सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—क्षेत्रात तुमच्यासोबत काम करणाऱ्या प्रचारकाला मदत करा
हे का महत्त्वाचे: प्रचार कार्य करत असताना आपल्यासोबत एक सोबती असणे किती महत्त्वाचे आहे हे येशूने ओळखले. म्हणून जेव्हा त्याने त्याच्या ७० शिष्यांना प्रचार कार्य करण्यास पाठवले तेव्हा त्यांना जोडी-जोडीने पाठवले. (लूक १०:१) घरमालकाशी बोलताना एखादी समस्या निर्माण झाली किंवा घरमालकाच्या प्रश्नाचे उत्तर प्रचारकाला देता आले नाही तर त्याचा सोबती त्याला मदत करू शकतो. (उप. ४:९, १०) सोबत काम करणाऱ्या प्रचारकाला तो आपल्या अनुभवातून मदत करू शकतो आणि एक परिणामकारक सुवार्तिक बनण्यासाठी कशाची गरज आहे याबद्दल तो त्याला अधूनमधून काही सूचनाही देऊ शकतो. (नीति. २७:१७) शिवाय, एका घरातून दुसऱ्या घरात जाताना जो वेळ मिळतो त्या वेळेत तो आपल्या सोबत्याशी उभारणीकारक संभाषण करण्याद्वारे त्याला प्रोत्साहनदेखील देऊ शकतो.—फिलिप्पै. ४:८.
हे कसे करावे:
• तुमचा सोबती घरमालकाशी बोलत असताना लक्षपूर्वक ऐका. (याको. १:१९) एखादे वचन वाचले जाते तेव्हा तुम्हीदेखील ते तुमच्या बायबलमध्ये पाहा. असे केल्यामुळे, गरज पडल्यास तुम्ही तुमच्या सोबत्याला योग्य प्रकारे मदत करू शकाल. घरोघरचे साक्षकार्य करताना, आपल्या सोबत्याच्या व घरमालकाच्या संभाषणाकडे लक्ष ठेवण्याव्यतिरिक्त आसपासच्या परिसरावरदेखील लक्ष ठेवा. (मत्त. १०:१६) जर तुम्हाला असे जाणवले की एखादी व्यक्ती तुमच्याकडे बघून मोबाईलचा वापर करत आहे, तर सुज्ञपणे आपल्या सोबत्याला संभाषण थांबवण्यास मदत करा आणि तेथून शांतपणे निघू जा.—नीति. १७:१४.
• संभाषणादरम्यान बोलावे की नाही आणि केव्हा बोलावे हे विचारपूर्वक ठरवा. (नीति. २५:११) तुम्ही जर एखाद्या प्रचारकासोबत त्याच्या बायबल अभ्यासासाठी गेलात तर अभ्यासादरम्यान तुम्ही अधूनमधून दिलेल्या टिपण्यांची तो नक्कीच कदर करेल. पण, घरोघरचे प्रचार कार्य करताना, घरमालकाशी बोलण्याची तुमच्या सोबत्याची वेळ असेल तर त्यालाच बोलू द्या. अर्थात, तुमचा सोबती जर नव्यानेच प्रचारक बनला असेल किंवा घरमालकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे हे त्याला माहीत नसेल तर तुम्ही त्याला मदत करू शकता. या मदतीची तो नक्कीच कदर करेल. पण, एखाद्या प्रचारकासोबत घरोघरचे कार्य करताना, पुनर्भेट घेताना किंवा बायबल अभ्यास घेताना तुमच्या सोबत्याचे संभाषण मधेच तोडू नका किंवा स्वतःच घरमालकाशी बोलू नका किंवा नव्या विषयावर बोलायला सुरुवात करू नका.
• सोबत काम करणाऱ्या प्रचारकाला आपल्या अनुभवातून मदत करा. तुमच्या सोबत्याला सेवाकार्यात आणखी परिणामकारक बनण्यास मदत करण्यासाठी एखादी सूचना देणे गरजेचे आहे असे वाटल्यास ती जरूर द्या. (नीति. ३:२७) योग्य वेळ पाहून तुम्ही असे म्हणू शकता: “तुला काय वाटतं, घरमालकासोबतचं तुझं ते संभाषण कसं होतं?” किंवा “मी तुला काही सांगितलं तर चालेल का?” किंवा तुम्ही असेही म्हणू शकता: “मी काय करतो माहीतंय?” एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण प्रत्येक गोष्टीत प्रचारकाच्या चुका काढत बसलो तर त्याचा उत्साह मंदावेल. याउलट, अधूनमधून दिलेली सूचना तो आनंदाने स्वीकारेल.
या महिन्यात हे करून पाहा:
• सेवाकार्यात एखाद्या प्रचारकासोबत काम केल्यानंतर, त्याने असे काय म्हटले किंवा केले ज्यामुळे तुम्हाला मदत मिळाली हे त्याला सांगा.