त्यांनी यहोवाची इच्छा पूर्ण केली
मोशे आणि अहरोन देवाच्या वचनाचे धैर्यशाली उद्घोषक
पृथ्वीवरील अत्यंत शक्तिशाली मनुष्य—इजिप्तचा फारो, याच्यासमोर ऐंशी वर्षांचा मोशे व त्याचा भाऊ अहरोन, हे उभे आहेत: अशा दृश्याची कल्पना करा. इजिप्शियन लोकांकरिता हा मनुष्य, ईश्वरांच्या प्रतिनिधीपेक्षाही अधिक आहे. त्यांचा असा विश्वास आहे, की तो स्वत: एक देव आहे. ते त्याला, ससाण्याचे डोके असलेल्या होरस नामक देवतेचा अवतार समजतात. इजिप्तच्या देवदेवतांमध्ये, आयसिस व ओसायरिस यांच्याबरोबर, होरस हे एक प्रमुख त्रैक्य बनले होते.
फारोसमोर येणारा कोणीही, त्याच्या मुकुटाच्या मध्यातून वर येणाऱ्या नागाच्या फणाची अनिष्टसूचक प्रतिमा पाहिल्यावाचून राहू शकत नव्हता. हा सर्प, फारोच्या कोणत्याही शत्रूंवर अग्नी आणि नाशही आणू शकत होता, असे गृहीत धरले जात होते. दास्यत्वात असलेल्या इस्राएल लोकांना, त्यांचा देव यहोवा याच्या प्रीत्यर्थ उत्सव करण्यासाठी जाऊ द्यावे, अशी अभूतपूर्व विनंती करण्यासाठी आता मोशे व अहरोन, जणू देवच असलेल्या ह्या राजाजवळ आले आहेत.—निर्गम ५:१.
फारोचे मन कठीण होईल असे यहोवाने आधीच भाकीत केले होते. त्यामुळे मोशे व अहरोनाला, “हा कोण परमेश्वर [यहोवा, NW] की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास जाऊ देणार नाही” या त्याच्या उद्धट प्रत्युत्तराचे नवल वाटले नाही: (निर्गम ४:२१; ५:२) अशा प्रकारे, एका नाट्यमय सामन्यासाठी, रंगमंच तयार झाला. पुढील सामन्याच्या दरम्यान, मोशे आणि अहरोनाने, फारोस चकित करणारा पुरावा सादर केला, की ते सत्य व सर्वसमर्थ देवाचे प्रतिनिधीत्व करतात.
एक चमत्कार घडतो
यहोवाने सूचना दिल्याप्रमाणे, अहरोनाने एक चमत्कार केला, ज्यामुळे इजिप्तच्या इतर देवांवरील यहोवाचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध झाले. त्याने फारोसमोर आपली काठी खाली टाकताच त्याचा एक मोठा साप झाला! ह्या चमत्कारामुळे पेचात पडून, फारोने त्याच्या जादूगारांना बोलावणे पाठविले.a दुरात्मिक सामर्थ्याच्या साह्याने, ही माणसे देखील आपल्या काठ्यांचा उपयोग करून, असलाच काही तरी प्रकार करू शकले.
जर फारो आणि त्याचे जादूगार संतुष्ट झाले असतील, तर ते केवळ क्षणासाठीच. त्यांच्या चेहऱ्यांवरील ते भाव आपल्या डोळ्यांसमोर रेखाटा, जेव्हा अहरोनाच्या सापाने, एका पाठोपाठ एक त्यांच्या सापांना गिळंकृत केले! उपस्थित असलेल्या सर्वांना हे कळून चुकले की इजिप्तची दैवते, कोणत्याही प्रकारे सत्य देव यहोवा याच्या बरोबरीचे नव्हते.—निर्गम ७:८-१३.
यानंतरही फारोचे मन कठीणच होते. देवाने इजिप्तवर दहा तडाखे किंवा पीडा आणल्यावर मात्र फारो, शेवटी मोशे व अहरोन यांना म्हणाला: “तुम्ही व सगळे इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा; तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची [यहोवाची] सेवा करा.”—निर्गम १२:३१.
आपल्यासाठी धडा
इजिप्तच्या शक्तिशाली फारोसमोर जाण्यासाठी, मोशे व अहरोनला कशाने शक्य केले? सुरवातीला, मोशेने स्वतःबद्दल, तो “मुखाचा जड व जिभेचाही जड” असल्याचे सांगून, त्याच्या कुवतीमध्ये आत्मविश्वासाची उणीव असल्याचे व्यक्त केले. यहोवाच्या पाठबळाची खात्री पटवून दिल्यानंतरही त्याने याचना केली: “तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांस संदेश पाठीव.” दुसऱ्या शब्दांत म्हणायचे तर, मोशेने अशी विनंती केली, की देवाने त्याच्याऐवजी कोणा दुसऱ्याला पाठवावे. (निर्गम ४:१०, १३) तरीसुद्धा, यहोवाने नम्र असलेल्या मोशेचा उपयोग, त्याची नेमणूक पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सुज्ञान व बळ देऊन केला.—गणना १२:३.
आज, यहोवा देव व येशू ख्रिस्ताचे सेवक, ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करणाची’ आज्ञा पूर्ण करत आहेत. (मत्तय २८:१९, २०) ह्या कामगिरीतील आपला भाग पूर्ण करण्यासाठी, आपल्यापाशी असलेल्या शास्त्रवचनीय ज्ञानाचा आणि कुवतींचा आपण उत्कृष्टरित्या उपयोग करावा. (१ तीमथ्य ४:१३-१६) आपल्या उणिवांवरच चित्तैकाग्र करण्याऐवजी, देवाने आपल्याला जी काही नेमणूक दिली आहे, तिचा आपण विश्वासाने स्वीकार करू या. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला लायक व सामर्थ्यवान करू शकतो.—२ करिंथकर ३:५, ६; फिलिप्पैकर ४:१३.
मानवी व दुरात्मिक विरोधाच्या प्रतिकूल असल्यामुळे मोशेला नक्कीच अतिमानुष मदतीची गरज होती. परिणामतः, यहोवाने त्याला आश्वासन दिले: “पाहा, तुला मी फारोचा देव करितो.” (निर्गम ७:१) होय, मोशेकडे ईश्वरी पाठबळ आणि अधिकार होता. यहोवाचा आत्मा त्याच्यावर असल्यामुळे, मोशेला, फारो किंवा त्या गर्विष्ठ राजाच्या सैन्याचे भय बाळगण्याचे काहीच कारण नव्हते.
आपली सेवा पूर्ण करण्यासाठी, आपण देखील यहोवाच्या पवित्र आत्म्यावर किंवा कार्यकारी शक्तीवर विसंबून राहावे. (योहान १४:२६; १५:२६, २७) ईश्वरी पाठबळ असल्यामुळे, आपण दावीदाचे शब्द प्रतिध्वनित करू शकतो, ज्याने असे गायिले: “देवावर मी भरवसा ठेविला आहे. मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”—स्तोत्र ५६:११.
यहोवा करूणामय असल्यामुळे, त्याने मोशेला त्याच्या नेमणुकीत एकटेच सोडले नाही. तर या उलट, देवाने म्हटले: “तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल. जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू बोल; तुझा भाऊ अहरोन फारोला सांगेल की, तू इस्राएल लोकांस तुझ्या देशातून जाऊ दे.” (निर्गम ७:१, २) मोशे समंजसपणे हाताळू शकेल, तितक्याच मर्यादेत यहोवाने कार्य साधणे हे किती प्रेमळपणाचे आहे.
सर्वोच्च असलेल्या यहोवाचे साक्षी बनण्याच्या आव्हानास स्वीकारणाऱ्या सहख्रिश्चनांच्या सहवासाची तरतूद, देव आपल्यासाठी करतो. (१ पेत्र ५:९) म्हणूनच, कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागला, तरी आपण मोशे व अहरोन यांच्यासारखे—देवाच्या वचनाचे धैर्यशाली उद्घोषक बनू या.
[तळटीपा]
a “जादूगार,” ज्या इब्री शब्दाचे भाषांतर आहे, तो शब्द चेटक्यांच्या गटाला सूचित करतो, जे की दुरात्म्यांच्या अवाक्या पलीकडे असलेले, अलौकिक सामर्थ्य, स्वतःकडे असल्याचा दावा करतात. ही माणसे, आपले म्हणणे ऐकण्यासाठी जादूने किंवा मंत्राने दुरात्म्यांना बोलावू शकत होती व दुरात्म्यांचा या चेटक्यांवर काहीच अधिकार नव्हता, असा विश्वास केला जात होता.
[२५ पानांवरील चित्रं]
फारोसमोर, मोशे आणि अहरोनने धैर्याने यहोवाचे प्रतिनिधीत्व केले