वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ३/८ पृ. ४-८
  • मस्तिष्काघात—त्याचे कारण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मस्तिष्काघात—त्याचे कारण
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्याचे परिणाम
  • संचार समस्या
  • भावनिक आणि व्यक्‍तिमत्त्वात बदल
  • कौटुंबिक सदस्य देखील पीडित
  • त्याच्या परिणामांचा सामना करणे
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • मस्तिष्काघात!
    सावध राहा!—१९९८
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९८
g98 ३/८ पृ. ४-८

मस्तिष्काघात—त्याचे कारण

“मेंदू हा शरीराचा सर्वात नाजूक अवयव आहे,” असे कॅनडा, लंडन येथील पश्‍चिम ओन्टारियो विद्यापीठाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. व्ह्लडीमर हाचिन्स्की म्हणतात. मेंदूचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या केवळ २ टक्के असून त्यात दहा अब्ज तंत्रिका कोशिका असतात ज्या आपला प्रत्येक विचार, हालचाल आणि संवेदन निर्माण करण्यासाठी सतत दळणवळण करत असतात. ऊर्जेसाठी ऑक्सिजन आणि ग्लुकोजवर अवलंबून असल्याने, मेंदूला रोहिणींच्या एका क्लिष्ट व्यवस्थेतून हा पुरवठा सतत केला जातो.

तथापि, मेंदूच्या कोणत्याही मर्यादित भागाला काही सेकंदांसाठीही ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर तंत्रिका एककाच्या नाजूक कार्यांना इजा पोहंचते. काही मिनिटांपेक्षा अधिक काळ हे झाल्यास मेंदूला हानी पोचते कारण मेंदूच्या कोशिकांची कार्ये बंद पडल्यावर त्या कोशिका सुद्धा मृत होतात. या स्थितीला इस्केमिया म्हणतात; प्रामुख्यत्वे, रोहिणीत व्यत्यय आल्याने ऑक्सिजनचा पुरवठा न होण्याची ही स्थिती असते. ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने एका मागोमाग एक अशा घातक रासायनिक प्रतिक्रिया घडतात की मेंदूच्या ऊतकाला आणखी हानी पोचते. त्याचा परिणाम म्हणजे मस्तिष्काघात होय. रक्‍तवाहिन्या फुटतात आणि मेंदूत रक्‍तस्राव झाल्याने सर्व संबंधित मार्गांमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा देखील मस्तिष्काघात होतो. यामुळे स्नायूंना मिळणाऱ्‍या रासायनिक आणि विद्युत संदेशांमध्ये व्यत्यय येतो आणि मेंदूच्या ऊतकाला हानी पोचते.

त्याचे परिणाम

प्रत्येक मस्तिष्काघात वेगळा असतो, आणि मस्तिष्काघातामुळे कोणावर कसा परिणाम होईल हे काही सांगता येत नाही. मस्तिष्काघाताचा प्रत्येक संभवनीय परिणाम कोणालाही सोसावा लागत नाही, तरीपण त्याचे परिणाम सौम्य आणि थोडेफार दिसणारे ते तीव्र आणि वेदनामय व ठळक असू शकतात. मेंदूच्या ज्या भागात मस्तिष्काघात होतो त्यावर शरीराच्या कोणत्या कार्यशीलतेत बिघाड होणार हे निर्भर करते.

दुर्बलता किंवा हातपाय लुळे पडणे ही एक सामान्य प्रकारची विकृती आहे. बहुधा, ही शरीराच्या एकाच भागावर परिणाम करते; मेंदूच्या ज्या भागात मस्तिष्काघात होतो त्याच्या विरुद्ध भागावर हा परिणाम होतो. अशाप्रकारे, उजव्या मेंदूला हानी पोचल्यास डाव्या बाजूचा पक्षाघात होतो आणि डाव्या मेंदूला हानी पोचल्यास उजव्या बाजूचा पक्षाघात होतो. काही व्यक्‍तींच्या हातापायांची हालचाल होऊ लागेल, पण त्यांचे स्नायू इतके थरथरत असतील की हातपाय कुठल्या कुठे जात आहेत असे भासेल. त्यामुळे मस्तिष्काघात झालेली व्यक्‍ती, तोल सांभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या नवशिक्या स्केटरसारखी दिसते. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर येथील डॉ. डेव्हिड लेव्हाईन म्हणतात: “हातपाय हलतो आहे की नाही आणि तो कुठे आहे अशी जी संवेदना असते ती त्यांनी गमावलेली असते.”

पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक पीडितांना झटके येतात ज्यामुळे अधूनमधून अनियंत्रित कार्यहालचाल आणि सहसा बेशुद्ध पडणे अशांचा त्यांना त्रास होतो. तसेच, वेदना होणे शिवाय संवेदनात बदल होणे हे देखील सामान्य असते. ज्याचे हातपाय सतत बधिर होतात असा मस्तिष्काघाताचा एक रुग्ण म्हणतो: “कधीकधी रात्री झोपेत माझ्या पायांना कशाचा तरी स्पर्श होतो आणि मला एकदम जाग येते कारण मला इलेक्ट्रिक शॉक बसल्यासारखंच वाटतं.”

मस्तिष्काघातामुळे दोन-दोन आकृत्या दिसू शकतात आणि गिळताना त्रास होऊ शकतो. मुखातील आणि घशातील संवेदी केंद्र बिघडले तर तोंडातून लाळ गळणे अशी आणखी मानहानी मस्तिष्काघाताच्या पीडितांना सहन करावी लागू शकते. कोणत्याही पाच ज्ञानेंद्रियांवर दुष्परिणाम होऊन दृष्टी, श्रवण, गंध, रस आणि स्पर्श यांमध्ये बाधा येऊ शकते.

संचार समस्या

कल्पना करा की, अंधूक प्रकाश असलेल्या एका गल्लीतून दोन धिप्पाड अनोळखी लोक तुमचा पाठलाग करत आहेत. मागे वळून पाहिल्यावर, ते तुमच्याच दिशेने धावत येत असल्याचे तुम्हाला दिसते. तुम्ही मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न करता पण तोंडातून आवाज निघत नाही! अशा परिस्थितीत केवढे असहाय वाटू शकते याची कल्पना तुम्ही करू शकता का? मस्तिष्काघाताच्या पीडितांची वाचा अचानक जाते तेव्हा पुष्कळांना असेच वाटते.

आपले विचार, भावना, आशा आणि भीती व्यक्‍त करता न येणे—लाक्षणिकपणे आपल्या मित्रांपासून आणि कुटुंबापासून खूप दूर असणे—हा मस्तिष्काघाताचा सर्वात उद्‌ध्वस्त करणारा परिणाम आहे. मस्तिष्काघात झालेल्या एका व्यक्‍तीने त्याचे असे वर्णन केले: “प्रत्येक वेळी मी काही बोलायला पाहायचो तर तोंडातून शब्दच बाहेर पडायचे नाहीत. मला बळजबरीनं शांत राहावं लागायचं आणि कुणाचं बोलणं किंवा लिहून दाखवलेल्या गोष्टीही मला कळायच्या नाहीत. शब्द ऐकल्यावर जणू . . . आजूबाजूचे लोक एखादी परकी भाषा बोलताहेत असंच वाटायचं. मला इतरांचं बोलणं कळायचंही नाही आणि स्वतःलाही काही बोलता यायचं नाही.”

परंतु, चार्ल्सला बोललेले सर्वकाही कळत होते. पण उत्तर देण्याविषयी तो लिहितो: “मी मनात काय बोलायचंय ते ठरवायचो पण शब्द मात्र अडखळत अडखळत बाहेर पडायचे. त्या वेळी आतल्या आत मला कोंदटल्यासारखं वाटायचं.” मस्तिष्काघात: मालकाचे माहितीपुस्तक (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात आर्थर जोझेफ्स म्हणतात: “बोलताना शंभरपेक्षा अधिक विविध स्नायूंवर नियंत्रण आणि सहसंयोजन केले जाते आणि त्या प्रत्येक स्नायूला सरासरी शंभरपेक्षा अधिक मोटर युनिट नियंत्रित करतात. . . . बोलण्याच्या प्रत्येक सेकंदाला चक्क १,४०,००० तंत्रिका-स्नायूंच्या कार्यहालचाली आवश्‍यक [असतात]. म्हणून या स्नायूंवर नियंत्रण करणाऱ्‍या मेंदूच्या भागाला इजा पोचते तेव्हा बोलण्यात अडखळण होणार नाही तर काय?”

बोलण्यात निर्माण होणारा पुष्कळसा गोंधळ मस्तिष्काघातामुळे होत असतो. उदाहरणार्थ, बोलता येत नसलेल्या व्यक्‍तीला गाता येत असेल. दुसऱ्‍या व्यक्‍तीला कदाचित बोलावेसे वाटते तेव्हा बोलता येत नसेल पण अचानक त्याच्या तोंडून काही शब्द बाहेर पडत असतील किंवा तो बोलतच राहील. इतरजण वारंवार काही शब्द किंवा वाक्यांश म्हणत राहतील किंवा योग्य वेळी त्यांचा उपयोग करणार नाहीत; उदाहरणार्थ, नाही म्हणायचे असल्यास हो म्हणतील किंवा हो म्हणायचे असल्यास नाही म्हणतील. काहींना काय म्हणायचे आहे ते ठाऊक असेल, पण त्यांचा मेंदू ते शब्द बोलून दाखवायला तोंडाला, ओठांना आणि जिभेला आज्ञा देणार नाही. किंवा स्नायूंच्या दुर्बलतेमुळे त्यांचे बोलणे अर्धवट असेल. काहीजण काही शब्द बोलल्यावर एकदम भडकतात आणि मग पुन्हा बोलू लागतात.

मस्तिष्काघातामुळे होणारा आणखी एक बिघाड म्हणजे भावनिक स्वराला नियंत्रित करणाऱ्‍या मेंदूच्या भागाची इजा होय. परिणामस्वरूप आवाजात काही चढउतार नसतो. किंवा इतरांचा भावनिक स्वर समजणे कठीण होऊ शकते. या तसेच वर उल्लेखिलेल्या संचार अडखळणांमुळे कौटुंबिक सदस्यांमध्ये, जसे की, पती आणि पत्नीमध्ये एक दरा निर्माण होऊ शकतो. जेऑर्ज म्हणतात: “मस्तिष्काघातामुळं चेहऱ्‍यावरील हावभावांवर, खरं तर संपूर्ण व्यक्‍तिमत्त्वावर परिणाम होत असल्यानं आमच्यामध्ये पूर्वीसारखा नातेसंबंध राहिला नाही. मला असं वाटलं जणू माझी ही बायको कोणी वेगळीच व्यक्‍ती आहे आणि तिला पुन्हा एकदा जाणून घ्यावं लागेल.”

भावनिक आणि व्यक्‍तिमत्त्वात बदल

अनुचित लहरीपणा, अचानक रडणे किंवा हसणे, खूप क्रोधित होणे, असामान्य शंकेखोरपणा आणि अत्यंत खिन्‍नता ह्‍या गोष्टी गोंधळविणाऱ्‍या भावनिक आणि व्यक्‍तिमत्त्व बिघाडांचा केवळ एक भाग असतील ज्या मस्तिष्काघात झालेल्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना सोसाव्या लागत असतील.

मस्तिष्काघात झालेले गिल्बर्ट नामक एक पीडित म्हणतात: “काही वेळा मी साध्यासुध्या गोष्टींवरही हसतो किंवा रडतो. कधी कधी मी हसतो तेव्हा कोणीतरी मला विचारतं, ‘अरे, तुम्हाला हसायला काय झालं?’ आणि त्यावेळी माझ्याकडं त्याचं उत्तर नसतं.” याशिवाय, आपला तोल सांभाळता न येणे आणि थोडेसे लंगडत चालणे अशा समस्यांमुळे गिल्बर्ट म्हणतात: “मला असं वाटतं की हे दुसऱ्‍या व्यक्‍तीचं शरीर आहे, मी कुणीतरी दुसरीच व्यक्‍ती आहे, मस्तिष्काघाताआधी असलेली तीच व्यक्‍ती मी नाही.”

मानसिक आणि शारीरिक अपंगत्व सहन करावे लागत असल्याने अगदी बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच काही भावनिक बिघाड जाणवत नाहीत. मस्तिष्काघातामुळे बोलण्यात विकृती आणि अर्धांगवायू ज्यांना झाला ते हिरोयुकी म्हणतात: “कित्येक दिवसांनंतरही माझ्यात काही सुधार झाला नाही. मला पूर्वीसारखं काम करता येणार नाही हे कळाल्यावर मी खिन्‍न झालो. मी दुसऱ्‍या गोष्टींना आणि लोकांना दोष देऊ लागलो आणि आता माझ्या भावना अनावर होतील असं मला वाटलं. माझ्यात मर्दानीपणा राहिला नव्हता.”

मस्तिष्काघाताच्या पीडितांना भीती आणि अस्वस्थता वाटणे सामान्य गोष्ट आहे. एलन म्हणतात: “माझ्या डोक्यात कोंदटल्यासारखं होतं तेव्हा मला असुरक्षित वाटतं; कारण हा पुढच्या झटक्याचा इशारा असू शकतो. मी जर नकारात्मक विचार करत राहिले तर माझा नुसता थरकाप होतो.” रॉन यांना जी अस्वस्थता वाटते त्याविषयी ते म्हणतात: “काही वेळा तर योग्य निष्कर्ष काढणं अशक्यच असतं. एकाच वेळी दोन किंवा तीन लहानसहान समस्या हाताळायचं म्हटलं तर मला जमत नाही. मी इतक्या लवकर काही विसरून जातो की काही मिनिटांआधीच आपण काय ठरवलं तेसुद्धा माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळं मी अशा काही विचित्र चुका करतो की त्यामुळं मला आणि इतरांनाही लाजल्यासारखं होतं. काही वर्षांनंतर माझं काय व्हायचं? मी बुद्धिमान व्यक्‍तीसारखं बोलू शकेन किंवा गाडी चालवू शकेन का? मी माझ्या पत्नीवर तर बोजा नाही बनणार?”

कौटुंबिक सदस्य देखील पीडित

केवळ मस्तिष्काघाताच्या पीडितांनाच या उद्‌ध्वस्त करणाऱ्‍या परिणामांचा सामना करावा लागतो असे नाही हे स्पष्ट आहे. त्यांच्या कुटुंबांना देखील सहन करावे लागते. काही बाबतीत, एकेकाळी स्पष्ट बोलणारी, कार्यक्षम व्यक्‍ती अगदी डोळ्यांसमोर कशी अचानक परावलंबी बालकासारखी दुर्बल बनते त्याचा भयंकर धक्का त्यांना सहन करावा लागतो. कौटुंबिक सदस्यांना अपरिचित भूमिका स्वीकाराव्या लागतात तेव्हा नातेसंबंध विस्कळीत होऊ शकतात.

त्या भयंकर परिणामांचे वर्णन हारूको अशा तऱ्‍हेने करतात: “माझे पती सगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टी विसरून गेले. अचानक आमच्या मालकीची कंपनी आम्हाला विकावी लागली आणि आमचं घर आणि मालमत्ता सगळं हातून गेलं. पण मला सर्वात दुःख याचं वाटलं की, मी माझ्या पतीसोबत पूर्वी बोलायचे तशा मनमोकळेपणानं आता बोलू शकत नव्हते किंवा त्यांचा सल्ला घ्यायला त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हते. त्यांना रात्र आहे की दिवस आहे हे कळत नसल्यामुळं रात्रीच्या वेळी लागणारे प्रोटेक्टिव्ह डायपर्स ते काढून ठेवतात. कालांतराने त्यांची ही गत होईल हे आम्हाला ठाऊक होतं, तरीसुद्धा त्यांची ही अवस्था स्वीकारणं आम्हाला अजूनही फार कठीण जातंय. आमची परिस्थिती एकदम पालटली आहे; आता माझी मुलगी आणि मी माझ्या पतीचा सांभाळ करतो.”

“मस्तिष्काघात झालेल्या कोणा व्यक्‍तीची काळजी घेणे म्हणजे काही वेळा खूप त्रासदायक असू शकते—मग ती व्यक्‍ती कितीही प्रिय असली तरीही,” असे इलेन फॅन्टल शिंबर्ग मस्तिष्काघात: कुटुंबांना काय जाणून घेण्याची गरज आहे (इंग्रजी) या पुस्तकात म्हणतात. “तणाव आणि जबाबदारी काही कमी होत नाही.” काही प्रकरणांत, कुटुंबातले सदस्य अतिशय काळजी घेत असल्यामुळे काळजी घेणाऱ्‍या व्यक्‍तीच्या प्रकृतीवर, भावनांवर आणि आध्यात्मिकतेवर याचा दुष्परिणाम होऊ शकतो. मारिया म्हणते की, तिच्या आईला मस्तिष्काघात झाल्यामुळे तिच्या जीवनावर त्याचा भयंकर परिणाम झाला: “मी दररोज तिला जाऊन भेटते, तिला आध्यात्मिकरित्या उभारण्याचा प्रयत्न करते, तिच्यासोबत वाचन करते, प्रार्थना करते आणि मग भरभरून प्रेम करते, मिठ्या मारते आणि चुंबने घेते. पण घरी आल्यावर मी भावनिकरित्या मात्र पार गळून गेलेली असते—कधी कधी तर त्यामुळे मला उलट्या होतात.”

वर्तणुकीतला बदल ही गोष्ट काही सांभाळकर्त्यांना सर्वात कठीण वाटते. न्यूरोसायकोलॉजिस्ट डॉ. रॉनल्ड कॅल्वान्यो, सावध राहाला! सांगतात: “प्रमस्तिष्क बाह्‍यांगाच्या क्लिष्ट कार्यशीलतेवर अर्थात व्यक्‍तीच्या विचारशक्‍तीवर, जीवन जगण्याच्या पद्धतीवर, तिच्या भावनात्मक प्रतिक्रियांवर परिणाम करणारा एखादा रोग होतो तेव्हा आपण त्या व्यक्‍तीच्या खऱ्‍या स्वरूपाशी व्यवहार करत असतो आणि म्हणून जे मानसिक बिघाड उत्पन्‍न होतात त्यांमुळे काही अंशी कुटुंबाची अगदी स्थितीच बदलून जाते.” योशिको सांगतात: “माझे पती तर आजारी पडल्यानंतर एकदमच बदलून गेले; अगदी लहानसहान गोष्टींवरही भडकायचे. त्या वेळी मला नकोनकोसं व्हायचं.”

बहुधा, व्यक्‍तिमत्त्वातले बदल कुटुंबाचे सदस्य नसलेल्या व्यक्‍तींच्या लक्षात येणार नाहीत. यास्तव, काही सांभाळकर्त्यांना एकटे-एकटे वाटते आणि ते एकट्यानेच हा बोजा उचलतात. मिडोरी म्हणतात: “मस्तिष्काघातांमुळे माझे पती मानसिक आणि भावनिकरित्या अपंग झाले आहेत. त्यांना पुष्कळ उत्तेजनाची गरज असतानाही ते कधीच तसं बोलून दाखवत नाहीत आणि स्वतःच सहन करत राहतात. म्हणून त्यांच्या भावना मलाच जपाव्या लागतात. दररोज माझ्या पतीचे मूड पाहून मला चिंता वाटते आणि काहीवेळा तर मला भीतीही वाटते.”

मस्तिष्काघातामुळे जीवनात झालेल्या बदलांना मस्तिष्काघात झालेल्या व्यक्‍तींनी आणि त्यांच्या कुटुंबांनी कसे तोंड दिले आहे? मस्तिष्काघाताच्या अपंग करणाऱ्‍या परिणामांना सहन करणाऱ्‍या लोकांना आपण प्रत्येक जण कोणत्या मार्गांनी मदत देऊ शकतो? आमचा पुढील लेख याचे उत्तर देतो.

[७ पानांवरील चौकट/चित्र]

इशाऱ्‍याची लक्षणे

● अचानक दौर्बल्य, बधिरता किंवा चेहऱ्‍याचा, हाताचा अथवा पायाचा पक्षाघात, विशेषतः शरीराच्या एकाच बाजूला होणारा

● अचानक अंधूक दिसणे किंवा दृष्टी कमी होणे, विशेषतः एका डोळ्याची; दोन-दोन आकृत्या दिसणे

● साधी सोपी वाक्ये सुद्धा बोलायला किंवा समजायला कठीण जाणे

● चक्कर येणे किंवा तोल जाणे वा सहसंयोजन नसणे, विशेषतः यासोबत दुसरे लक्षणही दिसते तेव्हा

इतकी सामान्य नसलेली लक्षणे

● अचानक, अकारण आणि तीव्र डोकेदुःखी—बहुधा “आतापर्यंत कधीच झाली नाही अशी वाईट डोकेदुःखी” असे तिचे वर्णन केले जाते

● अचानक मळमळ आणि ताप—कमी वेळात होत असल्यामुळे व्हायरल आजारापासून हे लक्षण वेगळे असते (कित्येक दिवसांऐवजी केवळ मिनिटे किंवा तास लागतात)

● अल्प वेळासाठी शुद्धी हरपणे किंवा काही वेळापर्यंत अर्धशुद्धीत असणे (बेशुद्ध होणे, गोंधळणे, झटके येणे, कोमात जाणे)

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

डॉ. डेव्हिड लेव्हाईन असे आर्जवून सांगतात की लक्षणे दिसताच रुग्णाने “होता होईल तितक्या लवकर इस्पितळाचा इमरजन्सी वॉर्ड गाठला पाहिजे. मस्तिष्काघातावर पहिल्या काही तासांतच उपचार केल्यास नुकसान कमी केले जाऊ शकते असा पुरावा आहे.”

काहीवेळा लक्षणे अल्पावधीपर्यंतच दिसून गायब होतील. या मालिकांना टीआयए किंवा ट्रान्सियंट इस्केमिक अटॅक असे म्हणतात. यांच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण मस्तिष्काघाताच्या गंभीर धोक्यांची ते सूचना देत असावेत आणि पुढे पूर्ण झटका येत असावा. त्याच्या कारणांवर उपचार करून डॉक्टर भावी मस्तिष्काघाताचा धोका कमी करू शकतील.

राष्ट्रीय मस्तिष्काघात संघटना, एंगलवुड, कोलोरॅडो, अ.सं.सं. यांनी पुरवलेल्या सूचनांवर आधारित

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा