जागतिक ऐक्य—कसे निर्माण होईल?
निष्काळजी भाडेकरूंनी सत्यानाश केलेल्या पडीक इमारतीप्रमाणेच सद्य जागतिक कारभार एकाच गोष्टीच्या लायकीचा आहे—नाश आणि पुनर्स्थापना. हा दृष्टिकोन निराशावादी नाही. बायबलनुसार हाच एकमेव वास्तववादी दृष्टिकोन आहे. ते का?
सद्य जागतिक व्यवस्थेचा पाया जीर्ण झाला आहे. या सबंध रचनेला वाळवी आणि कीड लागली आहे. स्टीलची फ्रेम गंजत आहे. आधार देणाऱ्या भिंती कमकुवत झाल्या आहेत. छत खाली कोसळत आहे. नळे गळकी झाली आहेत. विद्युत व्यवस्थेत बिघाड आहे आणि ती धोकेदायक आहे. निवासी दिवस न् रात्र एकमेकांशी झगडत राहतात आणि द्वेषाने त्या इमारतीचे नुकसान करत आहेत. त्या संपूर्ण इमारतीला आणि अवतीभोवतीच्या परिसराला कीड लागून जीवितहानी किंवा दुखापत होण्याचा धोका आहे.
“नामशेष होण्याच्या मार्गावर”
सतत चालू असलेले राजकीय झगडे, हव्यास, क्रोध आणि मनात खोलवर रुजलेले जातीय आणि जमातीय द्वेषभाव यांच्यामुळे, ग्वीन डायर यांच्या मते, “संपूर्ण मानवजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.” सबंध जगभर, जिद्दी अल्पसंख्यांक—प्रभावक गट, स्वातंत्र्य सैनिक, गुन्हेगारी टोळ्या, आंतरराष्ट्रीय अतिरेकी आणि इतर—स्वतःच्या स्वार्थी योजना पूर्ण करत असतात आणि जगातील शांतीच्या सर्व संभाव्यता अगदी स्वतःच्या मर्जीनुसार पार धुळीस मिळवण्यात शक्य होत आहेत असे दिसते. शांती भंग करणाऱ्या भाडेकरूंप्रमाणे ते बाकीच्या सर्वांचे जीवन दुःखमय करू शकतात.
परंतु, अनेक टीकाकारांच्या मते, केवळ विरोधी गट किंवा दंगेखोर लोकांमुळेच जागतिक ऐक्यतेला आळा बसत नाही. संपूर्ण राष्ट्रच सर्वात मोठा अडथळा आहे. युद्धविषयक लेखक एस. बी. पेन ज्युनियर, यांचे म्हणणे आहे की, स्वतंत्र राष्ट्रे “आंतरराष्ट्रीय अराजकतेच्या स्थितीत” असतात. स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी जे उत्तम ते साधून इतरांबद्दल त्यांना काहीएक चिंता नसते. परिणामस्वरूप, सबंध इतिहासात, ‘एका मनुष्याने दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान केले आहे.’—उपदेशक ८:९.
काही राष्ट्रीय सरकारांना आपापल्या क्षेत्रात किंवा काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवरही अन्याय आणि जुलूम काढून टाकण्यात थोडेफार यश लाभले आहे हे खरे आहे. त्यांनी वेळोवेळी काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय ऐक्य स्थापिले आहे. पण, एखाद्या बंडखोर राष्ट्राविरुद्ध कार्यवाही करायला काही राष्ट्र एकत्र होतात तेव्हा इतरांविषयी खरे हित असण्याऐवजी त्यांनी स्वहित साधण्यास असे पाऊल उचलले अशी शंकास्पद भावना नेहमी असतेच. वास्तविकता ही आहे की, मानवी सरकारांकडे जागतिक कलहावर कोणताही बहुव्यापक, कायमस्वरूपी उपाय नाही. ग्वीन डायर दाखवतात: “एखाद्या स्वतंत्र विचाराच्या राष्ट्राची बंडाळी रोखायला किंवा त्यासाठी त्या राष्ट्राला शिक्षा द्यायला सर्व राष्ट्रांनी एकत्र व्हावे हे तत्त्व तसे चांगलेच आहे, पण बंडखोर राष्ट्र कोणते हे कोण ठरवणार, आणि त्या राष्ट्राला रोखायला जी वित्तहानी व जीवितहानी होणार त्याची किंमत कोण मोजणार?”
अर्थात, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध तेव्हाच बंडाळी करते जेव्हा त्याचे बहुतांश नागरिक त्या बंडाळीशी सहमत असतात. इतिहास वारंवार दाखवून देतो, की केवळ “बंडखोर राष्ट्रातच” नागरिकांनी आपल्या चांगल्या अथवा वाईट पुढाऱ्यांना दुजोरा दिलेला नाही. खरे पाहता, पृथ्वीवरील बहुतांश लोकांनी असे केले आहे. राजकीय आणि धार्मिक पुढाऱ्यांची “लबाडी, खोटी आश्वासने आणि मतप्रसार” यांच्यामागे ते अंधळेपणाने गेले आहेत असे टाईम पत्रिका म्हणते.
एरवी समंजस आणि दयाळू असलेले लोक राष्ट्राभिमानामुळे चेतवले जाऊन त्यांनी दुसऱ्या राष्ट्राच्या पुरुष, स्त्रिया आणि मुलांविरूद्ध राक्षसी गुन्हे केले आहेत. उदाहरणासाठी, पहिल्या महायुद्धाविषयी इतिहासकार जे. एम. रॉबर्ट्स म्हणतात: “१९१४ मधला एक विरोधाभास हा आहे की, त्या वेळी आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक राष्ट्रातील सर्व पक्षातले, पंथातले आणि घराण्यातले कितीतरी लोक आपल्या मर्जीने आणि अगदी आनंदाने युद्धात सामील झाले.” त्यानंतर तरी लोकांनी धडा शिकला का? नाही! पत्रकार रॉड अशर यांनी ज्याला “अंध करणारे राष्ट्रीयवादाचे” श्वापद म्हटले तो जागतिक ऐक्याच्या प्रत्येक शक्यतेचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहे.
बाह्य शक्तींचे काम चालू
पण, जागतिक ऐक्याला याहीपेक्षा मोठा अडथळा आहे. बायबल प्रकट करते की बाह्य शक्तींचे काम चालू आहे. या बाह्य शक्ती, दियाबल सैतान आणि त्याचे अनुयायी अर्थात त्याचे दुरात्मे आहेत. बायबलनुसार, सैतान ‘ह्या युगाचे दैवत’ असून त्याने “विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने . . . आंधळी केली आहेत” ज्यामुळे त्यांच्यावर ‘ख्रिस्ताच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश’ प्रकाशत नाही.—२ करिंथकर ४:४; प्रकटीकरण १२:९.
अर्थात, या कारणामुळेच लोक स्वतःच्या कार्यांच्या जबाबदारीतून दोषमुक्त होत नाहीत. पण, मानवी सरकारे खऱ्या अर्थाने संयुक्त असलेले जग कधीच स्थापित का करू शकत नाहीत याचे उत्तर मात्र मिळते. दियाबल सैतान जोपर्यंत अस्तित्वात राहील तोपर्यंत बायबलच्या भाषेत, “देहाची कर्मे” त्याचप्रमाणे ‘वैर, कलह, तट आणि फुटी,’ निर्माण करायला तो स्त्री-पुरुषांवर प्रभाव पाडत राहील.—गलतीकर ५:१९-२१.
जागतिक सरकार
मग उपाय आहे तरी कोणता? सुमारे सातशे वर्षांआधी, सुप्रसिद्ध इटालियन कवी आणि तत्त्ववेत्ते डान्टे यांनी याचे उत्तर सांगतिले. त्यांनी असा वाद केला की फक्त जागतिक सरकारच मानवजातीस शांती आणि ऐक्य आणण्याची खात्री देऊ शकते. अनेक लोकांना कोणत्याही प्रकारचे जागतिक सरकार फसवेच वाटते; त्यांच्या मते त्यावर विश्वास केला जाऊ शकत नाही. आधी उल्लेखलेले लेखक पेन असा निष्कर्ष काढतात की, “इतिहासाच्या या क्षणी जागतिक सरकार अशक्य कोटीतली गोष्ट आहे.” पण का? कारण कोणत्याही यशस्वी जागतिक सरकाराला दोन गोष्टींची हमी द्यावी लागेल ज्या मानवी क्षमतेच्या पलीकडल्या आहेत; त्या म्हणजे, “जागतिक सरकार युद्धाचा कायमचा अंत करील आणि जागतिक सरकार जगव्याप्त जुलूमशहा होणार नाही.”
कोणतेच मानवी सरकार हे पूर्ण करू शकणार नाही हे निश्चित आहे. परंतु, येशू ख्रिस्ताच्या अधीन असलेले देवाचे सरकार मात्र युद्धाचा समूळ नाश करू शकते आणि करील. (स्तोत्र ४६:९, १०; मत्तय ६:१०) खरे म्हणजे, युद्ध चेतवणाऱ्या सर्वांचाच ते नाश करील. संदेष्टा दानीएल म्हणतो की, पृथ्वीवरील मानवी शासनाचा, देवाच्या नियुक्त वेळी अंत होईल तेव्हा, मानवी सत्ता ‘मातीत मिसळलेल्या लोखंडासारखी’ “द्विविध होईल.” (दानीएल २:४१-४३) यामुळे राजकीय गटांमध्ये फूट होऊन अनिवार्य झगडे होतील. तरीही, दानीएल म्हणतो की, देवाचे राज्य “या सर्व [राष्ट्रीयवादी आणि विभक्त] राज्यांचे” अर्थात, सरकारांचे “चूर्ण करून त्यांस नष्ट करील” आणि त्या बदल्यात येशू ख्रिस्ताची सत्ता असलेले दीर्घकाळापासून अपेक्षित राज्य स्थापन करील.—दानीएल २:४४.
इतरांच्या नाकी नऊ आणणाऱ्या अत्याचारी लोकांचे वास्तव्य पृथ्वीवर चालू राहिले तर लोकांसाठी सुंदर वातावरण निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही. तथापि, “दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल.” (स्तोत्र ३७:१, २, ९, ३८; नीतिसूत्रे २:२२) म्हणून, जाणूनबुजून देवाच्या दर्जांचा धिक्कार करणाऱ्यांचा किंवा शांतीभंजक जगिक अधिकाऱ्यांचे समर्थन करणाऱ्यांचा ख्रिस्त विध्वंस करील. या ग्रहाचा सत्यानाश करणाऱ्या सर्वांचा तो नाश करील. “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करण्याचे वचन देव देतो.—प्रकटीकरण ११:१८.
हा जगव्याप्त जुलूमशाहीपणाचा प्रकार नसेल. तर, येशू ख्रिस्त चांगल्यांना वाईटांपासून वेगळे करील तेव्हा तो “सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्या प्रीत्यर्थ” कार्य करील. (स्तोत्र ४५:३, ४; मत्तय २५:३१-३३) त्याचप्रमाणे, हा काही विपर्यस्त आणि विनाशकारी किंवा सत्तेचा दुरुपयोग करण्याचाही प्रकार नाही. तसे मुळीच नाही! एखाद्या प्राचीन काळातली सुंदर इमारत कोणी हव्यासी जमीनजुमल्याचा डेव्हलेपर पाडून टाकणार आहे अशातला तो प्रकार नाही. तर प्रसन्न, स्वच्छ वातावरण निर्माण करण्याकरता पडकी इमारत पाडून टाकण्यासारखे ते असेल.
पण, गतकाळात इतकी विभाजकता निर्माण केलेल्या बाह्य शक्तींचे काय होईल? या नवीन व्यवस्थेवरही त्यांचा प्रभाव पडेल का? मग तेथील रहिवासी पुन्हा एकदा विनाशकारी बनतील—सोबतच्या रहिवाशांबरोबर भांडणतंटा करत राहतील आणि सर्वांच्या नाकात दम आणतील का? असे मुळीच घडणार नाही. हा नायनाट आणि नविनीकरण कायमचे आणि पूर्ण स्वरूपाचे असेल. “पीडा दुसऱ्यांदा उठणार नाही.”—नहूम १:९, पं.र.भा.
बायबलमध्ये सैतानाच्या समूळ नाशाची तुलना केरकचरा जाळण्यासोबत केली आहे. ते म्हणते की, “[जगावरील रहिवाश्यांना] ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले.” (प्रकटीकरण २०:१०) केवढी प्रभावशाली संज्ञा! जरा कल्पना करा, हा नाश, जेथे थोडाबहुत केरकचरा जाळण्यात येतो असा नसेल तर चक्क अग्नीच्या सरोवरासारखा, दुष्ट आणि भ्रष्ट असणाऱ्या सर्व गोष्टींचे अस्तित्वच मिटवणारा व त्यांना भस्म करणारा असा असेल. विश्वव्यापी व्यवस्थेला धोका पोहंचेल, उचित आणि अनुचित यांसंबंधी देवाच्या दर्जांचे उल्लंघन होईल किंवा आपल्या सहमानवाला दुखावेल अशी कोणतीही कृत्ये करायला मानवालाच काय तर दुरात्म्याला देखील अनुमती दिली जाणार नाही. सर्व शांतताभंजक नाहीसे होतील!—स्तोत्र २१:९-११; सफन्या १:१८; ३:८.
सर्व राष्ट्रांतील संयुक्त लोक
या मोठ्या शुद्धीकरणातल्या उत्तरजीवींमध्ये “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे . . . [यांचा] मोठा लोकसमुदाय” असेल. (प्रकटीकरण ७:९) राष्ट्रीय आणि जातीय भेदभाव त्यांच्यात नसेल. शांतीमय एकतेत राहण्याचे त्यांनी शिकून घेतलेले असेल. (यशया २:२-४) एवढेच नव्हे तर, पुनरुत्थानाच्या विलक्षण तरतुदीकरवी पृथ्वीवरील गतकाळातले भाडेकरू देखील त्यांच्यासोबत या शुद्ध केलेल्या पृथ्वीचे पुन्हा वतन पावतील.—योहान ५:२८, २९.
अशा एका जगात जगायला तुम्हाला आवडेल का? केवळ देवाच्या गरजांनुरूप राहणाऱ्यांनाच हे शक्य होईल आणि त्याच्या गरजा बायबलमध्ये स्पष्ट रूपात दिल्या आहेत. (योहान १७:३; प्रेषितांची कृत्ये २:३८-४२) यहोवाचे साक्षीदार तुम्हाला देवाच्या गरजा शिकवण्यात स्वखुशीने मदत करतील म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने संयुक्त असलेल्या जगात सर्वकाळ जीवन उपभोगण्याची आशा धरू शकाल.
[७ पानांवरील चित्र]
येशू ख्रिस्ताच्या अधीन असलेले सरकार संयुक्त जगाची हमी देईल