“जुना करार” किंवा “इब्री शास्त्रवचने”—कोणते?
बायबलच्या इब्री/अरेमिक आणि ग्रीक भाषेतील भागांचा उल्लेख करताना आज ख्रिस्ती धर्मजगतात “जुना करार” व “नवा करार” अशा संज्ञा वापरणे प्रचलित आहे. पण, अशा या संज्ञांचा वापर करण्यासंबंधाने बायबलमध्ये काही आधार आहे का? आणि कोणत्या कारणास्तव यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रकाशनात या संज्ञांचा उपयोग करण्याचे सर्वसाधारणपणे टाळतात?
हे खरे की, किंग जेम्स व्हर्शन तसेच जर्मन सेप्टेंबरटेस्टमेंट हे मार्टीन ल्यूथरचे पहिले भाषांतर (१५२२), यासारख्या इतर जुन्या भाषांतरात २ करिंथकर ३:१४ चे भाषांतर ती प्रथा स्वीकृत असल्याचे दाखवेल. किंग जेम्स व्हर्शन यामध्ये हे वचन असे वाचले जाते: “परंतु त्यांची मने अंधळी झाली; कारण जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते; ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते.”
तथापि, येथे प्रेषित, ज्याला सर्वसाधारणपणे “जुना करार” असे म्हणण्यात येते त्या ३९ पुस्तकांबद्दल बोलत होता का? येथे ज्याचे “करार” असे भाषांतर करण्यात आले, तो ग्रीक शब्द डा․य․थेʹकʼ हा आहे. टेओलोगिश राओलएंटसुक्लोपाडी हा प्रसिद्ध जर्मन वेदांतीय शब्दकोश २ करिंथकर ३:१४ वर भाष्य करताना असे म्हणतो की, या वचनातील ‘जुन्या डा․य․थेʹकʼचे वाचन’ पुढील वचनात सांगण्यात आलेल्या ‘मोशेच्या ग्रंथाचे वाचन’ हेच आहे. यामुळे तो म्हणतो की, ‘जुना डा․य․थेʹकʼ’ मोशेचे नियमशास्त्र किंवा अधिकपणे पेन्टेटॉचला लागू होतो. तो प्रेरित शास्त्रवचनांच्या संपूर्ण ख्रिस्त पूर्व लिखाणाला निश्चितपणे लागू होणारा नाही.
अशाप्रकारे प्रेषित तर इब्री शास्त्रवचनाच्या केवळ एका भागाचा येथे उल्लेख करीत आहे. तो जुना नियमशास्त्र करार होता ज्याचे लिखाण मोशेकरवी पेन्टेटॉचमध्ये करण्यात आले होते. प्रेषित संपूर्ण इब्री तसेच अरेमिक शास्त्रवचनांचा उल्लेख करीत नाही. याप्रमाणे, सा. यु. पहिल्या शतकातील प्रेरित ख्रिस्ती लिखाणे एक “नवा करार” सामावून होता असा त्याचा अर्थ नव्हता, कारण बायबलमध्ये ही संज्ञा कोठेही आढळत नाही.
शिवाय हे लक्षात घेण्याजोगे आहे की, पौलाने येथे वापरलेला ग्रीक शब्द डाय․ए․थिʹके याचा अक्षरशः अर्थ “करारनामा” असा होतो. (याबद्दल अधिक माहितीसाठी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरन्स, सूची ७ई, पृष्ठ १५८५, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क इंकॉ. द्वारा प्रकाशित, १९८४ ची आवृत्ती, पहा.) याकरताच बरीच आधुनिक भाषांतरे “जुना करार” ह्या शब्दप्रयोगाऐवजी “जुना करारनामा” असे योग्यपणे वापरतात.
याबाबतीत, “नॅशनल कॅथलिक रिपोर्टर” याने असे म्हटले: “‘जुना करार’ ही संज्ञा कमीपणा किंवा कालबाह्यतेची अटळ छाप पाडते.” परंतु, बायबल तर खरे पाहता, एकच कलाग्रंथ आहे आणि त्याचा कोणताही भाग कालबाह्य झालेला किंवा “जुना” असा नाही. इब्री भागातील पहिल्या पुस्तकापासून ते ग्रीक भागातील शेवटल्या पुस्तकापर्यंत त्यातील संदेश सुसंगत आहे. (रोमकर १५:४; २ तीमथ्य ३:१६, १७) यास्तव, चुकीच्या समजूतींवर आधारलेल्या या संज्ञा आपण वापरण्याचे टाळण्याची योग्य कारणे आपल्यापाशी आहेत व त्याऐवजी “इब्री शास्त्रवचने” व “ग्रीक शास्त्रवचने” ह्या अधिक योग्य संज्ञा वापरण्याचे आपण पसंत करू.