प्रकाश एका अंधकारमय युगास संपुष्टात आणतो
येशू ख्रिस्त व त्याच्या प्रेषितांचे जग इब्री शास्त्रवचनाच्या काळांपेक्षा फार निराळे होते. याबाबतीत अनभिज्ञ असलेले बायबलचे वाचक, संदेष्टा मलाखीपासून शुभवर्तमान लेखक मत्तयापर्यंत, सामाजिक व धार्मिक अखंडत्वाची कल्पना करतील व असे करतेवेळी, त्यांना या ४०० वर्षांत काय घडले याची केवळ पुसट समज असेल.
आजच्या अधिकांश बायबलमधील इब्री शास्त्रवचनांचे शेवटले पुस्तक मलाखी, बाबेलोनमधील दास्यत्वातून मुक्त झाल्यानंतर इस्त्राएलचे शेष त्यांच्या मायभूमीत पुन्हा स्थावरतात, तेथे संपते. (यिर्मया २३:३) निष्ठावान यहुद्यांना, दुष्ट जगाचा नाश करण्यासाठी व मशीही युगाची सुरवात करण्यासाठी देवाच्या न्यायाच्या दिवसाची वाट पाहण्यास प्रोत्साहित केले होते. (मलाखी ४:१, २) या दरम्यान, पारसने राज्य केले. यहुद्यात वस्ती केलेल्या पारसच्या सैन्याने, शांती राखली व शस्त्रांच्या जोरावर शाही हुकुमांचे समर्थन केले.—पडताळा एज्रा ४:२३.
तथापि, बायबल प्रदेश पुढील सबंध चार शतकांदरम्यान स्थिर राहिले नाहीत. आध्यात्मिक अंधकार व गोंधळ आगंतुकपणे प्रवेश करू लागले. जवळचे पौर्वात्य देश हिंसा, दहशतवाद, दडपशाही, मूलगामी धार्मिक विचारसरणी, तर्कावर अधिष्ठित असलेले तत्त्वज्ञान व सांस्कृतिक धक्क्याने हादरुन गेले होते.
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पहिले पुस्तक मत्तय, एका वेगळ्या युगात लिहिण्यात आले होते. रोमी सैन्यांनी पॅक्स रोमॅना, किंवा रोमी शांती अंमलात आणली. श्रद्धाळू लोकांनी, दुःख, जुलूम व दारिद्र्याचा अंत करण्यासाठी तसेच जीवन, समृद्धी व शांतता यांवर प्रकाश टाकण्यासाठी मशीहाच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहिली. (पडताळा लूक १:६७-७९; २४:२१; २ तीमथ्य १:१०.) येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच्या शतकांमध्ये, यहुदी समाजाची पुनर्रचना करणाऱ्या जोरदार शक्तींकडे आपण अधिक जवळून पाहू या.
पर्शियन काळातील यहुदी जीवन
सा. यू. पू. ५३७ या वर्षी, यहुद्यांना बाबेलोनी दास्यत्वातून सुटका करून देणाऱ्या कोरेशच्या घोषणेनंतर, यहुदी व गैर-यहुदी संबंधितांच्या एका समुदायाने बाबेलोनिया सोडले. हा आध्यात्मिकरीत्या प्रतिक्रियाशील शेष, नष्ट केलेले नगर व ओसाड केलेल्या जमिनींच्या राष्ट्रात परतला. अदोमी, फिनिशियन, शोमरोनी, अरबी जमाती व इतरांनी, इस्राएलच्या एके काळच्या विस्तीर्ण क्षेत्रावर कब्जा करून ते कमी केले होते. यहुदा व बन्यामीनचे जे काही शिल्लक राहिले होते, त्यातून ऑबॉर नॉहॉरॉ (नदीच्या पलीकडे) म्हटलेल्या पर्शियन इलाख्यातील यहुदाचा प्रांत निर्माण झाला.—एज्रा १:१-४; २:६४, ६५.
यहुदी धर्माचा केंब्रिज इतिहास (इंग्रजी) हा ग्रंथ म्हणतो, की पर्शियन सत्तेच्या अधीन असताना यहुदा, “विस्तार व लोकसंख्येतील वाढीचा काळ” अनुभवू लागला. जेरूसलेमेविषयी तो पुढे म्हणतो: “शेतकरी व यात्रेकरुंनी भेटवस्तू आणल्या, मंदीर व नगर वैभवी बनले आणि या धनसंपदेने परदेशी व्यापारी व कारागीरांना आकर्षित केले.” स्थानीय सरकार व धर्म यांबद्दल पर्शियन लोक फार सहिष्णू असले तरीसुद्धा, कराधान फार भारी होते व ते केवळ मौल्यवान धातूंच्या रुपातच चुकते करता येत होते.—पडताळा नहेम्या ५:१-५, १५; ९:३६, ३७; १३:१५, १६, २०.
इलाखाधिपतींच्या बंडांनी वैशिष्ठ्यपूर्ण बनलेल्या पर्शियन सत्तेच्या शेवटल्या वर्षांचा काळ फारच गोंधळाचा होता. भूमध्य किनारपट्टीवर घडलेल्या एका बंडात, अनेक यहुदी सामील झाले, व त्यांना हद्दपार करून दूरवर उत्तरेकडे, कॅस्पीयन समुद्रावरील हिरकेनियाला पाठवण्यात आले. तथापि, यहुदीयाचा पुष्कळसा भाग, पर्शियाच्या दण्डात्मक प्रतिक्रियेने प्रभावित झाला असे दिसत नाही.
ग्रीकांचा काळ
सम्राट ॲलेक्झँडर सा. यु. पू. ३३२ या वर्षी, मध्यपूर्वेत एखाद्या चित्त्यासारखा प्रकट झाला, परंतु ग्रीसमधून आयात झालेल्या मालाबद्दलची आवड, तो येण्याआधीच निर्माण झाली होती. (दानीएल ७:६) ग्रीक संस्कृतीला राजनैतिक महत्त्व आहे, याची जाणीव असल्यामुळे, तो मुद्दामहून त्याच्या विस्तार पावत असलेल्या राज्याचे हेल्लेणीकरण करण्यास निघाला. ग्रीक आंतरराष्ट्रीय भाषा बनली. ॲलेक्झँडरच्या अल्पकालीन कारकीर्दीने फसव्या युक्तिवादाबद्दल प्रेम, खेळांप्रती उत्साह व सौंदर्यवादाविषयी गुणग्राहकतेला चालना दिली. हळूहळू, यहुदी परंपरासुद्धा, ग्रीक संस्कृतीला बळी पडली.
सा. यु. पू. ३२३ मध्ये ॲलेक्झँडरच्या मृत्यूनंतर, सिरिया व इजिप्तमधील त्याचे उत्तराधिकारी, “उत्तरेचा राजा” व “दक्षिणेचा राजा” असे संदेष्टा दानीएलाने संबोधलेल्या भूमिका बजावणारे पहिलेच होते. (दानीएल ११:१-१९) इजिप्तचा “दक्षिणेचा राजा” दुसरा टॉलमी फिलडेल्फस (सा. यु. पू. २८५-२४६) याच्या कारकीर्दीत, इब्री शास्त्रवचने कोइनी, सामान्य ग्रीकमध्ये भाषांतरीत करण्यास सुरवात झाली. या भाषांतरास सेप्टुएजिन्ट म्हणण्यात आले. यातील अनेक वचने ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत उद्धृत करण्यात आली होती. आध्यात्मिकरीत्या गोंधळलेल्या व अंधारलेल्या जगास, अर्थबोधाच्या प्रकाशमय छटा देऊ करण्यासाठी ग्रीक भाषा उत्कृष्ट ठरली.
चौथा अँटिओकस इपिफनीज, सिरीयाचा राजा व पॅलेस्टाईनचा अधिपती (सा. यु. पू. १७५-१६४) झाल्यावर, शासनाद्वारे चालविण्यात आलेल्या छळामुळे, यहुदी धर्म जवळजवळ नष्टच झाला होता. मृत्यूचा धाक दाखवून, यहुद्यांना यहोवा देवाचा त्याग करण्यास व केवळ ग्रीक देवतांना यज्ञ अर्पण करण्यास भाग पाडण्यात येत होते. सा. यु. पू. १६८ च्या डिसेंबर महिन्यात, जेरूसलेमेच्या मंदिरातील यहोवाच्या महान वेदीवर एक मूर्तिपूजक वेदी बांधण्यात आली व तिजवर ऑलम्पियन झ्यूसला यज्ञ अर्पण करण्यात आली. ग्रामीण भागातील हादरून गेलेले परंतु धैर्यवान पुरुष, जूडस मॅकबीजच्या नेतृत्वाखाली एकत्रित झाले व जेरूसलेम जिंकेपर्यंत त्यांनी झुंजार युद्ध लढले. मंदीर पुन्हा देवाला समर्पित करण्यात आले व ते भ्रष्ट करण्यात आले होते त्यानंतर बरोबर तीन वर्षांनी, रोजची यज्ञार्पणे पुन्हा सुरू करण्यात आली.
ग्रीकांच्या राहिलेल्या काळात, यहुदी समाजातील लोकांनी, त्यांचे क्षेत्र त्याच्या प्राचीन हद्दींपर्यंत विस्तारित करण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न केले. त्यांनी नुकताच घडविलेला लष्करी पराक्रम, तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या मूर्तिपूजक शेजाऱ्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडण्यासाठी एका अभक्त मार्गाने उपयोगात आणण्यात आला. तरीसुद्धा, ग्रीक राजनैतिक सिद्धांत, शहर व नगरांवर प्रभुत्व गाजवतच राहिला.
या काळांत, मुख्य याजकपदासाठी चढाओढ करणारे सहसा भ्रष्टाचारी होते. कारस्थाने, विश्वासघाती खून व राजनैतिक गुप्त मसलतींनी त्यांचे पद कलंकित केले. यहुद्यांमधील आत्मा जितका अधिक अभक्त बनला, ग्रीक खेळ तितके अधिक लोकप्रिय बनले. खेळांत भाग घेण्यासाठी, तरुण याजकांना आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करताना पाहणे केवढे आश्चर्याचे होते! विवस्त्र स्थितीत विदेश्यांसोबत स्पर्धेत भाग घेताना लाजिरवाणे वाटू नये म्हणून, यहुदी खेळाडू ‘सुंता न झालेले’ होण्यासाठी कष्टमय शस्त्रक्रियासुद्धा सहन करीत होते.—पडताळा १ करिंथकर ७:१८.
धार्मिक बदल
बंदिवासानंतरच्या काळातील सुरवातीच्या वर्षांत, विश्वासू यहुद्यांनी, मूर्तिपूजक विचार व तत्त्वज्ञानाचा, इब्री शास्त्रवचनांत प्रकट केलेल्या खऱ्या धर्मासोबत मिलाप होऊ दिला नाही. पर्शियासोबत ६० पेक्षा अधिक वर्षे निकट संबंध राखल्यानंतर लिहिण्यात आलेल्या एस्तेर या पुस्तकात पारशी धर्माचा किंचितही उल्लेख नाही. तसेच, पर्शियन काळाच्या (सा. यु. पू. ५३७-४४३) सुरवातीला लिहिण्यात आलेल्या एज्रा, नहेम्या किंवा मलाखी या बायबल पुस्तकांतसुद्धा या पर्शियन धर्माचा कोणताही प्रभाव आढळत नाही.
तथापि, विद्वानांचा समज आहे, की पर्शियन काळाच्या उरलेल्या भागात अनेक यहुदी, मुख्य पर्शियन देवता, अहूरा माजदाच्या भक्तांचे विचार स्वीकारू लागले. एस्सेन लोकांत प्रचलित असलेले अंधविश्वास व समजुतींत हे पाहायला मिळते. कोल्हे व वाळवंटात राहणारे इतर जीव तसेच निशाचर पक्षांसाठी असलेले सामान्य इब्री शब्द यहुद्यांच्या मनांत, बाबेलोनी व पर्शियन लोककथांतील दुष्टात्मे व रात्रीच्या राक्षसांसोबत जोडण्यात येऊ लागले.
यहुदी लोक, मूर्तिपूजक कल्पनांकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहू लागले. स्वर्ग, नरक, जीव, शब्द (लोगोस) व सुज्ञता सर्वांना नवीन अर्थ आला. तेव्हा शिकविण्यात येत होते त्याप्रमाणे, जर मानवांशी संपर्क न करण्याइतपत देव दूर होता तर मग त्याला मध्यस्थांची गरज होती. मध्यस्थी व रक्षण करणाऱ्या या आत्म्यांना ग्रीक लोक डायमोन्स म्हणत होते. डायमोन्स (दुरात्मे) चांगले किंवा वाईट असू शकतात ही कल्पना स्वीकारल्यामुळे, यहुदी लोक दुरात्मिक नियंत्रणास सहजगत्या बळी पडले.
एका उभारणीकारक बदलामध्ये स्थानीय उपासना समाविष्ट होती. यहुदी लोकांच्या जवळपासच्या मंडळ्या धार्मिक शिक्षण व उपासनेसाठी भेटू शकतील, अशी सभास्थाने निर्माण झाली. यहुदी सभास्थाने नेमकी केव्हा, कोठे व कशी अस्तित्वात आली हे ज्ञात नाही. दूरच्या देशातील यहुदी लोक उपासनेसाठी मंदिरात जाऊ शकत नव्हते अशा वेळेस सभास्थाने त्यांच्या गरजा पूर्ण करत असल्यामुळे, सामान्यपणे असे समजले जाते, की ही सभास्थाने बंदिवासाच्या किंवा बंदिवासानंतरच्या काळात प्रस्थापित झाली असावीत. विशेषपणे, ती येशू व त्याच्या शिष्यांसाठी, ‘ज्याने लोकांस अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध’ करण्यासाठी चांगली सभागृहे ठरली.—१ पेत्र २:९.
यहुदी धर्माने विविध वैचारिक पंथाना कवटाळले
सा. यु. पू. दुसऱ्या शतकात, विविध वैचारिक पंथ उगवू लागले. या वेगळ्या धार्मिक संघटना नव्हत्या. त्याउलट, त्या यहूदी धर्माच्या छायेखाली लोकांना प्रभावीत करू पाहणाऱ्या आणि राष्ट्राला ताब्यात घेऊ पाहणाऱ्या लहान संघटना होत्या ज्यामध्ये यहुदी पाळक, तत्त्वज्ञानी आणि राजनैतिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
राजनितीकरण झालेले सदूकी, मुख्यतः श्रीमंत उच्चकुलीन लोक होते, जे सा. यु. पू. दुसऱ्या शतकाच्या मध्यात झालेल्या हॅस्मोनियन बंडापासून, त्यांच्या कुशल राजकारणासाठी प्रसिद्ध होते. त्यांतील अधिकांश लोक याजक होते, तथापि, काही व्यापारी व जमीनदार होते. येशूचा जन्म झाला तोपर्यंत, अधिकतर सदूकी लोकांनी पॅलेस्टाईनच्या रोमी शासनास पसंती दाखवली, कारण ते अधिक स्थिर होते व ते विद्यमान स्थिती टिकवून ठेवील अशी शक्यता आहे असे त्यांस वाटे. (पडताळा योहान ११:४७, ४८.) अल्पसंख्यांक लोक (हेरोदी) असे समजत होते, की हेरोदच्या कुटुंबाचे शासन राष्ट्रीय मताला अधिक अनुकूल असेल. ते काहीही असले, तरीही यहुदी धर्मवेड्यांच्या हातात राष्ट्र असावे किंवा याजकांशिवाय इतर कोणीही मंदिरावर नियंत्रण करावे हे सदूकी लोकांना नको होते. सदूकी समजूती पारंपारिक होत्या, त्या प्रामुख्याने मोशेच्या लिखाणांवर आधारित व परुशांच्या शक्तिशाली पंथाविषयी त्यांचा विरोध प्रतिबिंबित करणाऱ्या होत्या. (प्रेषितांची कृत्ये २३:६-८) सदूकी लोकांनी, इब्री शास्त्रवचनांतील भविष्यवाण्यांना अंदाज समजून त्यांना नाकारले. बायबलची ऐतिहासिक, काव्यात्मक व नीतिसूत्रांची पुस्तके प्रेरित नसून, अनावश्यक होती असे त्यांनी शिकविले.
ग्रीकांच्या काळात, यहुदी-विरोधक ग्रीक संस्कृतीच्या विरोधात एक जोमदार प्रतिक्रिया या नात्याने परुश्यांचा उदय झाला. परंतु येशूच्या दिवसापर्यंत, ते ताठर, परंपरेने जखडलेले, कायद्याचे पुजारी, अहंकारी, आत्मगुणनिष्ठ असे, यहुदी मतानुसारी घडविणारे व शिक्षक होते जे सभास्थानातील मार्गदर्शनामार्फत राष्ट्राला नियंत्रित करू पाहत होते. ते मुख्यतः मध्यम वर्गातून आलेले होते व सामान्य लोकांचा तिरस्कार करीत होते. येशूच्या नजरेत अधिकांश परुशी स्वार्थी व दांभिकता दाखवणारे दयाहीन, पैशाचे लोभी होते. (मत्तय, अध्याय २३) त्यांनी संपूर्ण इब्री शास्त्रवचनांचा त्यांच्या स्वतःच्या स्पष्टीकरणांनुसार स्वीकार केला परंतु, त्यांनी त्यांच्या मौखिक परंपरेस समान अथवा त्याहूनही अधिक महत्त्व दिले. त्यांच्या परंपरा “नियमशास्त्राभोवती एक कुंपण” होते असे ते म्हणाले. तथापि, कुंपण असणे तर दूरच पण त्यांच्या परंपरांनी देवाच्या वचनाला रद्द केले व जनतेला गोंधळात टाकले.—मत्तय २३:२-४; मार्क ७:१, ९-१३.
एस्सेन लोक काही थोड्या विलग वसाहतींत राहणारे गूढवादी होते. ते स्वत:ला शुद्ध अवस्थेत मशीहाची वाट पाहणारे इस्राएलचे खरे शेष समजत होते. एस्सेन लोक पवित्र तपश्चर्येचे विचारशील जीवन जगले व त्यांच्या अनेक समजुतींनी पर्शियन व ग्रीक मते प्रतिंबिंबित केली.
विविध प्रकारचे धार्मिकपणे प्रेरित, धर्मांधरित्या राष्ट्रप्रेमी असलेले अतिउत्साही लोक, स्वतंत्र यहुदी राष्ट्रत्वाच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला खुनशीपणे शत्रू समजत होते. त्यांना हॅस्मोनियन लोकांची उपमा देण्यात आली आहे व त्यांनी मुख्यत्वे आदर्शवादी, साहसप्रिय तरुण पुरुषांना आकर्षित केले. त्यांना दरोडेखोर-खूनी किंवा विरोधक लढवैय्ये समजले गेले व त्यांनी गनिमी डावपेचांचा उपयोग केला ज्यामुळे गावांतील रस्ते व सार्वजनिक चौक धोकादायक बनले आणि त्या दिवसातील तणावांत आणखी भर पडली.
इजिप्तमध्ये, ॲलेक्झँड्रियन यहुद्यांत ग्रीक तत्त्वज्ञान भरभराटीस आले. तेथून ते पॅलेस्टाईन व डायस्पोराच्या सर्वत्र विखुरलेल्या यहुद्यांत पसरले. ॲपोक्रिफा व स्यूडेपिग्रफा लिहिणाऱ्या यहुदी सिद्धांतवाद्यांनी, मोशेचे लिखाण संदिग्ध नीरस अन्योक्त्या असल्याचे प्रतिपादित केले.
रोमी युग येईपर्यंत, हेल्लेणीकरणाने पॅलेस्टाईनला सामाजिकरित्या, राजनैतिकदृष्ट्या व तात्त्विकरित्या कायमचे परिवर्तित केले होते. यहुद्यांच्या बायबलधर्माची जागा यहुदी धर्माने घेतली जो काहीशा प्रमाणात शास्त्रवचनीय सत्य सम्मिलित असलेल्या बाबेलोनी, पर्शियन व ग्रीक मतांचा मिलाफ होता. तथापि, राष्ट्राचा ७ पेक्षा कमी टक्के भाग सदूकी, परुशी व एस्सेन लोक या सर्वांचा मिळून बनला होता. ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले व पांगलेले’ सर्वसामान्य यहुदी लोक या विरोधक शक्तींच्या दलदलीत सापडले.—मत्तय ९:३६.
त्या अंधारलेल्या जगात येशू ख्रिस्ताने पाऊल ठेवले. त्याचे दिलासा देणारे आमंत्रण सांत्वनदायक होते: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्तय ११:२८.) “मीच जगाचा प्रकाश आहे,” असे त्याला म्हणताना ऐकणे केवढे आनंदविणारे होते! (योहान ८:१२) तसेच “जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील” हे त्याचे पुलकित करणारे अभिवचन खरोखर आल्हादक होते.—योहान ८:१२.
[२६ पानांवरील चित्रं]
येशूने दाखविले की यहुदी धार्मिक पुढारी आध्यात्मिक अंधकारात होते
[२८ पानांवरील चित्रं]
चौथा अँटिऑकस (इपिफिनीज) ची प्रतिमा असलेले नाणे