काळ बदलला आहे
१ “ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे” असे बायबल आपल्याला सांगते. (१ करिंथ. ७:३१) आज हे किती खरे आहे! आपल्या जीवनमानातही, मानवी समाजाच्या प्रत्येक स्थरातील लोकांच्या विचारसरणीत आणि वर्तनात नाट्यपूर्ण बदल झाल्याचे आपण पाहिले आहेत. त्यांच्यापर्यंत राज्य संदेश पोहंचवण्यात यशस्वी होण्याकरता आपला प्रस्ताव बदलत्या काळानुरूप असला पाहिजे. लोकांना सुवार्ता आवडेल व त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहंचेल अशाप्रकारे ती सादर करावयाची आहे.
२ काही वर्षांआधी, पुष्कळ देशांतील साक्षकार्य वेगळ्या प्रकारचे होते, कारण लोक अधिककरून शांत जीवन व्यतीत करत होते आणि त्यांना तसे सुरक्षित वाटत होते. त्यांच्या जीवनात धर्माला एक पवित्र स्थान होते. ख्रिस्ती असण्याचा दावा न करणारे लोक देखील बायबलला अतिशय महत्त्व देत होते. त्या काळी, साक्षकार्यात बहुधा बायबल तत्त्वांच्या बाबतीत चुकीच्या समजुती दाखवून देण्याचा समावेश होत असे. आज, लोकांचे जीव संकटात आहेत. बहुतेकवेळा धर्माचा उपहास केला जातो. फार अल्प जण बायबलवर विश्वास ठेवतात. पुष्कळजण आपल्या संदेशाचा विरोध करतात. तसेच काहींच्या बाबतीत, उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतामुळे देवावरील त्यांचा विश्वास पूर्णपणे नाहीसा झाला आहे.
३ एका प्रवासी पर्यवेक्षकाने असे निरीक्षण केले: “आता, लोकांच्या जीवनात इतक्या समस्या आणि अडचणी आहेत की, जीवन कसे जगावे याचे शिक्षण त्यांना द्यावे लागेल असे दिसते.” स्वाभाविकपणे लोकांना आधी स्वतःविषयी, त्यांच्या कुटुंबांविषयी आणि त्यांच्या चिंतांविषयी काळजी वाटते. ते एकत्र येतात तेव्हा याच गोष्टींविषयी अधिककरून चर्चा करतात. आपल्या साक्षकार्यात ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे.
४ देवाचे राज्य भवितव्याकरता एकमेव खात्रीलायक आशा आहे: अनेक लोकांना मानवी सरकारांवर फार कमी भरवसा आहे. त्यांच्या जीवनकाळात, उत्तम जग पाहण्याची आशा नाही असे त्यांना वाटते. खोटा धर्म त्यांना आशा बाळगण्याचा आधार देण्यात अपयशी ठरला आहे. यास्तव, देव राज्याविषयीची सुवार्ता ऐकणे ही मानवजातीची सर्वात मोठी गरज आहे. ते मानवजातीच्या सर्व समस्यांवर सरतेशेवटी उपाय कसा पुरवील हे दाखवा.
५ बायबल मार्गदर्शनाचा एकमेव विश्वसनीय स्रोत आहे: मानवी बुद्धिमत्ता आणि जगिक तत्त्वज्ञान यांवर विसंबून राहणाऱ्या नेत्यांद्वारे आजच्या लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे. “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही” याची जाणीव लोकांना अद्याप व्हावयाची आहे. (यिर्म. १०:२३) त्यांनी शिकण्यासारखा सर्वात मूल्यवान धडा असा की, ‘त्यांनी अगदी मनापासून यहोवावर भाव ठेवावा व आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नये.’ (नीति. ३:५) काळ बदलला असला, तरी बायबल बदललेले नाही. यास्तव, आपल्या सेवेत, शक्य असेल त्या प्रत्येक वेळी आपण देवाचे वचन काढून दाखवले पाहिजे व इतरांना त्यातील प्रेरित, ईश्वरीय मार्गदर्शनाचे महत्त्व जाणण्यास शिकवले पाहिजे. (२ तीम. ३:१६, १७) तो हेतू साध्य करण्याकरता, आपण बायबलचा व्यवहारचातुर्याने आपल्या सादरतांमध्ये संदर्भ देऊन, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरता त्याचा उपयोग करून आणि अभ्यास करण्याच्या व त्यातील व्यावहारिक सुज्ञतेला लागू करण्याच्या गरजेचे समर्थन करून त्याचे महत्त्व लोकांसमोर मांडले पाहिजे.
६ आज काळ बदलत असतानाही, सेवेतील आपले हेतू तेच आहेत. आपण राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे, देवाच्या वचनावरील आत्मविश्वास दृढ केला पाहिजे आणि इतरांना आपल्यासोबत बायबलचा अभ्यास करण्याची गरज जाणून घेण्यास मदत केली पाहिजे. आपण ज्यांना साक्ष देतो त्यांच्या सद्य गरजांशी संबंधित असणारे काही आपण म्हटले पाहिजे. असे केल्याने, आपण इतरांना सुवार्ता सांगणारे होऊ शकतो आणि अशाप्रकारे अधिक लोकांना प्राप्त करू शकतो.—१ करिंथ. ९:१९, २३.