मक्काबी कोण होते?
अनेक लोकांकरता मक्काबी लोकांची कारकीर्द विमानातील ब्लॅक बॉक्सप्रमाणे आहे. हिब्रू शास्त्रवचनांतील शेवटचे पुस्तक पूर्ण होण्याचा आणि येशू ख्रिस्त येण्यापूर्वीचा काळ मक्काबी लोकांचा होता. विमानाच्या दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्सचा अभ्यास केल्याने काही माहिती प्राप्त होते त्याप्रमाणेच मक्काबी लोकांच्या कारकीर्दीचा अभ्यास केल्यानेही पुष्कळ काही माहिती प्राप्त होऊ शकते. मक्काबी लोकांचा काळ म्हणजे यहुदी राष्ट्रातील परिवर्तन किंवा रूपांतर.
मक्काबी कोण होते? भाकीत केलेला मशीहा येण्यापूर्वी त्यांचा यहुदी लोकांवर कसा प्रभाव पडला?—दानीएल ९:२५, २६.
ग्रीक संस्कृतीचा वाढता प्रभाव
सम्राट ॲलेक्झँडर याने ग्रीसपासून ते भारतापर्यंत सर्व प्रदेश पादाक्रांत केला होता. (सा.यु.पू. ३३६-३२३) त्याच्या या प्रचंड राज्यामुळे ग्रीक भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार झाला. ॲलेक्झँडरच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी तिथल्या स्त्रियांसोबत विवाह केला आणि अशाप्रकारे परदेशी आणि ग्रीक संस्कृतींचा मिलाफ झाला. ॲलेक्झँडरच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य त्याच्या चार सेनापतींमध्ये विभागले गेले. सा.यु.पू. दुसऱ्या शतकाच्या सुरवातीला सिरियाच्या सैल्युसीड या ग्रीक राजघराण्यातून आलेल्या ॲन्टिअकस तिसरा याने टोलिमीस राजघराण्याकडून इस्राएली लोकांचा ताबा काढून स्वतःकडे घेतला. इस्राएलमध्ये या ग्रीक राज्याचा यहुदी लोकांवर कसा प्रभाव पडला?
एक इतिहासकार असे लिहितो: “यहुदी लोकांच्या अवतीभोवती बहुतेक ग्रीक लोकच होते; शिवाय त्यांच्या स्वतःच्या बांधवांशी त्यांचा जास्त संपर्क नसल्यामुळे ग्रीक संस्कृती आणि विचारसरणी यांपासून अलिप्त राहणे त्यांच्याकरता जवळजवळ कठीण होते. . . . ग्रीक संस्कृतीची हवा इतकी जबरदस्त होती, की त्या हवेत श्वास घेताना यहुदी लोक एका अर्थाने ती संस्कृती स्वतःत सामावून घेत होते!” यहुदी लोकांनी आपली नावे बदलून ग्रीक नावे लावली. कमी-जास्त प्रमाणात त्यांनी ग्रीक चालिरीती आणि पोषाख आपलेसे केले. अशारीतीने यहुदी लोक नकळत ग्रीक संस्कृतीत विलीन होत चालले होते.
याजकांची नीतिभ्रष्टता
ग्रीक लोकांचा अगदी सहज प्रभाव यहुद्यांमध्ये विशेष कोणावर पडला असेल तर तो याजकांवर. त्यांच्यापैकी अनेकांचा असा विश्वास होता, की ग्रीक संस्कृतीचा स्वीकार करणे म्हणजे काळानुरूप यहुदी धर्मात प्रगती करणे. अशा विचारसरणीचा एक यहुदी मनुष्य होता. त्याचे नाव जेसन (हिब्रूमध्ये यहोशवा) होते आणि तो ओनिया तिसरा या महायाजकाचा भाऊ होता. ओनिया अँटिओखमध्ये असताना जेसनने ग्रीक अधिकाऱ्यांना लाच दिली. लाच देण्याचे कारण? ओनियाचे महायाजकाचे पद आपल्याला मिळावे असे त्याला वाटत होते. ग्रीक सैल्युसीड शास्ता ॲन्टिअकस एपीफन्स (सा.यु.पू. १७५-१६४) याने ही लाच लगेच स्वीकारली. यापूर्वी ग्रीक अधिकाऱ्यांनी यहुदी महायाजकांना नेमण्याच्या कामात केव्हाही हस्तक्षेप केला नव्हता, पण ॲन्टिअकसला लढायांकरता पैशांची आवश्यकता होती. शिवाय ग्रीक धर्म आणि संस्कृतीचा आणखी प्रसार करील असा यहुदी नेता मिळाल्यामुळेही त्याला आनंद झाला होता. जेसनच्या विनंतीवरून ॲन्टिअकसने जेरुसलेमला ग्रीक शहराचा (पोलीस) दर्जा दिला. जेसनने एक व्यायामशाळाही सुरू केली तेथील तरुण यहुदी आणि याजक सुद्धा वेगवेगळ्या खेळांत भाग घेत.
ठकास महाठक भेटतो तसा प्रकार घडला. तीन वर्षांनंतर मैनलेस याजकवंशातून आलेला नसतानाही त्याने जेसनपेक्षा जास्त लाच देऊन याजकपदाची मागणी केली. जेसनला तेथून पलायन करण्याशिवाय मार्ग उरला नाही. ॲन्टिअकसला लाच देण्याकरता मैनलेसने मंदिराच्या कोशातून मोठी रक्कम घेतली होती. या गोष्टीच्या विरुद्ध ओनियास तिसरा (अँटिओखमधील) याने तोंड उघडले तेव्हा मैनलेसने त्याची हत्या करण्याचा कट रचला.
ॲन्टिअकस मरण पावला अशी अफवा पसरली तेव्हा जेसन हजार माणसांना सोबत घेऊन जेरुसलेमला परतला; मैनलेसपासून महायाजकपद परत घेण्याचा त्याचा विचार होता. पण ॲन्टिअकस अद्यापही जिवंत होता. जेसनच्या कारवाया ॲन्टिअकसच्या कानावर आल्या आणि त्याला जेव्हा हे कळाले, की यहुदी लोक त्याच्या ग्रीसवादाचा विरोध करत आहेत तेव्हा जेसनविरुद्ध तो सुडाने पेटला.
ॲन्टिअकस कारवाई करतो
द मैक्कबीज या आपल्या पुस्तकात मोश पर्लमन लिहितो: “अहवाल स्पष्ट करत नसले तरी, कदाचित ॲन्टिअकस या अनुमानास आला असेल, की यहुदी धर्माला स्वातंत्र्य देणे हा राजकीय दृष्टीने चुकीचा निर्णय होता. त्याला असे वाटले, की अलीकडे जेरुसलेमध्ये जे बंड झाले त्याचे कारण केवळ धर्म नव्हते, तर त्यामागे राजकारणही होते कारण जुडियामधील लोकांना अद्यापही इजिप्शियन अंमल हवा होता; ॲन्टिअकसच्या राज्यात केवळ यहुदी लोकांनीच धार्मिक स्वातंत्र्याची मागणी केली होती आणि त्यांना ते दिल्यानेच त्यांनी बंड केले. . . . म्हणूनच त्याने यास आळा घालण्याचे ठरवले.”
इस्राएली मुत्सद्दी आणि पंडित, अब्बा एबन त्यानंतर जे घडले ते थोडक्यात सांगतो: “१६८ आणि १६७ [सा.यु.पू.] या काळादरम्यान एकानंतर एक मोठ्या प्रमाणात यहुदी लोकांना मारण्यात येऊ लागले, मंदिर लुटण्यात आले, यहुदी धर्मावर बंदी घालण्यात आली. सुंता करणाऱ्यांना तसेच शब्बाथ पाळणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा घोषित केली जात असे. सा.यु.पू. डिसेंबर १६७ मध्ये अपमानाचा अगदी कळस झाला, तेव्हा ॲन्टिअकसच्या आदेशानुसार मंदिरामध्ये झ्यूसची वेदी बांधण्यात आली आणि या ग्रीक देवतासमोर यहुदी लोकांनी डुक्कर—यहुदी नियमशास्त्रानुसार अशुद्ध प्राणी—बली द्यावा अशी जबरदस्ती करण्यात आली.” या काळादरम्यान मैनलेस आणि ग्रीक संस्कृतीचा स्वीकार केलेले यहुदी मंदिरात आपआपल्या पदावर अद्यापही याजक म्हणून कार्य करीत होते.
जेव्हा बहुतेक यहुद्यांनी ग्रीक धर्म अंगीकारला तेव्हा हसीदीम—धर्मनिष्ठ लोक—नावाचा एक नवीन गट मोशेचे नियमशास्त्र तंतोतंत पाळण्याचे उत्तेजन देत होता. ग्रीक धर्माचा अंगीकार केलेल्या याजकांविषयी नाराज होऊन आता जास्तीत-जास्त सामान्य लोक हसीदीम गटाकडे जाऊ लागले. अनेक लोकांना धार्मिक कारणांवरून मरण पत्करावे लागले कारण संपूर्ण देशामध्ये यहुदी लोकांवर गैरयहुदी रितीरिवाज पाळण्याची आणि बली देण्याची जबरदस्ती करण्यात येऊ लागली, त्यांनी तसे न केल्यास त्यांना मारण्यात येऊ लागले. मक्काबी लोकांच्या पुस्तकांमध्ये असे कित्येक अहवाल पहायला मिळतात ज्यामध्ये स्त्री-पुरुष इतकेच काय तर लहान मुलांनीसुद्धा हातमिळवणी करण्याऐवजी मरण पत्करले.
मक्काबी लोकांची प्रतिक्रिया
ॲन्टिअकसच्या या अत्याचाराला कंटाळून बरेच यहुदी लोक त्यांच्या धर्माकरता लढायला तयार झाले. जेरुसलेमच्या वायव्येकडील आधुनिक शहर, लोडच्या जवळ असलेल्या मोडनमध्ये मथ्थीयास नावाच्या एका याजकाला शहराच्या मध्यभागी बोलवण्यात आले. स्थानिक लोक मथ्थीयासचा आदर करत असल्यामुळे राजाने पाठवलेल्या माणसाने त्याला मूर्तिपूजक बली अर्पण करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याने स्वतःचा जीव वाचवून बाकीच्या लोकांसमोरही एक उदाहरण मांडावे. मथ्थीयास असे करण्यास तयार झाला नाही, पण दुसरा एक यहुदी मात्र तयार झाला आणि बलिदान करायला पुढे आला. त्यामुळे मथ्थीयासची तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि त्याने त्या मनुष्याला जिवानिशी मारून टाकले. या वयस्कर मनुष्याने दाखवलेली अशाप्रकारची त्वेषपूर्ण प्रतिक्रिया पाहून ग्रीक सैनिक अगदी सुन्न झाले. काही सेकंदाच्या आत मथ्थीयासने ग्रीक अधिकाऱ्यांनाही मारले. ग्रीक सैनिकांनी बचावासाठी काही हालचाल करण्याआधीच मथ्थीयासच्या पाच मुलांनी आणि शहरातील बाकीच्या लोकांनी हल्ला करून त्यांच्यावर मात केली.
मथ्थीयास मोठ्याने ओरडला: ‘ज्या कोणाला नियमशास्त्राविषयी आवेश आहे त्या सर्वांनी माझ्याकडे यावे.’ या घटनेचा बदला जरूर घेतला जाईल हे माहीत असल्यामुळे मथ्थीयास आणि त्याच्या मुलांनी डोंगराळ प्रदेशात पलायन केले. ही बातमी पसरली तेव्हा यहुदी (अनेक हसीदीम सुद्धा) त्यांना येऊन मिळाले.
मथ्थीयासने त्याचा मुलगा जुडा याला सेनापती बनवले. जुडाच्या शौर्याबद्दल त्याला मक्काबी म्हणायचे; त्याच्या शौर्यामुळे त्याला हे नाव पडले असावे कारण मक्काबीचा अर्थ “हातोडा” असा होता. मथ्थीयास आणि त्याच्या मुलांना हेष्मोनी म्हणण्यात येऊ लागले; हे नाव हेष्मोन या शहरावरून किंवा त्यांच्या वाडवडिलांच्या नावावरून पडले होते. (यहोशवा १५:२७) या बंडामुळे जुडा मक्काबी प्रसिद्ध झाला आणि त्याच्या संपूर्ण घराण्याला मक्काबी या नावाने ओळखण्यात येऊ लागले.
पुन्हा मंदिराचा ताबा
बंड केल्यानंतर पहिल्या वर्षाच्या दरम्यान मथ्थीयास आणि त्याच्या मुलांनी एक लहान सेना तयार केली. कित्येक वेळा ग्रीक सैनिकांनी हसीदीम लढवय्यांच्या गटावर शब्बाथाच्या दिवशी हल्ले केले होते. त्यांना स्वतःचे संरक्षण करणे शक्य होते, पण त्यांना शब्बाथाचा नियम तोडायचा नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची हत्या झाली. लोक आता मथ्थीयासला धार्मिक अधिकारी मानू लागले होते. म्हणून त्याने असा नियम काढला, की यहुदी लोक शब्बाथाच्या दिवशी स्वतःचा बचाव करू शकतात. यामुळे त्यांच्या चळवळीला एक नवे वळण लागले, शिवाय यहुदी धर्मात असा नवा विचार पुढे आला, की धार्मिक अधिकारी परिस्थिती लक्षात घेऊन नियमशास्त्रामध्ये हवा तो बदल करू शकतात. टॅलमूदमध्ये याविषयी असे म्हणण्यात आले आहे: “त्यांना एक शब्बाथ भंग करू द्या, ज्यामुळे अनेक शब्बाथ पवित्र होतील.”—योमा ८५ब.
आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर जुडा मक्काबी हा बंड पुकारलेल्या लोकांचा निर्विवाद नेता बनला. शत्रुसैन्याला समोरासमोर हरवणे आपल्याला कठीण आहे, याची त्याला पूर्ण जाणीव होती त्यामुळे त्याने युद्धात गनिमी काव्याची पद्धत वापरली. त्याने ॲन्टिअकसच्या लष्करी तुकड्यांवर अशा ठिकाणी हल्ला केला जेथून त्या लोकांना आपले नेहमीचे डावपेच वापरून स्वतःचा बचाव करणे अशक्य होते. यामुळे जुडा एका नंतर एक अशा अनेक लष्करांना हरवत गेला. त्यांतील बरीच लष्करे जुडाच्या लष्कराच्या तुलनेत कैकपटीने मोठी होती.
सैल्युसीड राज्यातील अंतर्गत विरोध आणि रोमचे वाढते वर्चस्व ग्रीक राज्यकर्त्यांचे लक्ष विचलित झाले आणि त्यामुळे यहुद्यांच्या विरुद्ध पावले उचलण्याकडे त्यांनी इतके लक्ष दिले नाही. त्यामुळे थेटपणे जेरुसलेमच्या वेशीवरच हल्ला करण्याची संधी जुडाला मिळाली. डिसेंबर सा.यु.पू. १६५ (किंवा कदाचित १६४ सा.यु.पू.) मध्ये त्याच्या सैनिकांनी मंदिर ताब्यात घेतले आणि त्यातील साहित्य शुद्ध करून मंदिराची पुनःस्थापना केली; ग्रीक लोकांनी मंदिराचे पावित्र्यभंग केल्याच्या बरोबर तीन वर्षांनी ही घटना घडली. या घटनेच्या स्मरणार्थ यहुदी लोक दर वर्षी समर्पणाचा हनुक्का सण साजरा करतात.
धर्मापेक्षा राजकारण श्रेष्ठ
बंड करण्यामागचा उद्देश आता पूर्ण झाला होता. यहुदी धर्मावरील बंदी काढून घेण्यात आली होती. मंदिरामध्ये पुन्हा एकदा उपासना आणि अर्पणे देण्यात येऊ लागली होती. हसीदीम लोक आता समाधानी होते त्यामुळे ते जुडा मक्काबीच्या सैन्यातून निघून आपआपल्या घरी परतू लागले. पण जुडाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याच्याकडे उत्तम प्रशिक्षण प्राप्त सैन्य होते, या सैन्याचा स्वतंत्र यहुदी राष्ट्राची स्थापना करण्यासाठी उपयोग का करू नये? धर्मामुळे जे बंड पुकारण्यात आले होते ते आता धार्मिक न राहता त्याला राजकीय वळण येऊ लागले. त्यामुळे लढा चालूच होता.
सैल्युसीड अंमलाविरुद्ध लढा देण्यासाठी जुडा मक्काबीला मदतीची आवश्यकता होती त्यामुळे त्याने रोमसोबत करार केला. सा.यु.पू. १६० मध्ये तो एका लढाईत मारला गेला, नंतर त्याच्या भावांनी मात्र लढा चालूच ठेवला. जुडाचा भाऊ जोनाथान याने असे काही केले की ज्यामुळे स्वतःला यहुदा राष्ट्राचा महायाजक आणि अधिकारी होऊ द्यावे अशाप्रकारे त्याने सैल्युसीड अधिकाऱ्यांचे मन वळवले, पण ते राष्ट्र अद्यापही त्यांच्या अंमलाखाली होते. सिरियामध्ये रचलेल्या कटात फसल्यामुळे जोनाथानाला आपला प्राण गमवावा लागला तेव्हा त्याला भाऊ सीमियन—मक्काबींचा शेवटचा भाऊ—हा त्याच्या जागी आला. सीमियनच्या कारकीर्दीत सैल्युसीड शासनाचा पूर्णपणे अंत झाला. (सा.यु.पू. १४१) सीमियनने रोमसोबत केलेला करार पुन्हा अंमलात आणला आणि यहुदी नेत्यांनी त्याला राज्यकर्ता आणि महायाजक म्हणून स्वीकारले. अशाप्रकारे मक्काबींनी स्वतंत्र हेष्मोनी राजघराण्याची स्थापना केली.
मशीहा येण्यापूर्वी मक्काबी लोकांनी पुन्हा एकदा मंदिरामध्ये उपासना करण्यास सुरवात केली होती. (पडताळा योहान १:४१, ४२; २:१३-१७.) ग्रीक धर्म आणि संस्कृतीचे समर्थन करणाऱ्या याजकांच्या कृत्यांमुळे यहुदी लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला होता, पण हेष्मोनी लोकांच्या काळात परिस्थिती आणखीनच खराब झाली होती. शेवटी काय, तर विश्वासू दावीदाच्या घराण्यातून आलेल्या राजाऐवजी आपलेच राजकीय हेतू साध्य करायला निघालेले याजक यहुदी लोकांवर राज्य करत होते, त्यामुळे त्यांचे खऱ्या अर्थाने कल्याण होऊच शकले नाही.—२ शमुवेल ७:१६; स्तोत्र ८९:३, ४, ३५, ३६.
[२१ पानांवरील चित्र]
जुडा मक्काबीचा पिता मथ्थीयास मोठ्याने ओरडला: ‘ज्या कोणाला नियमशास्त्राविषयी आवेश आहे त्या सर्वांनी माझ्याकडे यावे’
[Credit Line]
यहुदी शरणार्थींना मथ्थीयास अपील करतो/The Doré Bible Illustrations/Dover Publications