तुम्ही येशूला प्रार्थना करावी का?
काही लोकांना येशूला प्रार्थना करणे योग्य वाटते. जर्मनीत अनेकांना लहानपणी असे शिकवण्यात आले की जेवणाआधी त्यांनी त्यांचे हात जोडावे व येशू ख्रिस्ताला उपकारस्तुती करावी.
बायबलनुसार, येशूचे खरोखरच स्वर्गात एक उच्च स्थान आहे. परंतु आम्ही त्याला प्रार्थना करावी असा त्याचा अर्थ होतो का? तुम्ही देखील त्या लोकांमधील असू शकता जे प्रीतीपोटी येशूला प्रार्थना करतात, परंतु स्वतः येशू अशा प्रार्थनांबद्दल काय विचार करतो?
प्रथम आपण पाहू या, की असे प्रश्नच का उद्भवतात? कारण बायबल म्हणते की यहोवा देव ‘प्रार्थना ऐकणारा’ आहे. म्हणूनच प्राचीन काळी देवाचे सेवक, जसे इस्त्राएल लोक सर्वसमर्थ, यहोवा देवालाच प्रार्थना करत होते यात काही शंकाच नाही.—स्तोत्र ५:१, २; ६५:२.
देवाचा पुत्र, येशू, मानवजातीला पाप आणि मृत्यूपासून मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर आला तेव्हा परिस्थिती बदलली का? नाही, तेव्हा देखील यहोवालाच प्रार्थना केल्या जात होत्या. पृथ्वीवर असताना येशूने स्वतः अनेक वेळा त्याच्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना केल्या, आणि इतरांनीही असेच करावे म्हणून त्याने त्यांना शिकवले. संपूर्ण जगभरात सर्वात उत्तम प्रार्थना म्हणून ओळखली जाणारी प्रभूची प्रार्थना किंवा हे आमच्या स्वर्गीय पित्या या आदर्श प्रार्थनेचा विचार करा. येशूने आम्हाला त्याला प्रार्थना करण्याचे शिकवले नाही; त्याने आम्हाला हा नमुना दिला: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.”—मत्तय ६:६, ९; २६:३९, ४२.
आता आपण प्रार्थना म्हणजे नेमके काय याच्या कसून परीक्षणाद्वारे हा विषय पाहू या.
प्रार्थना म्हणजे काय?
प्रत्येक प्रार्थना उपासनेचा एक प्रकार आहे. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ असे म्हणून याची खात्री देतो की: “प्रार्थना उपासनेचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एक व्यक्ती देवाला भक्ती, उपकारस्तुती, पापोच्चारण किंवा विनंती करू शकते.”
एके प्रसंगी येशूने म्हटले: “‘परमेश्वर [यहोवा, NW] तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर’ असे शास्त्रात लिहिले आहे.” येशू मूलभूत सत्याला चिकटून राहिला की उपासना—यास्तव प्रार्थना देखील—केवळ त्याचा पिता यहोवा देव यालाच उद्देशून केली पाहिजे.—लूक ४:८; ६:१२.
आपल्या प्रार्थनांमध्ये येशूला कबूल करणे
येशू मानवजातीसाठी एक खंडणी बलिदान म्हणून मृत्यू पावला, देवाद्वारे त्याचे पुनरुत्थान झाले आणि श्रेष्ठ स्थानावर त्याला उंचावण्यात आले. तुम्ही कल्पना करू शकता त्याप्रमाणे या सर्व गोष्टींमुळे स्वीकारयोग्य प्रार्थनांसंबंधी काही बदल झाला. तो कसा?
येशूच्या हुद्याचा प्रार्थनांवर बराच मोठा परिणाम होतो याचे वर्णन प्रेषित पौल पुढीलप्रमाणे देतो: “ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतु हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल करावे.”—फिलिप्पैकर २:९-११.
“प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा” या शब्दांचा अर्थ आपण त्याला प्रार्थना करावी असा होतो का? नाही. येथे आलेली ग्रीक संज्ञा “जे गुडघे टेकतात ते एक होतात, व ऐक्याने (πᾶν γόνυ) उपासना करतात याला चित्रित करते. येशूला जे नाव मिळाले आहे ते सर्वांना ऐक्याने उपासना करण्यास प्रवृत्त करते.” (जी. बी. वायनर यांचे नवीन कराराच्या वाक्यप्रचाराचे व्याकरण (इंग्रजी) हे पुस्तक) अर्थात, प्रार्थना स्वीकारयोग्य होण्यासाठी ती ‘येशूच्या नावानेच’ सादर केली पाहिजे, परंतु तरीही ती यहोवा देवाला उद्देशून असते व त्याच्या महिमेस्तव असते. याचकारणास्तव, पौल म्हणतो: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.”—फिलिप्पैकर ४:६.
एक मार्ग जसा इष्ट स्थानी जाण्यास निरवतो, त्याचप्रकारे येशू सर्वसमर्थ देवाकडे जाण्याचा “मार्ग” आहे. “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही,” असे येशूने त्याच्या प्रेषितांना शिकवले. (योहान १४:६) यास्तव, आपण आपल्या प्रार्थना थेट येशूला नव्हे तर येशूद्वारे देवाला उद्देशून केल्या पाहिजेत.a
‘परंतु शिष्य स्तेफन आणि प्रेषित योहान या दोघांनी स्वर्गातील येशूबरोबर बोलल्याचा अहवाल बायबल देत नाही का?’ असे काही जण विचारतील. ते अगदी खरे आहे. परंतु या प्रसंगांमध्ये त्यांनी त्याला प्रार्थना केल्या नाहीत, कारण स्तेफन आणि योहान या प्रत्येकाने येशूला दृष्टांतात पाहिले आणि त्याच्यासोबत थेटपणे बोलले. (प्रेषितांची कृत्ये ७:५६, ५९; प्रकटीकरण १:१७-१९; २२:२०) लक्षात असू द्या की देवासोबत फक्त बोलल्यानेच ती काही प्रार्थना होत नाही. आदाम आणि हव्वेने एदेन बागेत पाप केल्यावर देवाने त्यांचा न्याय केला तेव्हा ते त्यांच्या महापापाच्या सबबी सांगत असताना देवासोबत बोलले. त्याच्यासोबत त्यांचे त्याप्रकारचे बोलणे प्रार्थना नव्हती. (उत्पत्ती ३:८-१९) यास्तव, आपण प्रत्यक्षात येशूला प्रार्थना करावी यासाठी स्तेफन किंवा योहानाचे येशू सोबतचे बोलणे तो याचा एक पुरावा आहे म्हणून सांगणे अयोग्य ठरेल.
येशूचे ‘नाव कसे घेतले जाते’?
येशूलाच प्रार्थना करणे उचित असल्याच्या अजूनही तुम्हाला शंका आहेत का? एका स्त्रीने वॉचटावर संस्थेच्या एका शाखा दप्तराला लिहिले: “दुर्दैवाने, पहिल्या ख्रिस्ती जनांनी येशूला प्रार्थना केल्या नाहीत याविषयी माझी अजूनही खात्री पटलेली नाही.” तिच्या मनात १ करिंथकर १:२, [सुबोध भाषांतर] मधील पौलाचे शब्द होते जेथे त्याने ‘प्रभु येशू ख्रिस्त याचे नाव घेतात असे चहूकडले लोक’ असा उल्लेख केला. परंतु, तुम्ही याची नोंद घेऊ शकता की मूळ भाषेत ‘नाव घेणे’ या संज्ञेचे प्रार्थनेशिवाय दुसरेही अर्थ होऊ शकतात.
ख्रिस्ताचे नाव चहूकडे कसे ‘घेतले’ जात होते? एक मार्ग म्हणजे, नासरेथकर येशूच्या अनुयायांनी त्याला उघडपणे मशीहा तसेच “जगाचा तारणारा” म्हणून कबूल केले, व त्याच्या नावाने अनेक चमत्कारिक कृत्ये केली. (१ योहान ४:१४; प्रेषितांची कृत्ये ३:६; १९:५) यास्तव, द इंटरप्रीटर्स बायबल असे सांगते की “आमच्या प्रभुचे नाव घेणे . . . म्हणजे त्याला प्रार्थना करण्याऐवजी त्याच्या प्रभुत्वाचा स्वीकार करणे होय.”
‘आमचा प्रभु येशू ख्रिस्त याचे नाव घेणे’ यामध्ये ख्रिस्ताचा स्वीकार करणे व त्याने ओतलेल्या रक्तावर विश्वास ठेवणे ज्यामुळे पापांची क्षमा शक्य होते, या गोष्टी गोवलेल्या आहेत. (प्रेषितांची कृत्ये १०:४३ ची तुलना २२:१६ सोबत करा.) आपण जेव्हा जेव्हा देवाला प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा येशूचे नाव वास्तविकतेत घेतोच. यास्तव आपण येशूचे नाव घेऊ शकतो हे दाखवताना, बायबल असे सूचित करत नाही की आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे.—इफिसकर ५:२०; कलस्सैकर ३:१७.
येशू आपल्यासाठी काय करू शकतो
येशूने स्पष्टपणे त्याच्या शिष्यांना अभिवचन दिले: “तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.” यासाठी त्याला प्रार्थना करावी लागेल का? नाही. जे काही मागायचे आहे ते यहोवा देवाकडे मागायचे आहे—परंतु येशूच्या नावाने. (योहान १४:१३, १४; १५:१६) आपण देवाला विनंती करतो की त्याचा पुत्र, येशू याने आपल्यासाठी त्याच्या महान सामर्थ्याचा आणि अधिकाराचा उपयोग करावा.
येशू त्याच्या खऱ्या अनुयायांसोबत आज कसे दळणवळण राखतो? अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मंडळीचे पौलाने दिलेले वर्णन त्याचे उदाहरण सादर करते. त्याने तिची तुलना शरीरासोबत केली व येशू ख्रिस्ताची तुलना मस्तकासोबत केली. ‘मस्तक’ आध्यात्मिक शरीराच्या सदस्यांना “सांधे व बंधने” किंवा त्याच्या मंडळीला आध्यात्मिक पौष्टिकता व मार्गदर्शन पुरवण्याच्या मार्गाद्वारे किंवा व्यवस्थेद्वारे त्यांच्या गरजा पुरवते. (कलस्सैकर २:१९) त्याचप्रकारे, येशू आज ‘देणग्या मिळालेल्या मानवांचा’ किंवा आध्यात्मिकरीत्या पात्र असलेल्या पुरूषांचा मंडळीत पुढाकार घेण्यासाठी व गरज भासल्यास चुकीची सुधारणूक करण्यासाठी उपयोग करतो. मंडळीतील सदस्यांना थेटपणे येशूसोबत दळणवळण राखण्याची किंवा त्याला प्रार्थना करण्याची कोणतीही योजना नाही, परंतु त्यांनी निश्चितच—होय,—येशूचा पिता, यहोवा देवाला प्रार्थना केलीच पाहिजे.—इफिसकर ४:८-१२.
तुम्ही येशूचा आदर कसा करता?
मानवांच्या तारणासंबंधी, येशू किती मुख्य भूमिका बजावतो! प्रेषित पेत्राने उद्गारले: “तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रेषितांची कृत्ये ४:१२) तुम्ही येशूच्या नावाच्या महत्त्वाबद्दल जाणीव राखून आहात का?
थेट येशूला प्रार्थना न केल्यामुळे आपण त्याच्या हुद्याची मानहानी करत नाही. उलट, आपण येशूच्या नावाने प्रार्थना करतो तेव्हा त्याचा सन्मान होतो. मुले जसे त्यांच्या पालकांच्या आज्ञेत राहून त्यांना सन्मान देतात त्याचप्रकारे आपण देखील येशू ख्रिस्ताची आज्ञा मानून विशेषकरून एकमेकांवर प्रीती करण्याच्या नव्या आज्ञेचे पालन करून त्याचा सन्मान करतो.—योहान ५:२३; १३:३४.
स्वीकारयोग्य प्रार्थना
तुम्हाला स्वीकारयोग्य प्रार्थना कराव्याशा वाटतात का? तर मग यहोवा देवाला त्याचा पुत्र, येशू याच्या नावाने प्रार्थना करा. देवाची इच्छा काय आहे हे जाणून घ्या, आणि तुम्हाला जी समज प्राप्त झाली ती प्रार्थनेद्वारे प्रतिबिंबित होऊ द्या. (१ योहान ३:२१, २२; ५:१४) स्तोत्र ६६:२० च्या शब्दांमधून शक्ती मिळवून घ्या, तेथे म्हटले आहे: “देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझी प्रार्थना अवमानिली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही.”
आपण पाहिल्यानुसार, प्रार्थना या उपासनेच्या प्रकारातील एक आहेत व ती उपासना केवळ सर्वसमर्थ देवालाच दिली पाहिजे. आपल्या सर्व प्रार्थना यहोवा देवाला उद्देशून केल्याने, आपण “हे आमच्या स्वर्गातील पित्या” हे येशूने प्रार्थना करण्यासंबंधी दिलेले मार्गदर्शन लागू केले आहे असे दर्शवतो.—मत्तय ६:९.
[तळटीपा]
a काही जण येशूला प्रार्थना करतील कारण तो देव आहे असा त्यांचा विश्वास असेल. परंतु येशू देवाचा पुत्र होता, आणि तो स्वतः त्याचा पिता यहोवा याची उपासना करत होता. (योहान २०:१७) या विषयावरील सविस्तर माहितीकरता वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केलेले तुम्ही त्रैक्य मानावे का? हे माहितीपत्रक पहा.