त्याच्या परिणामांचा सामना करणे
इस्पितळातल्या खाटेवर लुळ्या अवस्थेत पडलेल्या गिल्बर्ट यांनी आपल्या डॉक्टरांना विचारले: “माझे हातपाय पुन्हा ठीक होतील का?” गिल्बर्ट यांना असे आव्हानात्मक उत्तर मिळाले: “जितके परिश्रम तुम्ही कराल तितक्याच अधिक प्रमाणात आणि लवकर तुम्ही बरे व्हाल.” ते म्हणाले: “मी तयार आहे!” फिझिकल थेरपी आणि सकारात्मक मनोवृत्तीच्या साहाय्याने ६५ वर्षांच्या या वयात, प्रथम व्हील चेअरमधून जाणारे मग वॉकरने मग काठीने चालू लागले आणि सरतेशेवटी थेट कामावर जाऊ लागले.
“आजकालचे बहुतांश मस्तिष्काघातानंतरचे पुनर्वसन कार्यक्रम या कल्पनेला दुजोरा देतात की, मेंदूच्या एका भागाला इजा पोचली असल्यास, दुसरे भाग त्या इजा पोचलेल्या ऊतकाचे कार्य करू शकतात. थेरपीचा एक उद्देश म्हणजे, या असंबंधित भागांची कार्यक्षमता जागवणे आणि मेंदूला सुव्यवस्थित होऊन जुळवून घेता यावे म्हणून उद्दीपित करणे हा आहे,” असे वायनर, ली आणि बेल हे संशोधक सांगतात. तथापि, बरे होणे इतर घटकांवरही अवलंबून असते जसे की, मस्तिष्काघाताची जागा आणि तीव्रता, व्यक्तीची साधारण प्रकृती, वैद्यकीय निगेचा दर्जा आणि इतरांचे पाठबळ.
कुटुंब आणि मित्रांचे पाठबळ
एरीका तीन वर्षांपर्यंत पुनर्वसनाचे व्यायाम करत राहिली, चालायला आणि लुळा पडलेल्या डाव्या हाताची कमी भरून काढण्यासाठी उजवा हात वापरायला ती शिकत होती. तिला सामना करायला कशाची मदत झाली याविषयी ती म्हणते: “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे पती आणि माझे मित्र माझ्याशी विश्वासू राहिले. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे माहीत असल्याने मला शक्ती मिळाली आणि हार न मानण्याचे उत्तेजन त्यांनी दिले तेव्हा मला प्रोत्साहन मिळाले.”
आपल्या प्रिय व्यक्तींच्या बरे होण्याच्या क्रियेत कौटुंबिक सदस्य भागीदार असतात. त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि घरी सुद्धा चालू ठेवण्याची आवश्यकता असलेल्या थेरपींचे पालन केले पाहिजे जेणेकरून आतापर्यंत झालेल्या सुधारणांचे चीज होईल. कौटुंबिक सदस्य आणि मित्रांकडील सहनशीलता, दयाळुपणा, समजूतदारपणा आणि प्रेम यांमुळे बोलणे, वाचणे आणि दररोजच्या जीवनातली इतर कौशल्ये पुन्हा शिकण्यासाठी एक सुरक्षित भावनिक वातावरण निर्माण होते.
जास्त जबरदस्ती न करता आणि जास्त न लाडावता जॉन यांनी आपल्या पत्नीला अर्थात एलन यांना व्यायाम आणि थेरपीसाठी मदत करायला खूप परिश्रम घेतले. आपल्या कुटुंबाच्या प्रयासांबद्दल ते असे म्हणतात: “एलनला स्वतःचीच कीव वाटेल अशी तिची गत आम्ही होऊ दिली नाही. काही वेळा आम्ही कडक होतो पण आम्ही नेहमी तिच्या मर्यादा पाहून त्यानुसार तिला मदत करत होतो. ती फार हळव्या मनाची आहे म्हणून तिच्यावर दबाव येऊ नये याचीही मी दक्षता बाळगतो.”
वाचा थेरपीस्टच्या मदतीने एलन पुन्हा बोलायला शिकल्या तेव्हा जॉन यांनी त्यांना साहाय्य दिले. “एकत्र मिळून काही करणे उत्तेजनाचे होते, म्हणून आम्ही एकमेकांना बायबल मोठ्याने वाचून दाखवत असू ज्यामुळे तिचे बोलणे सुधारण्यास मदत मिळाली. त्याचप्रमाणे, आम्ही यहोवाचे साक्षीदार असल्याकारणाने हळूहळू प्रचारकार्यात जाऊ लागलो. अशातऱ्हेने एलन दुसऱ्यांना भविष्याच्या आशेविषयी सांगू शकत होती. एलनसाठी हीच एक प्रकारची थेरपी होती.” तीन वर्षांत एलनमध्ये खूप सुधार झाला होता.
मित्रांकडून मिळणारे उत्तेजन आणि शक्ती यांना कधीही क्षुल्लक समजू नये कारण मस्तिष्काघात झालेल्या व्यक्तीच्या सुधारणेवर याचा प्रचंड परिणाम होऊ शकतो. मस्तिष्काघात (इंग्रजी) या वैद्यकीय पत्रिकेने असा अहवाल दिला की, अधिक “प्रमाणातील सामाजिक साहाय्य, जलद बरे होण्याची आणि एकूण कार्यशीलतेत जास्त सुधारणा होण्याची पूर्वसूचना देत असल्याचे आढळून आले; अगदी तीव्र मस्तिष्काघात झालेल्या रुग्णांमध्ये सुद्धा.”
बर्नी यांनी आपल्या मित्रांकडून मिळालेल्या साहाय्याची खूप प्रशंसा केली. ते आपल्याला आठवून करून देतात: “मस्तिष्काघाताचा सामना करण्यासाठी मित्रांच्या भेटी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. सहानुभूतीचा स्वर आणि काळजी घेणाऱ्या मनोवृत्तीने मनोधैर्य वाढते. एखाद्या व्यक्तीच्या अपंगत्वावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज नसली, तरी कोणतीही सुधारणा झाल्याची कबुली देणे फार प्रोत्साहनदायक असते.” मस्तिष्काघात झाल्यानंतरच्या परिणामांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना साहाय्य देण्यासाठी आपण सर्वजण काय करू शकतो? “फुलं घेऊन जा,” असे बर्नी सुचवतात, “किंवा एखादा शास्त्रवचनीय मुद्दा किंवा अनुभव त्यांना सांगा. मला त्याची खूप मदत झाली.”
मस्तिष्काघात झालेली एक वृद्ध बहीण मेल्वा यांना आध्यात्मिक बांधवाने त्यांच्यासोबत प्रार्थना केल्याने बरे वाटले. गिल्बर्ट देखील याची शिफारस करत म्हणतात: “कोणासोबत प्रार्थना केली तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खरीच काळजी आहे असं दिसून येतं.” मस्तिष्काघातानंतर पीटर यांच्या दृष्टीत दोष निर्माण झाला; म्हणून इतरजण त्यांच्या मर्यादा समजून त्यांना काही वाचून दाखवण्यासाठी वेळ काढतात तेव्हा त्यांना त्याची खूप कदर वाटते.
पुनर्वसनाच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी मदत करणे हे सुद्धा एक प्रेमळ कृत्य आहे. मस्तिष्काघात झालेल्या व्यक्तीचे घर तिच्यासाठी एक सुरक्षित ठिकाण आहे याची खात्री करणे देखील आवश्यक आहे. तोल सांभाळण्याची समस्या असल्यास खाली पडण्याची सतत भीती असते. उदाहरणार्थ, इतर गोष्टींव्यतिरिक्त गिल्बर्ट यांच्या न्हाणीघरात त्यांच्या मित्रांनी धरायला एक दांडा बसवला तेव्हा त्यांनी या प्रेमळ मदतीची प्रशंसा केली.
पाठबळ द्यायला शिकणे
लहरीपणा आणि रडण्याची तीव्र प्रवृत्ती या गोष्टी मस्तिष्काघात झालेल्या व्यक्तीला लाजविणाऱ्या असू शकतात त्याचप्रमाणे आता काय करावे हे माहीत नसलेल्या अवतीभोवतीच्या लोकांसाठीही ते गोंधळविणारे असू शकते. परंतु, मित्रपरिवार सहायक बनायचे शिकून मस्तिष्काघात झालेल्या व्यक्तीला होऊ शकणाऱ्या एकलकोंडेपणापासून वाचवू शकतात. सहसा, रडणे कमी होते. परंतु अश्रू वाहू लागल्यास, शांत राहून त्या व्यक्तीजवळ बसा आणि तुम्ही त्यांच्या स्थितीत असता तर तुम्हाला काय ऐकायला आवडले असते ते बोला.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बिघाडांमुळे ज्यांचे व्यक्तिमत्त्व बदलले आहे अशांबद्दल ईश्वरी प्रेम विकसित करा. तुम्हाला काय वाटते हे त्यांना कळते आणि त्यानुसार ते तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतात. एरीका म्हणतात: “मी कदाचित पूर्वीसारखी कधीच होणार नाही. पण, मस्तिष्काघात झालेल्या व्यक्तीपासून कोणीच तशी अपेक्षा करू नये. तो किंवा ती जशी आहे अगदी त्याच स्थितीत नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यांना प्रेम करायला शिकले पाहिजे. त्यांनी त्याच्या किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास, गतकाळातले सर्वात आकर्षक गुण त्यांच्यात अद्यापही आहेत हे त्यांना आढळून येईल.”
जेव्हा बोलणे किंवा समजून घेणे अशक्य होते तेव्हा एखाद्या व्यक्तीचा आत्म-सन्मान खूपच खचतो. ज्यांच्या बोलण्यात बिघाड झाला आहे अशांसोबत बोलण्याचा प्रयत्न करून ते मूल्यवान आहेत अशी खात्री मित्रपरिवार त्यांना पटवून देऊ शकतो. ताकाशी असे म्हणतात: “माझे विचार आणि भावना काही बदललेल्या नाहीत. तरीही, लोक माझ्यापासून दूरच राहतात कारण ते इतरांसोबत बोलतात तसं त्यांना माझ्यासोबत बोलता येत नाही म्हणून. मला लोकांकडे जाणं फार कठीण वाटतं पण जेव्हा कोणी माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलतं तेव्हा मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि मला खूप खूप आनंद होतो!”
बोलण्याची अडचण असलेल्यांना मदत आणि प्रोत्साहन देण्याकरता आपल्या सर्वांना सहायक ठरतील अशा काही सूचना पुढे दिल्या आहेत.
बहुतांश मस्तिष्काघातांचा बुद्धीवर परिणाम होत नाही. मस्तिष्काघातातून वाचलेल्या अनेकांची भाषा समजायला कठीण असली, तरी ते मानसिकदृष्ट्या सतर्क असतात. त्यांना कधीच कमी लेखू नये किंवा त्यांच्याशी लहान बाळांशी बोलतात तसे बोलू नये. त्यांना आदराने वागवा.
सहनशीलतेने ऐका. त्यांना एखादा विचार जुळवायला किंवा शब्द, वाक्यांश अथवा वाक्य पूर्ण करायला वेळ लागेल. लक्षात ठेवा, की लक्ष देऊन ऐकणारी एखादी व्यक्ती कधीच ऐकण्याची घाई करत नाही.
तुम्हाला समजले नाही तर समजल्याचे ढोंग करू नका. नम्रपणे कबूल करा: “सॉरी, मला समजलं नाही. आपण नंतर पुन्हा एकदा बोलू.”
नेहमीच्या स्वरात हळूहळू आणि स्पष्टपणे बोला.
लहान वाक्ये आणि परिचित शब्द वापरा.
हो किंवा नाही असे उत्तर असलेले प्रश्न विचारा आणि उत्तर द्यायला उत्तेजन द्या. तुमचे शब्द समजणे त्यांना शक्य नसेल हे लक्षात असू द्या.
अवतीभोवतीचा आवाज कमी ठेवा.
यहोवाच्या प्रेमळ मदतीने सामना करणे
तुमच्या मस्तिष्काघाताचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे काही पावले उचलायला आणि भावी झटक्यांचा धोका कमी करायला तुम्हाला मदत होते; परंतु त्यामुळे वाटणाऱ्या भीतीवर नियंत्रण मिळवणेही महत्त्वाचे आहे. एलन म्हणतात: “यशया ४१:१० मधले देवाचे शब्द मला विशेष सांत्वन देतात. तिथं तो म्हणतो: ‘तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ति देतो; मी तुझे साहाय्यहि करितो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो.’ यहोवा मला इतका वास्तविक वाटतो की माझी सगळी भीती पळून गेली आहे.”
आपल्या निराशेला तोंड द्यायला आनंद यांना देखील बायबल मदत करते: “ते मला पराकाष्ठेची मदत देते आणि मला सतत बळ आणि तजेला देते.” हिरोयुकी यांना लक्ष केंद्रीत करता येत नसल्यामुळे त्यांना शास्त्रवचनांतून लाभ कसा मिळवावा याची समस्या होती. ते आपल्याला सांगतात: “ऑडिओ कॅसेटवर बायबलची पुस्तके ऐकल्यामुळे मला दिलासा मिळाला.”
प्रेषित पौलाने म्हटले: “जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.” (२ करिंथकर १२:१०) पौल स्वतःहून जे करू शकला नाही ते यहोवाच्या आत्म्याच्या मदतीने त्याने साध्य केले. मस्तिष्काघात झालेल्या व्यक्ती देखील आध्यात्मिक मदतीसाठी यहोवावर विसंबून राहू शकतात. एरीका म्हणतात: “आपली सुदृढ प्रकृती असते आणि आपण सर्वकाही आपल्या सामर्थ्याने करू शकतो तेव्हा कदाचित आपण यहोवाला आपली मदत करण्यासाठी इतकी संधी देत नसतो. परंतु, माझ्या या अपंगत्वामुळे त्याच्यासोबतचे माझे नाते एका अतिशय खास पद्धतीने बळकट करण्यास मला मदत मिळाली आहे.”
काळजीवाहकांना मदत मिळते
काळजीवाहकांना त्यांच्या खडतर कामासाठी मदत लागते. ते मदतीसाठी कोठे जाऊ शकतात? कुटुंब हे एक ठिकाण आहे. काळजी वाहण्याचा बोजा प्रत्येक सदस्याने उचलला पाहिजे. आपल्या मुलांनी भावनिक आधार कसा दिला त्याविषयी योशिको म्हणतात: “ते माझ्या समस्या अगदी त्यांच्या समस्या आहेत असे समजून ऐकत असत.” मस्तिष्काघात झालेल्या व्यक्तीची काळजी कशी घ्यावी त्याचप्रमाणे आपल्या प्रिय व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाल्याने कसा व्यवहार करावा हे शिकण्यासाठी कौटुंबिक सदस्यांनी त्यांना उपलब्ध असलेली सर्व माहिती मिळवण्याची गरज आहे.
काळजीवाहकांना आणखी कोण मदत देऊ शकतात? व्हिक्टरसाठी मदत मिळवण्याकरता डेव्हिड आणि त्याच्या कुटुंबाने त्यांच्या आध्यात्मिक कुटुंबाकडे अर्थात यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीकडे मदत मागितली: “त्यांनी लगेच मदत दिली. कधी कधी, ते आळीपाळीने आमच्याकडे येतात आणि तिथंच राहून रात्रभर व्हिक्टरची काळजी घेऊन आम्हाला मदत करतात.”
प्रत्येक काळजीवाहकाला आपल्या आध्यात्मिक कुटुंबाच्या उबदार प्रेमाची आणि आधाराची जाणीव झाली पाहिजे. पण काहींना मदत मागायला जड वाटत असेल. हारुको म्हणतात: “मला सहसा असं सांगतात: ‘तुम्हाला मदत हवी असेल तर मागंपुढं पाहू नका, बिनधास्त विचारा.’ पण सर्वजण त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळं माझ्याच्याने विचारायला होतंच नाही. विशिष्ट कामात आम्ही मदत करू, असं जर लोकांनी म्हटलं तर मी त्यांचे खूप आभार मानेन, जसं ‘मी साफसफाईसाठी मदत करीन. तुम्हाला कोणता दिवस सोयीचा असेल?’ ‘मी तुमच्यासाठी खरेदी करीन, तर मग मी आता तुमच्या घरी आलं तर चालेल का?’”
केन्जी यांच्या पत्नीला मस्तिष्काघात झाला; तथापि, त्यांना आवश्यक असलेली मदत ते देऊ शकले. प्रार्थनेद्वारे ते आपला भार यहोवावर टाकू शकतात असे त्यांना आढळले. कालांतराने, केन्जी यांच्या पत्नीची बोलण्याची क्षमता गेली आणि अशातऱ्हेने केन्जी एक सोबतीण गमावून बसले जिच्याशी ते बोलू शकत होते. पण ते दररोज बायबल वाचतात. ते म्हणतात: “ज्यांचा आत्मा चिरडलेला आहे अशांची यहोवा कोमलतेने काळजी घेतो त्याची मला आठवण होते आणि यामुळे मला खिन्नता आणि एकलकोंडेपणा जाणवलेला नाही.”
भावना आपल्याला भारावून टाकणार असे दिसते तेव्हा यहोवाच्या आत्म्यावर विसंबून राहिल्याने मदत मिळू शकते. मस्तिष्काघात झाल्यानंतर आपल्या पतीच्या व्यक्तिमत्त्वातला बदल आणि त्यांचे भडकणे या गोष्टींचा सामना करत असलेल्या योशिको म्हणतात: “काही वेळा मला जोरात ओरडावंसं वाटतं. पण त्या त्या वेळी मी यहोवाला प्रार्थना करायचे आणि त्याचा आत्मा मला शांती द्यायचा.” यहोवाला निष्ठावान असण्याची त्यांना कदर असल्यामुळे आपल्या ख्रिस्ती जीवनशैलीत त्या कोणत्याही गोष्टीचा व्यत्यय होऊ देत नाहीत. त्या नियमितपणे ख्रिस्ती सभांना उपस्थित राहतात, सेवेत भाग घेतात आणि व्यक्तिगत बायबल अभ्यास करतात. योशिको म्हणतात, “माझी भूमिका मी निभावली तर यहोवा मला कधीच सोडणार नाही हे मला ठाऊक आहे.”
चिंता निर्माण होतात तेव्हा यहोवा नेहमी आपले ऐकून घ्यायला तयार असतो. मिडोरी, ज्यांच्या पतीला मस्तिष्काघात झाला, त्यांना या गोष्टीपासून दिलासा मिळतो की, लाक्षणिकरित्या यहोवाने त्यांचे सर्व अश्रू आपल्या “बुधलीत” जमा करून ठेवले आहेत. (स्तोत्र ५६:८) त्यांना येशूच्या शब्दांची आठवण होते: “उद्याची चिंता करू नका.” त्या म्हणतात: “नवे जग येईस्तोवर धीर धरण्याचा मी निश्चय केलाय.”—मत्तय ६:३१-३४.
तीव्र मर्यादांचा सामना
पुनर्वसनाने काहीजण पुष्कळ बरे होतात हे खरे पण इतरांना मस्तिष्काघात होण्याआधीच्या क्षमता पुन्हा मिळवण्यात फार कमी यश मिळते. या नंतर उल्लेखिलेल्या लोकांना आपल्या मर्यादा कितीही तीव्र आणि कायमस्वरूपी असल्या, तरी त्या स्वीकारण्याच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी काय मदत करू शकते?
मस्तिष्काघातामुळे आपली कार्यशीलता गमावून बसलेले बर्नी उत्तरतात: “येणाऱ्या परादीस पृथ्वीवरील अनंतकाळच्या जीवनाच्या आशेचा हर्ष आणि माझ्या स्वर्गीय पित्याला अर्थात यहोवाला प्रार्थना करणे यांमुळे मला शांतपणे माझ्या मर्यादा स्वीकारण्यास मदत मिळाली.”
त्याच आशेने एरीका आणि त्यांचे पती जेऑर्ज यांनाही त्यांच्या मर्यादा स्वीकारून जीवनाचा आनंद लुटण्यास मदत दिली. जेऑर्ज म्हणतात: “एके दिवशी संपूर्णतः बरं होण्याचं देवाचं वचन आमच्यासमोर आहे. म्हणून आम्ही अपंगत्वाकडे जास्त लक्ष देत नाही. अर्थात, एरीकाच्या प्रकृतीसाठी आम्ही अजूनही होता होईल तितकं करतो. पण, सहसंयोजन बिघडलेल्या स्नायूंचा त्रास सहन करायला आणि जास्त सकारात्मक असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला शिकता येतं.”—यशया ३३:२४; ३५:५, ६; प्रकटीकरण २१:४.
ज्या लोकांमध्ये प्रगती फार सीमित आहे अशांच्या बाबतीत कुटुंब आणि मित्रपरिवाराचा आधार अधिक महत्त्वाचा असतो. सर्व दुखणीखुपणी काढून टाकायची देवाची वेळ येत नाही तोपर्यंत ते मस्तिष्काघात झालेल्या व्यक्तीला सामना करायला मदत करू शकतात.
प्रकृती पूर्ववत केली जाईल असे महान भविष्य मस्तिष्काघात झालेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी पुढे आहे हे जाणून असल्यामुळे त्यांना त्या त्या दिवसाला तोंड द्यायला मदत मिळते. अशातऱ्हेने, लवकरच येणाऱ्या देवाच्या नवीन जगात सर्व दुःखण्यापासून मुक्तता मिळवण्याची ते धीराने वाट पाहू शकतात. (यिर्मया २९:११; २ पेत्र ३:१३) या दरम्यान, यहोवाकडे वळणारे सर्वजण हा आत्मविश्वास बाळगू शकतात की, मस्तिष्काघाताच्या अपंग करून टाकणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी तो त्यांना आताही मदत आणि साहाय्य देईल.—स्तोत्र ३३:२२; ५५:२२.
[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]
सर्व दुखणीखुपणी काढून टाकायची देवाची वेळ येत नाही तोपर्यंत कुटुंब आणि मित्रपरिवार मस्तिष्काघात झालेल्या व्यक्तीला त्याचा सामना करायला मदत करू शकतात
[१० पानांवरील चौकट/चित्र]
मस्तिष्काघाताचा प्रतिबंध
“मस्तिष्काघाताचा सामना करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्याचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणे,” असे डॉ. डेव्हिड लेव्हाईन म्हणतात. अनेक पक्षघातांना कारणीभूत असलेला सर्वात प्रमुख घटक हा उच्च रक्तदाब आहे.
अनेक लोकांच्या बाबतीत पाहता, त्यांचा उच्च रक्तदाब, पोटॅशियमचे अधिक प्रमाण आणि मीठ, संतृप्त मेद आणि कोलेस्टेरॉल यांचे कमी प्रमाण असलेल्या आहाराद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. मद्यार्क कमी करणे देखील महत्त्वाचे असेल. एखाद्याच्या वयोमानानुसार आणि प्रकृतीनुसार उचित असलेल्या नियमित व्यायामाच्या कार्यक्रमाने अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत होऊ शकते आणि त्यामुळे मग रक्तदाब कमी होऊ शकतो. औषधे घेण्याची गरज भासेल—परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कारण यावर पुष्कळ औषधे उपलब्ध आहेत.
ग्रीवा रोहिणी विकारामुळे मेंदूला होणाऱ्या मुख्य रक्त पुरवठ्याचा मार्ग अरूंद होतो आणि मस्तिष्काघाताला कारणीभूत ठरणारे हे प्रमुख कारण आहे. कितपत अडखळण झाले आहे त्यावर आधारित कॅरोटॉईड एन्डार्टइरेक्टोमी नावाची शस्त्रक्रिया, खंडित झालेल्या रोहिण्या मोकळ्या करण्यासाठी सुचवली जाऊ शकते. अभ्यासांवरून हे स्पष्ट झाले आहे की, ज्या लोकांमध्ये लक्षणे दिसून येत होती आणि ज्यांच्या रोहिण्या खूपच खंडित झाल्या होत्या अशांना शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचार पद्धती यांमुळे फायदा झाला. तथापि, शस्त्रक्रियेशी संबंधित समस्या असू शकतात आणि म्हणून तिचा काळजीपूर्वक विचार केला जावा.
हृदयविकाराने मस्तिष्काघाताचा धोका वाढू शकतो. अट्रायल फिब्रिलेशनमुळे (अनियमित हृदयाचा ठोका) रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या मेंदूपर्यंत पोचतात; पण क्लथनरोधकांनी त्यांच्यावर उपचार करता येतो. मस्तिष्काघाताचा धोका कमी करण्यासाठी इतर हृदयाच्या समस्यांसाठी शस्त्रक्रिया आणि औषधोपचार करण्याची गरज भासेल. मस्तिष्काघाताच्या पुष्कळशा घटना मधुमेहामुळे होतात, म्हणून त्यावर नियंत्रण ठेवल्याने मस्तिष्काघात टाळायला मदत होते.
क्षणिक इस्केमिक झटके अर्थात टीआयए, मस्तिष्काघात घडण्याची शक्यता आहे याच्या स्पष्ट सूचना असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही याची खात्री करा. तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या आणि त्या मागील कारणासाठी उपचार करा कारण टीआयएमुळे मस्तिष्काघाताचा धोका कितीतरी पटीने वाढतो.
सुदृढ, सर्वसाधारण जीवनशैलीने मस्तिष्काघात टाळण्यास पुष्कळ मदत होते. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम त्याचप्रमाणे मद्यार्क एकदम कमी करणे आणि धुम्रपान थांबवणे यांमुळे रोहिण्या सुदृढ ठेवण्यास मदत मिळते आणि खराब झालेल्या रोहिण्यांमध्ये सुधार होण्यासही हातभार लागतो. ताजी फळे आणि भाज्या आणि कडधान्ये यांचे अधिक सेवन केल्याने मस्तिष्काघाताचा धोका कमी करण्यास मदत झाली आहे असे विविध अभ्यासांवरून निष्पन्न झाले आहे.