वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१५ पृ. २४-२७
  • आपण आध्यात्मिक प्रगती करू शकता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण आध्यात्मिक प्रगती करू शकता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आपल्या सेवकांना शक्‍ती देतो
  • ‘जुने मनुष्यत्व काढून टाका’
  • आपल्यामधील ‘अग्नीप्रमाणे’
  • तिख्याने धारदार केल्याप्रमाणे
  • आध्यात्मिक प्रगती करण्याकरता उत्तम कारण
  • हिरे इतके महाग का असतात?
    सावध राहा!—१९९७
  • खड्याचे रूपांतर रत्नात
    सावध राहा!—१९९९
  • आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज ओळखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तरुणांनो​—बाप्तिस्म्यानंतरही प्रगती करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१५ पृ. २४-२७

आपण आध्यात्मिक प्रगती करू शकता

खरे मूल्य ओळखण्यास कठीण असू शकते. हिऱ्‍यांच्या बाबतीत असे असते. नैसर्गिक अवस्थेतील हिरे मळकट असतात पण पॉलिश केल्यानंतर त्यांचे सौंदर्य व तेज पूर्णत्वाने खुलते. पण, या मळकट खड्याच्या आत एक देखणा हिरा लपलेला असतो.

ख्रिस्तीजन अनेक प्रकारे या मळकट हिऱ्‍यांसारखे आहेत. आपण परिपूर्णतेपासून खूप दूर असलो तरी, आपल्यामध्ये एक प्रकारचे मूल्य दडलेले असते ज्याची यहोवा किंमत करतो. हिऱ्‍यांप्रमाणे आपल्या सर्वांमध्ये विविध गुणधर्म असतात. आपली मनापासून इच्छा असल्यास आपल्यातील प्रत्येकजण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. यहोवाचे गौरव आणखी तेजोमयरीत्या चमकवण्यासाठी आपले व्यक्‍तिमत्त्व पॉलिश केले जाऊ शकते.—१ करिंथकर १०:३१.

हिरा कापून पॉलिश केल्यानंतर त्याला अशा एका कोंदणात बसवले जाते ज्यामुळे तो आणखीनच उठून दिसतो. तसेच, “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” केल्यास यहोवाही आपला विविध कोंदणात अर्थात, परिस्थितीत किंवा नेमणुकीत उपयोग करून घेऊ शकतो.—इफिसकर ४:२०-२४.

नैसर्गिक अवस्थेतील हिरा जसा क्वचितच चमकतो तसेच आपली आध्यात्मिक प्रगती आपोआप घडून येणार नाही. आपल्याला कदाचित आपल्यामध्ये रेंगाळत असलेल्या कमतरता दूर कराव्या लागतील, जबाबदारी घेण्याबाबतची आपली मनोवृत्ती बदलावी लागेल किंवा एकाच प्रकारच्या आध्यात्मिक चाकोरीतून बाहेर निघण्यासाठी झटावे लागेल. आपली मनस्वी इच्छा असल्यास आपण प्रगती करू शकू, कारण यहोवा देव आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ’ देऊ शकतो.—२ करिंथकर ४:७; फिलिप्पैकर ४:१३.

यहोवा आपल्या सेवकांना शक्‍ती देतो

हिरा कापणाऱ्‍या कारागिराला अचूक ज्ञानातून मिळणाऱ्‍या आत्मविश्‍वासाची गरज असते; कारण एकदा त्याने एक भाग कापला तर तो कायमचाच कापला जातो. इच्छित आकार मिळण्यासाठी कधीकधी एवढ्या महागा मोलाच्या दिप्यातील अधिकांश भाग—कधी कधी ५० टक्के भाग—कापावा लागतो. आपल्यामध्येही अचूक ज्ञानातून मिळणारा आत्मविश्‍वास असला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या व्यक्‍तिमत्वाला आकार देऊ शकू व आध्यात्मिक प्रगती करू शकू. विशेषकरून यहोवा आपल्याला शक्‍ती देईल हा दृढ विश्‍वास आपल्यामध्ये असणे आवश्‍यक आहे.

परंतु, आपल्याला वाटू शकते, की आपण अयोग्य आहोत किंवा आपण जास्त करू शकत नाही. गत काळांत, देवाच्या विश्‍वासू सेवकांनाही कधीकधी असे वाटले होते. (निर्गम ३:११, १२; १ राजे १९:१-४) यिर्मयाला देवाने “राष्ट्रांचा संदेष्टा” नेमले तेव्हा तो म्हणाला “मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” (यिर्मया १:५, ६) यिर्मया मितभाषी होता तरी, तीव्र विरोध करणाऱ्‍या लोकांना तो बेधडक संदेश देणारा एक धैर्यवान संदेष्टा बनला. हे कसे शक्य झाले बरे? यहोवावर विसंबून राहण्यास तो शिकला. यिर्मयाने नंतर लिहिले: “जो पुरुष परमेश्‍वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषय परमेश्‍वर आहे तो धन्य!”—यिर्मया १७:७; २०:११.

आज यहोवा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना अशाचप्रकारे शक्‍ती देतो. चार मुलांचा पिता असलेल्या एडवर्डलाa याची प्रचिती आली; त्याची आध्यात्मिक प्रगती अतिशय मंदगतीने चालली होती. तो म्हणतो: “मी नऊ वर्षांपासून यहोवाचा साक्षीदार होतो, पण माझी आध्यात्मिकता जणू काय जागीच थांबली होती. माझ्यामध्ये प्रगती करण्याचा फार कमी उत्साह होता आणि मुख्य म्हणजे आत्मविश्‍वास नव्हता. स्पेनला राहायला गेल्यावर तेथील मंडळी खूप लहान होती; फक्‍त एक वडील आणि एक सेवा-सेवक. आवश्‍यकता पाहून तेथील वडिलांनी मला पुष्कळ जबाबदाऱ्‍या हाताळण्यास सांगितले. माझी सुरवातीची भाषणे देताना आणि सभेतील भाग हाताळताना अक्षरशः भीतीने माझी गाळण उडायची. पण मग, मी यहोवावर विसंबून राहण्यास शिकलो. त्या वडिलांनी नेहमी माझी प्रशंसा केली आणि माझ्या सुधारणेसाठी अगदी चतुराईने मला काही सूचना दिल्या.

“त्याचबरोबर मी माझी क्षेत्र सेवाही वाढवली आणि माझ्या कुटुंबात चांगला आध्यात्मिक पुढाकार घेऊ लागलो. यामुळे माझ्या सर्व कुटुंबाला सत्य आणखी अर्थपूर्ण वाटू लागले; हे पाहून मला किती समाधान वाटलं. आता मी एक सेवा-सेवक आहे आणि ख्रिस्ती पर्यवेक्षकासाठी आवश्‍यक असणारे गुण विकसित करण्याचा खूप प्रयत्न करीत आहे.”

‘जुने मनुष्यत्व काढून टाका’

एडवर्डने जाणले त्याप्रमाणे, आध्यात्मिक प्रगती करण्याकरता यहोवावर भरवसा ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच, ख्रिस्ताप्रमाणे ‘नवे मनुष्यत्व’ धारण करणेही जरूरीचे आहे. हे कसे केले जाऊ शकते? पहिले पाऊल म्हणजे, जुन्या मनुष्यत्वाचा भाग असलेले वाईट गुण ‘काढून टाकणे.’ (कलस्सैकर ३:९, १०) काही दोष, जसे की, एका मळकट हिऱ्‍याला झळाळी देण्याकरता त्यातील बाह्‍य खनिजे काढून टाकावी लागतात त्याचप्रमाणे आपल्यालाही “जगातील” वृत्त्या आपल्यामधून काढून टाकाव्या लागतील जेणेकरून आपले नवीन मनुष्यत्व खुलून येईल.—गलतीकर ४:३.

एक वृत्ती म्हणजे, आपल्याकडून जास्त अपेक्षिले जाईल या भीतीने जबाबदारी स्वीकारण्यास कुचराई करणे होय. हे खरे आहे, की जबाबदारी आली म्हणजे कामही आले, पण ते समाधान देणारे काम आहे. (पडताळा प्रेषितांची कृत्ये २०:३५.) ईश्‍वरी भक्‍तीसाठी आपण ‘श्रम व खटपट’ केली पाहिजे हे पौलाने कबूल केले. तो म्हणाला, की असे आपण आनंदाने ह्‍यासाठी करतो कारण, सहख्रिस्ती आणि इतरांसाठी आपण करत असलेली सेवा विसरून न जाणाऱ्‍या ‘जिवंत देवावर आपण आशा ठेवली आहे.’—१ तीमथ्य ४:९, १०; इब्री लोकांस ६:१०.

काही हिरे घडवताना “दोष” निर्माण होतात तेव्हा त्यांस अतिशय काळजीने हाताळावे लागते. परंतु, ध्रुवणदर्शक नावाचे एक उपकरण असते ज्याच्या साहाय्याने पॉलिश करणारा कारागिर ते दोष शोधून काढू शकतो व त्या खड्याला सफाईदारपणे हाताळू शकतो. कदाचित आपल्या पार्श्‍वभूमीमुळे किंवा एखाद्या कटू अनुभवामुळे आपल्यामध्येही एखादा आंतरिक दोष असू शकतो. अशावेळी आपण काय करू शकतो? पहिल्यांदा, आपल्यामध्ये दोष आहेत हे आपण कबूल केले पाहिजे आणि होता होईल तितका त्यावर मात करण्याचा निश्‍चय केला पाहिजे. प्रार्थनेद्वारे आपण आपले मन यहोवाजवळ मोकळे केले पाहिजे; कदाचित एखाद्या ख्रिस्ती वडिलाचीही आध्यात्मिक मदत आपल्याला घ्यावी लागेल.—स्तोत्र ५५:२२; याकोब ५:१४, १५.

अशाप्रकारच्या आंतरिक दोषाचा निकोलसवर प्रभाव झाला होता. तो म्हणतो: “माझे वडील दारूडे होते; त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला खूप त्रास दिला. मी शाळा सोडल्यावर सैन्यात भरती झालो; पण माझ्या बंडखोर वृत्तीमुळे माझ्यावर संकट ओढवले. सैन्य अधिकाऱ्‍यांनी मला अमली पदार्थांची विक्री केल्याबद्दल तुरुंगात टाकले आणि दुसऱ्‍या एका वेळी मी सैन्यदलातून फरार झालो. शेवटी, मी सैन्यदल सोडून दिले पण तरीही मी काही सुखात नव्हतो. अमली पदार्थांचा दुरुपयोग आणि दारूबाजी यामुळे माझ्या जीवनाला काही शिस्तच राहिली नव्हती; पण बायबलमध्ये मला आस्था होती आणि जीवनात काहीतरी उद्देश असावा असे मला सारखे वाटायचे. कालांतराने मी यहोवाच्या साक्षीदारांना भेटलो; माझी जीवन-शैली बदलली आणि मी सत्य स्वीकारले.

“परंतु, माझ्या व्यक्‍तिमत्त्वातील दोष स्वीकारून त्यात बदल करण्यास मला खूप वर्षं लागली. मला अधिकाराविषयी अतिशय चीड यायची आणि मला कोणताही सल्ला दिला तर मी रागाने लालबुंद व्हायचो. यहोवाने माझा पूर्णपणे उपयोग करून घ्यावा असे मला कितीही वाटत असले तरी, माझ्यातील हा दोष एक अडखळणच होते. सरतेशेवटी, दोन समंजस वडिलांच्या साहाय्यामार्फत मी माझी समस्या कबूल केली आणि त्यांनी दिलेला प्रेमळ शास्त्रवचनीय सल्ला अनुसरू लागलो. कधीकधी मला राग येतो, पण मी आता माझ्या बंडखोर स्वभावावर नियंत्रण ठेवलं आहे. माझ्याबरोबर सबुरीने वागल्याबद्दल मी यहोवाचे आणि वडिलांच्या प्रेमळ साहाय्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझ्या आध्यात्मिक प्रगतीमुळे अलिकडेच मला सेवा-सेवक म्हणून नेमण्यात आले.”

निकोलसच्या प्रत्ययास आल्याप्रमाणे, खोलवर रुजलेली मनोवृत्ती बदलणे इतके सोपे नसते. आपणही कदाचित अशाच आव्हानाला तोंड देत असू. कदाचित आपण जास्त संवेदनशील असू. कदाचित आपण मनात एखाद्या गोष्टीचा राग बाळगत असू किंवा स्वातंत्र्यावर आपला फारच जोर असेल. यामुळे आपली ख्रिस्ती प्रगती खुंटली असेल. हिरा पॉलिश करणाऱ्‍या कारागिरांना, ते ज्यांना नाट्‌स म्हणतात त्या खड्यांसंबंधी काहीसा असाच अनुभव येतो. हे खरोखरचे दोन खडे असतात जे हिरा घडताना एकमेकांत वितळतात. यामुळे, नाट्‌स मध्ये दोन विरोधात्मक विकास नमुने तयार होतात जे, हिऱ्‍याच्या रेषेनुसार कापणे कठीण बनवतात. आपल्याबाबतीत, उत्सुक आत्म्याचा “स्वभाव” अपरिपूर्ण देहाच्या स्वभावाविरुद्ध लढत असल्याचे आपल्याला दिसून येते. (मत्तय २६:४१; गलतीकर ५:१७) कधीकधी आपल्याला, आपण जी लढत देत आहोत त्यात हार मानावीशी वाटेल; आपण असा बुद्धिवाद करू, की नाहीतरी आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील अपरिपूर्णता काही इतक्या महत्त्वाच्या नाहीत. आपण कदाचित म्हणू, ‘कारण, माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या स्नेह्‍यांचे तर माझ्यावर अजूनही प्रेम आहे.’

परंतु, आपल्याला आपल्या बांधवांची सेवा आणि आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावयाचे आहे तर आपल्याला नवीन मनुष्यत्व धारण करून “आपल्या मनोवृत्तीत नवे” होण्याची गरज आहे. हा प्रयत्न वाया जाणार नाही; याची साक्ष निकोलस आणि इतर अगणित लोक देऊ शकतात. हिरा पॉलिश करणाऱ्‍या कारागिराला माहीत असते की केवळ एका दोषामुळे अख्खा हिरा बिघडू शकतो. तसेच, आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील एखाद्या कमजोर पैलूकडे दुर्लक्ष करण्याद्वारे आपण आपले आध्यात्मिक स्वरूप बिघडवू शकतो. याहूनही वाईट म्हणजे, एखादी गंभीर कमजोरी आपल्या आध्यात्मिक पतनास कारणीभूत ठरू शकते.—नीतिसूत्रे ८:३३.

आपल्यामधील ‘अग्नीप्रमाणे’

हिऱ्‍याला पॉलिश करणारा कारागिर, हिऱ्‍यातील तेज कोंडून ठेवायचा प्रयत्न करीत असतो. असे तो पैलू पाडण्याद्वारे करतो ज्यामुळे सप्तरंग दिसू लागतात. हिऱ्‍यातील रंगीबेरंगी प्रकाशाचे प्रतिबिंब पुढेमागे पडल्यामुळे हिऱ्‍याचे तेज अधिकच झळाळते. तसेच, देवाचा आत्मा आपल्यामध्ये ‘अग्नीप्रमाणे,’ अर्थात तेजाप्रमाणे असू शकतो.—१ थेस्सलनीकाकर ५:१९, मराठी कॉमन लँग्वेज; प्रेषितांची कृत्ये १८:२५; रोमकर १२:११.

आपल्याला आध्यात्मिक प्रेरणा मिळाली पाहिजे ही गरज आपल्या नजरेस आल्यास काय? हे कसे केले जाऊ शकते? आपल्याला आपल्या “वर्तनक्रमाविषयी विचार” करावा लागेल. (स्तोत्र ११९:५९, ६०) यामध्ये, आपल्याला आध्यात्मिकरीत्या मंद करणाऱ्‍या गोष्टी ओळखणे व कोणती ईश्‍वरशासित कार्ये आपण आवेशाने केली पाहिजेत ते ठरवणे समाविष्ट आहे. नियमित व्यक्‍तिगत अभ्यास व कळकळीने प्रार्थना करण्याद्वारे आपण आध्यात्मिक गोष्टींची समज वाढवू शकतो. (स्तोत्र ११९:१८, ३२; १४३:१, ५, ८, १०) याशिवाय, विश्‍वासात कठीण परिश्रम घेणाऱ्‍यांबरोबर संगत केल्याने आपण यहोवाची सेवा आवेशाने करण्याचा आपला निर्धार आणखी पक्का करू शकू.—तीत २:१४.

लवीझ नामक एका तरुण ख्रिस्ती स्त्रीने कबूल केले: “मी पायनियर किंवा पूर्ण वेळची राज्य उद्‌घोषक होण्याआधी तब्बल दोन वर्षांपर्यंत नियमित पायनियरींगचा नुसता विचार करीत होते. तसं मला ते करणं जमलं असतं कारण माझं जीवन अतिशय सुरळीत चाललं होतं; फक्‍त काय तर मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत नव्हते. मग अचानक माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा कुठं मला समजलं की जीवन किती अशाश्‍वत असतं व मी माझ्या जीवनाचा मुळीच सदुपयोग करीत नव्हते. मी माझा आध्यात्मिक दृष्टिकोन बदलला, माझी सेवा वाढवली आणि एक नियमित पायनियर झाले. याबाबतीत माझ्या आध्यात्मिक बंधूभगिनींचे विशेष साहाय्य मला लाभले; त्यांनी क्षेत्र सेवेच्या व्यवस्थांना चांगला प्रतिसाद दिला, व ते माझ्याबरोबर नियमितरीत्या सेवेला येत असत. एक गोष्ट मी शिकले व ती म्हणजे, चांगल्यासाठी असो किंवा वाईटासाठी असो, आपल्या सहकाऱ्‍यांच्या महत्त्वांत व उद्देशांत आपला हातभार असतोच.”

तिख्याने धारदार केल्याप्रमाणे

हिरा, पृथ्वीवर नैसर्गिक अवस्थेत आढळणाऱ्‍या गोष्टींमध्ये सर्वात कठीण आहे. म्हणूनच हिऱ्‍यानेच हिरा कापता येतो. यावरून बायबल विद्यार्थ्यांना एका नीतिसूत्राची आठवण होईल जेथे लिहिले आहे: “तिखे तिख्याला पाणीदार करिते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करितो.” (नीतिसूत्रे २७:१७) एका व्यक्‍तीचा चेहरा कसा काय “पाणीदार” केला जातो? लोखंडाचा तुकडा त्याच धातूच्या पात्याला धार करण्याकरता जसा वापरला जातो तसेच एक व्यक्‍ती दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या बौद्धिक व आध्यात्मिक बोथट स्थितीला धारदार करू शकतो. जसे की, एखाद्या गोष्टीमुळे आपण निराश होतो तेव्हा दुसऱ्‍या व्यक्‍तीचे उत्तेजन आपली उभारणी करू शकते. आपला उदास चेहरा आनंदाने खुलेल व आवेशी कार्याकरता पुन्हा एकदा आपल्यामध्ये तरतरी येऊ शकेल. (नीतिसूत्रे १३:१२) खासकरून मंडळीचे वडील आपल्याला शास्त्रवचनीय उत्तेजन व सुधारणेकरता सल्ला देऊन धारदार करू शकतात. शलमोनाने दिलेल्या या तत्त्वाचे ते अनुकरण करतात: “ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल; धार्मिकाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल.”—नीतिसूत्रे ९:९.

अर्थातच, आध्यात्मिक प्रशिक्षणासाठी वेळ लागतो. प्रेषित पौलाने दहापेक्षा अधिक वर्षांपर्यंत आपला अनुभव आणि शिकवणुकीच्या पद्धती तीमथ्याला सांगितल्या. (१ करिंथकर ४:१७; १ तीमथ्य ४:६, १६) सुमारे ४० वर्षांच्या कालावधीसाठी मोशेने यहोशवाला दिलेल्या दीर्घ प्रशिक्षणाचा इस्राएल राष्ट्राला पुष्कळ वर्षांपर्यंत फायदा झाला. (यहोशवा १:१, २; २४:२९, ३१) अलीशाने एलीयाबरोबर कदाचित ६ वर्षे घालवली; त्यादरम्यान त्याला स्वतःच्या सेवेचा पाया घालता आला जी पुढे सुमारे ६० वर्ष टिकणार होती. (१ राजे १९:२१; २ राजे ३:११) सबुरीने नित्य प्रशिक्षण देण्याद्वारे वडीलजन पौल, मोशे आणि एलीया यांच्या उदाहरणाचे अनुकरण करतात.

शिक्षण देण्याचा महत्त्वाचा भाग आहे प्रशंसा करणे. उत्तम प्रकारे भाग हाताळल्याबद्दल किंवा स्तुत्य कृत्यांबद्दल प्रामाणिकपणे केलेली प्रशंसा इतरांना देवाची अधिक सेवा करण्यास प्रवृत्त करू शकते. प्रशंसेमुळे एखाद्याचा आत्मविश्‍वास वाढतो आणि यामुळे तो स्वतःमधील कमतरतांवर मात करण्याचा प्रयत्न करू लागतो. (पडताळा १ करिंथकर ११:२.) राज्य प्रचार कार्यात आणि मंडळीच्या इतर कार्यांत जोमाने भाग घेतल्याने देखील सत्यामध्ये प्रगती करण्याचे उत्तेजन मिळू शकते. (प्रेषितांची कृत्ये १८:५) वडीलजन, बंधूजनांच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्यांना काही जबाबदाऱ्‍या सोपवतात तेव्हा यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो आणि कदाचित आध्यात्मिकरीत्या प्रगती करीत राहण्याची त्यांची मनसा अधिक बळकट होऊ शकते.—फिलिप्पैकर १:८, ९.

आध्यात्मिक प्रगती करण्याकरता उत्तम कारण

हिऱ्‍यांना मौल्यवान समजले जाते. यहोवाच्या उपासकांच्या जगव्याप्त कुटुंबाबरोबर सहवास राखणाऱ्‍यांच्या बाबतीतही हे खरे आहे. खरे तर, स्वतः देव त्यांना राष्ट्रांतील ‘इष्ट’ किंवा “मोलवान” [पं.र.भा.] वस्तू असे संबोधतो. (हाग्गय २:७) गेल्या वर्षी, ३,७५,९२३ लोक यहोवाचे बाप्तिस्मा प्राप्त साक्षीदार बनले. या वाढीमुळे ‘डेऱ्‍याची जागा वाढवण्याची’ गरज आहे. आध्यात्मिक प्रगती केल्याने व ख्रिस्ती सेवेतील विशेषाधिकार मिळविण्याचा प्रयत्न केल्याने ही गरज पूर्ण करण्यात आपणही हातभार लावू शकतो.—यशया ५४:२; ६०:२२.

आपले आध्यात्मिक तेज चमकू शकते; ते त्या मौल्यवान हिऱ्‍यांसारखे नाही जे बँकेत ठेवले जातात आणि क्वचितच त्यांचे दर्शन घडते. आपले ख्रिस्ती गुण नियमितरीत्या पॉलिश केल्यास व ते प्रदर्शित करीत राहिल्यास आपण यहोवा देवाचे गौरव करू. येशूने त्याच्या अनुयायांना आर्जवले: “त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्में पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) ह्‍या कारणास्तव, निश्‍चितच मग आपल्याला आध्यात्मिक प्रगती करावीशी वाटेल.

[तळटीप]

a या लेखात बदलण्यात आलेले एक नाव.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा