ख्रिस्तीजन आणि मानवांचे जग
“बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा.”—कलस्सैकर ४:५.
१. आपले अनुयायी आणि जग यांसंबंधाने येशूने काय म्हटले?
आपल्या स्वर्गीय पित्याला एकदा प्रार्थना करताना, येशूने आपल्या अनुयायांविषयी म्हटले: “जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” पुढे तो म्हणाला: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करितो.” (योहान १७:१४, १५) ख्रिस्तीजनांना, मठांमध्ये वियोगी जीवन जगण्याद्वारे—या जगापासून शारीरिकदृष्ट्या वेगळे राहावयाचे नव्हते. उलट, त्यांनी “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” आपल्याविषयी साक्ष द्यावी म्हणून ख्रिस्ताने “त्यांना जगात पाठविले.” (प्रेषितांची कृत्ये १:८; योहान १७:१८) तरीसुद्धा, “ह्या जगाचा अधिकारी” अर्थात सैतान, ख्रिस्ताच्या नावामुळे त्यांच्याविरुद्ध द्वेषाला बढावा देईल त्यामुळे देवाने त्यांचे रक्षण करावे अशी येशूने देवाकडे विनंती केली.—योहान १२:३१; मत्तय २४:९.
२. (अ) बायबल “जग” हा शब्द कोणत्या अर्थाने वापरते? (ब) यहोवा जगाच्या संबंधाने कोणती संतुलित मनोभूमिका प्रदर्शित करतो?
२ बायबलमध्ये “जग” हा शब्द (ग्रीक, कॉसमॉस) सहसा, ‘त्या दुष्टाला वश झालेल्या’ अनीतिमान मानवी समाजाकरता वापरण्यात येतो. (१ योहान ५:१९) ख्रिस्तीजन यहोवाच्या आदर्शांनुसार जगतात आणि जगात देवाच्या राज्याचा प्रचार करण्याच्या आज्ञेचेही ते पालन करतात, या कारणामुळे जगाशी त्यांचे संबंध नेहमीच सुरळीत राहिलेले नाहीत. (२ तीमथ्य ३:१२; १ योहान ३:१, १३) पण, बायबलमध्ये कॉसमॉस हा शब्द सर्वसामान्य मानवी परिवाराच्या संदर्भात देखील वापरला गेला आहे. या अर्थाने जगाविषयी बोलताना येशूने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.” (योहान ३:१६, १७; २ करिंथकर ५:१९; १ योहान ४:१४) म्हणून, सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणातल्या वाईट गोष्टींविषयी तिरस्कार असला तरीसुद्धा, यहोवाने आपल्या पुत्राला पृथ्वीवर पाठवण्याद्वारे मानवजातीविषयी आपली प्रीती व्यक्त केली, यासाठी की जे कोणी ‘पश्चात्ताप करतील’ त्यांचे तारण व्हावे. (२ पेत्र ३:९; नीतिसूत्रे ६:१६-१९) जगाच्या संदर्भात यहोवाची संतुलित मनोभूमिका त्याच्या उपासकांसाठी मार्गदर्शक ठरली पाहिजे.
येशूचे उदाहरण
३, ४. (अ) राज्याधिकारासंबंधी येशूची भूमिका कशी होती? (ब) मानवांच्या जगासंबंधाने येशूचा कसा दृष्टिकोन होता?
३ आपला मृत्यू होण्याच्या काही वेळापूर्वीच येशूने पंतय पिलाताला सांगितले: “माझे राज्य ह्या जगाचे नाही.” (योहान १८:३६) या शब्दांच्या सामंजस्यात, येशूने जगातल्या सर्व राज्यांचा अधिकार देण्याच्या सैतानाच्या प्रस्तावाला याआधीच झुगारून लावले होते आणि यहुदी त्याला राजा बनवू इच्छित होते तेव्हा देखील त्याने नकार दिला होता. (लूक ४:५-८; योहान ६:१४, १५) पण दुसरीकडे, येशूने मानवांच्या जगाबद्दल विलक्षण प्रीती प्रदर्शित केली. प्रेषित मत्तयाने याचे एक उदाहरण अभिलिखित केले: “लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” प्रेमापोटी, त्याने खेडोपाडी आणि नगरोनगरी जाऊन लोकांना प्रचार केला. त्याने त्यांना शिकवले आणि त्यांची दुखणी बरी केली. (मत्तय ९:३६) त्याच्याकडून शिकून घेण्याच्या इच्छेने जे लोक त्याच्याकडे येत असत, त्यांच्या शारीरिक गरजांचीही त्याला जाणीव होती. आपण वाचतो: “येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, ‘मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काहीहि नाही; कदाचित ते वाटेत कासावीस होतील; म्हणून त्यांस उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही.’” (मत्तय १५:३२) किती मनस्वी कळकळ!
४ यहुदी लोक शोमरोनी लोकांना नेहमीच पाण्यात पाहात असत, पण येशूने मात्र एका शोमरोनी स्त्रीशी बऱ्याच वेळपर्यंत संभाषण केले होते, शिवाय त्याने शोमरोनातील एकाच शहरात दोन दिवस राहून तेथे पूर्णपणे साक्ष दिली होती. (योहान ४:५-४२) देवाने त्याला ‘इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे’ पाठवले असले तरीसुद्धा, इतर गैरयहुद्यांनी देखील त्याच्यावर विश्वास प्रकट केला, आणि प्रसंगी येशूने या विश्वासाला प्रतिसाद देखील दिला. (मत्तय ८:५-१३; १५:२१-२८) होय, येशूने दाखवून दिले की ‘जगाचे नसतानाही’ मानवांच्या जगाविषयी अर्थात, लोकांविषयी प्रीती दाखवणे शक्य आहे. आपण जेथे राहतो, जेथे काम करतो, किंवा खरेदी करायला जेथे जातो, तेथे भेटणाऱ्या लोकांविषयी आपण देखील येशूने दाखवली तशी आस्था दाखवतो का? त्यांच्या कल्याणाविषयी—केवळ आध्यात्मिकच नव्हे तर आपल्याकडून काही मदत होणे शक्य असल्यास, त्यांच्या इतर गरजांविषयी देखील आपण कळकळ व्यक्त करतो का? येशूने केली होती, आणि असे केल्यामुळे त्याने लोकांना राज्याविषयी शिकवण्यासाठी मार्ग मोकळा केला. येशूसारखी चमत्कारिक कृत्ये तुम्ही-आम्ही करू शकत नाही हे खरे आहे. पण, कधीकधी दयाळुपणाच्या एखाद्या साध्याशाच कृत्यामुळे आपल्याबद्दल असणारे विपरीत ग्रह चमत्कारिकपणे नाहीसे होऊ शकतात.
“बाहेरच्या” लोकांविषयी पौलाची मनोभूमिका
५, ६. “बाहेरच्या” यहुद्यांशी प्रेषित पौलाचे संबंध कसे होते?
५ आपल्या अनेक पत्रांत, प्रेषित पौलाने “बाहेरच्या” किंवा “जे बाहेर आहेत” अशा लोकांचा उल्लेख केला होता, आणि असा उल्लेख करताना त्याचा रोख गैरख्रिस्तीयांकडे होता, मग ते यहुदी असोत किंवा विदेशी. (१ करिंथकर ५:१२; १ थेस्सलनीकाकर ४:१२; १ तीमथ्य ३:७) अशांप्रती त्याची वागणूक कशी होती? तो ‘सर्वांना सर्व काही झाला, अशा हेतूने की, त्याने सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.’ (१ करिंथकर ९:२०-२२) प्रचाराकरता एखाद्या शहरात आल्यावर, प्रथम तेथे स्थायिक झालेल्या यहुद्यांकडे जाण्याची त्याची पद्धत होती. तो त्यांच्याशी कशा तऱ्हेने संभाषण करीत असे? चाणाक्ष आणि आदरपूर्ण पद्धतीने तो त्यांच्यासमोर बायबलमधून, मशीहा आल्याचा, बलिदानरूपी मृत्यू पावल्याचा आणि पुनरुत्थित झाल्याचा खात्रीलायक पुरावा सादर करीत असे.—प्रेषितांची कृत्ये १३:५, १४-१६, ४३; १७:१-३, १०.
६ अशारितीने पौलाने, नियमशास्त्रासंबंधाने आणि संदेष्ट्यांसंबंधाने यहुद्यांना आधीपासूनच असलेल्या ज्ञानाचा आधार घेऊन, मशीहा आणि देवाचे राज्य याविषयी त्यांना शिकविले. आणि काहींना हे सत्य पटवून देण्यात तो यशस्वी झाला. (प्रेषितांची कृत्ये १४:१; १७:४) यहुदी पुढाऱ्यांकडून विरोध होत असतानाही, पौलाने सहयहुद्यांविषयी सौहार्दपूर्ण भावनेने लिहिले: “बंधुजनहो, त्यांच्याविषयी [यहुद्यांविषयी] माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की, त्यांचे तारण व्हावे. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.”—रोमकर १०:१, २.
सत्य मानणाऱ्या गैरयहुद्यांना साहाय्य
७. पौलाने केलेल्या सुवार्तेच्या प्रचाराला अनेक यहुदीय मतानुसाऱ्यांनी कसा प्रतिसाद दिला?
७ यहुदीय मतानुसारी असे लोक होते, ज्यांनी सुंता करवून यहुदी धर्म स्वीकारला होता. रोम, सिरियातील अंत्युखिया, इथियोपिया आणि पिसिदियातील अंत्युखिया—अक्षरशः पॅलेस्टाईनच्या बाहेर असलेल्या सबंध यहुदी वसाहत क्षेत्रात यहुदीय मतानुसारी होते. (प्रेषितांची कृत्ये २:८-१०; ६:५; ८:२७; १३:१४, ४३; पडताळा मत्तय २३:१५.) यहुदीय मतानुसारी बऱ्याचशा यहुदी शासकांसारखे गर्विष्ठ नव्हते, आणि आम्ही अब्राहामाच्या कुळातून आलो आहोत असे म्हणून ते त्यांच्यासारखी फुशारकी पण मारू शकत नव्हते. (मत्तय ३:९; योहान ८:३३) उलट, विधर्मी देवदेवतांचा त्याग करून यहोवाविषयी आणि त्याच्या नियमांविषयी माफक ज्ञान संपादन करण्याद्वारे ते नम्रपणे त्याच्याकडे वळले होते. शिवाय, त्यांनी मशीहाच्या येण्याविषयीची यहुद्यांची आशा देखील आपलीशी केली होती. सत्याचा शोध करीत असताना, स्वतःच्या जीवनात बदल करण्याची त्यांनी आधीच तयारी दाखवली असल्यामुळे, यांपैकी बरेच जण आता आणखी बदल करून प्रेषित पौलाच्या प्रचार कार्याला प्रतिसाद देण्यास उत्सुक होते. (प्रेषितांची कृत्ये १३:४२, ४३) एकेकाळी विधर्मी देवदेवतांची भक्ती करणारा एखादा यहुदीय मतानुसारी जेव्हा ख्रिस्ती धर्म स्वीकारत असे, तेव्हा अजूनही त्या देवतांची भक्ती करीत असलेल्या इतर विदेश्यांना मदत करणे त्याला विशेषतः आणखी सोपे जात असे.
८, ९. (अ) यहुदीय मतानुसाऱ्यांव्यतिरिक्त विदेश्यांचा आणखी कोणता गट यहुदी धर्माकडे आकर्षित झाला होता? (ब) सुंता न झालेल्या अनेक देवाला-भिणाऱ्यांनी सुवार्तेविषयी कशी प्रतिक्रिया दाखवली?
८ सुंता झालेल्या यहुदीय मतानुसाऱ्यांसोबतच इतर गैरयहुदी देखील यहुदी धर्माकडे आकर्षित झाले. यांपैकी ख्रिस्ती बनणारा कर्नेल्य हा पहिला होता; तो यहुदीय मतानुसारी नसला तरीसुद्धा, ‘नीतिमान व देवाचे भय बाळगणारा,’ होता. (प्रेषितांची कृत्ये १०:२) प्रेषितांची कृत्ये यावर भाष्य करताना प्राध्यापक एफ. एफ. ब्रूस यांनी असे लिहिले: “अशाप्रकारच्या विदेश्यांना सहसा ‘देवाला-भिणारे’ असे म्हणतात; हे एक निश्चित संबोधन नसले तरीसुद्धा वापरण्याच्या दृष्टीने सोयीचे आहे. त्या काळी बरेच विदेशी लोक, (सुंता करण्याची अनिवार्यता, पुरुषांसाठी एक प्रमुख अडखळण असल्यामुळे) यहुदी धर्माचा पूर्णार्थाने स्वीकार करण्यास तयार नव्हते; तरीसुद्धा, त्यांना यहुदी सभास्थानांतील एकेश्वरवादी उपासना आणि यहुद्यांच्या जीवन पद्धतीतील नैतिक दर्जे पसंत होते. यांपैकी काहीजण सभास्थानांत उपस्थित राहात असत, आणि यामुळे ग्रीक भाषेतून केल्या जाणाऱ्या प्रार्थना आणि शिकवल्या जाणाऱ्या शास्त्रांतील धड्यांविषयी त्यांना जुजबी ज्ञान मिळाले होते.”
९ एशिया मायनर आणि ग्रीस येथल्या सभास्थानांत प्रचार करताना, प्रेषित पौलाला असे देवाला-भिणारे अनेकजण भेटले होते. पिसिदियातील अंत्युखियात त्याने सभास्थानात जमलेल्यांना, “अहो इस्राएल लोकांनो, व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो,” असे म्हणून संबोधले होते. (प्रेषितांची कृत्ये १३:१६, २६) लूक असे लिहितो की पौलाने तीन शब्बाथांपर्यंत थेस्सलनीका येथील सभास्थानात प्रचार केल्यानंतर, “त्यांच्यापैकी [यहुद्यांपैकी] काही जणांची खातरी होऊन [“काही जण सत्य मानणारे (ख्रिस्ती) बनले,” NW] ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि भक्तिमान हेल्लेणी ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यांत प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या.” (प्रेषितांची कृत्ये १७:४) कदाचित, या हेल्लेण्यांपैकी काही जण सुंता न झालेले देवाला-भिणारे असावेत. पुराव्यानुसार, अशाप्रकारचे बरेच विदेशी यहुदी समुदायांत येऊन मिळाले होते.
‘सत्य न मानणाऱ्यांत’ प्रचार
१०. बायबलचे अजिबातच ज्ञान नसलेल्या विदेश्यांना पौलाने कशाप्रकारे प्रचार केला आणि यामुळे कोणता परिणाम घडून आला?
१० ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, “अवज्ञा करणारे,” ‘विश्वास न ठेवणारे’ [“सत्य न मानणारे,” NW] हा शब्दप्रयोग ख्रिस्ती मंडळीबाहेर असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या संदर्भात वापरण्यात येतो. बऱ्याचदा तो मूर्तिपूजकांना सुचवितो. (रोमकर १५:३१; १ करिंथकर १४:२२, २३; २ करिंथकर ४:४; ६:१४) अथेन्स शहरात सत्य न मानणाऱ्या अनेकांना ग्रीक तत्त्वज्ञानाचे शिक्षण मिळालेले होते आणि त्यांना बायबलचे अजिबातच ज्ञान नव्हते. यामुळे निराश होऊन पौल त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त झाला का? नाही. त्याने साक्ष जरूर दिली, मात्र त्याने आपल्या पद्धतीत थोडा फेरबदल केला. अथेनकरांना अनोळखी असलेल्या हिब्रू शास्त्रवचनांतून थेटपणे वचने उद्धृत न करता, त्याने मोठ्या वाकबगारपणे बायबल आधारित विचार त्यांच्यापुढे मांडले. त्याने कुशलतेने बायबलमधील सत्य आणि पुरातन स्टॉईक कवींनी व्यक्त केलेल्या काही कल्पना यांमध्ये साम्य असल्याचे दाखवले. शिवाय, सर्व मानवजातीचा एकच खरा देव आहे, आणि तो देव, मृत्यू पावलेल्या आणि मग पुनरुत्थित करण्यात आलेल्या एका मनुष्याच्याद्वारे नीतिमत्तेने न्याय करणार आहे, ही संकल्पना त्याने त्यांच्यापुढे सादर केली. अशाप्रकारे पौलाने अथेनकरांना मोठ्या चाणाक्षपणे ख्रिस्ताविषयी प्रचार केला. याचा परिणाम? बव्हंशी लोकांनी त्याची थट्टा केली, आणि काहीजण संशयवादी होते, तरीदेखील “काही माणसांनी त्यास चिकटून राहून विश्वास ठेवला [“सत्य मानले,” NW], त्यात दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.”—प्रेषितांची कृत्ये १७:१८, २१-३४.
११. करिंथ कशाप्रकारचे शहर होते, आणि तेथे पौलाने केलेल्या प्रचार कार्याचा काय परिणाम झाला?
११ करिंथ शहरात बरेचसे यहुदी रहिवासी असल्यामुळे पौलाने तेथील सभास्थानांत आपले प्रचारकार्य आरंभले. पण, यहुदी लोकच विरोध करू लागले तेव्हा पौल विदेशी लोकसमाजाकडे वळला. (प्रेषितांची कृत्ये १८:१-६) आणि काय तो समाज! करिंथ या गजबजलेल्या आणि व्यवसायप्रधान कॉस्मोपॉलिटन शहरात चालणारी रंगेलबाजी, सबंध ग्रेको-रोमन जगात सर्वज्ञात होती. एवढेच काय, अनैतिक वागणे या अर्थाचा, “करिंथीकरण करणे” असा चक्क शब्दप्रयोगही अस्तित्वात आला होता. तथापि, यहुद्यांनी पौलाच्या प्रचाराचा अव्हेर केल्यावरही, ख्रिस्ताने त्याला एका दृष्टान्तात येऊन सांगितले: “भिऊ नको; बोलत जा . . . कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.” (प्रेषितांची कृत्ये १८:९, १०) हे शब्द अगदी खरे ठरले; पौलाने करिंथ शहरात एका मंडळीची स्थापना केली, जरी या मंडळीतील काही सदस्य पूर्वी “करिंथी” जीवनशैली अनुसरणारे होते.—१ करिंथकर ६:९-११.
आज ‘सर्व माणसांच्या’ तारणासाठी प्रयत्न
१२, १३. (अ) आपल्या प्रचाराच्या क्षेत्राशी पौलाच्या काळातील क्षेत्राचे कशाप्रकारे साम्य आहे? (ब) ख्रिस्ती धर्मजगताची चर्चेस अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत अशा आणि जेथे लोक संघटित धर्मांकडून निराश झाले आहेत अशा क्षेत्राबद्दल आपण कशी मनोभूमिका बाळगतो?
१२ पहिल्या शतकाप्रमाणेच आज देखील ‘देवाची अपात्री कृपा सर्व माणसांना तारण देते.’ (तीत २:११) सुवार्ता प्रचाराच्या क्षेत्रात आता सर्व खंड आणि समुद्रांतील बव्हंशी द्वीप व्यापले गेले आहेत. आणि या कार्यात पौलाच्या काळाप्रमाणेच, अक्षरशः ‘सर्व प्रकारच्या माणसांशी’ गाठ पडते. उदाहरणार्थ, आपल्यापैकी काहीजण अशा देशांत प्रचारकार्य करतात, जेथे ख्रिस्ती धर्मजगताची चर्चेस कितीतरी शतकांपासून अस्तित्वात आहेत. पहिल्या शतकातील यहुद्यांप्रमाणे, या चर्च सदस्यांच्या जीवनावर कदाचित पारंपरिक धार्मिक चालीरितींचा जबरदस्त पगडा असेल. तरीसुद्धा अनुकूल मनःस्थितीच्या लोकांना शोधून, त्यांच्यागाठी बायबलचे जे काही ज्ञान आहे त्याचा आधार घेऊन त्यांना शिकवण्यास आपल्याला आनंदच वाटतो. त्यांच्या धार्मिक पुढाऱ्यांनी आपला विरोध किंवा छळ जरी केला, तरी आपण त्यांना तुच्छ लेखून, त्यांच्याशी तिरस्काराने वागत नाही. उलट आपण याची जाणीव ठेवतो की अचूक ज्ञान नसले तरीसुद्धा, त्यांच्यापैकी काहींना “देवाविषयी आस्था” असेल. येशू आणि पौल यांच्या आदर्शाचे अनुकरण करून आपणही लोकांविषयी निर्व्याज प्रेम व्यक्त करतो आणि त्यांचे तारण व्हावे अशी आपली मनस्वी इच्छा आहे.—रोमकर १०:२.
१३ प्रचार करताना, आपल्यापैकी अनेकांना असे लोक भेटतात, जे धर्मांमुळे निराश झालेले आहेत. पण, ते कदाचित अद्यापही देवाला-भिणारे असतील; त्यांचा देवावर काही प्रमाणावर विश्वास असून ते प्रामाणिक जीवन जगण्याचाही कदाचित प्रयत्न करीत असतील. या बिघडलेल्या आणि अत्यंत अभक्त पिढीत, ज्यांचा देवावर निदान थोडातरी विश्वास आहे अशा लोकांना भेटून आपल्याला आनंदच होऊ नये का? ढोंगीपणा आणि खोटेपणा यांनी कलंकित न झालेल्या उपासनेच्या मार्गावर त्यांना घेऊन येण्यास आपण उत्सुक नाही का?—फिलिप्पैकर २:१५.
१४, १५. प्रचार कार्य करण्याकरता एक मोठे क्षेत्र कशाप्रकारे उपलब्ध झाले आहे?
१४ समुद्रात टाकलेल्या जाळ्याचा दृष्टान्त देताना, येशूने प्रचार कार्याकरता एक अतिविस्तीर्ण क्षेत्र असण्याविषयी पूर्वभाकीत केले होते. (मत्तय १३:४७-४९) या दृष्टान्ताचा खुलासा करताना, टेहळणी बुरूज जून १५, १९९२ (इंग्रजी) अंकातील पृष्ठ २० वर असे म्हणण्यात आले होते: “अनेक शतकांपासून, ख्रिस्ती धर्मजगताच्या सदस्यांनी देवाच्या वचनाचे भाषांतर, नक्कल आणि वितरण करण्यात एक महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. कालांतराने चर्चेसनी बायबल सोसायटीज स्थापन केल्या किंवा त्यांनी अशा सोसायटींना पाठबळ दिले; या सोसायटींकरवी दूरदूरच्या देशांत बोलल्या जाणाऱ्या भाषांत बायबलचे भाषांतर करण्यात आले. तसेच, त्यांनी देशोदेशी वैद्यकीय कौशल्य असणारे मिशनरी आणि शिक्षक पाठविले, ज्यामुळे (भौतिक फायदे स्वीकारून ख्रिस्ती धर्मात आलेले) राईस ख्रिश्चन्स अस्तित्वात आले. अशारितीने, ज्यांना देवाची स्वीकृती नव्हती असे असंख्य अयोग्य मासे जाळ्यात आले. पण, त्यामुळे कोट्यवधी गैरख्रिस्ती लोक निदान बायबलच्या, आणि भ्रष्ट झालेल्या का होईना, पण एका प्रकारच्या ख्रिस्ती विश्वासाच्या संपर्कात तरी येऊ शकले.”
१५ विशेषतः दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि समुद्रातील काही द्वीपांवर ख्रिस्ती धर्मजगताला धर्मांतर करण्यात बऱ्याच प्रमाणावर यश आले आहे. आपल्या काळात, या प्रदेशांत कित्येक नम्र अंतःकरणाचे लोक सापडले आहेत; आणि पौलाने यहुदीय मतानुसाऱ्यांविषयी बाळगलेली आशावादी, प्रेमळ मनोभूमिका बाळगल्यास आपणही अशा आणखी कितीतरी लीन लोकांचे भले करू शकू. यहोवाच्या साक्षीदारांची “मते ज्यांना पटतात” अशाही लक्षावधी लोकांना आपल्या मदतीची गरज आहे. आपण त्यांना भेट देतो तेव्हा ते नेहमीच आपले आनंदाने स्वागत करतात. यांपैकी काहींनी आपल्यासोबत बायबलचा अभ्यास केलेला असतो, काही आपल्या सभांना आणि विशेषतः ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वार्षिक स्मारक विधीलाही उपस्थित राहिलेले असतात. राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी हे लोकच आपल्याला एक मोठे क्षेत्र उपलब्ध करून देत नाहीत का?
१६, १७. (अ) आपण सुवार्ता घेऊन कोणकोणत्या प्रकारच्या लोकांकडे जातो? (ब) निरनिराळ्या प्रकारच्या लोकांना प्रचार करताना आपण पौलाचे कशाप्रकारे अनुकरण करतो?
१६ तसेच, काही लोकांची संस्कृती ख्रिस्ती धर्मजगतापेक्षा वेगळी असते—आपण त्यांना कधी त्यांच्या मायदेशांत तर कधी ते स्थानांतरण करून गेलेल्या पाश्चात्त्य देशांत भेटतो, अशांविषयी काय? शिवाय, धर्मांचा पूर्णपणे अव्हेर करून जे कोट्यवधी लोक नास्तिक किंवा अज्ञेयवादी बनले आहेत त्यांच्याविषयी काय? याव्यतिरिक्त, बुक स्टोअर्समध्ये मिळणाऱ्या असंख्य सल्लाविषयक पुस्तकांत प्रकाशित केलेल्या आधुनिक तत्त्वज्ञानाचे अक्षरशः धर्मपरायणतेने पालन करणाऱ्या लोकांविषयी काय? यांचा बचाव होणे आता शक्य नाही असे म्हणून आपण यांपैकी कोणत्याही प्रकारच्या लोकांना टाळावे का? पौलाचे अनुकरण करीत असल्यास आपण असे करणार नाही.
१७ अथेन्स येथे प्रचार करताना, पौल आपल्या श्रोत्यांसोबत तत्त्वज्ञानावर वाद घालण्याच्या फंदात पडला नाही. मात्र, त्याने आपला युक्तिवाद विशिष्ट लोकांशी बोलताना त्यांच्याशी जुळवून घेतला आणि सुस्पष्ट, तर्कशुद्ध पद्धतीने बायबलची सत्ये सादर केली. आपण ज्या लोकांना प्रचार करतो त्यांच्या धर्मांचे किंवा तत्त्वज्ञानाचे पंडित असण्याची गरज नाही. पण, आपले साक्षकार्य प्रभावकारी होण्यासाठी आपण देखील आपली बोलण्याची पद्धत विशिष्ट लोकांप्रमाणे जुळवून घेतो, आणि अशारितीने “सर्वांना सर्व काही” होतो. (१ करिंथकर ९:२२) कलस्सै येथील ख्रिश्चनांना लिहिलेल्या पत्रात पौलाने म्हटले: “बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधि साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.” (तिरपे वळण आमचे.)—कलस्सैकर ४:५, ६.
१८. आपल्यावर कोणती जबाबदारी आहे, आणि आपण कोणती गोष्ट कधीही विसरता कामा नये?
१८ येशू आणि प्रेषित पौलाप्रमाणे, आपण सर्व प्रकारच्या लोकांविषयी प्रीती बाळगू या. विशेषतः इतरांना राज्याची सुवार्ता सांगण्याकरता आपण नेहमीपेक्षा जास्त परिश्रम करू या. पण, त्याच वेळेस येशूने आपल्या शिष्यांविषयी काय म्हटले होते ते आपण कधीही विसरता कामा नये, त्याने म्हटले, ‘ते जगाचे नाहीत.’ (योहान १७:१६) या शब्दांचे आपल्यासाठी कोणते तात्पर्य आहे हे पुढच्या लेखात विचारात घेतले जाईल.
उजळणी
◻ जगाच्यासंबंधाने येशूच्या संतुलित मनोभूमिकेचे वर्णन करा.
◻ प्रेषित पौलाने यहुद्यांना आणि यहुदीय मतानुसाऱ्यांना कशा पद्धतीने प्रचार केला?
◻ देवाला-भिणारे आणि सत्य न मानणारे यांच्याशी पौलाने कशा तऱ्हेने संभाषण केले?
◻ आपण आपल्या प्रचार कार्यांत “सर्वांना सर्वकाही” कशाप्रकारे होऊ शकतो?
[१० पानांवरील चित्र]
आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांप्रती दयाळुपणाची कृत्ये केल्यामुळे ख्रिस्ती लोक बऱ्याचदा त्यांच्याविषयी असलेले विपरीत ग्रह मिटवू शकतात