जगात असून जगाचे नाही
“तुम्ही जगाचे नाही, . . . म्हणून जग तुमचा द्वेष करिते.”—योहान १५:१९.
१. ख्रिश्चनांचा जगासोबत कसा संबंध आहे, पण जगाचा त्यांच्याप्रती कसा दृष्टिकोन आहे?
प्रेषितांसोबतच्या शेवटल्या रात्री, येशूने त्यांना सांगितले: “तुम्ही जगाचे नाही.” येथे तो कोणत्या जगाच्या संदर्भात बोलत होता? तथापि, “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे,” असे त्याने स्वतःच यापूर्वी म्हटले नव्हते का? (योहान ३:१६) येशूचे शिष्य या जगाचे निश्चितच होते, कारण सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे याकरता येशूवर विश्वास ठेवणारे ते पहिलेच होते. तर मग, आपले शिष्य जगापासून वेगळे आहेत असे आता येशू का म्हणतो? शिवाय, “तुम्ही जगाचे नाही, . . . म्हणून जग तुमचा द्वेष करिते,” असे त्याने का म्हटले?—योहान १५:१९.
२, ३. (अ) ख्रिस्तीजनांना कोणत्या ‘जगाचे’ भाग राहायचे नव्हते? (ब) ख्रिस्तीजन ज्या जगाचे नाहीत त्या ‘जगाबद्दल’ बायबल काय म्हणते?
२ या प्रश्नांचे उत्तर असे आहे की “जग” (ग्रीक, कॉसमॉस) या शब्दाचा, बायबल वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करते. यापूर्वीच्या लेखात खुलासा केल्याप्रमाणे बायबलमध्ये काही ठिकाणी “जग” हा शब्द सर्वसामान्य मानवजातीच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. हेच ते जग आहे ज्याच्यावर देवाने प्रीती केली आणि ज्याच्यासाठी येशू मरण पावला. परंतु, ख्रिस्ती धर्माचा ऑक्सफर्ड इतिहास (इंग्रजी) हा ग्रंथ सांगतो त्याप्रमाणे: “ख्रिस्ती धर्मासंबंधाने, देवाला पारख्या झालेल्या आणि त्याचा प्रतिकार करणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतानाही ‘जग’ हा शब्द वापरण्याचा प्रघात आहे.” असे कशावरून म्हणता येईल? कॅथलिक लेखक रॉलॅन मिनराट, ले क्रेत्यान ए ल मॉन्ड (ख्रिस्तीजन आणि जग) या आपल्या पुस्तकात स्पष्टीकरण देतात: “अनादरयुक्त अर्थाने घेतल्यास जग म्हणजे, . . . देवाचा प्रतिकार करणाऱ्या शक्ती जेथे कार्यरत आहेत असे क्षेत्र; ख्रिस्ताच्या विजयशाली राज्याच्या विरोधात असल्यामुळे, ते सैतानाच्या नियंत्रणातील एक शत्रू साम्राज्य ठरते.” हे “जग” म्हणजे देवाला पारखा झालेला सामान्य जनसमुदाय. या जगाचे, खरे ख्रिस्ती भाग नाहीत आणि ते त्यांचा द्वेष करते.
३ पहिल्या शतकाच्या शेवटास, योहानाने हेच जग मनात ठेवून पुढील शब्द लिहिले: “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीति करू नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी—ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.” (१ योहान २:१५, १६) त्याने असेही लिहिले की, ‘आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे, पण सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.’ (१ योहान ५:१९) स्वतः येशूने देखील सैतानाला “ह्या जगाचा अधिकारी” म्हटले होते.—योहान १२:३१; १६:११.
जागतिक साम्राज्यांचा उदय
४. जागतिक साम्राज्ये कशारितीने अस्तित्वात आली?
४ नोहाच्या काळातील जलप्रलयानंतर त्याच्या वंशजांपैकी कित्येकांनी यहोवाची उपासना त्यागली, तेव्हा देवाला पारखे असणारे आजचे हे जग क्रमाक्रमाने विस्तारू लागले. यांपैकी अगदी सुरवातीच्या काळातील निम्रोदचे एक ठळक उदाहरण आहे; तो नगरे बांधणारा आणि “परमेश्वरासमोर [“यहोवाच्या विरोधात,” NW] बलवान पारधी” होता. (उत्पत्ति १०:८-१२) त्या वर्षांदरम्यान, जगाचे अनेक लहानलहान नगर-शासनांत विभाजन झालेले होते आणि वेळोवेळी यांपैकी काही नगरशासने एकमेकांशी सख्य करून इतरांशी लढाया करीत असत. (उत्पत्ति १४:१-९) काही नगरशासने इतरांपेक्षा अधिक बलाढ्य झाली आणि अशारितीने त्यांच्यापासून प्रादेशिक शक्ती उदयास आल्या. कालांतराने या प्रादेशिक शक्तींपैकी काही, आणखी विस्तार पावून त्यांची जागतिक साम्राज्ये बनली.
५, ६. (अ) बायबल इतिहासातील सात जागतिक शक्ती कोणत्या आहेत? (ब) या जागतिक साम्राज्यांना प्रतिकात्मक भाषेत कशाप्रकारे सूचित करण्यात आले आहे, आणि त्यांना सामर्थ्य कोठून प्राप्त होते?
५ निम्रोदच्याच वाटेने जाऊन, जागतिक साम्राज्यांच्या शासकांनी यहोवाची उपासना केली नाही, आणि हे त्यांच्या निर्दय, हिंसाचारी कृत्यांवरून उघड झाले. प्रतिकात्मक भाषेत, या जागतिक साम्राज्यांची बायबलमध्ये हिंस्र श्वापदांसोबत तुलना करण्यात आली असून, काळाच्या ओघात होऊन गेलेल्या अशा सहा साम्राज्यांची बायबल ओळख करून देते ज्यांनी यहोवाच्या लोकांवर जबरदस्त प्रभाव पाडला. ही साम्राज्ये होती इजिप्त, असेरिया, बॅबिलोन, मेदो-पर्शिया, ग्रीस आणि रोम. रोमच्या पाठोपाठ एक सातवे जागतिक साम्राज्य उदयास येईल असे भाकीत करण्यात आले होते. (दानीएल ७:३-७; ८:३-७, २०, २१; प्रकटीकरण १७:९, १०) अँग्लो-अमेरिकन हे सातवे जागतिक साम्राज्य ठरले; ब्रिटन आणि अमेरिका या त्याच्या मित्र राष्ट्राने मिळून बनलेले हे साम्राज्य होते, पण कालांतराने अमेरिकेची शक्ती वाढली आणि त्याने ब्रिटनला मागे टाकले. रोमी साम्राज्याचे सर्व नामोनिशाण मिटल्यावर ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार होऊ लागला होता.a
६ एका पाठोपाठ एक झालेल्या या सात जागतिक साम्राज्यांना प्रकटीकरणाच्या पुस्तकात, प्रक्षुब्ध मानवजातीच्या समुद्रातून बाहेर पडणाऱ्या सात डोक्यांच्या एका हिंस्र श्वापदाकरवी सूचित करण्यात आले आहे. (यशया १७:१२, १३; ५७:२०, २१; प्रकटीकरण १३:१) शासन करणाऱ्या या श्वापदाला कोण सत्ता देतो? बायबल उत्तर देते: “त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला.” (प्रकटीकरण १३:२) हा अजगर दुसरा तिसरा कोणी नसून दियाबल सैतान आहे.—लूक ४:५, ६; प्रकटीकरण १२:९.
देवाच्या राज्याचे आगामी शासन
७. ख्रिस्तीजन कोणती आशा बाळगून आहेत, आणि जगातल्या सरकारांशी असलेल्या त्यांच्या संबंधावर याचा कसा प्रभाव पडतो?
७ “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” अशी प्रार्थना ख्रिस्तीजन आज जवळजवळ २,००० वर्षांपासून करत आले आहेत. (मत्तय ६:१०) यहोवाच्या साक्षीदारांना माहीत आहे, की केवळ देवाचे राज्यच पृथ्वीवर खरी शांती आणू शकते. बायबलच्या भविष्यवाण्यांवर जवळून लक्ष ठेवत असल्यामुळे, त्यांना खात्री आहे की या प्रार्थनेचे लवकरच उत्तर मिळेल आणि देवाचे राज्य पृथ्वीवरील कारभार आपल्या हाती घेईल. (दानीएल २:४४) या राज्याला निष्ठावान असल्यामुळे ते जगातील सरकारांच्या कारभारांत तटस्थ राहतात.
८. स्तोत्र २ येथे भाकीत करण्यात आल्याप्रमाणे, देवाच्या राज्याच्या शासनाप्रती सरकारे कशी प्रतिक्रिया दाखवतात?
८ काही राष्ट्रे, आपण धार्मिक तत्त्वांचे पालन करतो असा दावा करतात. पण, यहोवा हा विश्वाचा सार्वभौम आहे आणि त्याने येशूला पृथ्वीवर अधिकार देऊन स्वर्गीय राजा म्हणून सत्तारूढ केले आहे; या वास्तविकतेकडे डोळेझाक करीत असल्याचे ते आपल्या कार्यांतून दाखवून देतात. (दानिएल ४:१७; प्रकटीकरण ११:१५) एका भविष्यसूचक स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे: “परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध [येशूविरुद्ध] पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की: ‘चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ!’” (स्तोत्र २:२, ३) आपल्या राष्ट्रीय सार्वभौमत्त्वावर मर्यादा घालणारी कोणतीही “बंधने” किंवा “पाश” सरकारांना मंजूर नाहीत. म्हणूनच यहोवा आपला नियुक्त राजा, येशू यास म्हणतो: “माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतांपर्यंतचे स्वामित्व तुला देईन; लोहदंडाने तू त्यांस फोडून काढिशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करिशील.” (स्तोत्र २:८, ९) पण, मानवजातीच्या ज्या जगासाठी येशू मृत्यू पावला त्याचा पूर्णपणे “चुराडा” होणार नाही.—योहान ३:१७.
‘श्वापदाची खूण’ अव्हेरणे
९, १०. (अ) प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपल्याला कोणता इशारा देण्यात आला आहे? (ब) ‘श्वापदाची खूण’ बाळगण्यातून काय सूचित होते? (क) देवाचे सेवक कोणत्या खुणा स्वीकारतात?
९ प्रेषित योहानाला झालेल्या प्रकटीकरणात इशारा देण्यात आला होता की देवाला पारखे झालेल्या मानवांचे जग, आपला नाश होण्याच्या थोड्याच काळाआधी देवाच्या लोकांवर जास्तच दबाव आणते; “लहानथोर, धनवान दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी; आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीहि विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करिते.” (प्रकटीकरण १३:१६, १७) याचा काय अर्थ होतो? उजव्या हातावर असलेली खूण एखाद्या गोष्टीला दिलेल्या सक्रिय पाठिंब्याचे प्रतीक आहे. कपाळावरील खुणेविषयी काय? दि एक्स्पॉझिटर्स ग्रीक टेस्टमेंट हा ग्रंथ म्हणतो त्याप्रमाणे: “सैनिकांच्या आणि गुलामांच्या शरीरावर ठळकपणे गोंदून किंवा डाग देऊन खूण लावण्याची जी पद्धत होती . . . किंवा त्याहीपेक्षा समर्पक म्हणजे, देवाच्या नावाचे ताईत घालण्याची जी धार्मिक परंपरा होती तिच्याविषयी अत्यंत प्रतिकात्मक शब्दांत येथे सुचवण्यात आले आहे.” आपल्या कृती आणि शब्दांकरवी अनेक लोक ही खूण बाळगतात आणि त्याद्वारे आपण ‘श्वापदाचे’ “गुलाम” किंवा “सैनिक” आहोत हे सिद्ध करतात. (प्रकटीकरण १३:३, ४) त्यांच्या भविष्याविषयी थियॉलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट हा शब्दकोश म्हणतो: “देवाचे शत्रू श्वापदाचे नाव असलेल्या गूढ आकड्याची [खूण] स्वतःच्या कपाळावर आणि एका हातावर करवून घेतात. यामुळे त्यांना आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीच्या दिशेने अनेक फायदे प्राप्त होतात; पण असे केल्यामुळे त्यांच्यावर देवाचा क्रोध येतो आणि हजार वर्षांच्या राज्यात त्यांना प्रवेश मिळत नाही, प्रकटी. १३:१६; १४:९; २०:४.”
१० ही “खूण” करवून घेण्याच्या दबावाचा प्रतिकार करण्याकरता मोठे साहस आणि धैर्य दाखवावे लागते. (प्रकटीकरण १४:९-१२) देवाच्या सेवकांजवळ ही शक्ती आहे, पण याच कारणामुळे कित्येकदा त्यांचा द्वेष आणि बदनामी केली जाते. (योहान १५:१८-२०; १७:१४, १५) श्वापदाची खूण बाळगण्याऐवजी, यशयाने म्हटले की ते प्रतिकात्मक रूपाने आपापल्या हातावर, “मी परमेश्वराचा” असे लिहून घेतील. (यशया ४४:५) शिवाय, धर्मत्याग्यांकरवी केल्या जाणाऱ्या अमंगळ कृत्यांबद्दल ते ‘उसासे टाकून विलाप करीत असल्यामुळे’ त्यांच्या कपाळावर एक प्रतिकात्मक खूण केली जाते, आणि यहोवाचे न्यायदंड बजावले जातील तेव्हा ते बचावले जाण्याच्या योग्यतेचे आहेत अशी या खुणेमुळे त्यांची ओळख पटेल.—यहेज्केल ९:१-७.
११. देवाचे राज्य येऊन पृथ्वीवरील राजवट आपल्या हाती घेत नाही तोपर्यंत राज्य करण्याची मानवी सरकारांना कोण परवानगी देतो?
११ ख्रिस्ताचे स्वर्गीय राज्य या पृथ्वीवरील राजवट पूर्णपणे आपल्या हाती घेईपर्यंत देव मानवी सरकारांना, राज्य करण्याची परवानगी देत आहे. राजकीय सरकारांना देवाकरवी परवानगी दिली जाण्याविषयी प्राध्यापक ऑस्कर कुलमॅन यांनी नव्या करारातील सरकार (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ते म्हणतात: “सरकार हे ‘तात्पुरत्या’ स्वरूपाचे आहे या संयुक्त संकल्पनेमुळे आरंभीच्या ख्रिश्चनांची सरकारांप्रतीची भूमिका एकसंगत नसून, विसंगत असल्याचे भासते. पुन्हा म्हणेन की ती अशी भासते. एक उदाहरण द्यायचे झाल्यास, रोमकर १३:१ येथील ‘प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे’ या वचनाची आणि सरकारांना अगाधकुपातील श्वापद म्हणणाऱ्या प्रकटीकरण १३ ची तुलना करता येईल.”
“श्वापद” आणि “कैसर”
१२. मानवी सरकारांप्रती यहोवाच्या साक्षीदारांचा कोणता संतुलित दृष्टिकोन आहे?
१२ सरकारी पदांवर असणारे सर्वच्या सर्व लोक सैतानाचे हस्तक आहेत असा निष्कर्ष काढणे अयोग्य ठरेल. अनेकांनी आपण तत्त्वनिष्ठ असल्याचे दाखवून दिले आहे, उदाहरणार्थ राज्यपाल सिर्ग्य पौल, ज्याचे बायबल ‘बुद्धिमान मनुष्य’ म्हणून वर्णन करते. (प्रेषितांची कृत्ये १३:७) काही राज्यकर्त्यांनी मोठ्या धैर्याने अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे समर्थन केले आहे; आणि यहोवा किंवा त्याच्या उद्देशांविषयी माहिती नसली तरीसुद्धा ते देवाने दिलेल्या विवेकबुद्धीमुळे असे करतात. (रोमकर २:१४, १५) लक्षात असू द्या, बायबल “जग” या शब्दाचा दोन विरुद्धार्थांनी उपयोग करते: पहिले म्हणजे, देवाने ज्याच्यावर प्रेम केले आणि आपणही ज्याच्यावर प्रेम करावे असे मानवांचे जग; आणि दुसरे म्हणजे, सैतान ज्याचा देव आहे आणि आपण ज्याच्यापासून अलिप्त राहावे असे यहोवाला पारखे झालेल्या मानवजातीचे जग. (योहान १:९, १०; १७:१४; २ करिंथकर ४:४; याकोब ४:४) अशाप्रकारे, यहोवाच्या सेवकांची मानवी राजवटीच्या संबंधाने एक संतुलित मनोभूमिका आहे. आपण देवाच्या राज्याचे राजदूत किंवा जासूद असल्यामुळे आणि आपले जीवन हे देवाला समर्पित असल्यामुळे आपण राजकीय प्रश्नांवर तटस्थ भूमिका पत्करतो. (२ करिंथकर ५:२०) दुसरीकडे पाहता, आपण मोठ्या कर्तव्यदक्षतेने, जे अधिकारपदांवर आहेत अशांच्या अधीन राहतो.
१३. (अ) मानवी सरकारांकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? (ब) ख्रिस्तीजन मानवी सरकारांप्रती कोठवर अधीन राहतात?
१३ या संतुलित भूमिकेतून स्वतः यहोवाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. जागतिक साम्राज्ये, किंवा लहानशी सरकारे देखील जेव्हा आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात, आपल्या लोकांवर जाचजुलूम करतात किंवा देवाच्या उपासकांचा छळ करतात तेव्हा हिंस्र श्वापद म्हणून भविष्यसूचकपणे त्यांचे जे वर्णन करण्यात आले होते ते अगदी यथायोग्य ठरते. (दानीएल ७:१९-२१; प्रकटीकरण ११:७) तथापि, राष्ट्रांची सरकारे जेव्हा न्यायसंगतपणे कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या देवाच्या उद्देशानुरूप कार्य करतात, तेव्हा तो त्यांना आपले ‘सेवक’ या दृष्टीने पाहतो. (रोमकर १३:६) मानवी सरकारांचा आदर करावा आणि त्यांच्या अधीन राहावे, अशी यहोवाची आपल्या लोकांकडून अपेक्षा आहे; पण त्यांच्या या अधीनतेला मर्यादा आहेत. जेव्हा मानव देवाच्या सेवकांकडून देवाच्या नियमाने निषिद्ध ठरवलेल्या गोष्टी करण्याची अपेक्षा करतात किंवा देव आपल्या सेवकांकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतो त्या गोष्टी जेव्हा ते निषिद्ध ठरवतात तेव्हा देवाचे सेवक प्रेषितांनी पत्करलेल्या भूमिकेचे अनुकरण करतात, अर्थात: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
१४. येशूने आणि पौलाने मानवी सरकारांप्रती ख्रिस्ती अधीनतेविषयी कसे स्पष्टीकरण दिले?
१४ “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा,” असे म्हणताना येशूने दाखवून दिले की त्याच्या अनुयायांना सरकार आणि देव या दोघांच्याप्रती काही बाध्यता असतील. (मत्तय २२:२१) प्रेषित पौलाने आत्म्याच्या प्रेरणेने असे लिहिले: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे . . . पण जर तू वाईट करिशील तर त्याची भीति बाळग; कारण तो तरवार व्यर्थ धारण करीत नाही; तर क्रोध दाखविण्याकरिता वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेहि अधीन राहणे अगत्याचे आहे. ह्या कारणास्तव तुम्ही करहि देता.” (रोमकर १३:१, ४-६) सा.यु. पहिल्या शतकापासून आजपर्यंत, ख्रिश्चनांना सरकारच्या मागण्या तोलून पाहाव्या लागल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या उपासनेच्या बाबतीत समझोता करावा लागेल का, की या मागण्या न्याय्य असून त्या कर्तव्यदक्षतेने पूर्ण केल्या पाहिजेत हे ठरवण्यासाठी त्यांना समग्र विचार करावा लागला आहे.
कर्तव्यदक्ष नागरिक
१५. यहोवाचे साक्षीदार कर्तव्यदक्षतेने कैसराला जे द्यावयाचे ते कसे देतात?
१५ राजकीय ‘वरिष्ठ अधिकारी’ देवाने स्वीकृत केलेली त्यांची भूमिका पार पाडतात तेव्हा ते देवाचे ‘सेवक’ ठरतात; या भूमिकेत ‘वाईट करणाऱ्यांना शिक्षा करणे व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करणे’ सामील आहे. (१ पेत्र २:१३, १४) कैसर कर भरण्याची जी काही न्याय्य मागणी करतो ती यहोवाचे सेवक कर्तव्यदक्षतेने पूर्ण करतात, आणि “सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या . . . आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे,” याकरता त्यांचा बायबल प्रशिक्षित विवेक त्यांना जेथपर्यंत परवानगी देतो तेथपर्यंत ते जातात. (तीत ३:१) ‘चांगली कामे’ यांत इतरांना मदत करणे समाविष्ट आहे, उदाहरणार्थ, आपत्ती येते अशा वेळेस. असे प्रसंग ओढवतात तेव्हा यहोवाचे साक्षीदार आपल्या सहमानवांना जो दयाळूपणा दाखवतात त्याविषयी कित्येकांनी ग्वाही दिली आहे.—गलतीकर ६:१०.
१६. सरकारांच्या आणि सहमानवांच्या हितासाठी यहोवाचे साक्षीदार कर्तव्यदक्षतेने कोणती चांगली कामे करतात?
१६ यहोवाच्या साक्षीदारांचे आपल्या सहमानवांवर प्रेम आहे आणि जेथे नीतिमत्त्व वास करते असे “नवे आकाश व नवी पृथ्वी” आणण्याविषयीच्या देवाच्या उद्देशाविषयी अचूक ज्ञान घेण्यास मदत करणे हे आपल्या सहमानवांसाठी करता येण्यासारखे सर्वोत्तम काम आहे असे त्यांना वाटते. (२ पेत्र ३:१३) बायबलमधील उच्च नैतिक तत्त्व शिकवण्याद्वारे आणि त्यांचे पालन करण्याद्वारे ते मानवी समाजाला एक भूषण आहेत; त्यांनी कित्येकांना समाजकंटक कृत्ये करण्यापासून वाचवले आहे. यहोवाचे सेवक कायद्यांचे पालन करतात आणि सरकारी मंत्री, अधिकारी, न्यायाधीश आणि नगर अधिकारी यांचा आदर करतात; ‘ज्यांचा सन्मान करावयाचा’ त्यांचा ते सन्मान करतात. (रोमकर १३:७) साक्षीदार आईवडील आपल्या मुलांच्या शाळेतील शिक्षकांना आनंदाने सहयोग देतात आणि आपली मुले उद्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकली पाहिजेत आणि समाजावर त्यांनी एक अनावश्यक ओझे बनू नये म्हणून ते आपल्या मुलांनाही चांगला अभ्यास करण्यासाठी मदत करतात. (१ थेस्सलनीकाकर ४:११, १२) आपल्या मंडळ्यांमध्ये साक्षीदार जातीभेद आणि वर्गभेद यांना थारा देत नाहीत आणि कौटुंबिक नातेसंबंध बळकट करण्याला ते अत्यधिक महत्त्व देतात. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; कलस्सैकर ३:१८-२१) अशारितीने, आपल्या आचरणाकरवी ते दाखवून देतात की कुटुंबविरोधी किंवा समाजाला असहयोगी असण्याविषयी त्यांच्याविरुद्ध लावलेले आरोप निराधार आहेत. प्रेषित पेत्राचे शब्द अगदी खरे ठरतात: “देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे.”—१ पेत्र २:१५.
१७. ख्रिस्तीजन कशाप्रकारे ‘बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागू शकतात’?
१७ तर मग, ख्रिस्ताचे खरे अनुयायी ‘जगाचे नसले’ तरीसुद्धा ते मानवी समाजाच्या जगात अद्यापही आहेत आणि त्यांनी ‘बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागले पाहिजे.’ (योहान १७:१६; कलस्सैकर ४:५) यहोवा देव वरिष्ठ अधिकाऱ्यांना जोपर्यंत आपला सेवक म्हणून कार्य करू देईल तोपर्यंत आपण त्यांना आदर दाखवत राहू. (रोमकर १३:१-४) राजकीय बाबतीत तर आपण तटस्थ राहतो परंतु, आपण “राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता,” विशेषतः त्यांना आपल्या उपासनेच्या स्वातंत्र्यावर परिणाम करू शकतील असे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा, त्यांच्याकरता प्रार्थना करतो. आपण पुढेही असेच करत राहू, “ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तिने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे,” ज्यामुळे ‘सर्व माणसांचे तारण होऊ शकेल.’—१ तीमथ्य २:१-४.
[तळटीपा]
a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकातील अध्याय ३५ पाहा.
उजळणी प्रश्न
◻ ख्रिस्तीजन कोणत्या ‘जगाचे’ भाग आहेत पण ते कोणत्या ‘जगाचे’ भाग असू शकत नाहीत?
◻ एखाद्या व्यक्तीच्या हातावर किंवा कपाळावर असलेल्या ‘श्वापदाच्या खुणेकरवी’ काय सूचित होते आणि यहोवाचे विश्वासू सेवक कोणत्या खुणा बाळगतात?
◻ मानवी सरकारांप्रती खऱ्या ख्रिश्चनांचा कोणता संतुलित दृष्टिकोन आहे?
◻ कोणत्या काही मार्गांनी यहोवाचे साक्षीदार मानवी समाजाच्या कल्याणाला हातभार लावू शकतात?
[१६ पानांवरील चित्र]
देवाचा सेवक आणि एक हिंस्र श्वापद या दोन्ही प्रकारे बायबल मानवी सरकारांची ओळख करून देते
[१७ पानांवरील चित्र]
इतरांप्रती मनस्वी कळकळ दाखवल्यामुळे यहोवाचे साक्षीदार त्यांच्या समाजाला एक भूषण ठरतात