळाल्यामुळे तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. आता तुम्ही स्वतः एक अनुभवी सेवक झाला आहात, त्यामुळे इतर नवीन लोकांना प्रचार करण्यासाठी प्रशिक्षित करू शकता.
२. नवीन प्रचारकांनी काय शिकणे गरजेचे आहे?
२ नवीन प्रचारकांनी घरमालकांशी संभाषण कसे सुरू करावे, प्रचारात बायबलचा वापर कसा करावा, पुनर्भेटी कशा घ्याव्यात व बायबल अभ्यास कसे सुरू करावेत हे शिकण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांनी इतर मार्गांनी प्रचार करणे जसे की रस्त्यावरील साक्षकार्य, व्यापारी क्षेत्रात प्रचार करणे हे देखील शिकले पाहिजे. घरमालकाच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यास तसेच इतरांना सुवार्ता सांगताना व्यवहारचातुर्याने कसे बोलावे व सावधगिरी कशी बाळगावी हे देखील त्यांनी शिकून घेणे गरजेचे आहे. (कलस्सै. ४:६) या बाबतीत सुधारणा करण्यासाठी आपण त्यांना आपल्या उदाहरणाद्वारे व उपयुक्त सूचना देण्याद्वारे मदत करू शकतो.
३. आपल्या उदाहरणामुळे इतरांना मदत कशी होऊ शकते?
३ उदाहरणाद्वारे शिकवणे: येशूने त्याच्या शिष्यांना प्रचार करायला केवळ सांगितले नाही तर तो कसा करायचा हे त्यांना दाखवले. (लूक ८:१; १ पेत्र २:२१) नवीन प्रचारकासोबत प्रचार करताना तुम्ही आपल्या प्रकाशनांतील एखादी सोपी प्रस्तावना तयार करू शकता, जेणेकरून प्रचारकही ती प्रस्तावना वापरू शकेल. नंतर पहिल्या एक दोन घरांत तुम्ही बोला म्हणजे प्रचारक तुम्ही कसे बोलता ते ऐकू शकेल. पुढच्या घरात जाण्याअगोदर तुमची प्रस्तावना कितपत प्रभावी होती याबद्दल प्रचारकाला काय वाटते हे तुम्ही विचारू शकता. यामुळे इतरांसोबत प्रचार करण्याचे महत्त्व त्याला समजेल व तो एखाद्या घरात बोलल्यानंतर तुम्ही केलेल्या सूचनांचा स्वीकार करणे त्याला सोपे जाईल.
४. नवीन प्रचारकाची प्रस्तावना ऐकल्यानंतर आपण त्याची मदत कशी करू शकतो?
४ सूचना करण्याद्वारे शिकवणे: येशूने त्याच्या शिष्यांना प्रचार कसा करायचा याबद्दल सूचना दिल्या होत्या. (मत्त. १०:५-१४) तुम्हीही नवीन प्रचारकांना अशीच मदत करू शकता. जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. त्या घरातून बाहेर आल्यानंतर, त्याच्या बोलण्यातील काही उणिवा तुमच्या लक्षात आल्या असल्या तरीसुद्धा त्याच्या प्रस्तावनेतील काही विशिष्ट चांगल्या गोष्टींबद्दल त्याची प्रामाणिकपणे प्रशंसा करा. त्याला कोणतीही सूचना देण्याअगोदर, पुढच्या घरात त्याने आपली चूक सुधारली आहे किंवा नाही हे पाहा. कदाचित तो थोडा घाबरलेला असेल. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते आणि एखादी गोष्ट करण्याच्या अनेक योग्य पद्धती असू शकतात हे देखील लक्षात ठेवा.—१ करिंथ. १२:४-७.
५. सल्ला देण्यासाठी पुढाकार घेताना आपण काय म्हणू शकतो?
५ काही वेळा नवीन प्रचारक स्वतः तुम्हाला काही सल्ला मागेल. पण त्याने तसे न केल्यास त्याला मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. त्याच्या भावना न दुखावता तुम्ही हे कसे करू शकता? काही अनुभवी प्रचारक नवीन प्रचारकाला असे विचारतात: “मी तुम्हाला काही सूचवू का?” किंवा “या घरमालकाशी झालेल्या संभाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं?” तुम्ही असेही म्हणू शकता, “मी जेव्हा प्रचाराला सुरुवात केली होती तेव्हा मला . . . करणं खूप कठीण वाटायचं, पण मला . . . यामुळे मदत मिळाली.” चर्चा कशा सुरू कराव्या या पुस्तिकेतील माहिती तुम्ही दोघे मिळून विचारात घेऊ शकता. खूप माहिती दिल्यामुळे त्याला दडपण येऊ नये म्हणून त्याच्या प्रस्तावनेतील कोणत्याही एकाच गोष्टीबद्दल त्याला सूचना करा.
६. प्रचार कार्याच्या बाबतीत कशा प्रकारे ‘लोखंड लोखंडाला धार लावते’?
६ लोखंड लोखंडाला धार लावते: तीमथ्यासारख्या अनुभवी सुवार्तिकालाही स्वतःच्या शिकवण्याकडे लक्ष देण्याचे व प्रगती करत राहण्याचे पौलाने प्रोत्साहन दिले होते. (१ तीम. ४:१३, १५) तुम्ही प्रचार कार्याला सुरुवात केली त्याला अनेक वर्षे झाली असली, तरी तुमची कौशल्ये सुधारत राहण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. तुम्ही जेव्हा इतर प्रचारकांसोबत प्रचार करता तेव्हा जरी त्यांचा अनुभव कमी असला तरीही त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच, इतरांना खासकरून नवीन लोकांना सुवार्ता सादर करणारा कुशल सेवक बनण्यास प्रेमळपणे मदत करण्याबाबत जागृत राहा.—नीति. २७:१७, सुबोध भाषांतर.