पवित्र शास्त्र—वाचण्याजोगे पुस्तक
पवित्र शास्त्राबद्दल बोलताना त्याला कितीही विशेषणे जोडली तरी अपुरीच वाटतील. सर्व इतिहासात, विस्तृत प्रमाणावर खप होणारे हे एकमेव पुस्तक आहे. पवित्र शास्त्र हे, सर्वात प्राचीन, अनेक भाषेत भाषांतरीत केलेले, सर्वात जास्त उल्लेखलेले, सर्वात प्रभावकारी, आणि सर्वात आदरणीय असे पुस्तक आहे. कदाचित ते सर्वात वादग्रस्त देखील आहे. शिवाय ते असे पुस्तक आहे जे निश्चितच पुष्कळ बंदी, जाळपोळ, आणि हिंसात्मक विरोधातून बचावलेले आहे. दुःखाची गोष्ट अशी की, एक असे विशेषण आहे जे पवित्र शास्त्राला आता कधीच लागू करता येत नाही. जगामध्ये मोठ्या प्रमाणात हे पुस्तक वाचले जाते ही गोष्ट असंभवनीय आहे.
लोकांच्या घरात पवित्र शास्त्र कोठेतरी ठेवलेले असले तरी, त्याचे प्रत्यक्ष वाचन करण्यासाठी त्यांच्याकडे सवड नाही असे त्यांना वाटते. वाचन करणे एकेकाळी मोठी करमणूक होती. परंतु आता, अनेक जण त्यांचा फावला वेळ दूरदर्शन पाहण्यात किंवा इतर कामे करण्यात घालवू इच्छितात. जर कोणी अद्यापही वाचन करत असतील तर, त्यांना हलके व सोपे वाचन करावयास आवडते. पवित्र शास्त्राचे वाचन करण्यासाठी एकाग्रतेची गरज आहे, व अनेक लोक ते जे काही वाचतात ते गंभीर एकाग्रतेने वाचत नाहीत.
तरीही, पवित्र शास्त्र हे आमच्या पुस्तकांच्या फळीवर असेच धूळ खात पडावे म्हणून बचावलेले नाही. त्याचे वाचन का केले पाहिजे यासाठी खूप चांगली कारणे आहेत. त्याविषयीच्या काही वस्तुस्थितींचा विचार करा.
ते टिकून राहिले हेच आश्चर्याचे आहे!
“बायबल” (पवित्र शास्त्र) ही संज्ञा ग्रीक शब्द बिब्लिया, ज्याचा अर्थ “लहान पुस्तके” असा होतो, यातून आली आहे. हे आम्हाला याची आठवण करून देते की, पवित्र शास्त्र अनेक पुस्तकांचे मिळून बनलेले आहे—त्यातील काही पुस्तके अगदीच लहान नाहीत! त्यांचे लिखाण करण्यासाठी सोळाशे पेक्षा अधिक वर्षे लागली. त्यांचे लेखक हे मानव होते. परंतु त्यांना एका उच्च उगमाद्वारे प्रेरणा झाली. एका पवित्र शास्त्र लेखकाने म्हटले: “संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” (२ पेत्र १:२१) शास्त्रवचनीय भविष्यवाणीच्या बाबतीत जी गोष्ट खरी आहे तीच गोष्ट, उर्वरित पवित्र शास्त्राबद्दलही खरी आहे. ही ईश्वरप्रेरित “लहान पुस्तके” यहोवा देवाच्या उदात्त विचारांनी भरलेली आहेत. (यशया ५५:९) यासाठीच, ते इतक्या दिवसांपर्यंत टिकून राहिले आहे!
देवाच्या सेवकांसाठी, पवित्र शास्त्र हे नेहमीच अत्यंत महत्त्वाचे पुस्तक ठरले आहे. प्रेषित पौल जो स्वतः एक लेखक होता त्याच्याशी सहमतात आहे. त्याने म्हटले: “प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे व सद्बोध . . . ह्याकरता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) त्यामुळे, आज पवित्र शास्त्र हे यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासाचा आधार आहे. ते त्यांच्या शिकवणी ठरवते व त्यांच्या वागणूकीला नियंत्रित करते. यहोवाचे साक्षीदार, पूर्ण अंतःकरणाने अशी शिफारस करतात की सर्वांनी दररोज देवाच्या वचनाचे वाचन करावे आणि त्याच्या साहित्यावर कृतज्ञतापूर्वक मनन करावे.—स्तोत्रसंहिता १:१-३.
पवित्र शास्त्राचे वाचन करण्याची सवय
शास्त्रवचनांच्या वाचनाची सवय गत काळात उपयोगी ठरली आहे. इस्त्राएलच्या राजांना, स्वतःच्या हातांनी नियमशास्त्राची—पवित्र शास्त्राचा आता सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या भागाची—एक प्रत लिहिण्याची व त्यांच्याबद्दल देवाची काय इच्छा आहे याची त्यांना नियमित आठवण करून देण्यासाठी त्याचे दररोज वाचन करण्याची आज्ञा दिली होती. (अनुवाद १७:१८-२०) असे करावयास चुकवल्यामुळे अनेक राजांचा अधःपात झाला.
शास्त्रवचनांचा अभ्यास करण्याचे मोल, वृद्ध संदेष्टा दानीएलामध्ये दिसते. त्याच्या दिवसात अस्तित्वात असलेल्या पवित्र शास्त्राच्या भागांच्या त्याच्या व्यक्तिगत अभ्यासामुळेच, तो बाबेलमध्ये कैदेत असताना, यिर्मयाने नोंद करून ठेवलेली एक महत्त्वपूर्ण भविष्यवाणी पूर्ण होणार असल्याचे ‘शास्त्रग्रंथातून’ समजू शकला.—दानीएल ९:२.
येशूच्या जन्मावेळी, “नीतिमान व भक्तिमान” पुरूष शिमोन अगदी खात्रीपूर्वकतेने ख्रिस्त किंवा मशीहा होणाऱ्याला पाहण्याची अपेक्षा करत होता. शिमोनाला असे अभिवचन देण्यात आले होते की, ख्रिस्ताला पाहण्याअगोदर त्याला मरण येणार नव्हते. येशू बाळाला हातात घेतल्यावर यशयाच्या भविष्यवाणीचा त्याने केलेला उल्लेख हे दाखवतो की शिमोन, त्याच्या दिवसांमध्ये आधीच लिहून ठेवलेल्या पवित्र शास्त्रातील पुस्तकांचा लक्षपूर्वक वाचक होता.—लूक २:२५-३२; यशया ४२:६.
बाप्तिस्मा करणारा योहान प्रचार करत असताना, मशीहाची “लोक वाट पाहत” होते. हे काय सूचित करते? हेच की, यहुद्यांतील अनेक जण, शास्त्रवचनात नोंद करून ठेवलेल्या मशीही भविष्यवाण्यांशी परिचित होते. (लूक ३:१५) ही गोष्ट चित्तवेधक आहे कारण, त्या काळी पुस्तके इतक्या सहजगत्या उपलब्ध नव्हती. पवित्र शास्त्राच्या पुस्तकांच्या प्रतींना खूप परिश्रमाने हातांनी बनवावे लागत होते, आणि यामुळेच ते महाग व असाध्य होते. तरीही त्यातील साहित्याशी लोक परिचित कसे झाले?
पुष्कळ बाबतीत, जाहीर वाचनामुळे. उदाहरणार्थ, मोशेने ही आज्ञा दिली की विशिष्ट ठरवलेल्या वेळेला, देवाने दिलेले संपूर्ण नियमशास्त्र एकत्रित झालेल्या इस्त्राएलांसाठी वाचण्यात यावे. (अनुवाद ३१:१०-१३) सामान्य युगाच्या पहिल्या शतकापर्यंत, पवित्र शास्त्रातील पुस्तकांचे जाहीर वाचन सर्वत्र होत होते. शिष्य याकोबाने म्हटले: “प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात होते.”—प्रे. कृत्ये १५:२१.
आज, सहजपणे पवित्र शास्त्राची एक व्यक्तिगत प्रत मिळू शकते. या “लहान पुस्तकातील” निदान काही, जगाच्या लोकसंख्येच्या ९८ टक्के भाषांमध्ये उपलब्ध आहेत. परंतु दुःखाची गोष्ट अशी की अनेक लोक, पवित्र शास्त्र त्यांना काय सांगू इच्छिते ते जाणून घेण्याची आवड दाखवत नाहीत. हे वैज्ञानिक युग असले तरी, देवाचे वचन, पवित्र शास्त्र अजूनही सर्वश्रेष्ठपणे “सद्बोध ह्याकरता उपयोगी आहे.” ते, नैतिकता, मानवी नातेसंबंध, आणि इतर आणखी विषयांवर विश्वसनीय सल्ला देते. शिवाय, पवित्र शास्त्र एका शांतीमय भवितव्यासाठी एकमेव खात्रीशीर आशा देते.
ते नियमितपणे वाचा
यास्तव, यहोवाच्या साक्षीदारांनी, पवित्र शास्त्राचे वाचन नियमितरीत्या करण्याचे उत्तेजन देणे याला, त्यांच्या कार्याचा प्रमुख भाग बनवले आहे. ब्रुकलिन, न्यूयॉर्क, येथील त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या कारखान्याच्या इमारतीवर ठळक अक्षरांमध्ये असे आग्रहपूर्वकतेचे शब्द दिसून येतात: “देवाचे वचन, पवित्र शास्त्राचे दररोज वाचन करा.” रस्त्याने जाणाऱ्या लक्षावधी लोकांनी हे शब्द पाहिले आहेत, आणि अशी आशा केली जाते की, अनेकांनी त्याकडे लक्ष दिले आहे.
संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या ७३,००० पेक्षा अधिक मंडळ्यांमध्ये, ईश्वरशासित प्रशालेच्या सभा दर आठवडी भरवल्या जातात. त्या अभ्यासक्रमातील एक भाग, पवित्र शास्त्राच्या एका निवडक भागाचे जाहीर वाचन करणे हा आहे. उपस्थित असलेल्या सर्वांना देखील, पवित्र शास्त्राचे काही अध्याय त्यांच्या घरामध्ये वैयक्तिकरीत्या वाचण्याची नेमणूक असते. जे या आराखड्यासोबत वाचन करतात ते अखेरीस संपूर्ण पवित्र शास्त्र वाचतात.
ही व्यवस्था, या प्रशालेत वापरण्यात येणाऱ्या एका पाठ्यपुस्तकाच्या एकवाक्यतेत आहे. ईश्वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक म्हणते: “तुमच्या व्यक्तिगत आराखड्यामध्ये, पवित्र शास्त्राचे वाचन करण्यासाठी वेळ नेमून देण्याचे समाविष्ट असले पाहिजे. अथपासून इतिपर्यंत वाचून काढणे खूप मोलाचे आहे. . . . परंतु, वाचन करताना दिलेली सर्व माहिती लवकरात लवकर उरकून टाकण्याचे तुमचे ध्येय कधीच असू नये, तर एकंदरीत दृष्टिकोन समजून घेण्याचा असला पाहिजे, जेणेकडून ती माहिती आठवणीत राहू शकते. ते जे काही सांगते त्यावर मनन करण्यासाठी वेळ काढा.”
यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली इतर प्रकाशने, याचप्रकारे पवित्र शास्त्राचे वाचन करण्याचे उत्तेजन देतात. उदाहरणार्थ, या नियतकालिकाच्या सोबतच्या अवेक! नियतकालिकात, तरुण लोकांसाठी पुढीलप्रमाणे उत्तेजन आले आहे की: “तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र वाचले आहे का? होय, पवित्र शास्त्र हे एक मोठे पुस्तक आहे, परंतु त्याचे वाचन लहान लहान भागात तोडून का करू नये? . . . बिरूयातील ‘मोठ्या मनाचे’ लोक ‘शास्त्रात दररोज काळजीपूर्वकतेने शोध करीत गेले.’ (प्रे. कृत्ये १७:११) जर तुम्ही दिवसाला १५ मिनिटांसाठी वाचन करण्याचा दररोजचा नित्यक्रम अनुसरला तर . . . , तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्राचे वाचन एका वर्षात पूर्ण करू शकता.” होय, यहोवाच्या साक्षीदारांना वाटते की आधुनिक दिवसातील ख्रिश्चनांनी, प्राचीन काळातील देवाचे सेवक होते त्याप्रमाणे, शास्त्रवचनांसोबत उत्तमरीतीने परिचित असले पाहिजे.
हे लक्षात ठेवून, साक्षीदारांनी पवित्र शास्त्राच्या जाहीर वाचनाच्या २० व्या शतकाच्या आवृत्तीला हातभार लावला आहे. अनेक भाषांमध्ये, त्यांनी संपूर्ण पवित्र शास्त्राच्या वाचनाच्या कॅसेट बनवल्या आहेत. बहुतेकांसाठी पवित्र शास्त्राचे वाचन करताना येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ही एक उत्तम मदत ठरली आहे. काही जण ध्वनीमुद्रित केलेली ही टेप, घरांमध्ये काम करत असताना, कार चालवताना, किंवा अनेक पुष्कळ कामे करताना ऐकतात. पवित्र शास्त्राच्या भागाचे वाचन होत असताना शांत बसून ऐकून व आपल्या स्वतःच्या पवित्र शास्त्रानुसार ते अनुसरणे, हा एक सुखदायक अनुभव आहे.
जर तुम्ही आधीपासूनच पवित्र शास्त्राचे दररोज वाचन करत नाही तर, तसे करण्याची एक सवय का लावून घेऊ नये? यासाठी प्रत्येक दिवशी जास्त वेळ देण्याची गरज नाही, परंतु त्याचे फायदे मात्र खूप मोठे असतील, कारण शास्त्रवचनांचे अनुकरण, तुम्हाला सुज्ञपणे वागण्यास व आध्यात्मिक प्रतिफळदायी जीवनाचा उपभोग घेण्यासाठी मदत करील. तुम्ही, इस्त्राएलांचा नेता यहोशवा याला खूप वर्षांआधी दिलेल्या आज्ञेच्या सुसंगतीत देखील कार्य कराल की, “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल, व तुला यशःप्राप्ती घडेल.”—यहोशवा १:८.
पवित्र शास्त्राची पाने, आज्ञाधारक मानवजातीसाठी असलेल्या यहोवाच्या प्रेमळ उद्देशांना प्रकट करतात. त्याच्या प्रेरित वचनाच्या अचूक ज्ञानाचा परिणाम, खरा आनंद व अनंत आशीर्वादांच्या आश्चर्यकारक नव्या जगाच्या नंदनवनातील सार्वकालिक जीवनाची आशा हा होईल. (लूक २३:४३; २ पेत्र ३:१३) पवित्र शास्त्र वाचण्याचे व त्याचा अभ्यास करण्याच्या संधीला घट्ट धरून रहा आणि या आश्चर्यकारक जीवनाला मिळवा.