प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग ८: विद्यार्थ्यांचे लक्ष संघटनेकडे वळवणे
१. दर आठवडी बायबल अभ्यासाच्या वेळी यहोवाच्या संघटनेविषयी एखादा मुद्दा सांगितल्याने काय फायदा होईल?
१ बायबल अभ्यास संचालित करण्यामागचा आपला हेतू, केवळ सैद्धांतिक माहिती देणे इतकाच नव्हे तर विद्यार्थ्यांना ख्रिस्ती मंडळीचा भाग बनण्यास मदत करणे, हा देखील आहे. (जख. ८:२३) यहोवाचे साक्षीदार—कोण आहेत? त्यांचा काय विश्वास आहे? हे माहितीपत्रक आपल्याला याबाबतीत मदत करू शकेल. नवीन बायबल विद्यार्थ्यांना या माहितीपत्रकाची एक प्रत द्या आणि त्यांना ते वाचण्याचे उत्तेजन द्या. याशिवाय, दर आठवडी अभ्यासाच्या वेळी काही मिनिटांसाठी यहोवाच्या संघटनेविषयी एखादा मुद्दा त्यांना सांगा.
२. बायबल विद्यार्थ्यांना मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी तुम्ही उत्तेजन कसे देऊ शकता?
२ मंडळीच्या सभा: बायबल विद्यार्थी एका प्रमुख मार्गाने, यहोवाच्या संघटनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात; आणि तो म्हणजे, मंडळीच्या सभांमध्ये आपल्याबरोबर संगती करून. (१ करिंथ. १४:२४, २५) यास्तव, एका वेळी एका सभेचे अशाप्रकारे आठवड्यातल्या पाच सभांचे वर्णन तुम्ही त्यांना देऊ शकता. पुढील जाहीर भाषणाचा विषय त्यांना सांगा. टेहळणी बुरूज अभ्यासात कोणत्या लेखाची चर्चा केली जाईल आणि मंडळीच्या पुस्तक अभ्यासात कोणत्या भागावर विचार केला जाईल ते त्यांना दाखवा. ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा यांच्याविषयी त्यांना सांगा. प्रशालेत तुम्हाला एखादी नेमणूक असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर सराव करू शकता. सभांमध्ये सादर केलेले उल्लेखनीय मुद्दे त्यांना सांगा. सभांमध्ये काय काय होत असते त्याची कल्पना देण्यासाठी आपल्या प्रकाशनांतील चित्रांचा उपयोग करा. अगदी पहिल्या अभ्यासापासूनच त्यांना सभेला उपस्थित राहण्याचे उत्तेजन द्या.
३. संघटनेच्या कोणकोणत्या पैलूंची आपण चर्चा करू शकतो?
३ स्मारकविधी, संमेलने आणि विभागीय पर्यवेक्षकांची भेट, जवळ येते तेव्हा या व्यवस्थांबद्दलची माहिती देण्यासाठी व त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यासाठी वेळ काढा. पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे टप्याटप्याने द्या; जसे की: आपल्याला यहोवाचे साक्षीदार का म्हटले जाते? आपल्या सभांच्या ठिकाणाला राज्य सभागृह का म्हटले जाते? वडील आणि सेवा सेवक, कोणकोणती कामे करतात? प्रचार कार्य आणि क्षेत्र यांची व्यवस्था कशी केली जाते? आपली प्रकाशने कशी निर्माण केली जातात? आपल्या संघटनेला पैसा कोठून मिळतो? कार्याच्या देखरेखीत, शाखा दफ्तर आणि नियमन मंडळ यांची काय भूमिका आहे?
४, ५. व्हिडिओंमुळे विद्यार्थ्याची संघटनेविषयीची समज आणि तिच्याबद्दलची गुणग्राहकता कशी वाढू शकते?
४ प्रबोधनकारक व्हिडिओ: आणखी एका मार्गाने अर्थात व्हिडिओंद्वारे विद्यार्थी यहोवाची अद्भुत संघटना पाहू शकतात. व्हिडिओद्वारे ते पृथ्वीच्या टोकापर्यंत जाऊ शकतात, आपला संपूर्ण बंधूसमाज यांच्याशी त्यांची ओळख घडू शकते आणि आपण ईश्वरी शिक्षणामुळे संघटित कसे आहोत, हे त्यांना दिसेल; हे तिन्ही व्हिडिओ इंग्रजीत आहेत. पाच वर्षांपासून जिला आपली मासिके आणि आपली प्रकाशने मिळत होती त्या स्त्रीने जेव्हा यहोवाचे साक्षीदार—नावामागील संघटना हा व्हिडिओ पाहिला तेव्हा ती अश्रू आवरू शकली नाही. तिच्याकडे येणाऱ्या साक्षीदारांवर तिचा भरवसा वाढत चालला होता, पण हा व्हिडिओ पाहिल्यावर तिला वाटले, की ती यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेवर देखील भरवसा ठेवू शकते. तिच्याबरोबर अभ्यास सुरू झाला आणि पुढील आठवड्यापासून ती राज्य सभागृहात होणाऱ्या सभांना देखील उपस्थित राहू लागली.
५ दर आठवडी आपल्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवून व आपल्याला दिलेल्या साधनांचा उपयोग करून आपण बायबल विद्यार्थ्यांचे लक्ष, यहोवा आज वापर करत असलेल्या संघटनेकडे हळूहळू वळवू शकतो.