राज्य घोषकांचा वृतान्त
देव वचनाची परिवर्तन शक्ती
त्याने स्वतः कबूल केल्याप्रमाणे, तो “निंदक, छळ करणारा व जुलमी” होता. (१ तीमथ्य १:१३) परंतु तो बदलला! प्रेषित पौलाचे परिवर्तन इतके मोठे होते, की नंतर तो असे घोषित करू शकला: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.”—१ करिंथकर ११:१.
आज, जगभरातील शेकडो हजारो प्रांजळ उपासक अशाच प्रकारचे बदल करीत आहेत. असे करण्यास त्यांना कशामुळे शक्य होते? ते देव वचनाचे ज्ञान आत्मसात करीत आहेत आणि त्याचा अवलंब स्वतःच्या जीवनांत करीत आहेत. खालील अनुभव देव वचनाच्या परिवर्तन शक्तीवर जोर देतो.
स्लॉव्हेनियामधील एका गावाच्या बाहेर एकांतवासात वृद्ध दांपत्य राहत होते. पतीचे नाव योझ होते. त्याचे वय वर्षे ६० असून तो मद्यपानाच्या तीव्र समस्येने ग्रस्त होता. तरी देखील तो आपल्या आजारी पत्नीची, ल्युडमिलॉची काळजी घेत असे. एके दिवशी दोन राज्य घोषक योझकडे आले. त्याने साक्षीदारांना घरात बोलावले, तेथे त्यांची भेट त्याच्या पत्नीबरोबर झाली. राज्य संदेश ऐकल्यानंतर ल्युडमिलॉच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू ओघळू लागले. साक्षीदारांनी जे काही सांगितले ते योझला देखील आवडले आणि त्याने अनेक प्रश्नही विचारले. या जोडप्यास काही बायबल साहित्य दिल्यानंतर साक्षीदार तेथून परतले.
एका महिन्यानंतर साक्षीदार त्यांच्याकडे परत गेले तेव्हा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक तेथील मेजावर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपणास हे पुस्तक कोठून मिळाले, असे विचारल्यानंतर योझने म्हटले: “तुम्ही मला दिलेल्या नियतकालिकांपैकी एकाच्या मागील पृष्ठावर मी एक जाहिरात पाहिली. म्हणून मी झाग्रेबमधील तुमच्या दफ्तराला लिहिले आणि या पुस्तकासाठी विनंती केली.” योझची ही आस्था पाहून, राज्य सभागृहामध्ये होणाऱ्या ख्रिस्ताच्या स्मारक विधीला उपस्थित राहण्याचे त्याला आमंत्रण देण्यात आले. तो आल्यानंतर साक्षीदारांना आनंद झाला नसेल तर नवलच!
लवकरच बायबल अभ्यासाची सुरवात करण्यात आली आणि त्याने चांगली प्रगतीही केली. उदाहरणार्थ, “आपल्यासाठी कोरीव मूर्ति करू नको; . . . त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको,” असे योझला बायबलमधून दाखविण्यात आल्यानंतर त्याने लगेच आपल्या घरात असणाऱ्या धार्मिक प्रतिमांसहित सर्व मूर्तींना गोळा करून घराबाहेर काढले.—निर्गम २०:४, ५.
योझची आध्यात्मिक सत्यासाठी असणारी तहान शमविण्यात येत होती. तथापि, दुर्दैवाची बाब म्हणजे, त्याला अद्यापही एका दुसऱ्याच गोष्टीची तहान होती. जवळजवळ १८ वर्षांपासून, तो प्रतिदिन सुमारे सात लीटर मद्य पीत होता. त्याच्या या पिण्याच्या समस्येमुळे तो स्वतःच्या व्यक्तिगत स्वरूपाकडे विशेष लक्ष देत नसे. परंतु मद्याच्या गैरवापराविषयी यहोवाचा दृष्टिकोन जाणल्यानंतर त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्धार केला.
आपण दररोज किती मद्य पीत आहोत, याची नोंद ठेवण्याद्वारे स्वतःच्या पिण्याच्या समस्येवर हळूहळू मात करण्याचा त्याने प्रयत्न केला. लवकरच तो मद्याच्या व्यसनातून मुक्त झाला. ख्रिश्चनांकडून व्यक्तिगत स्वच्छता राखण्याची अपेक्षा केली जाते, हे देखील तो त्याच्या बायबल अभ्यासाच्या दरम्यान शिकला. यास्तव त्याने साक्षीदारांना पैसे दिले आणि असे म्हटले: “जा आणि ख्रिस्ती सभा तसेच क्षेत्र कार्याकरिता साजेसे कपडे माझ्यासाठी घेऊन या!” साक्षीदारांनी त्याच्यासाठी अंडरवेअर, सॉक्स, बूट, शर्ट, सूट, टाय आणि ब्रिफकेस वगैरे गोष्टी आणल्या.
एक वर्ष बायबलचा अभ्यास केल्यानंतर, घरोघरच्या प्रचार कार्यात साक्षीदारांना सोबत देण्यासाठी योझ आणि ल्युडमिलॉ पात्र ठरले. देवाला समर्पणाचे प्रतीक म्हणून यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनात त्यांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. वार्धक्य आणि ढासळती प्रकृती असताना देखील योझने सुवार्तेच्या प्रचारात नियमितपणे सहभाग घेतला; मे १९९५ मध्ये आपला मृत्यू होईपर्यंत त्याने मंडळीमध्ये सेवा-सेवक म्हणून विश्वासूपणे कार्य केले. हा नम्र मनुष्य आणि त्याची पत्नी यांच्या जीवनांत निर्माण झालेली सकारात्मक फळे देव वचनाच्या परिवर्तन शक्तीची ग्वाही देतात!