आपल्या संघटनेकडे विद्यार्थ्यांना निर्देशित करणे
१ “तो, २०० हून अधिक भाषांतून घोषित केलेला संदेश आहे. तो, २१० राष्ट्रांतून ऐकलेला संदेश आहे. जेथे कोठे लोक भेटू शकतात त्यांना व्यक्तिगतपणे सांगितलेला तो संदेश आहे. जगाला कधी ज्ञात नव्हते त्या प्रचंड प्रचार मोहिमेचे महत्त्वपूर्ण अंग असलेला तो संदेश, पृथ्वीच्या पाठीवरील लाखोंना संयुक्त करत आहे. हे कार्य साध्य करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना एका शतकापेक्षा अधिक काळापासून संघटित केले आहे!”
२ या शब्दांनी, यहोवाचे साक्षीदार—या नावामागील संघटना (इंग्रजी) या व्हिडिओचे निवेदन सुरू होते. नंतर ते पुढील प्रश्नांची उत्तरे देते: यहोवाचे साक्षीदार आहेत तरी कोण? त्यांच्या कार्याचे संघटन, निर्देशन कसे केले जाते? त्यास अर्थसाह्य कोठून प्राप्त होते? हा व्हिडिओ, बघणाऱ्यांच्या मनांवर ही वास्तविकता ठसवतो की, “बायबलवर विश्वास ठेवण्यास आपल्या शेजाऱ्यांना साहाय्य करण्यासाठी विश्वभरातील यहोवाच्या साक्षीदारांना एक संघटना या नात्याने प्रशिक्षित केले जाते,” तसेच आपली संघटना स्वतःहून ओळखण्याचे त्यांना उत्तेजन मिळते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, अभ्यास करणाऱ्या एका स्त्रीच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे आनंदाश्रू उभे राहिले; ती पुढे म्हणाली: “कोण कबूल करणार नाही, की सत्य देव यहोवा याची हीच संघटना आहे?”—पडताळा १ करिंथकर १४:२४, २५.
३ दुसऱ्या एका स्त्रीने कित्येक काळापर्यंत बायबलचा अधूनमधून अभ्यास केला होता पण तरी, त्रैक्याची शिकवण खोटी असल्याचे ती स्वीकारू शकत नव्हती. मग तिला आणि तिच्या पतीला आपला व्हिडिओ दाखवण्यात आला. त्याच्या सादरीकरणाने ते इतके प्रभावित झाले, की त्याच रात्री चक्क दोनदा त्यांनी तो पाहिला. त्यांच्या अभ्यासाच्या पुढच्या वेळी, पत्नीने साक्षीदार बनण्याची इच्छा व्यक्त केली. तिने कबूल केले, की त्रैक्यावरील आपल्या विश्वासावरच तिने आपले लक्ष इतके क्रेंदित केले होते, की आपल्या संघटनेकडे आणि त्यातील लोकांकडे तिची डोळेझाक झाली होती. व्हिडिओ पाहून, देवाची खरी संघटना सापडल्याची तिला जाणीव झाली. वेळ न दवडता तिला लागलीच घरोघर जाऊन प्रचार करायचे होते. बाप्तिस्मा न झालेला प्रचारक होण्यासाठी कोणती आवश्यक पाऊले उचलली जावीत याचे स्पष्टीकरण तिला दिल्यावर ती उद्गारली: “तर मग मला लगेचच काहीतरी हालचाल करावी लागेल.” तिने चर्चला राजीनामा दिला, क्षेत्र सेवा कार्य सुरू केले व त्रैक्याचे खंडन करण्यात ती तरबेज बनली.
४ बायबल विद्यार्थ्यांना यहोवाच्या संघटनेची ओळख पटते व ते तिच्याशी सहवास राखू लागतात, तेव्हा ते चांगली आध्यात्मिक प्रगती करून जलदगतीने प्रौढता गाठतात हे सिद्ध झाले आहे. पेन्टेकॉस्टच्या दिवशी ज्या ३,००० लोकांचा बाप्तिस्मा झाला त्यांच्यासंबंधी एक उल्लेखनीय बाब अशी की, ‘ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि एकत्र सहवास राखण्यात तत्पर राहिले.’ (प्रे. कृत्ये २:४२) आपणही आपल्या विद्यार्थ्यांना असे करण्यास मदत करावी हे आवश्यक आहे. पण, आपल्याला ते कसे करता येईल?
५ जबाबदारी स्वीकारा: बायबल विद्यार्थ्याला देवाच्या संघटनेकडे निर्देशित करणे ही आपली जबाबदारी आहे अशी प्रत्येक शिष्य बनवणाऱ्याला जाणीव होण्यास हवी. (१ तीम. ४:१६) नवोदित व्यक्ती, यहोवाला केलेले तिचे समर्पण पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे चिन्हांकित करेल त्या आनंदी दिवसाकडे नेणारी एक चढती पायरी, या दृष्टिकोनातून प्रत्येक अभ्यास सत्राकडे पाहिले जावे. बाप्तिस्म्याच्या विधिदरम्यान त्या व्यक्तीला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न असा असेल: “तुम्ही हे जाणता का, की तुमचे समर्पण आणि बाप्तिस्मा, देवाच्या आत्मा-निर्देशित संघटनेशी सहवास राखणारा एक यहोवाचा साक्षीदार म्हणून तुमची ओळख देतात?” यास्तव, खऱ्या ख्रिस्ती मंडळीशी क्रियाशीलपणे सहवास राखल्याशिवाय तिला देवाची सेवा करणे अशक्य आहे याची तिला जाणीव होणे महत्त्वाचे आहे.—मत्त. २४:४५-४७; योहा. ६:६८; २ करिंथ. ५:२०.
६ स्थानीय मंडळी आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी विद्यार्थ्याला शिक्षण देत राहा. पहिल्याच वेळी सुरवात करून प्रत्येक बायबल अभ्यास सत्रात असे करा. अगदी सुरवातीपासूनच विद्यार्थ्याला सभांना आमंत्रित करा आणि सतत आमंत्रण देत राहा.—प्रकटी. २२:१७.
७ पुरवलेली साधने उपयोगात आणा: गृह बायबल अभ्यास संचालित करण्याची आपली सर्वोत्कृष्ट प्रकाशने म्हणजे, देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे माहितीपत्रक आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक आहे. दोन्ही प्रकाशने मंडळीशी सहवास राखण्याच्या गरजेवर भर देतात. अपेक्षा माहितीपत्रकात पाचव्या धड्याच्या शेवटी म्हटले आहे: “तुम्हाला यहोवाबद्दल शिकत राहावे लागेल आणि त्याच्या अपेक्षांना निरंतर पूर्ण करावे लागेल. यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय राज्य सभागृहात भरणाऱ्या सभांना उपस्थित राहिल्याने असे करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.” ज्ञान पुस्तक वारंवार विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन देते. अध्याय ५, परिच्छेद २२ हे निमंत्रण देतो: “यहोवाचे साक्षीदार . . . ‘आत्म्याने व खरेपणाने’ भक्ती करण्यामध्ये तुम्हीही त्यांच्यासोबत सहभागी व्हावे असे ते तुम्हास उबदारपणे आर्जवत आहेत. (योहा. ४:२४)” अध्याय १२, परिच्छेद १६ असे कथन करतो: “तुम्ही अभ्यास चालू ठेवला व यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना नियमितपणे उपस्थित राहण्याचा प्रघात ठेवला तर तुमचा विश्वास अधिक बळकट होईल.” अध्याय १६, परिच्छेद २० म्हणतो: “यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्याचा प्रघात बनवा.” ते पुढे म्हणते: “हे, तुम्हाला देवाविषयीचे ज्ञान समजण्यास मग तुमच्या जीवनात लागू करायला आणि तुम्हाला आनंदी बनायला मदत देईल. जगव्याप्त ख्रिस्ती बंधुत्वाचा भाग बनल्यामुळे तुम्हाला यहोवाच्या जवळ राहण्याची मदत मिळेल.” एखाद्याला देवाच्या लोकांमध्ये खरी सुरक्षितता कशी लाभते यावर अध्याय १७ पुरेपूर चर्चा करतो. आपण इतरांसोबत अभ्यास करतो तेव्हा साहित्याच्या ह्या भागांवर जोर देणे आपली जबाबदारी आहे.
८ आपली इच्छा साध्य करण्यासाठी आज यहोवा ज्या एकमेव संघटनेचा वापर करत आहे तिच्याशी वैयक्तिकांना परिचित करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार—जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत हे माहितीपत्रक एक उत्तम साधन आहे. आपली सेवा, सभा आणि संघटना यांच्याबद्दलची यामधील तपशीलवार माहिती, वाचकाला देवाची उपासना करण्यात आपल्याशी सहवास राखण्यास उत्तेजित करील. एकदा का बायबल अभ्यास सुरू झाला, मग विद्यार्थ्याने स्वतःहून वाचावे याकरता ह्या माहितीपत्रकाची एक प्रत त्याला देण्याची आपल्याला शिफारस केली जाते. पूर्वी करत होतो त्याप्रमाणे त्याच्याशी ह्याचा अभ्यास करण्याची गरज नाही.
९ विद्यार्थ्यांना आपल्या संघटनेकडे निर्देशित करण्यासाठी, संस्थेने तयार केलेले काही व्हिडिओ ही अत्युत्कृष्ट साधने आहेत. त्यांनी पुढील व्हिडिओ पाहिल्यास, ते त्यांच्यासाठी हितावह असेल: (१) कार्यरत असलेली नवीन जग संस्था जो, यहोवाची संघटना ज्या सुरळीत, कार्यक्षम आणि प्रेमळ पद्धतीने कार्य करते यांसंबंधी लक्ष वेधून घेणाऱ्या १९५४ च्या फिल्मचे समालोचन आहे; (२) वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा ५० वा वर्धापन दिन चिन्हांकित करणारा तसेच जगव्याप्त प्रचार कार्यावर मिशनऱ्यांचा असलेला प्रभाव दाखवून देणारा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत; (३) यहोवाचे साक्षीदार नात्सी हल्ल्यांविरुद्ध खंबीर उभे राहतात जो, हिटलरने सोडलेल्या पाशवी छळाच्या लाटेतही साक्षीदारांचे धैर्य आणि विजय यांबद्दल शिरशिरी आणणारी एक हकिकत आहे; (४) ईश्वरी शिक्षणाने संयुक्त केलेले, जो पूर्व युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियात भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये प्रदर्शित झालेल्या शांतिमय एकतेचे परीक्षण करतो; आणि तसेच, (५) यहोवाचे साक्षीदार—या नावामागे असलेली संघटना. यांपैकी शेवटचे दोन, भारतात उपलब्ध असून मंडळीमार्फत ते मागवले जाऊ शकतात, परंतु अनेक बांधवांनी बाकीच्या तीन प्रती परदेशातून प्राप्त केल्या आहेत आणि बायबल विद्यार्थ्यांना संघटनेकडे निर्देशित करण्यास यांचा चांगला उपयोग केला जाऊ शकतो.
१० सभांसंबंधी प्रगतिशील ध्येये राखा: विद्यार्थ्यांना याचे स्पष्टीकरण दिले जावे, की आपल्याला गृह बायबल अभ्यास मांडणीत दिल्या जाणाऱ्या खासगी शिकवण्या तसेच मंडळीतील सभांमध्ये केल्या जाणाऱ्या वर्गातील चर्चा या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. (योहा. ६:४५) एखाद्या नवोदिताला शास्त्रवचने आणि संघटना या दोहोंची समज प्राप्त करण्यात समान प्रगती करणे आवश्यक आहे. त्याअर्थी, सभांच्या उपस्थितीसाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. (इब्री. १०:२३-२५) वेळ न दवडता, व्यक्तीला मंडळीच्या सभांना येण्याचे आमंत्रण द्यायला सुरवात करा. एक नियमित गृह बायबल अभ्यास सुरू होण्याआधीच काही आस्थेवाईकजण सभांना उपस्थित राहू लागतात. यात काही शंकाच नाही, की आपल्या नियमित उपस्थितीने आपण स्वतः त्यांच्यासमोर एक चांगला आदर्श मांडला पाहिजे.—लूक ६:४०; फिलिप्पै. ३:१७.
११ सभांविषयी तसेच त्या कशा चालवल्या जातात यांच्याविषयीची पुरेशी माहिती विद्यार्थ्याला द्या, म्हणजे पहिल्याच वेळी सभेला उपस्थित राहिल्यावर तो भांबावून जाणार नाही. अनेकांना पहिल्याच वेळी कुठल्या नवीन ठिकाणी गेल्यावर अतिशय अवघडल्यासारखे वाटते, त्यामुळे विद्यार्थी पहिल्यांदाच सभेला उपस्थित राहतो तेव्हा राज्यसभागृहात येण्यासाठी त्याची सोबत करणे फायदेकारक ठरू शकेल. मंडळीच्या सदस्यांशी त्याची भेट होत असता तुम्ही त्याच्यासोबत असल्यास तो अधिक निश्चिंत असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या अभ्यागताला स्वागतार्ह व निश्चिंत वाटू देऊन आपण त्याचे उत्तम यजमान व्हावे.—मत्त. ७:१२; फिलिप्पै. २:१-४.
१२ विद्यार्थ्याला खास संमेलन दिवस, विभागीय संमेलन अथवा जिल्हा अधिवेशनास उपस्थित राहण्याची पहिली संधी मिळताच त्यास उपस्थित राहण्याचे त्याला प्रोत्साहन द्या. कदाचित, तुमच्या परिवहन व्यवस्थेत तुम्ही त्याचाही समावेश करू शकता.
१३ हृदयपूर्वक कृतज्ञता रुजवा: आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (इंग्रजी), पृष्ठ ९२ स्पष्टीकरण देते: “तुम्हाला यहोवाच्या संघटनेबद्दल गाढ अभिरूची आहे हे तुमच्या आस्थेवाईक लोकांसोबत होणाऱ्या संभाषणात प्रकट झाले तर त्यांनाही ही अभिरूची वाढवण्यास अधिक सोपे होईल व मग यहोवाला जाणण्याकरता अधिक प्रगती करण्याची त्यांना चालना मिळेल.” तुमच्या स्थानिक मंडळीविषयी नकारात्मकपणे नव्हे तर नेहमी सकारात्मकपणे बोला. (स्तोत्र ८४:१०; १३३:१, ३ब) बायबल अभ्यासाच्यावेळी तुम्ही जी प्रार्थना करता त्यात मंडळीचा तसेच विद्यार्थ्याने नियमितपणे सहवास राखण्याच्या गरजेचा उल्लेख करा.—इफिस. १:१५-१७.
१४ देवाच्या लोकांमध्ये लाभणारे आल्हाददायक साहचर्य आणि आध्यात्मिक सुरक्षा यांबद्दल हृदयपूर्वक कृतज्ञता विकसित करण्यासाठी नवोदितांना मदत करण्यास आपण निश्चितच इच्छुक आहोत. (१ तीम. ३:१५; १ पेत्र २:१७; ५:९) यहोवाचे साक्षीदार या नात्याने देव वचनाच्या विद्यार्थ्यांना आपल्या संघटनेकडे निर्देशित करण्यासाठी आपल्याला होता होईल तितके आपण करू या.
विद्यार्थ्यांना जेव्हा स्वतःहून संघटनेची ओळख पटते तेव्हा ते अधिक जलदगतीने आध्यात्मिक प्रगती करतात
विद्यार्थ्यांना सभांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात दिरंगाई करू नका