यहोवाचे वचन प्रबल होते!
यहोवाचे वचन सामर्थ्याने वाढत जाऊन प्रबल झाले.”—प्रे. कृत्ये १९:२०.
१. पवित्र शास्त्रातील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील आताच्या अभ्यासात कशाची चर्चा केली जाणार?
यहोवा कार्याचे दालन उघडत होता. पौल जो “विदेशी लोकांचा प्रेषित” होता, तो या कामाचे नेतृत्व करणार होता. (रोमकर ११:१३) आम्ही प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा जो अभ्यास करीत आहोत तो आम्हाला हा प्रेषित खरेच या थरारक सुवार्तिक कार्यात केवढा तन्मयतेने गुंतला होता ते दाखवील.—प्रे. कृत्ये १६:६–१९:४१.
२. (अ) इ. स. ५० ते ५६ च्या दरम्यान पौलाने ईश्वरी प्रेरणा लाभलेला लेखक या नात्याने कशी सेवा सादर केली? (ब) देवाने पौलाच्या व इतरांच्या उपाध्यपणावर आशीर्वाद पाठविला तेव्हा काय घडले?
२ पौल हा देखील ईश्वरी प्रेरणा लाभलेला लेखक होता. इ. स. ५० ते ५६ च्या काळात त्याने १ ले व २ रे थेस्सलनीकाकरांस पत्र करिंथमधून, गलतियाचे पत्र हे त्या शहरातून किंवा सुरियाच्या अंत्युखियातून, करिंथकरांस पहिले पत्र इफिसमधून, करिंथकरांस दुसरे पत्र मासेदोनियातून, आणि रोमकरांस पत्र हे करिंथमधून लिहिले. देवाने पौलाच्या तसेच इतरांच्या उपाध्यपणास आशीर्वादित केले तसे “यहोवाचे वचन सामर्थ्याने वाढत जाऊन प्रबल झाले.”—प्रे. कृत्ये १९:२०.
आशिया ते युरोप
३. पवित्र आत्म्याने जे मार्गदर्शन दिले त्याकडे लक्ष देण्यात पौल व त्याच्या साथीदारांनी कोणते उत्तम उदाहरण मांडले?
३ पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारण्यात पौल व त्याच्या साथीदारांनी चांगले उदाहरण मांडले. (१६:६-१०) पवित्र आत्म्याकरवी दृश्य प्रकटीकरण, स्वप्न किंवा दृष्टांत यांच्या माध्यमाने त्यांना आशिया प्रांत तसेच बिथुनिया येथे प्रचारास जाण्यास मनाई केली गेली. येथे नंतर सुवार्ता पोहंचविण्यात आली. (प्रे. कृत्ये १८:१८-२१; १ पेत्र १:१, २) पण आत्म्याने त्या स्थळी जाण्यास का रोखले होते बरे? कारण त्यावेळी कामकरी थोडे होते व आत्मा त्यांना युरोपातील अधिक फलदायी क्षेत्राकडे निरवीत होता. आजही, जेथे क्षेत्रात कार्य करण्यास मज्जाव केला जातो तेथे यहोवाचे साक्षीदार इतर जागी जाऊन प्रचार करतात आणि देवाचा आत्मा त्यांना मेंढरासमान लोकांप्रत निरवील याची खात्री बाळगतात.
४. कोणी मासेदोनियाचा माणूस आपल्याला मदत मिळावी ही याचना करीत असल्याच्या दृष्टांताबाबत कोणता प्रतिसाद दाखविण्यात आला?
४ तेव्हा पौल व त्याचे साथीदार आशिया मायनर येथील मुसिया येथे ‘खाली गेले’ व तेथे त्यांनी आपले सुवार्तिक कार्य आरंभिले. तथापि, पौलाने एका दृष्टांतात कोणी मासेदोनियाचा माणूस मदतीची याचना करीत असल्याचे पाहिले. तेव्हा हे सुवार्तिक लागलेच बाल्कन द्वीपकल्पाच्या मासेदोनिया शहरात गेले. याचप्रमाणे आज, जेथे राज्य घोषकांची अधिक गरज आहे असे पवित्र आत्म्याकरवी मार्गदर्शित केले जाते तेव्हा यहोवाचे साक्षीदार तेथे जाऊन सेवा करतात.
५. (अ) यहोवाचे वचन फिलिप्पै येथे प्रबल झाले असे का म्हणता येते? (ब) आज पुष्कळ साक्षीदार लुदियासारखे आहेत हे कशाप्रकारे दिसते?
५ यहोवाचे वचन मासेदोनियात प्रबल झाले. (१६:११-१५) फिलिप्पै ही रोमी नागरिकांची वसाहत होती, येथे थोडेच यहुदी होते, पण त्यांचे सभास्थान नव्हते. यामुळे बंधुजन शहराबाहेर नदीकाठी असणाऱ्या एका ‘प्रार्थना स्थळा’कडे गेले. येथे जे लोक आढळले त्यामध्ये लुदिया ही यहुदी मतपरिवर्तन झालेली स्त्री होती, जी थुवतीरा या आशिया मायनरच्या रंगकामाविषयी प्रसिद्ध असणाऱ्या औद्योगिक शहरातून येथे आली असावी. ती जांभळी वस्त्रे किंवा रंग दिलेले कपडे विकीत असे. लुदिया व तिच्या घरच्या लोकांचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने “माझ्या घरी येऊन राहा” अशी आग्रहाची विनंति करून बंधुजनांचा पाहुणचार तत्परतेने केला असे लूक लिहितो.
एक तुरुंगाधिकारी विश्वास धरतो
६. फिलिप्पै येथे दुरात्मिक हालचालीने पौल व सीला यांना कसे बंदिवान केले?
६ फिलिप्पैमध्ये जी आध्यात्मिक वाढ झाली त्याविषयी सैतानाला क्रोध आला हे साहजिक आहे व यामुळेच त्याने दुरात्मिक हालचाली घडवून आणून पौल व सीला यांना बंदीत टाकले. (१६:१६-२४) “दैवज्ञवारे” (अक्षरशः “भूत संचार”) असलेली कोणी मुलगी पुष्कळ दिवसापासून यांचा पाठलाग करीत होती. या दुरात्म्याने, पायʹथन या सर्पाची हत्या केल्याची समज असणाऱ्या अपोलो या देवाचे प्रतिरुप धारण केले असावे. त्या मुलीने आपल्या धन्याला भाकिते सांगण्याच्या जोरावर बराच पैसा मिळवून दिला होता. तिने शेतकऱ्यांना केव्हा पेरणी करावी, मुलींना केव्हा लग्न करावे व खनिजे शोधणाऱ्यांना सोने कोठे मिळू शकेल तेही सांगितले असावे! ती या बंधूजनांच्या मागेमागे जात राहिली व मोठ्याने ओरडून म्हणत राहिलीः “ही माणसे परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात.” दुरात्म्याने तिला तसे म्हणावयास भाग पाडून असे भासविले की, तिची भाकिते खरीच ईश्वरप्रेरित आहेत. पण यहोवा व त्याने केलेल्या तारणाच्या तरतुदीविषयी घोषणा करण्याचा या दुरात्म्यांना हक्क नाही. पौल तिचे ऐकून ऐकून कंटाळला तेव्हा त्याने येशूच्या नामाने त्या दुरात्म्यास घालवून दिले. तेव्हा मुलीच्या धन्याचा धंदा चौपट झाला. त्याने पौल व सीला यांना बाजारपेठेत आणले व त्यांना काठ्यांनी मार दिला. (२ करिंथकर ११:२५) मग त्यांना तुरुंगात टाकले गेले व त्यांचे पाय खोड्यात अडकविण्यात आले. हे खोडे असे आवळीत की त्यामुळे पाय ताठ राहून मोठ्या वेदना होत.
७. फिलिप्पै येथील पौल व सीला यांचा बंदिवास कोणाला व कशाप्रकारे आशीर्वाद ठरला?
७ हा तुरुंगवास तुरुंगाधिकारी व त्याच्या कुटुंबास आशीर्वाद ठरला. (१६:२५-४०) मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत देवाची स्तुती गात होते. तो त्यांच्या समीप आहे याची त्यांना खात्री होती. (स्तोत्रसंहिता ४२:८) तेव्हा एकाएकी भूमिकंप झाला व त्यामुळे तुरुंगाचा दरवाजा उघडला गेला आणि कैद्यांची सर्व बंधने भिंतीतून किंवा तुळ्यातून निखळून पडली. सर्व कैदी सुटून पळाले असतील या भितीने तुरुंगाधिकाऱ्यापुढे मृत्युची शिक्षा चमकून गेली. तो आत्महत्या करण्याच्या बेतात होता इतक्यात पौलाने ओरडून म्हटलेः “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्व येथेच आहोत.” तेव्हा पौल व सीला यांना बाहेर आणून तुरुंगाधिकाऱ्याने त्यांना विचारले की, त्याचा बचाव कसा होऊ शकेल. “प्रभु येशूवर विश्वास ठेव.” असे उत्तर मिळाले. यहोवाचे वचन ऐकल्यावर “तो व त्याच्या सर्वांचा विलंब न लावता बाप्तिस्मा झाला.” यामुळे केवढा आनंद झाला असेल!
८. फिलिप्पैच्या मुलकी अधिकाऱ्याला कोणती हालचाल करावी लागली; आणि जर त्यांची चूक त्यांना जाहीर करावी लागली असती तर काय घडले असते?
८ पुढल्या दिवशी मुलकी न्यायाधिशाने पौल व सीला यांना सोडून द्यावे असे म्हटले. पण पौल म्हणालाः ‘आम्ही रोमी मनुष्ये असता अपराधी ठरविल्यावाचून त्यांनी आम्हास उघडपणे . . . बंदिशाळेत टाकले, आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय?’ न्यायाधिशाने आपला अपराध जाहीर केला असता तर त्यांना इतर ख्रिश्चनांना मारता व तुरुंगात टाकता आले नसते. त्यामुळे आता रोमी नागरिकांची सुटका करता येत नाही असे दिसल्यामुळे न्यायाधिशाने स्वतःच येऊन बंधूजनांना जाण्याची विनंति केली. पण हे बंधूजनांनी समविश्वासू बांधवांना उत्तेजन दिल्यानंतर केले. अशाच प्रकारची आस्था आज नियमन मंडळाचे सदस्य तसेच इतर फिरत्या देखरेख्यांना देवाच्या लोकांना जगभर भेटी देऊन त्यांना उत्तेजन देण्याची चालना देते.
थेस्सलनीका व बिरुया येथे यहोवाचे वचन प्रबल होते
९. आजही यहोवाच्या साक्षीदारांमार्फत उपयोगात आणली जात आहे अशा कोणत्या पद्धतीचा वापर करून पौलाने मशीहाला दुःख भोगावे लागणार व त्याला मृतातून उठविले जाणार याविषयी ‘उलगडा व प्रतिपादन’ केले?
९ यानंतर देवाचे वचन थेस्सलनीका येथे प्रबल झाले. (१७:१-९) येथे पौलाने यहुद्यांशी विवाद करून मशीहाला दुःख सहन करायचे तसेच मृतातून परत जिवंत व्हावयाचे होते याविषयी “उलगडा करून प्रतिपादन केले.” (पौलाने हे, भविष्यवादांची तुलना घडलेल्या घटनांसोबत करून स्पष्ट केले असावे, जे आज यहोवाचे साक्षीदार देखील करीत आहेत.) यामुळे काही यहुदी, पुष्कळ धर्मांतरीत व इतरांनी विश्वास ठेवला. काही द्वेष्ट्या यहुद्यांनी जमाव तयार केला आणि पौल व सीला यांचा शोध केला; पण ते मिळाले नाहीत तेव्हा त्यांनी यासीन व इतर बांधवांना शहराच्या अधिकाऱ्यांकडे ओढत नेले व त्यांच्यावर देशद्रोह करीत असल्याचा आरोप केला. असाच खोटा आरोप यहोवाच्या साक्षीदारांवर देखील केला जातो. पण बंधूजनांपासून “जामीन घेऊन” त्यांना मोकळे सोडण्यात आले.
१०. बिरुयातील यहुद्यांनी शास्त्रवचनांचा कोणत्या अर्थी ‘काळजीपूर्वक शोध’ घेतला?
१० यानंतर पौल व सीला बिरुया येथे गेले. (१७:१०-१५) येथे यहुद्यांनी शास्त्रवचनांचा ‘काळजीपूर्वक शोध’ घेतला; हीच गोष्ट आज यहोवाचे साक्षीदार लोकांनी करावी असे त्यांना उत्तेजन देतात. त्या बिरुयाच्या लोकांनी पौलाचा संशय धरला नाही तर येशू हा खराच मशीहा होता का याविषयी संशोधन केले. याचा परिणाम? पुष्कळ यहुदी व (धर्मांतरीत) ग्रीक लोक विश्वासी बनले. नंतर थेस्सलनीका येथून आलेल्या यहुद्यांनी जमावाला चेतविले तेव्हा बंधूजनांनी पौलाला संरक्षण देऊन समुद्राकडे आणले, जेथे त्याच्या काही साथीदारांनी पिराअस् (आजचे पिरावस्) हे अथेनै शहरालगतचे बंदर-शहर होते तेथे जाण्यासाठी जहाज धरले असावे.
यहोवाचे वचन अथेनै येथे प्रबल होते
११. (अ) पौलाने अथेनैमध्ये कशी जोरदार साक्ष दिली, पण कोण त्याच्याशी वाद घालू लागले? (ब) पौल हा “बडबड्या” आहे असे काही जण म्हणाले तेव्हा त्यांना काय वाटत होते?
११ अथेनैमध्ये जोरदार साक्ष देण्यात आली. (१७:१६-२१) पौल, येशू व पुनरुत्थान याविषयी बोलत होता तेव्हा काही तत्ववेत्त्यांनी त्याजशी विसंगत स्वरुपाची बोलणी केली. काही एपिकूरपंथी होते, ज्यांना सुखविलास आवडत होता. बाकीचे स्तोयिकपंथी होते, जे शिस्तबद्धतेवर अधिक भर देत होते. ‘हा बडबड्या काय बोलतो?’ असे काहींनी विचारले. “बडबड्या” (मुळात, दाणे घेणारा) या शब्दाचा अर्थ असा की, पौल हा दाणे गोळा करणाऱ्या पक्षासारखा होता व थोडेसे ज्ञान देत होता पण त्यात सूज्ञता दिसून येत नव्हती. इतरांनी म्हटलेः “हा परक्या देवांची घोषणा करणारा दिसतो.” हे अतिगंभीर होते, कारण याच आरोपामुळे सॉक्रेटीसला आपले जीवन गमवावे लागले. लवकरच पौलाला अरीयपगावर (मंगळाची टेकडी) नेले, जेथे अक्रोपोलिसजवळील खुल्या हवेत सर्वोच्च न्यायालय बसत असे.
१२. (अ) अरीयपग येथील पौलाच्या भाषणात चांगल्या वक्तव्याविषयीचे कोणते गुण दिसले? (ब) पौलाने देवाविषयी कोणता मुद्दा सांगितला व याचा काय परिणाम दिसला?
१२ पौलाने अरीयपगा येथे जे भाषण दिले ते, भाषणात प्रभावी प्रस्तावना, तर्कशुद्ध मांडणी आणि खात्री पटेल असा विवाद या गोष्टी कशा असतात त्याचे उत्तम उदाहरण आहे. याच गोष्टी यहोवाच्या साक्षीदारांच्या ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत शिकवण्यात येतात. (१७:२२-३४) त्याने म्हटले की, अथेनैकर हे इतरांपेक्षा अधिक धार्मिक लोक आहेत. कोणा दैवताचे विस्मरण होऊ नये म्हणून “अज्ञात देवाला” वेदीही होती! पौलाने ‘एकापासून मनुष्याची सर्व रा उत्पन्न करणाऱ्या’ निर्मात्याविषयीची माहिती देऊन म्हटले की, त्याने “त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा [जसे की, कनान्यांचे केव्हा उच्चाटन करावे] ठरविल्या” आहेत. (उत्पत्ती १५:१३-२१; दानीएल २:२१; ७:१२) या देवाला शोधता येऊ शकते, कारण “आपण त्याचा वंश आहोत,” असे पौल म्हणाला. येथे त्याने मानवाची निर्मिती यहोवा देवाने केली हे प्रतिपादन त्या काळातील अरात व क्लेन्थेस् या कवींच्या कवितेतील अवतरण उद्धृत करून स्पष्ट केले. देवाचा वंश आहोत म्हणून आपला परिपूर्ण निर्माता हा अपूर्ण मानवाने बनविलेल्या मूर्तिसारखा आहे असे कदापि वाटू देऊ नये. या अज्ञानाला देवाने एकेकाळी दुर्लक्षिले, पण आता तो मानवजातीला पश्चाताप करण्यास सांगत आहे; कारण त्याने नेमलेल्या माणसाकरवी तो लोकांचा न्याय करणार आहे. पौल “येशूविषयी सुवार्ता सांगत असे,” त्यामुळे त्याच्या श्रोत्यांनी तो न्यायधीश ख्रिस्त असल्याचे ओळखले. (प्रे. कृत्ये १७:१८; योहान ५:२२, ३०) पश्चातापाचा विषय एपिकूरपंथीयांना त्रासदायक वाटला; तर ग्रीक तत्त्ववेते अमरत्वाचे शिक्षण स्वीकारु शकत होते पण त्यांना मरण व पुनरुत्थान हा विषय पटला नाही. यामुळेच, आजच्या काळी जसे लोक दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे त्या वेळी काहींनी म्हटलेः “याविषयी आम्ही तुझे पुनः ऐकून घेऊ.” पण तेच दिओनुस्य या न्यायाधिशाने व इतरांनी विश्वास धरिला.
देवाचे वचन करिंथमध्ये प्रबल होते
१३. पौलाने उपाध्यपणातील आपला चरितार्थ कसा सांभाळला व याचे कोणते आधुनिक साम्य आपल्याला आढळते?
१३ पौल नंतर अखया प्रांताची राजधानी करिंथ येथे गेला. (१८:१-११) येथे त्याला अक्विला व प्रिस्किल्ला हे जोडपे आढळले. जे रोमी नागरिक नाहीत अशांनी रोम सोडून जावे अशी क्लौद्य कैसर याने आज्ञा काढल्यामुळे हे जोडपे येथे आले होते. या ख्रिस्ती जोडप्यासोबत मिळून पौलाने राहुट्या बांधण्याचा धंदा करून आपला चरितार्थ उपाध्यपणासोबत सांभाळला. (१ करिंथकर १६:१९; २ करिंथकर ११:९) बकऱ्यांच्या ताठ केसाचे कापड कापणे व ते शिवणे फार कठीण काम होते. याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदार प्रापंचिक कामाआधारे आपल्या भौतिक गरजा भागवतात, पण त्यांचे प्रमुख ध्येय हे उपाध्यपण हे असते.
१४. (अ) पौलाला करिंथमध्ये सारखा विरोध होत होता तेव्हा त्याने काय केले? (ब) पौलाने करिंथमध्ये राहावे याची त्याला कशी हमी देण्यात आली, पण आज यहोवाच्या लोकांना कसे मार्गदर्शित करण्यात येत आहे?
१४ पौलाने येशूच्या मशीहापदाविषयी भाष्य केले तेव्हा करिंथमधील यहुद्यांनी त्याची निंदा चालविली. यामुळे त्याने आपले झगा झटकून त्यांच्याविषयीची आपली जबाबदारी पूर्ण केली आहे असे सूचित केले आणि तीत युस्त या रोमी माणसाच्या घरी सभा घेऊ लागला. यामुळे (सभास्थानाचा पूर्वीचा अधिकारी क्रिस्प व त्याच्या घरातील लोक यासमवेत) पुष्कळ जणांनी विश्वास धरला व बाप्तिस्मा घेतला. यहुद्यांच्या वैमनस्यामुळे करिंथमध्ये राहावे की काय असा पौलाला प्रश्न पडला असावा, पण प्रभूने त्याला दृष्टांतात असे सांगितले कीः “भिऊ नको, बोलत जा; कारण मी तुजबरोबर आहे. तुझे वाईट करावयाला कोणी तुजवर येणार नाही. या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.” यामुळे पौल तेथे देवाचे वचन साधारणपणे एक वर्ष व सहा महिने सांगत राहिला. आज यहोवाच्या लोकांना दृष्टांत घडत नसले तरी प्रार्थना व पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन याद्वारे त्यांना राज्य आस्थेविषयीचे सूज्ञ निर्णय घेता येणे शक्य होते.
१५. पौलाला प्रोकॉन्सल गल्लियो याजपुढे आणण्यात आले तेव्हा काय घडले?
१५ तेव्हा यहुद्यांनी पौलाला प्रॉकोन्सल ज्युनिअस गल्लियो या अधिकाऱ्यासमोर आणले. (१८:१२-१७) त्यांनी म्हटले की, पौल हा बेकायदेशीरपणे आपली मते गाजवितो. हा असा खोटा आरोप आहे जो, आज ग्रीक धर्मपुढारी यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध घेत आहेत. तथापि, पौल नीच नव्हता आणि यहुद्यांना रोम व त्याच्या कायद्यांविषयी तितकी काळजी वाटत नव्हती हे गल्लियोला माहीत होते; यामुळेच त्याने त्यांना हाकून लावले. तेव्हा बघणाऱ्यांनी सोस्थनेस या सभास्थानाच्या नव्या अधिकाऱ्याला मार दिला, पण गल्लियोने यात हात घातला नाही; कदाचित यामुळे की, पौलाविरुद्ध जमाव उभा केलेल्या या अधिकाऱ्याला त्याच्या कृत्याचे फळ मिळत आहे.
१६. पौलाने राखलेल्या नवसाप्रमाणे आपले केस लहान करणे हे का बरोबर होते?
१६ यानंतर पौल किंख्रिया येथील बंदरातून तारवाने आशिया मायनरच्या इफिस या शहरी आला. (१८:१८-२२) या प्रवासाआधी त्याने ‘त्याचा नवस होता म्हणून आपल्या डोक्याचे केस कापले.’ पौलाने हा नवस येशूचा अनुयायी होण्याआधी केला होता किंवा तो त्या नवसाचा आरंभ किंवा शेवट होता असे काही सांगण्यात आले नाही. ख्रिस्ती लोक नियमशास्त्राच्या अधीन नाहीत, पण ते देवासमोर तसेच पवित्र होते आणि त्या नवसात पापीष्ठ असे काही नव्हते. (रोमकर ६:१४; ७:६, १२; गलतीकर ५:१८) इफिसमध्ये पौलाने यहुद्यांशी वादविवाद केला व म्हटले की, यहोवाची इच्छा असेल तर तो परत येईल. (हे अभिवचन नंतर पूर्ण झाले.) तो सुरियाच्या अंत्युखिया येथे परत गेला तेव्हा त्याची दुसरी सुवार्तिक यात्रा संपली.
यहोवाचे वचन इफिसमध्ये प्रबल होते
१७. बाप्तिस्म्याविषयी अपुल्लो तसेच इतरांना कोणत्या सूचना मिळण्याची गरज होती?
१७ पौलाने लवकरच आपली तिसरी सुवार्तिक यात्रा (सुमारे ५२-५६ इ. स. दरम्यान) आरंभिली. (१८:२३–१९:७) दरम्यान इफिसमध्ये अपुल्लोने येशूविषयी शिक्षण दिले पण त्याला केवळ नियमशास्त्र कराराविरुद्ध केल्या जाणाऱ्या पापाप्रीत्यर्थ पश्चातापाचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी त्याला “देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.” यात कदाचित त्यांनी येशूने घेतलेल्या बाप्तिस्म्याविषयीची स्पष्टता देऊन हे सांगितले असावे की, तसाच बाप्तिस्मा पाण्यात बुडवून घेतला पाहिजे व पवित्र आत्म्याची प्राप्ती झाली पाहिजे. इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्ट प्रसंगी पवित्र आत्म्याने जो बाप्तिस्मा केला गेला त्यानंतर योहानाचा बाप्तिस्मा घेतलेल्यांनी येशूच्या नामात बाप्तिस्मा घेणे जरुरीचे होते. (मत्तय ३:११, १६; प्रे. कृत्ये २:३८) नंतर इफिसमध्येच योहानाचा बाप्तिस्मा घेतलेल्या १२ यहुद्यांनी “प्रभु येशूच्या नामात बाप्तिस्मा घेतला.” हा शास्त्रवचनात एकमेव असा पुनर्बाप्तिस्म्याचा उल्लेख आहे. पौलाने त्यांच्यावर आपले हात ठेवले तेव्हा यांना पवित्र आत्मा मिळाला व सोबत अन्य भाषांत बोलणे व भविष्यकथन करणे ही दोन अद्भुत दाने प्राप्त होऊन स्वर्गीय जीवनाची स्वीकृती मिळाली.
१८. पौलाने इफिसमध्ये असताना कोठे साक्षीकार्य केले व कोणत्या परिणामासह?
१८ सुमारे ३,००,००० लोकवस्तीच्या इफिस शहरात पौलाने स्वतःला खरेपणाने कार्यमग्न ठेवले. (१९:८-१०) या शहरात असणारे अर्तमी देवीचे देऊळ हे प्राचीन जगतातील सात आश्चर्यापैकीचे एक होते. तसेच तेथील आखाड्यात २५,००० लोक बसू शकत होते. सभास्थानात पौलाने प्रमाण पटवीत ‘आग्रहाची बोलणी’ केली, पण जेव्हा लोक “त्या मार्गाची” किंवा येशू ख्रिस्तावरील विश्वासावर आधारलेल्या जीवनाक्रमणाची निंदा करू लागले तेव्हा तो तेथून चालता झाला. त्याने साधारण दोन वर्षे तुरन्नाच्या शिक्षणगृहात शिक्षण दिले. त्यामुळे “वचन” आशिया प्रांताच्या सर्व भागात पसरले.
१९. इफिसमध्ये असे काय घडले की, ज्यामुळे तेथे ‘यहोवाचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले’?
१९ देवाने पौलाला बरे करणे व भूते घालविणे याचे सामर्थ्य देऊन त्याच्या कार्याविषयीची आपली मान्यता व्यक्त केली. (१९:११-२०) पण मुख्य याजक स्किवा याच्या सात पुत्रांना येशूच्या नामाचा वापर करून भूत घालविता आले नाही; कारण ते देवाचे व ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करणारे नव्हते. त्यामुळे ते त्या भूतग्रस्ताकरवी घायाळ बनले! यामुळे लोकांना मोठे भय वाटले आणि “प्रभु येशूच्या नामाचा महिमा झाला.” ज्यांनी विश्वास धरला अशांनी आपली भूतविद्या त्यागिली आणि आपणापाशी असणारी मंत्र व जादूची पुस्तके त्यांनी जाहीरपणे जाळून टाकिली. “याप्रमाणे,” लूक लिहितो, “यहोवाचे वचन सामर्थ्याने वाढत जाऊन प्रबल झाले.” आज देखील, देवाचे सेवक लोकांना भूतविद्येपासून मुक्त करीत आहेत.—अनुवाद १८:१०-१२.
धार्मिक असहिष्णुता यशस्वी होत नाही
२०. इफिसच्या कारागिरांनी दंगल का उसळविली, व ती कशी शमली?
२० यहोवाच्या साक्षीदारांना क्रोधिष्ट जमावाचा वेळोवेळी सामना करावा लागला आहे, त्याचप्रमाणे इफिसमधील ख्रिश्चनांचेही घडले. (१९:२१-४१) विश्वास धरणाऱ्यांची संख्या वाढली तसे देमेत्रिय व इतर सोनारांचा धंदा बसला; कारण आता अर्तमी देवी, जी अनेक स्तनांनी चित्रित केलेली फलदेवता आहे असे मानले जात होते, तिच्या रुप्याच्या देव्हाऱ्यांची फारच कमी विक्री होऊ लागली होती. देमेत्रियकडून चिथावणी मिळाल्यामुळे जमावाने पौलाचा सहकारी गायस व अरिस्तार्ख यांना ओढीत नाटकगृहात आणले. पण शिष्यांनी पौलाला तेथे जाऊ दिले नाही. सण तसेच खेळाच्या अधिकाऱ्यांनी त्याला विनंति केली की त्याने तेथे जाऊ नये. साधारण दोन तास जमाव “इफिसकरांची अर्तमी थोर” अशा घोषणा देत राहिला. सरतेशेवटी नगराचा शिरस्तेदार (जो मुलकी सरकारचे नेतृत्व करीत असे) म्हणाला की, कारागीर आपला दावा न्यायालयात न्यायधिशांपुढे मांडू शकतात; किंवा त्यांचे प्रकरण हे “कायदेशीर सभेत” देखील प्रविष्ट होऊ शकते. नाहीतर, हा जमाव दंगल व बंड करण्याच्या मिषाने जमला आहे असा त्यांच्यावर आरोप येऊ शकेल. असे बोलून त्याने सर्वांना पांगविले.
२१. देवाने पौलाचे कार्य कसे आशीर्वादित केले, आणि तो यहोवाच्या साक्षीदारांचे आजचे कार्य कसे आशीर्वादित करीत आहे?
२१ देवाने पौलाला विविध परिक्षांचा सामना करण्यामध्ये मदत दिली व लोकांनी धार्मिक चुकांचा त्याग करून सत्याला कवटाळावे म्हणून त्याने जे प्रयत्न केले ते देवाने आशीर्वादित केले. (पडताळा यिर्मया १:९, १०.) आजही आमचा स्वर्गीय पिता आमच्या कामावर आशीर्वाद देत आहे याविषयी आम्ही केवढे कृतज्ञ आहोत! यामुळे, पहिल्या शतकाप्रमाणेच आताही ‘यहोवाचे वचन वाढत जाऊन प्रबल होत आहे.’
तुम्ही काय उत्तर देणार?
◻ पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घेण्याच्या बाबतीत पौलाने कसले उदाहरण मांडले?
◻ आज अद्याप यहोवाच्या सेवकांकरवी जी पद्धत वापरली जाते तिच्याच माध्यमाने पौलाने कसा ‘उलगडा व प्रतिपादन’ केले?
◻ पौलाने अरीयपग येथे दिलेल्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद व यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचारकार्यात मिळत असलेला प्रतिसाद यात कोणते साम्य दिसते?
◻ पौलाने उपाध्यपणात आपला चरितार्थ कसा चालविला, आणि याची कोणती आधुनिक समांतरता मिळते?
◻ देवाने पौलाचे कार्य आशीर्वादित केले तसेच तो यहोवाच्या साक्षीदारांचे आजचे कार्यही कसे आशीर्वादित करीत आहे?
[२६, २७ पानांवरील चित्रं]
यहोवाचे वचन येथे प्रबल झाले
१. फिलिप्पै
२. व ३. अथेनै
४. व ६. इफिस
५. रोम