वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ६/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कर्करोगाचे सहसा चुकीचे निदान
  • मस्तिष्काघाताची इशारेवजा लक्षणे
  • विवाहामुळे आनंद
  • साखळी पत्रांची होळी
  • बुडते शहर
  • दंगेखोर मुले
  • विध्वंसक मिच वादळ
  • आता हत्तींनाही सवलती
  • बुजऱ्‍या स्वभावावर मात
  • अपघात—नशीबामुळे नव्हे
  • मस्तिष्काघात—त्याचे कारण
    सावध राहा!—१९९८
  • त्याच्या परिणामांचा सामना करणे
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • तंबाखूपासून धुम्रपान करणाऱ्‍यांना व न करणाऱ्‍यांना असलेला धोका
    सावध राहा! माहितीपत्रक ८-४ (gbr8-4)
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ६/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

कर्करोगाचे सहसा चुकीचे निदान

न्यू सायंटिस्ट या नियतकालिकाच्या अहवालानुसार, मृत्यूच्या कारणावरील अधिकृत आकडेवारी, कर्करोगामुळे होणाऱ्‍या जीवहानीची कदाचित पूर्ण कल्पना देणार नाही. न्यू ऑर्लीअन्समधील लुइझिॲना वैद्यकीय केंद्रातील डॉ. एलिझाबेथ बर्टन यांनी, सन १९८६ ते १९९५ पर्यंत १,१०५ रुग्णांचे शवविच्छेदन अहवाल तपासले; कर्करोगाच्या चिकित्सालयीन निदानांची आणि शवविच्छेदनावरून लावलेल्या निदानाची तुलना करणे हा त्यामागील उद्देश होता. बर्टन यांच्या मते, चक्क ४४ टक्के रुग्णांमधील कर्करोगाचे निदान लावले गेले नव्हते किंवा मग निदान लावलेला कर्करोगाचा प्रकार चुकीचा होता. १९६० च्या दशकातील ५० टक्के शवविच्छेदनांच्या तुलनेत सध्या केवळ १० टक्के मृतकांचे शवविच्छेदन केले जाते, त्यामुळे “आणखीन पुष्कळशा चुका कधीच उघडकीस येणार नाहीत” असे नियतकालिकाचे म्हणणे आहे.

मस्तिष्काघाताची इशारेवजा लक्षणे

“अनेकांना मस्तिष्काघाताचे एकही लक्षण नीट ओळखता येत नाही,” असा एफडीए कन्सूमर अहवाल देते. सदर नियतकालिक पुढे म्हणते: “सर्वेक्षणातील निम्म्याहून किंचित अधिक लोकांनाच फक्‍त मस्तिष्काघाताच्या एखाद्या लक्षणाचे नाव सांगता येते होते, तर केवळ ६८ टक्के लोकांना मस्तिष्काघाताचे केवळ एखादे धोकेदायक कारण सांगता येत होते.” औद्योगीकरण झालेल्या पाश्‍चिमात्त्य जगात मस्तिष्काघात हे मृत्यूचे अग्रेसर आणि अपंगत्वाचे मुख्य कारण असताना देखील हे चित्र पहायला मिळते. मस्तिष्काघातामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी पहिले इशारेवजा लक्षण दिसताच ताबडतोब वैद्यकीय उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे. अचानक अशक्‍तपणा, बधिरपणा; चेहऱ्‍याचा, हातांचा किंवा पायांचा पक्षाघात; एका डोळ्याची दृष्टी अचानक अंधूक होणे किंवा दृष्टीच जाणे; बोलताना किंवा बोललेले समजून घेण्यात अडचण; आणि खासकरून इतर इशारेवजा लक्षणांसोबत, स्पष्ट कारण नसताना चक्कर येणे किंवा तोल जाणे ही सर्व मस्तिष्काघाताची सगळ्यात सामान्य लक्षणे आहेत.

विवाहामुळे आनंद

काहीजण विवाहास एक मोठे दडपण समजून त्याची टीका करतात, तर टीव्हीवरील विनोदी कार्यक्रम त्यास एक अगदीच पुरोगामी पद्धत म्हणून चित्रित करतात. पण, वस्तुस्थिती काय दाखवून देते? अविवाहित राहणारे लोक खरोखरच अधिक सुस्थितीत असतात का? फिलाडेल्फिया इंक्वायर्र यात उल्लेखिलेल्या एका महिला समाजशास्त्रज्ञेच्या मते तरी नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की विवाहित लोक, “सहसा अधिक आनंदी, अधिक निरोगी आणि अधिक श्रीमंत असतात.” सामुहिक पातळीवरून पाहता, विवाह करणाऱ्‍या लोकांत तणावग्रस्त होण्याचे, गुन्हे करण्याचे, अवैध ड्रग्स घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळते; शिवाय, अशा लोकांना सहसा सरकारी कल्याण योजनांच्या भरवशावर उदरनिर्वाह चालवावा लागत नाही. म्हणूनच, विवाहित लोक दीर्घायुष्यी असतात असे जे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्याविषयी आपल्याला आश्‍चर्य वाटायला नको.

साखळी पत्रांची होळी

सन १९९२ पासून जपानच्या नागोया शहरात दर वर्षी पत्रांची होळी करणारा एक बौद्ध विधी पार पाडला जातो. अनावश्‍यक पत्रे टाकण्यासाठी टपाल खात्याने सबंध शहरातील टपाल कचेऱ्‍यांमध्ये संचय पेट्या ठेवल्या आणि मग त्यातील पत्रांची होळी करण्यासाठी एका बौद्ध मंदिराला एक विधी पार पाडण्यास सांगितले. यावर खुलासा करताना आसाही ईव्हनिंग न्यूज वृत्तपत्राने म्हटले की ही सेवा, “पत्रांकडे दुर्लक्ष करण्याची किंवा स्वतः त्यांची विल्हेवाट लावण्याची भीती बाळगणाऱ्‍या अतिशय भोळ्याभाबड्या लोकांसाठी पुरवली जाते.” पण त्यात भीती वाटण्याचे काय कारण? कारण ही पत्रे, त्यांतील सूचनांचे अनुपालन करणाऱ्‍यांना लाभांची केवळ हमीच देत नाहीत, तर साखळी मोडणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीला दुर्दैवाची धमकीही देतात. उदाहरणार्थ, टोकिओमध्ये पत्रांची साखळी मोडणाऱ्‍या एका व्यक्‍तीचा खून करण्यात आला होता अशी ताकीद एका पत्राने दिली.

बुडते शहर

द न्यू यॉर्क टाईम्स वृत्तपत्रानुसार, “मेक्सिको शहर बुडत चालले आहे. महानगरात राहणाऱ्‍या १.८ कोटी रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या खाली असलेल्या जलधरातून इतके पाणी उपसून काढले आहे, की तिथली जमीन आता विलक्षण गतीने ढासळत चालली आहे.” त्यातच, “मेक्सिको शहराची जल वितरण यंत्रणा, ही सबंध जगभरात सगळ्यात गळकी यंत्रणा आहे. त्यामुळे या यंत्रणेत पंप केलेल्या प्रत्येक एक लिटर गोड्या पाण्यातले एक तृतीयांश पाण्याची गळती होते.” मग आणखीन जास्त पाणी उपसून काढावे लागते आणि त्यामुळेच मग शहर आणखीनच बुडत जाते. दुरुस्ती करणारा कर्मचारी वर्ग दर वर्षी ४०,००० फुटलेले पाईप दुरुस्त करतो; पण, या शिवाय आणखीन पुष्कळशा फुटलेल्या पाईप्सचा पत्ताही लागत नाही. अर्थात, मेक्सिको हे बुडत चाललेले एकच शहर नाही. उदाहरणार्थ, २० व्या शतकात इटलीतले व्हेनिस शहर २३ सेंटिमीटर खाली धसले आहे. पण, मेक्सिको शहर तर चक्क नऊ मीटर खाली बुडाले आहे!

दंगेखोर मुले

द न्यू यॉर्क टाईम्स वृत्तपत्राच्या अहवालानुसार १६,२६२ अमेरिकन किशोरवयीनांच्या एका सर्वेक्षणातून उघडकीस आले, की साधारणपणे ५ पैकी एकजण स्वतःपाशी शस्त्र बाळगतो आणि १० पैकी एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वेक्षणात देशभरातील १५१ शाळांतील मुलांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि लैंगिक कामांविषयी तसेच ड्रग्स, दारू आणि तंबाखूच्या वापरासंबंधी माहिती काढण्यासाठी गुप्त प्रश्‍नावलींचा उपयोग करण्यात आला होता. दुर्धर व्याधी निवारणाचे आणि आरोग्य पुरस्काराच्या राष्ट्रीय केंद्रातील लॉरा कॅन म्हणतात: “यावरून हेच समजते, की अनेक मुले जीव धोक्यात घालणारी कामे करतात ज्यामुळे दुखापत किंवा मृत्यू ओढवू शकतो किंवा पुढे दुर्धर व्याधी होऊ शकते.”

विध्वंसक मिच वादळ

ऑक्टोबर २७, १९९८ रोजी, मिच वादळाने मध्य अमेरिकेला झोडपून काढले; आणि त्यात ११,००० पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. याशिवाय, हजारो बेपत्ता आहेत, त्यांचा मृत्यू झाला असे गृहित धरले गेले, तर सुमारे २३ लाख बेघर झाल्याची माहिती मिळाली. वादळाचा सर्वात जबरदस्त तडाखा बसला तो हाँडुरास आणि निकाराग्वाला. ग्रामीण भागातील शेतजमिनीवर एक मीटरहून अधिक पाऊस पडला; ही या भागात दोनशे वर्षांत आलेली सर्वात भयंकर नैसर्गिक दुर्घटना आहे असे म्हटले जाते. चिखलाच्या लोटांखाली गावेच्या गावे अक्षरशः बुडाली, तर काही पुराच्या वाढत्या प्रवाहात वाहून गेली. हाँडुरासचे राष्ट्रपती कार्लोस फ्लोर्स फाकूसे म्हणाले: “जे शहर टप्प्याटप्प्याने उभे करण्यासाठी आम्हाला ५० वर्षे लागली तेच शहर चक्क ७२ तासांत आम्ही गमावले.” जीव आणि वित्त हानी होण्यासोबतच वादळग्रस्त भागाचा बाहेरच्या जगाशी संपर्कही तुटला. वादळाच्या वाटेत असलेल्या सर्व लहान नगरातील विद्युत आणि टेलिफोन कनेक्शन काढून टाकले गेले. शेकडो रस्ते आणि पूल वाहून गेले आणि परिणामी, जिवंत बचावलेल्या कित्येक लोकांना अन्‍न, शुद्ध पाणी आणि औषधे यांशिवाय कित्येक दिवस एकाच ठिकाणी अडकून राहावे लागले. साहाय्य संस्थांकडे भरपूर अन्‍नसाठा होता परंतु तो लोकांपर्यंत पोचवायचा कसा हा प्रश्‍न होता. वित्तहानीबरोबरच अनेकांचे नोकरीधंदे देखील गेले. केळी, कलिंगड, कॉफीच्या बिया आणि भात यांसारखे जवळजवळ ७० टक्के मुख्य पीक वाहून गेले. “याच्या तुलनेत १९७४ चे फीफी वादळ काहीच नव्हते,” असे हाँडुरासचे उपराष्ट्रपती विल्यम हान्डल म्हणाले. “फीफी वादळाच्या परिणामांतून सावरण्यासाठी आम्हाला केवळ १२ ते १४ वर्षे लागली; पण, यावेळेस ३०, ४० वर्षे लागतील.”

आता हत्तींनाही सवलती

भारताच्या अनेकानेक भागांत हत्ती हे कामगार वर्गाचा एक अविभाज्य हिस्सा आहेत. द वीक नियतकालिकाच्या अहवालानुसार उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्यात सर्वसामान्य कर्मचारी या नात्याने सरकारी वेतनपटावर हत्तींची नावे नोंदवली आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी कामाला लागणारे हे हत्ती ५० वर्षांपर्यंत आपल्या मालकांची सेवा करतात. इतर सरकारी कर्मचाऱ्‍यांप्रमाणेच, सेवानिवृत्त झाल्यानंतर हत्तींना सेवानिवृत्ती वेतन मिळते; तसेच त्यांना प्रशिक्षण देणारा, त्यांचे पालनपोषण करणारा एक राखणदारही त्या प्रत्येकावर नेमला जातो. आपल्या कार्य-काळात हत्तीणींनाही काही लाभ मिळतात; प्राणीसंग्रहालयाच्या ऐषोरामात एक वर्षभराची प्रसूती रजा. वर्षभरानंतर, लाकडाचे ओंडके वाहून नेणे, रान हत्तींना कोंडवाड्यात वळवणे, त्यांना प्रशिक्षण देणे तसेच राष्ट्रीय उद्यानांत आणि सुरक्षित अरण्य क्षेत्रांत गस्त घालणे अशा महत्त्वाच्या कामावर त्या पुन्हा रूजू होतात.

बुजऱ्‍या स्वभावावर मात

कॅनडाच्या टोरोन्टो स्टार वृत्तपत्रानुसार, “जवळजवळ १३ टक्के प्रौढांना अतिशय बुजरा स्वभाव असण्याची समस्या आहे.” सदर वृत्तपत्र म्हणते की, या समस्येमुळे “ते जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाहीत.” बुजऱ्‍या स्वभावावर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी पुढील काही गोष्टी सुचवल्या आहेत: “बातम्या, मासिकांतील लेख, पुस्तके, छंद किंवा चित्रपट यांतून ज्यांवर संभाषण सुरू करता येईल असे विषय निवडा.” “दृष्टी संपर्क आणि सक्रिय श्रवण यांसारख्या मौखिक व सांकेतिक संभाषण कौशल्यांचा सराव करा.” “तुम्हाला भीती वाटते नेमक्या त्याच गोष्टी करण्यास स्वतःला भाग पाडा.” “तुमचे मूल बुजऱ्‍या स्वभावाचे असल्यास, तुम्ही त्याला लोकांत मिळण्यामिसळण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.” बुजऱ्‍या स्वभावावर मात करण्यासाठी अपरिमित प्रयत्न करण्याचे उत्तेजन देण्यात आले होते; कारण अनुभव दाखवून देतो, की तुम्ही जितका अधिक प्रयत्न करता तितकेच तुम्हाला ते सोपे जाते.

अपघात—नशीबामुळे नव्हे

ब्राझीलियन आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार देशभरात दर वर्षी कमीतकमी २२,००० बालकांचा आणि युवकांचा अपघाती मृत्यू होतो. यांपैकी सर्वाधिक जीव जातात ते वाहन अपघातांत. पण, पेडिआट्रिक्सच्या ब्राझीलियन संस्थेचे अध्यक्ष लीनकोन फ्रेरी यांनी म्हटले: “अपघात खरं तर टाळता येण्यासारखे आहेत; ते नशीबामुळे होतात असे आता आपण समजून चालू शकत नाही.” तसेच, राष्ट्रीय अपघात-निवारण मोहिमेच्या सूत्रसंचालिका तेरेझा कॉस्टा यांनीही असे म्हटले की, ‘अतिसार, श्‍वासोच्छ्‌वासाचे संसर्ग, संसर्गजन्य रोग इत्यादी टाळण्यासाठी सरकारी पातळीवर पावले उचलण्यात आल्यामुळे मागच्या १५ वर्षांत सदर कारणांमुळे होणाऱ्‍या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे,’ तेव्हा, अपघातही टाळण्याचा प्रयत्न केल्यास बरेच जीव वाचतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा