सर्वजण एकमेकांवर प्रेम करणे शक्य आहे का?
“सार्वकालिक जीवन” मिळवण्यासाठी देवावर संपूर्ण मनाने प्रेम करणे आणि आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावरही प्रेम करणे आवश्यक होते असे एका वकिलाने म्हटले. त्यावर, येशूने त्याची प्रशंसा करून त्याला सांगितले: “ठीक उत्तर दिलेस; ‘हेच कर म्हणजे जगशील.’” (लूक १०:२५-२८; लेवीय १९:१८; अनुवाद ६:५) पण, आपण फार धार्मिक आहोत हे सिद्ध करू पाहणाऱ्या त्या मनुष्याने विचारले: “माझा शेजारी कोण?”
येशूने “तुझे यहुदी बांधव” असे उत्तर द्यावे ही त्या वकिलाची अपेक्षा होती. पण त्याउलट, येशूने शेजारधर्म पाळलेल्या एका शोमरोनी व्यक्तीची गोष्ट सांगितली व त्यावरून विविध राष्ट्रांचे लोकही आपले शेजारी आहेत हे दाखवून दिले. (लूक १०:२९-३७; योहान ४:७-९) आपल्या सेवेदरम्यान, देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करणे या निर्माणकर्त्याच्या सर्वात प्रमुख आज्ञा आहेत यावर येशूने भर दिला.—मत्तय २२:३४-४०.
तथापि, असे कोणी लोक आहेत का ज्यांनी खरोखरच आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम केले आहे? सर्व लोक प्रेमाने राहू शकणे खरच शक्य आहे का?
पहिल्या शतकातला चमत्कार
येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, की जातीभेद, राष्ट्रभेद आणि कसलाही भेदभाव न पाळणाऱ्या प्रेमाने ते ओळखले जातील. तो म्हणाला: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी.” मग तो म्हणाला: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३४, ३५; १५:१२, १३.
येशूच्या प्रेमाविषयीच्या शिकवणींना त्याच्या उदाहरणाची जोड मिळाल्याने पहिल्या शतकात चमत्कारच घडला. त्याचे अनुयायी त्यांच्या गुरूचे अनुकरण करू लागले; ते एकमेकांवर प्रेम करू लागले आणि ते पाहून सगळीकडे लोकांचे लक्ष आकर्षित झाले आणि लोक त्यांचे कौतुक करू लागले. सा.यु. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातला लेखक टर्टुलियन याने गैरख्रिस्ती लोक येशूच्या अनुयायांचे कौतुक करत असल्याचे सांगितले: ‘ते पाहा कसे एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांसाठी आपला जीव द्यायला तयार आहेत.’
हे खरेच आहे, प्रेषित योहानानेसुद्धा असे लिहिले: “आपणहि आपल्या बंधूंकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे.” (१ योहान ३:१६) येशूने तर आपल्या अनुयायांना शत्रुंवरही प्रेम करायला शिकवले. (मत्तय ५:४३-४५) येशूने शिकवल्यानुसार लोक दुसऱ्यांवर प्रेम करतात तेव्हा त्याचा काय परिणाम होतो?
राजनीतिशास्त्राच्या एका प्राध्यापकांनी या प्रश्नावर विचार केला. म्हणून, द ख्रिश्चन सेंच्युरी यात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी विचारले: “येशू त्याच्या शत्रुंवर हातगोळे फेकतोय, मशीनगन चालवतोय, फ्लेमथ्रोअर वापरतोय, अणुबॉम्ब पाडतोय किंवा आयसीबीएम क्षेपणास्त्राचा मारा करतोय अशी कल्पना आपण करू शकतो का?”
उत्तर देताना ते प्राध्यापक म्हणाले: “हा प्रश्नच इतका विचित्र आहे की त्याचे उत्तर देण्यालायक नाही.” म्हणून त्यांनी असा प्रश्न विचारला: “येशू जर हे करू शकत नव्हता आणि त्याला हे शोभले नसते, तर आपण हे असले कृत्य करून त्याला निष्ठावंत कसे राहू शकतो?” त्यामुळे, अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे त्याप्रमाणे येशूचे प्रारंभिक अनुयायी तटस्थ राहिले हे ऐकून आपल्याला आश्चर्य व्हायला नको. याची केवळ दोन उदाहरणे पाहा.
एन. प्लॅट आणि एम. जे. ड्रमंड यांचे आवर वर्ल्ड थ्रू द एजेस म्हणते: “ख्रिश्चनांची वागणूक रोमन लोकांपेक्षा फारच निराळी होती. . . . ख्रिस्ताने शांतीचा प्रचार केल्यामुळे त्यांनी सैनिक व्हायला नकार दिला.” त्याचप्रमाणे, एडवर्ड गिब्बन यांचे द डिक्लाईन ॲण्ड फॉल ऑफ द रोमन एम्पायर म्हणते: “[खऱ्या ख्रिश्चनांनी] राज्याच्या नागरी प्रशासनात किंवा लष्करात सक्रिय भाग घ्यायला साफ नकार दिला. . . . ख्रिश्चन, एक पवित्र कामगिरी सोडून सैनिक बनतील हे शक्यच नव्हते.”
आजच्या बाबतीत?
आज ख्रिस्तासारख्या प्रेमाचे आचरण कोणी करते का? एन्सायक्लोपिडिया कॅनेडियाना असे निरीक्षण करते: “यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य, येशू आणि त्याचे शिष्य आचरत असलेल्या प्रारंभिक ख्रिस्ती धर्माचे पुनरूज्जीवन आणि पुनर्स्थापना करण्याचे कार्य आहे . . . सर्वजण भाऊ-भाऊ आहेत.”
त्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ यहोवाचे साक्षीदार आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करतात आणि जातीभेद, राष्ट्रभेद किंवा वंशभेद यांपैकी कशालाच ते या प्रेमाच्या आड येऊ देत नाहीत. त्याचप्रमाणे ते कोणाची हत्या देखील करणार नाहीत, कारण त्यांनी सांकेतिक भाषेत बायबलने देवाच्या खऱ्या सेवकांविषयी भाकीत केल्याप्रमाणे आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ केले आहेत आणि आपल्या भाल्याच्या कोयत्या केल्या आहेत.—यशया २:४.
म्हणूनच, कॅलिफोर्नियाच्या सेक्रेमेंटो युनियनमधील एका संपादकीय लेखात असे म्हटले होते: “संपूर्ण जग जर का यहोवाच्या साक्षीदारांच्या धर्माचे आचरण करू लागले तर रक्तपात आणि द्वेषभाव राहणारच नाही, त्याउलट प्रेमाचे वर्चस्व असेल!”
हंगेरीच्या रींग पत्रिकातही एका लेखकाने अशीच टिपणी केली होती: “मी तर या निष्कर्षावर येऊन पोचलोय की, या पृथ्वीवर सर्वजण यहोवाचे साक्षीदार असते, तर युद्धांचा मागमूसही राहिला नसता आणि पोलिसांना फक्त वाहतुकीचे नियंत्रण करणे आणि पासपोर्ट देणे एवढेच काम राहिले असते.”
ऑन्डॉरे ऑले जेन्टी या इटालियन चर्चच्या पत्रिकेत, एका रोमन कॅथोलिक ननने देखील साक्षीदारांविषयी प्रशंसोद्गार काढले: “ते कोणत्याच प्रकारच्या हिंसेत भाग घेत नाहीत आणि त्यांच्या विश्वासामुळे त्यांच्यावर संकटे ओढवतात तेव्हा काहीही बंड न करता निमूटपणे सर्वकाही सहन करतात . . . यहोवाच्या साक्षीदारांसारखेच, काहीही झाले तरी शस्त्रे घ्यायची नाहीत असा निश्चय एके दिवशी सर्वांनी केला तर हे जग केवढे वेगळे असेल!”
आपल्या शेजाऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यात साक्षीदार नेहमी पुढे असतात हे तर सर्वांना माहीतच आहे. (गलतीकर ६:१०) वुमेन इन सोव्हिएट प्रिझन्स या आपल्या पुस्तकात लॅटव्हियाची एक स्त्री सांगते की, १९६० या दशकाच्या मध्यात, सक्त मजुरीच्या पोटमा कॅम्पात शिक्षा भोगत असताना ती फार आजारी पडली. “माझ्या संपूर्ण आजारपणात [साक्षीदारांनी] अगदी नर्सप्रमाणे माझी काळजी घेतली. त्या कॅम्पात माझी इतकी सेवा होईल असा मी विचारही करू शकत नव्हते.” ती पुढे म्हणते: “लोकांची मदत करणे आपले कर्तव्य आहे असेच यहोवाचे साक्षीदार समजतात मग ते लोक कोणत्याही धर्माचे किंवा राष्ट्राचे असोत.”
अलीकडे, झेक प्रजासत्ताकमधील पब्लिक प्रेसने छळ छावण्यांमधील साक्षीदारांच्या अशा वर्तनाची दखल घेतली. बर्नोमध्ये निर्माण केलेल्या “द लॉस्ट होम” या माहितीपटावर विवेचन करताना, सेवरोचेस्की देनीक या वृत्तपत्रकाने असे निरीक्षण केले: “अगदी या भरवशालायक समकालीन लोकांनी [बचावलेले झेक आणि स्लोव्हाक यहुदी] देखील यहोवाचे साक्षीदार असलेल्या कैद्यांविषयी प्रशंसोद्गारच काढले ही उल्लेखनीय गोष्ट आहे. ‘हे लोक अत्यंत धीट होते; मृत्यूदंडाचा धोका असतानाही हे लोक आम्हाला होता होईल त्या मार्गाने मदत करायचे,’ असे अनेकजण म्हणाले. ‘आम्ही त्यांच्याच कुटुंबातले असल्याप्रमाणे ते आमच्यासाठी प्रार्थना करायचे; आम्ही खचून जाऊ नये म्हणून आम्हाला धीर द्यायचे.’”
पण, तुमचा द्वेष करणाऱ्या लोकांवर प्रेम करण्याविषयी काय? ते शक्य आहे का?
प्रेमाचा द्वेषावर विजय
शत्रुंवर प्रेम करण्याविषयी येशूने दिलेली शिकवण बायबलमधील एका नीतिसूत्राच्या सुसंगतेत आहे: “तुझा शत्रु भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यावयाला दे.” (नीतिसूत्रे २५:२१; मत्तय ५:४४) एकेकाळी शत्रू मानलेल्या लोकांच्या प्रेमळ व्यवहाराच्या उत्तम परिणामाविषयी अलीकडेच यहोवाची साक्षीदार बनलेल्या एका आफ्रिकन स्त्रीने लिहिले: “काहीवेळा गोऱ्या साक्षीदारांचं खरं प्रेम पाहून माझं अंतःकरण इतकं भरून यायचं की मला अश्रू अनावर व्हायचे; काही काळापूर्वी एका चळवळीच्या नावाखाली याच लोकांना ठार मारायलाही मी कमी केलं नसतं.”
एका फ्रेंच साक्षीदाराने सांगितले की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांच्या एका शेजारणीने गेस्तापोंना तिच्या आईचा ठावठिकाणा सांगितला. “म्हणून माझ्या आईला जर्मन छळ छावण्यांमध्ये दोन वर्षं काढावी लागली; तिथं मेल्यासारखी तिची अवस्था झाली होती,” असे ती मुलगी म्हणते. “युद्धानंतर, फ्रेंच पोलिस माझ्या आईकडे एक दस्तऐवज घेऊन आले ज्यावर ती बाई जर्मन लोकांशी जुळलेली आहे असं लिहिलं होतं आणि आईला त्यावर स्वाक्षरी द्यायची होती. पण आईने नकार दिला.” नंतर, याच शेजारणीला कर्करोग झाला आणि ती शेवटल्या टप्प्यात होती. ती मुलगी पुढे म्हणाली: “त्या बाईचे शेवटले दिवस होता होईल तितके आरामदायी करायला आई तास न् तास तिची सेवा करायची. अशाप्रकारे, प्रेमाने द्वेषावर कसा विजय मिळवला हे मी कधीच विसरू शकणार नाही.”
म्हणून लोक एकमेकांवर प्रेम करायला शिकू शकतात यात काही शंकाच नाही. पूर्वी शत्रू असलेले—तुत्सी आणि हुतू, ज्यू आणि अरब, आर्मीनियन आणि तुर्क, जपानी आणि अमेरिकी, जर्मन आणि रशियन, प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक—हे सर्वजण बायबल सत्याने एकवटले गेले आहेत!
पूर्वी एकमेकांचा जीव घ्यायला कमी न करणारे लाखो लोक आता एकमेकांवर प्रेम करू लागले आहेत तर जगातले सर्वजणही हे नक्कीच करू शकतात. परंतु, सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने राहण्याची ही कल्पना खरी व्हायची असेल तर मोठा जगव्याप्त बदल होण्याची गरज आहे. हा बदल कसा घडून येईल?
[७ पानांवरील चित्रं]
दक्षिण आफ्रिकेत गोरे आणि काळे लोक
ज्यू आणि अरब
हुतू आणि तुत्सी
सांकेतिक भाषेत, साक्षीदारांनी आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ केले आहेत