जगावरील दृष्टिक्षेप
धूम्रपानामुळे कायमची हानी?
एका अलीकडील अभ्यासानुसार, धूम्रपानामुळे धमनींना पोहंचणारी हानी कायमस्वरूपी असू शकते. द जर्नल ऑफ दि अमेरिकन मेडिकल असोसिएशन यात दिलेला संशोधकांचा अहवाल दाखवून देतो, की धूम्रपान करणे व इतरजण धूम्रपान करत असता त्यांनी सोडलेल्या धुराच्या संपर्कात येणे या दोन्ही गोष्टी धमनींना स्थायी हानी पोहंचवू शकतात. सदर अभ्यासात ४५ ते ६५ वर्षे वयोगटांतील १०,९१४ स्त्रीपुरुषांचे निरीक्षण करण्यात आले. या गटात धूम्रपान करणारे, पूर्वी धूम्रपान करणारे, सातत्याने धुराच्या संपर्कात येणारे व कधीकधीच धुराच्या संपर्कात येणारे लोक समाविष्ट होते. अल्ट्रा ध्वनिलहरींचा उपयोग करून संशोधकांनी मानेमध्ये असलेल्या कॅरोटिड धमनीच्या जाडीचे मोजमाप केले. तीन वर्षांनंतर पुन्हा हे मोजमाप करण्यात आले.
अपेक्षिल्याप्रमाणे, सतत धूम्रपान करणाऱ्यांच्या धमनीतील काठिण्यात लक्षणीय वाढ झाली होती; मागील ३३ वर्षांत ज्यांनी दररोज, सरासरी एक संपूर्ण सिग्रेटीचे पाकीट ओढले होते अशा लोकांच्या धमनीत ही वाढ ५० टक्के होती. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत जे लोक पूर्वी धूम्रपान करत होते त्यांच्या धमन्या २५ टक्के अधिक जलद गतीने आकुंचित झाल्या; ज्यांनी २० वर्षांपूर्वी धूम्रपान करण्याचे सोडले होते त्यांच्यापैकी काही लोकांच्या धमनी आकुंचित झाल्या होत्या. धुराच्या संपर्कात येणाऱ्यांच्या धमनीचे काठिण्य देखील, मुळीच धुराच्या संपर्कात न येणाऱ्यांच्या धमनीच्या काठिण्यापेक्षा २० टक्के अधिक होते. एका अभ्यासानुसार, केवळ संयुक्त संस्थानांत प्रती वर्षी अदमासे ३०,००० ते ६०,००० मृत्यू, धुराच्या संपर्कात आल्यामुळे ओढवतात.
तणावामुळे कार अपघातांत वाढ
जर्मनीतील आरोग्य सेवा व सामाजिक कल्याण व्यावसायिक संघाच्या एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीचा कामाप्रती असणाऱ्या मनोवृत्तीचा त्याच्या वाहन चालवण्यावर बराच मोठा परिणाम पडतो. स्यूट्डॉईच ट्सायटुंग असा अहवाल देते, की ज्यांच्या मनावर कामाचा प्रचंड तणाव असतो अशा लोकांना वाहन अपघाताचा सर्वाधिक धोका असतो. “मालकाबद्दल किंवा सहकर्मचाऱ्यांबद्दल मनात कोंडून ठेवलेल्या वैफल्यामुळे वाहन चालवण्यावर एखाद्याचे लक्ष राहत नाही,” असे या अहवालाचे म्हणणे आहे. सदर अभ्यासावरून दिसून आले, की कामाला जाताना किंवा कामावरून परतताना घडलेली वाहन अपघाताची ७५ टक्के प्रकरणे, “लक्ष एकाग्र न केल्यामुळे, खूप धावपळ केल्याने, वेळेवर पोहंचण्याची काळजी किंवा तणाव,” यांमुळे घडली होती. नकारात्मक तणावाखाली असताना पुरुषांना अपघाताचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात असले तरीही सदर अभ्यासावरून निदर्शनास आले, की लहान मुलांच्या मातांना देखील याचा विशेष धोका असतो. सदर वृत्तपत्र म्हणते: “आपल्या चिमुरड्यांना वेळेवर शाळेतून आणायचे असल्यामुळे किंवा दुपारच्या सुट्टीत घरी जाऊन स्वयंपाक करण्याची घाई असल्यामुळे या माता सतत प्रचंड तणावाखाली वावरत असतात.”
जागतिक आरोग्य समस्या
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. डेव्हिड हेमन म्हणतात: “आपण २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहंचलो तरीसुद्धा जगभरात ३३ टक्के मृत्यू संसर्गजन्य आजारामुळे होतात.” या समस्येसाठी बऱ्याच गोष्टी जबाबदार आहेत. द जर्नल ऑफ दि अमेरिकन मेडिकल असोसिएशन म्हणते, लोकसंख्या वाढ, फोल ठरलेली लसीकरण शिबीरे, अत्यंत दाटीवाटी, पर्यावरणातील बदल आणि जगभरातील सार्वजनिक आरोग्य संस्थेचा ऱ्हास या सर्व गोष्टी वरील समस्येस कारणीभूत आहेत. यांशिवाय, नाइलाजाने केलेले स्थलांतर, निराश्रित आणि आंतरराष्ट्रीय प्रवास या गोष्टींनी देखील संसर्गजन्य आजार फैलावण्यास हातभार लावला आहे. “खरे तर या सर्व गोष्टी टाळता येण्याजोग्या आहेत कारण असे आजार रोखण्याची किंवा त्यांचे समूळ उच्चाटन करण्याची साधने आज आपल्यापाशी आहेत,” असे डॉ. हेमन म्हणतात.
मुलांना भयानक स्वप्ने पडणे सर्वसामान्य
जवळजवळ सर्वच मुलांना भयानक स्वप्ने पडतात. मॅनहीम, जर्मनी येथील मानसिक आरोग्य केंद्रीय संस्थेच्या एका अभ्यासानुसार १० पैकी ९ मुलांना स्वप्नांमुळे झोपेतून जागे झाल्याचे आठवते. सर्वसामान्य भयानक स्वप्नांमध्ये कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचे, अतिशय उंच ठिकाणावरून खाली पडल्याचे किंवा आपण एखाद्या लढाईत किंवा संकटात सापडलो आहोत अशी दृश्ये मुलांना सहसा दिसतात. अनेकदा, अशा स्वप्नांमध्ये काल्पनिक तसेच वास्तविक जगाच्या घटकांची भेसळ असते. आपल्याला कोणते स्वप्न पडले होते हे मुले सहसा विसरून जातात. पण मुलींच्या बाबतीत तसे नाही; त्या सहसा आपल्या स्वप्नांविषयी बोलतात किंवा ती लिहून काढतात. तज्ज्ञ असे सुचवतात, की भयानक स्वप्नांमुळे निर्माण झालेली मानसिक घालमेल निवळण्यासाठी मुलांनी आपल्या स्वप्नांविषयी बोलावे, त्यांचे चित्र काढावे किंवा त्यातील एखादे दृश्य जिवंत करावे असा अहवाल बर्लीनर ट्सीटून देते. या सल्ल्याचे पालन केल्यास काही आठवड्यांतच अशा प्रकारची स्वप्ने पडणे कमी होते शिवाय ती इतकी भयानकही वाटत नाहीत.
टीव्ही अधिक, वाचन कमी
ग्रीसच्या ऑडिओव्हिजुअल मिडिया इंस्टिट्यूटच्या सर्वेक्षणानुसार, या देशात ३५ लाख परिवारांसाठी ३८ लाख टीव्ही सेट्स आहेत; शिवाय दर ३ पैकी एका परिवाराकडे व्हिसीआर आहे. एथेन्स वृत्तपत्र टो व्हीमा अहवाल देते, की १९९० साली जे ग्रीक रहिवासी दररोज सरासरी अडीच तासांपेक्षाही कमी वेळ टीव्ही पाहायचे तेच आता जवळजवळ चार तास टीव्ही पाहण्यात घालवतात. त्यामुळे वाचनात लक्षणीय घट झाल्याचे आपल्याला नवल वाटायला नको. सर्वेक्षणाने प्रकट केले, की १९८९ साली एक सर्वसाधारण ग्रीक व्यक्ती ४२.२ वृत्तपत्रे वाचत असे; पण १९९५ साली हीच संख्या २८.३ पर्यंत घसरली. शिवाय, त्याच काळात मासिके वाचणाऱ्यांची संख्याही १० टक्क्यांनी घटली.
वयस्करांतील कुपोषण
फ्रँकफर्ट, जर्मनीच्या नासाऊईशे नॉईए प्रेसे वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार, “पुरेसा आहार न मिळाल्यामुळे वयस्कर लोकच आजाराला अधिक बळी पडतात.” दहा युरोपीयन देशांतील सत्तरी ओलांडलेल्या २,५०० स्त्रीपुरुषांची मते जाणून घेल्यानंतर वरील निष्कर्ष काढला गेला. अनेकांना वाटते, की वयस्कर लोकांना जास्त जेवण लागत नाही; पण हे चुकीचे आहे कारण शरीराला पुरेशा कॅलरिज न मिळल्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. याशिवाय, वयस्कर लोक एकाच वेळी भरपूर स्वयंपाक करून ठेवतात आणि कित्येक दिवस तेच पुरवतात, यामुळे त्यांचा आहार इतका काही पौष्टिक नसतो. तसेच, पुष्कळजण ताजी फळे व भाज्या खात नाहीत; त्यातच विशिष्ट फळांचा व भाज्यांना सिझन नसला तर त्याहून नाही. अभ्यासाने असे अनुमान काढले, की डॉक्टरांनी वयस्कर रुग्णांना “पुरेसे व वेळच्या वेळी भोजन करण्याची” आठवण करून द्यावी. त्यांनी असाही सल्ला दिला, की वयस्कर लोकांना व्यायामाचे अधिक प्रशिक्षण दिले जावे कारण शारीरिक हालचाल केल्याने भूक वाढते.
बायबल आता २,१९७ भाषांत
“मागच्या वर्षी बायबलच्या काही भागांचे ३० अतिरिक्त भाषांमध्ये अनुवाद केल्यामुळे आता एकूण २,१९७ भाषांमध्ये शास्त्रवचने उपलब्ध आहेत,” असा अहवाल जिनेव्हा, स्वीत्झर्लंडचे ईएनआय बुलेटिन देते. आज संपूर्ण बायबल ३६३ भाषांमध्ये उपलब्ध आहे; यांत एसपेरेन्टोसारखी मुद्दाम तयार केलेली भाषाही संमिलित आहे. ज्यात बायबलच्या केवळ एका पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे अशा सर्व भाषांची देखील नोंद, दी युनायटेड बायबल सोसायटीस (युबीएस) ठेवते. युबीएसचे सचीव फर्गस मॅकडॉनल्ड म्हणाले की, “लोकांना त्यांच्या मातृभाषेत देवाचे वचन उपलब्ध करणे” हा यामागचा मूळ हेतू आहे.