नमुना म्हणून दिलेल्या सादरतांचा कसा वापर करावा?
१. नमुनेदाखल पुरवल्या जाणाऱ्या सादरतांचा आपण कशाप्रकारे उपयोग करावा?
१ आपली नियतकालिके व इतर प्रकाशने कशी सादर करावीत हे दाखवण्याकरता आमची राज्य सेवा यात वेळोवेळी नमुनेदाखल सादरता दिल्या जातात. सेवाकार्यात घरमालकाशी बोलताना या सादरतांमध्ये सुचवल्याप्रमाणे जसेच्या तसेच बोलणे आवश्यक नाही. आपण काय म्हणू शकतो याची सर्वसाधारण कल्पना देण्याकरता या सादरता पुरवल्या जातात. त्यांचा उपयोग करताना आपण स्वतःच्या शब्दात यांतील मजकूर सादर केल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल. स्वाभाविक पद्धतीने आपले विचार व्यक्त केल्यामुळे घरमालक अगदी निश्चिंत होऊन ऐकतात; तसेच आपल्या बोलण्यातून प्रामाणिकपणा व आत्मविश्वास प्रकट होतो.—२ करिंथ. २:१७; १ थेस्सलनी. १:५.
२. सादरता तयार करताना विशिष्ट ठिकाणच्या लोकांच्या रीतीरिवाजांचा विचार करणे का महत्त्वाचे आहे?
२ आपली सादरता परिस्थितीनुसार जुळवून घ्या: सुवार्ता सादर करण्याची आपली पद्धत बऱ्याच अंशी आपल्या समाजातील रीतीरिवाजांवर अवलंबून आहे. सुरुवातीला घरमालकाला नमस्कार केल्यावर त्याच्याशी संभाषण सुरू करून मग आपला संदेश तुम्ही सादर करता का? की आपण कोणत्या कामाने आलो आहोत हे तुम्ही सर्वप्रथम सांगावे अशी तुमच्या भागातील लोक अपेक्षा करतात? प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी असते आणि कधीकधी तर प्रत्येक व्यक्तीनुसार तुम्हाला हे ठरवावे लागेल. घरमालकाला कोणताही प्रश्न विचारताना देखील समजूतदारपणा दाखवणे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी एखादा प्रश्न विचारण्यात काहीही गैर नसेल, पण तोच प्रश्न दुसऱ्या ठिकाणी विचारल्यास लोकांना वाईट वाटू शकते. त्यामुळे आपण विचारशीलता दाखवून, विशिष्ट ठिकाणी लोकांना काय आवडते, काय आवडत नाही यानुसार आपल्या सादरतांमध्ये फेरबदल केला पाहिजे.
३. आपण ज्यांच्याशी बोलतो त्यांची पार्श्वभूमी व विचारसरणी लक्षात घेणे का महत्त्वाचे आहे?
३ या शिवाय, क्षेत्र सेवेची तयारी करताना आपल्या भागातील लोकांची पार्श्वभूमी व विचारसरणी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. उदाहरणार्थ मत्तय ६:९, १० या वचनावर चर्चा करताना, एखाद्या कॅथलिक व्यक्तीशी चर्चा करण्याची तुमची पद्धत आणि जिला “प्रभूची प्रार्थना” माहितच नाही अशा व्यक्तीशी चर्चा करण्याची पद्धत साहजिकच वेगळी असेल. आधी थोडा विचार केल्यास, सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांना आपला संदेश ऐकावासा वाटावा म्हणून आपण आपल्या सादरतांमध्ये सहसा आवश्यक फेरबदल करू शकतो.—१ करिंथ. ९:२०-२३.
४. उत्तम तयारी का आवश्यक आहे?
४ नमुनेदाखल दिलेल्या सादरता आपण जशाच्या तशा वापरण्याचे ठरवतो तेव्हा देखील, पूर्वतयारी करण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण जो लेख किंवा जो अध्याय घरमालकाला दाखवू इच्छितो त्यातून त्याला आवडतील असे मुद्दे निवडण्यासाठी आपण आधी तो लेख किंवा अध्याय वाचला पाहिजे. मग त्या मुद्द्यांचा आपण आपल्या सादरतेत समावेश करू शकतो. आपल्या प्रकाशनांतील सुरेख माहितीशी आपण स्वतः परिचित झालो तरच आपण ही प्रकाशने उत्साहाने सादर करू शकतो.
५. कधीकधी दिलेल्या सादरतेपेक्षा वेगळी सादरता आपल्याला तयार कराविशी का वाटू शकेल आणि आपण हे कसे करू शकतो?
५ वेगळ्या पद्धतीने सादर करणे: नमुनेदाखल दिलेल्या सादरताच आपण वापराव्यात असा नियम आहे का? नाही. जर तुम्हाला एखाद्या वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळे शास्त्रवचन वापरून संदेश सादर करणे सोपे वाटत असेल तर तसे करा. खासकरून नियतकालिके सादर करताना मुख्य लेखांव्यतिरिक्त, आपल्या क्षेत्रातल्या लोकांना मासिकातले इतर कोणते लेख आवडतील का, याचा विचार करून ते त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा. सेवा सभेत क्षेत्र सेवेची प्रात्यक्षिके दाखवताना तुमच्या क्षेत्रात जी पद्धत परिणामकारक ठरली आहे ती दाखवा. अशा रीतीने सर्वांनाच परिणामकारक पद्धतीने सुवार्ता सादर करण्यास साहाय्य मिळेल.