सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—सुरुवातीचे शब्द बोलण्याची तयारी करा
हे का महत्त्वाचे? जर आपली प्रस्तावना आवड निर्माण करणारी नसली, तर साक्ष देण्याआधीच घरमालक कदाचित संभाषण थांबवेल. म्हणून, बरेच प्रचारक त्यांच्या प्रस्तावनेतील सुरुवातीच्या शब्दांकडे जास्त लक्ष देतात. आपली राज्य सेवा आणि रिझनिंग पुस्तकात नमुना सादरीकरणे दिलेली असली तरी, त्यात शब्द न् शब्द दिलेला नसतो. आणि नमुना सादरीकरण पूर्ण असले तरी प्रचारक त्यात फेरबदल करू शकतो किंवा स्वतःच्या शब्दांत सादरीकरण तयार करू शकतो. त्यामुळे, घरमालकाने दार उघडल्यावर मनात जे येईल ते बोलण्यापेक्षा आपण जर काळजीपूर्वक सुरुवातीचे शब्द निवडले तर आपली प्रस्तावना परिणामकारक ठरू शकेल.—नीति. १५:२८.
हे कसे करावे?
• एक विषय निवडा. तो तुम्ही देणार असलेल्या साहित्यावर आधारित आणि तुमच्या क्षेत्रातील लोकांना आवडणारा असावा.
• अभिवादन केल्यानंतर तुम्ही लगेचच जी एक किंवा दोन वाक्ये बोलणार आहात त्यांची काळजीपूर्वक तयारी करा. तुम्ही असे म्हणून सुरुवात करू शकता: “मी तुमच्याकडं . . . यासाठी आलो होतो,” “आज लोकांना . . . या गोष्टींची चिंता आहे,” “मला . . . यावर तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल,” किंवा असेच काहीतरी बोलू शकता. छोटी आणि सोपी वाक्ये सहसा चांगला प्रभाव पाडतात. काही प्रचारक त्यांची प्रस्तावना तोंडपाठ करतील.
• घरमालकाला विचार करायला लावणारा प्रश्न विचारा ज्यामुळे तो संभाषणात सहभाग घेऊ शकेल. (मत्त. १७:२५) आणि लक्षात ठेवा तुम्ही येण्याआधी बहुतेक करून तो दुसऱ्या कशाचा तरी विचार करत असेल. म्हणून, त्याला ज्याचे उत्तर द्यायला अवघड वाटेल असा प्रश्न विचारू नका.
या महिन्यात हे करून पाहा:
• कौटुंबिक उपासनेच्या वेळी थोडा वेळ बाजूला ठेवा ज्यामध्ये तुम्ही सुरुवातीचे शब्द बोलण्याची तयारी आणि सराव करू शकता.
• सेवाकार्यात तुम्ही काय बोलण्याचे ठरवले आहे ते आपल्यासोबत असणाऱ्या प्रचारकाला सांगा. (नीति. २७:१७) तुमची प्रस्तावना प्रभावकारी नसेल तर ती बदला.