“प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध” असा
१ येशूने प्रचार कार्याची एक नवीन मोहीम हाती घेतली तेव्हा आधी त्याने वेळात वेळ काढून आपल्या शिष्यांना या कार्यासाठी तयार केले. (मत्त. १०:५-१४) आपल्या सर्वांना बरीच कामे असतात, हे खरे आहे. पण तरीसुद्धा, घरोघरच्या सेवाकार्यात सहभाग घेण्याअगोदर त्यासाठी तयारी करण्यात निदान काही मिनिटे घालवल्यास, आपल्याला सेवाकार्यात चांगले परिणाम मिळतील.—२ करिंथ. ९:६.
२ तयारी कशी करावी?: चांगली तयारी करण्यासाठी सर्वप्रथम, आपण जे साहित्य देणार आहोत त्याबद्दल स्वतः माहिती करून घेतली पाहिजे. तसेच, आपल्या क्षेत्रातील लोकांबद्दल आपण विचार केला पाहिजे. त्यांना कोणत्या गोष्टींविषयी काळजी वाटते? बहुतेक लोकांचे मुख्य धार्मिक विश्वास काय आहेत? अशा लोकांशी आपण कशा प्रकारे बोलू शकतो यासंबंधी साहाय्यक सूचनांसाठी आपण आमची राज्य सेवा व पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या या पुस्तिकेत दिलेल्या सादरता पाहू शकतो.
३ सेवा सभेत दाखवल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकांचे लक्षपूर्वक निरीक्षण केल्यानेही आपल्याला बराच फायदा होईल. आपण तयार केलेली सादरता प्रत्यक्ष वापरण्यास सुरू केल्यावर आपल्याला प्रत्येक वेळी तयारी करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. तरीसुद्धा, दर वेळी सेवाकार्याला जाण्यापूर्वी, क्षेत्रसेवेत आपण काय बोलणार यावर थोडा विचार केल्यास आणि आपल्या सादरतेत सुधारणा करत राहिल्यास, आपले सेवाकार्य जास्त परिणामकारक बनेल. तसेच, प्रचार कार्यात लागणारे सर्व साहित्य आपल्या बॅगेत असल्याचीही आपण खात्री केली पाहिजे.
४ आपण तयार केलेली सादरता आठवणीत ठेवण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? एक मार्ग म्हणजे, आपल्याला जे बोलायचे आहे त्याचा मोठ्याने सराव करणे. काही जण कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी असा सराव करतात. इतर जण आपली सादरता एका लहानशा कागदावर लिहून आपल्या सोबत ठेवतात आणि दारावरची बेल वाजवण्याआधी एकदा त्यावर ओझरती नजर टाकतात.
५ तयारी करण्याचे फायदे: चांगली तयारी केल्याने आपण सेवाकार्यात जास्त परिणामकारक ठरू आणि आपला आनंदही द्विगुणित होईल. तसेच, आपल्याला घरमालकाशी शांतपणे व आत्मविश्वासाने बोलता येईल. कोणी आपल्या सेवाकार्याविषयी आक्षेप घेतल्यास किंवा आपल्यावर आरोप केल्यास आपण त्यांना सौम्यतेने व विचारपूर्वक उत्तर देऊ शकू. काय बोलावे याचाच विचार करण्याऐवजी, घरमालकाकडे जास्त लक्ष देणे आपल्याला शक्य होईल. याव्यतिरिक्त, आपल्याजवळ असलेल्या साहित्याची माहिती करून घेतल्यामुळे आपल्याला ते जास्त उत्साहाने सादर करता येईल.
६ बायबल आपल्याला ‘प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असण्याचे’ प्रोत्साहन देते. (तीत ३:१) आणि सुवार्तेच्या प्रचारापेक्षा चांगले काम दुसरे कोणते असू शकते का? या कार्यात सहभागी होण्याआधी चांगली तयारी करण्याद्वारे, आपला संदेश ऐकू इच्छिणाऱ्या घरमालकाबद्दल तसेच, ज्याने आपल्यावर हे कार्य सोपवले आहे त्या यहोवा देवाबद्दल आपण आदर दाखवतो.