तरुण लोक विचारतात . . .
लठ्ठ होण्याची भीती मी कशी घालवू शकते?
“मेयोनेस माझा जीव की प्राण आहे; त्याच्याशिवाय दुसऱ्या कशाचाही मी विचार करू शकत नाही. त्यामुळे माझ्या सँडविचवर मी मेयोनेस घालू की नको या पेचात मी पडले आहे. मग निर्णय काय घेतला? मेयोनेस पूर्णपणे बंद! का? कारण त्यात भरपूर कॅलरीज असतात. झाली ना पुन्हा ॲनोरेक्सिआचीच जीत आणि माझी हार?”—जेमी.
आज लाखो युवक आहारसंबंधित विकाराने ग्रासलेले आहेत.a सुरवातीला, स्वतःची उपासमार करून घेणे (ॲनोरेक्सिआ) किंवा आधाशासारखे खाऊन मग मुद्दामहून ओकारी काढण्याची सवय लावून घेणे (बुलीमिया) हा मुळीच त्यांचा हेतू नव्हता; तर, केवळ काही किलो वजन कमी करणे इतकाच त्यांचा उद्देश होता. पण, काही कळायच्या आत ते उपासमारीच्या किंवा ओकारीच्या एका भीषण दुष्टचक्रात सापडले. जेमी म्हणते: “केवळ माझं वजन नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूने मी डायटिंग सुरू केलं. पण आता डायटिंगच माझ्यावर नियंत्रण गाजवत आहे.”
तुम्हाला खाण्यापिण्याची किंवा तुमच्या वजनाची अवास्तव भीती वाटत असल्यास तुम्ही ती कशी घालवू शकता? प्रथम, हे लक्षात घ्या, की तुमच्याआधी इतर अनेक युवकांनी आहारसंबंधित विकाराशी झुंज दिली आहे आणि त्यात त्यांची जीतही झाली! पण, त्यांना हे कसे जमले?
सौंदर्याची तुमची व्याख्या
आहारसंबंधित विकाराशी यशस्वीरित्या झुंजण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे तुमच्या स्वरूपाविषयी एक वास्तविक दृष्टिकोन बाळगणे अर्थात तुमचे स्वरूप आहे तसे स्वीकारणे. बदलते स्वरूप, बदलते जीवन (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “आहारसंबंधित विकार असलेले अनेक लोक आपल्या शरीरयष्टीविषयी एक विकृत दृष्टिकोन बाळगतात. एका वास्तविक दृष्टिकोनातून ते आपल्या शरीराकडे पाहत नाहीत; उलट, आपली स्वतःची आणि खासकरून आपल्या स्वरूपाची ते नको तितकी टीका करतात.”
किंबहुना काही किशोरवयीनांना स्वतःविषयी काय वाटते हे सर्वस्वी त्यांच्या शारीरिक स्वरूपावर अवलंबून असते; लहानशीच एखादी खोट असली तरीही, मोठे दुर्दैव ओढवल्यासारखी त्यांची अवस्था होते. उदाहरणार्थ, १७ वर्षांची विकी म्हणते: “शी! मी इतकी लठ्ठ आहे, मला स्वतःकडे पाहावत नाही. माझी कंबर इतकी मोठी आहे की इन करूनही काही घालता येईनासं झालंय.” चक्क दहा किलो वजन कमी करून देखील विकीचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे तिने खाणेपिणेच सोडून दिले किंवा मग अधाशीपणाने खाऊन ती खाल्लेले सगळे ओकून टाकू लागली.
खरे तर, आपल्या स्वरूपाची थोडीफार काळजी करणे यात काहीच वावगे नाही. मनोरंजक गोष्ट अशी, की बायबलमध्ये सारा, राहेल, योसेफ, दावीद आणि अबीगईल यांशिवाय इतर अनेकानेक स्त्रीपुरुषांच्या शरीरयष्टीची, स्वरूपाची स्तुती केलेली आहे.b दाविदाची शुश्रूषा करणारी अबीशग ही “तरुणी फार सुंदर होती,” असेही बायबल म्हणते.
खरे सौंदर्य म्हणजे?
पण, याचा अर्थ एखाद्याच्या बाह्यस्वरूपाला किवा शरीरयष्टीला बायबल सर्वाधिक महत्त्व देते असे नाही. उलट, “अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची” ते प्रशंसा करते. (१ पेत्र ३:४) या आंतरिक व्यक्तित्वामुळेच एखादी व्यक्ती देवाच्या आणि मनुष्याच्या नजरेत एकतर आकर्षक किंवा तिरस्कृत ठरते.—नीतिसूत्रे ११:२०, २२.
दावीद राजाचा पुत्र, अबशालोम याचेच उदाहरण घ्या. बायबल म्हणते: “सर्व इस्राएलात सौंदर्याविषयी प्रशंसनीय असा अबशालोमासारखा कोणी नव्हता; त्याच्या ठायी नखशिखांत काही दोष नव्हता.” (२ शमुवेल १४:२५) पण, हा तरुण विश्वासघातकी निघाला. गर्वामुळे आणि महत्वाकांक्षेमुळे, खुद्द यहोवाने अभिषिक्त केलेल्या राजाला पदच्युत करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यामुळे बायबल अबशालोमाविषयी चांगले बोलत नाही; उलट निर्लज्ज, धोकेबाज आणि खुनशी द्वेष बाळगणारा मनुष्य असे चित्र बायबल त्याच्याविषयी रंगवते.
एखाद्याचे बाह्यस्वरूप, त्याच्या खऱ्या सौंदर्याचे, देखणेपणाचे मापक नसते. म्हणूनच बायबल यथायोग्यपणे म्हणते: “ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ति वेचून सूज्ञता संपादन कर. ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल; तुला सुंदर मुकुट देईल.”—नीतिसूत्रे ४:७, ९.
पण, स्वरूपाविषयीचे असमाधानच आहारसंबंधित विकाराचे एकमेव कारण नाही, हे मान्य करावे लागेल. एक संदर्भग्रंथ म्हणतो: “खाण्यापिण्याची अवास्तव भीती असणाऱ्या तसेच ॲनोरेक्सिआ नर्व्होसा, बुलीमिया आणि ओव्हरईटिंग (खादाडपणा) यांसारख्या आहारसंबंधित विकारांना बळी पडलेल्या लोकांमध्ये सहसा न्यूनगंड असतो; दुसऱ्या शब्दांत, त्यांना स्वतःविषयी काहीच किंमत राहत नाही आणि इतरांनाही आपली किंमत नाही असेच त्यांना वाटत असते.”
न्यूनगंडाच्या या भावनेस एक ना अनेक गोष्टी खतपाणी घालतात. उदाहरणार्थ, तारुण्याच्या उमलत्या काळात आणि खासकरून तुमच्या वयाच्या इतर मुलामुलींच्या तुलनेत तुमच्या शरीराची लवकर वाढ होत असल्यास तुमची अगदी दोलायमान मनःस्थिती होऊ शकते. किंवा मग, काही तरुण अशा घरात वाढलेले असतील जिथे सतत समस्या असतात, एवढेच नाही तर मारझोड आणि लैंगिक अत्याचारही होत असतो. कारण कोणतेही असो, न्यूनगंडातून सावरण्याचा एक मार्ग म्हणजे या भावनेस सरपण पुरवणाऱ्या गोष्टी ओळखणे. याचा अर्थ, व्यक्ती या नात्याने स्वतःची खरी किंमत ओळखणे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते वांच्छनीय गुण असतातच, यात शंका नाही. (पडताळा १ करिंथकर १२:१४-१८.) कदाचित, तुम्हाला स्वतःला ते दिसणार नाहीत हेही खरे. पण, एखादा प्रौढ मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला त्याची जाणीव करून देऊ शकते.
परंतु, आपल्या आरोग्यासाठी वजन कमी करण्याची खरोखरच गरज असल्यास काय? बायबल आपल्याला सांगते की आपण, “नेमस्त” असावे. (१ तीमथ्य ३:११) त्यामुळे, डायटिंग करण्याच्या बाबतीत अतिरेक न करणे तसेच झटपट-वजन-घटवा या आशयाच्या जाहीरातींना बळी न पडणेच सर्वात चांगले आहे. वजन कमी करण्याचा एक सर्वात उत्तम मार्ग म्हणजे योग्य आहार घेणे आणि पुरेसा व्यायाम करणे. एफडीए कन्सूमर नियतकालिक म्हणते, “दुसऱ्या कोणत्याही गोष्टीप्रमाणेच वजन घटवण्याचेही योग्य आणि अयोग्य असे दोन मार्ग आहेत. अयोग्य मार्ग म्हणजे न जेवणे, डायट ब्रेड आणि पाणी यांशिवाय दुसरे काहीच न खाण्याचा निश्चय करणे, वजन कमी करण्यासाठी गोळ्याऔषधे घेणे किंवा मुद्दामहून ओकारी काढून खाल्लेलं बाहेर काढणे.”
मनातले बोला
समाज सेविका नॅन्सी कॉलॉड्नी यांच्या मते आहारसंबंधित विकार, “नकाशा, दिशादर्शक न घेता, कुठून, केव्हा बाहेर पडायचे किंवा बाहेर पडणे शक्य आहे की नाही अशा अनिश्चित अवस्थेत एकटेच एखाद्या चक्रव्यूहात घुसण्यासारखे आहे. . . . तुम्ही जितका वेळ त्यात घुटमळत राहता तितकेच तुम्ही भांबावून जाता आणि त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याच्या निष्फळ प्रयत्नात तुम्ही आणखीनच हवालदिल होऊन जाता.” म्हणूनच, तुमच्यामध्ये ॲनोरेक्सिआ किंवा बुलीमियाची लक्षणे असल्यास तुम्ही कुणाची तरी मदत घेतलीच पाहिजे. मदत न घेता, तुम्ही स्वबळावर त्या ‘चक्रव्यूहातून’ बाहेर पडूच शकणार नाही. यास्तव, आपल्या आईपाशी किंवा वडिलांपाशी किंवा मग एखाद्या विश्वासू प्रौढ व्यक्तीपाशी मनातले बोला. बायबलचे एक नीतिसूत्र म्हणते: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतिसूत्रे १७:१७.
यहोवाच्या अनेक साक्षीदारांना ख्रिस्ती मंडळीतील वडील असे विश्वासार्ह सोबती असल्याचे आढळले आहेत. अर्थात, वडील काही डॉक्टर नसतात किंवा ते वैद्यकीय मदतही देऊ शकत नाहीत. पण ख्रिस्ती वडील, ‘गरिबाच्या आरोळीकडे’ दुर्लक्ष करणार नाहीत; उलट, त्यांच्या सल्ल्यामुळे, प्रार्थनांमुळे, ‘तो रोगी आध्यात्मिकरित्या बरा’ होऊ शकतो.—नीतिसूत्रे २१:१३; याकोब ५:१३-१५, सुबोध भाषांतर.
एखाद्याशी समोरासमोर बसून मनातले बोलण्यास जरा अवघडल्यासारखे वाटत असल्यास तुमचे विचार कागदावर उतरवून पत्राने उत्तर देण्याची एखाद्याला विनंती करा. मनातले बोलून टाकणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. नॅन्सी कॉलॉड्नी यांच्या मते, “कुणाचीही मदत न घेता स्वबळावर ही समस्या सोडवणे आता आपल्याला जमणार नाही हे स्वीकारल्याने, दुसऱ्या एका व्यक्तीला आपली मदत करू देण्याचा एक करारच तुम्ही स्वतःशी बांधत असता.” शिवाय, “सुरवातीला असा विचार करणं, ही पावलं उचलणं फार सोपं वाटणार नाही; पण, चक्रव्यूहातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारी ही व्यावहारिक पावलं आहेत.”
या शिवाय, मनोबल वाढवण्यासाठी ख्रिस्ती युवकांजवळ असलेले आणखी एक माध्यम म्हणजे—प्रार्थना. देवाला प्रार्थना करणे हे मनःशांती प्राप्त करण्याचे काही मानसशास्त्रीय साधन नाही; तर, आपण स्वतःला जितके जाणतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला जाणणाऱ्या सृष्टिकर्त्यासोबत दळणवळण राखण्यासाठी प्रार्थना एक खरेखुरे आणि अत्यावश्यक साधन आहे! (१ योहान ३:१९, २०) सर्व रोगराईंचे उच्चाटन करण्याची यहोवाची नियुक्त वेळ अद्याप आलेली नाही; पण आपण ढळू नये म्हणून प्रत्येक पाऊल टाकताना देव आपल्या पाठीशी राहू शकतो. (स्तोत्र ५५:२२) स्वानुभवावरून स्तोत्रकर्त्या दाविदाने लिहिले: “मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडविले.”—स्तोत्र ३४:४, ६.
तर मग, आपल्या सर्वात गहिऱ्या भावना यहोवा देवाला हमखास सांगाव्यात. “त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो.” असे प्रेषित पेत्राने लिहिले. (१ पेत्र ५:७) यहोवाच्या प्रेमळ कृपेबद्दल कदर विकसित करण्यासाठी स्तोत्र ३४, ७७, ८६, १०३ आणि १३९ काळजीपूर्वक वाचा. या स्तोत्रांवर मनन-चिंतन केल्याने तुमची पक्की खात्री होईल, की यहोवा निष्ठावान आहे आणि तुम्ही यशस्वी व्हावे अशी सदिच्छा तो बाळगतो. त्याचे वचन वाचल्याने तुम्हालाही दाविदासारखेच वाटू लागेल; त्याने लिहिले: “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.”—स्तोत्र ९४:१९.
वेळ लागेल, पण धीर सोडू नका
आहारसंबंधित विकारावर मात करण्यासाठी मदत स्वीकारणारे अनेकजण रातोरात बरे होत नसतात. सुरवातीला उल्लेखिलेल्या जेमीचेच उदाहरण घ्या ना. मदत मिळत असताही केवळ एक वाटी सिरियल खाणे तिच्या अगदी जीवावर यायचे. “मला सतत स्वतःची समजूत घालावी लागते, की हे माझ्या तब्येतीसाठी चांगलं आहे, आणि जिवंत राहण्यासाठी मी खाल्लंच पाहिजे,” असे ती म्हणते. “चमचाभर अन्नही मला हजारो पाऊंडांसारखं वाटतं.”
एक वेळ तर जेमी मृत्यूच्या अगदी द्वारापाशी जाऊन पोहंचली होती; पण तिने खाण्यापिण्याची भीती घालवून टाकण्याचा दृढ संकल्प केला: “आता मी मरणार नाही,” असे ती म्हणाली. “मी झुंजणार, त्यावर विजय मिळवणार. ॲनोरेक्सिआवर मी जरूर मात करणार. ते सोपं नसेल हे खरं. पण, मी हार मानणार नाही.” तुम्हालाही हे शक्य आहे!
[तळटीपा]
a मे ८, १९९८ च्या सावध राहा! अंकातील पृष्ठे २०-२२ पाहा.
[२६ पानांवरील चित्र]
संतुलित आहार आणि पुरेसा व्यायाम यांमुळे आपले वजन नियंत्रणात ठेवणे शक्य आहे