‘एक पान, नक्षत्रासारखे काळोखाला भेदून जाऊ शकते’
आज, पवित्र शास्त्रवचनांचे अनुवाद जवळजवळ विश्वभरात सर्वत्र उपलब्ध आहेत. तथापि, पवित्र शास्त्राबद्दलचा झगडा नेहमी, जीवन आणि मृत्युची बाब बनला आहे.
पंधराव्या शतकातील पवित्र शास्त्रे (इंग्रजी) या पुस्तकात, वेन्डेल प्राईम यांनी लिहिले: “छापण्याचा शोध लागल्यानंतर तीस वर्षांनी, पाखंडी लोकांच्या मताची चौकशी करणारी धर्मसभा स्पेनमध्ये यशस्वीपणे कार्य करत होती. त्या धर्मसभेद्वारे शिक्षा केलेल्या त्या राष्ट्रातील ३,४२,००० व्यक्तींपैकी ३२,००० व्यक्तींना जिवंत जाळण्यात आले. पवित्र शास्त्र बाळगल्यामुळे व वाचल्यामुळे त्यांना हुतात्म्याच्या ज्वाळा मिळाल्या. इटलीतील उत्तर आणि दक्षिणेकडील नाशाची ही धर्मसभा देखील अशीच भयानक होती. धर्मसभेचा पाठिंबा असलेले आर्चबिशप, पवित्र शास्त्र आणि त्याचे वाचन करणारे अशा दोहोंसाठी भस्म करणारे अग्नी होते. निरोने काही ख्रिश्चनांना, जगाचा प्रकाश म्हणून पोत्यांमध्ये घालून शिवून टाकले आणि त्यावर डामर फासून आग लावून दिली व त्याच्या भ्रष्टतेच्या दृश्याला रोशनाईत ठेवण्यासाठी या ख्रिश्चनांचा त्याने मेणबत्त्या म्हणून उपयोग करून प्रकाशवत ठेवले. परंतु युरोपियन शहरांच्या रस्त्यांवर पवित्र शास्त्राच्या होळ्यांच्या तेजस्वी ज्वाला होत्या. पवित्र शास्त्र हे काही त्याच्या वाचकांप्रमाणे नव्हते ज्यांना भिकेस लावता येत होते, लुबाडले जाऊ शकत होते, छळ केला जाऊ शकत होता, छिन्नविछिन्न करून बेघर केले जाऊ शकत होते. त्याचे बचावलेले केवळ एक पान, नक्षत्रासारखे या अंधकाराच्या काळोखाला भेदून जाऊ शकते.”—तिरपी अक्षरे आमची.
लेखक प्राईम ज्याचे वर्णन देतात ते, येथे पुनःनिर्माण केलेल्या पवित्र शास्त्राच्या पानाच्या बाबतीत प्रत्यक्षात पूर्ण झाले. ते मलपृष्ठाचे पान आहे, म्हणजेच, एखाद्या पुस्तकाच्या अनुवादकाची ओळख होण्यासाठी त्या पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या माहितीचे पान होय. वरील दोन समांतर रकाने अपोकॅलिप्स किंवा प्रकटीकरण पुस्तकाच्या समाप्तीची वचने आहेत.
या पुस्तकाच्या संबंधाने, पवित्र शास्त्राचा केंम्ब्रीज इतिहास (इंग्रजी) या आणखी एका पुस्तकाने म्हटले: “बॉनिफॉस्यो फेररचे कॅटलन पवित्र शास्त्राचे अनुवाद, १४७८ मध्ये वॉलेनस्यॉ येथे छापण्यात आले; १५०० च्या आधी धर्मसभेने, उपलब्ध असलेल्या सर्व प्रतींचा नाश केला, परंतु हिस्पानिक सोसायटी ऑफ अमेरिकाच्या ग्रंथालयात एकच पान बचावून राहिले आहे.”—तिरपी अक्षरे आमची.
वेन्डेल प्राईम यांनी असेही निरीक्षण केले की, “गर्भगळीत झालेले धर्मोपदेशक, पवित्र शास्त्राला चांगल्यारीतीने जपून ठेवण्याऐवजी त्यांना जाळून टाकत होते. या पवित्र अग्निला जळत ठेवण्यासाठी आणखी सरपण मिळाले नाही, नाहीतर ती अनेक वेळा आणि तेजस्वी राहिली असती. पुष्कळ ठिकाणी पवित्र शास्त्रांची होळी होत नव्हती, कारण तेथील अधिकारी वर्ग इतका दक्ष होता की जाळण्यासाठी एकही पवित्र शास्त्र शिल्लक राहिले नव्हते.” सामान्य लोकांसाठी बनवलेल्या पवित्र शास्त्रांचे पूर्णपणे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला गेला तरी, पुष्कळ प्रती यातून बचावल्या. प्राईम पुढे म्हणाले: “कैद्यांनी पवित्र शास्त्र, उचलून नेल्यामुळे किंवा मौल्यवान खडे आणि धातुंना, विपत्ती आणि धोक्याच्या काळात जपून ठेवले जाते त्याप्रमाणे, जपून ठेवल्यामुळे सुरक्षित राहिली.”
देवाचा संदेष्टा यशया याने लिहिले: “सर्व मानवजाति गवत आहे. . . गवत सुकते; फूल कोमजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.” (यशया ४०:६, ८) अनेक शतकांपासून, पवित्र शास्त्र प्रेमिकांच्या जनसमूहाने व अनेक धैर्यवान अनुवादकांनी, देवाच्या वचनासाठी खूप धोके पत्करले व कठीण त्रासही सहन केला. तरीही, केवळ मानवी प्रयत्न त्याच्या संरक्षणाची खात्री देऊ शकले नाहीत. त्याला जोपासून ठेवल्याबद्दल आम्ही पवित्र शास्त्राचा लेखक, यहोवा देव, याचे आभार मानतो.