बायबलचा दृष्टिकोन
कार्निव्हल उत्सव बरोबर की चुकीचे?
“तुम्हाला राहावणारच नाही,” असे मायकल म्हणतो. “त्याच्या संगीतामुळे तुम्ही खुर्चीवरून उठता, तुमचे पाय ठेका घेतात, तुम्ही उन्मादित होता—तुम्हाला कार्निव्हल रोग जडला आहे!” खरोखर, दर वर्षी कार्निव्हलमुळे जगभरात कोट्यवधी लोक रोमांचित होतात, पण हा रोग मायकल जेथे राहतो त्या ब्राझीलपेक्षा इतर कोणत्याही देशात इतका प्रबळ नाही. राखेच्या बुधवारच्या आदल्या सप्ताहात, ब्राझील सर्वात झगमगत्या कपड्यांनी सुशोभित होतो, त्यावेळी तो घड्याळाकडे व दिनदर्शिकेकडे लक्ष देत नाही व ॲमेझोन जंगलापासून रिउ दे झानेइरुच्या किनाऱ्यापर्यंत धांगडधिंगा माजतो. ती गाण्याची, सांबा नृत्य करण्याची व देहभान हरपून जाण्याची वेळ असते.
“हेच त्याचं एक कारण आहे ज्यामुळे तो उत्सव इतका लोकप्रिय आहे,” असे मायकल सांगतो, जो स्वतः अनेक वर्षे उत्साहाने कार्निव्हल साजरा करत होता. “कार्निव्हल लोकांना त्यांचं दुःख विसरून जाण्यास एक मोका देतो.” विशेषतः, पुरेसे पाणी, वीज, काम व कोणतीही आशा यांविना जगणाऱ्या कोट्यवधी गरीब लोकांकडे विसरण्याजोगे पुष्कळ असते. त्यांच्याकरता कार्निव्हल म्हणजे ॲस्प्रिन आहे: तो समस्या सोडवू शकत नसला तरी निदान वेदना कमी करतो. याशिवाय, काही रोमन कॅथलिक पाळकांचा कार्निव्हलविषयी जो दृष्टिकोन आहे तो विचारात घ्या—एका बिशपने म्हटले, कार्निव्हल “लोकांच्या मानसिक संतुलनाकरता फार उपयुक्त ठरतो.” यास्तव, अनेकांच्या मते कार्निव्हल विसर पाडणारी मदतदायी व मान्यताप्राप्त गोष्ट का आहे हे पाहणे अगदी सोपे आहे. तथापि, कार्निव्हल उत्सवांबद्दल बायबलचा काय दृष्टिकोन आहे?
आनंदोत्सव की रंगेलपणा?
देवाचे वचन म्हणते, “हसण्याचा समय . . . व नृत्य करण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:४) ‘हसणे’ यासाठी असलेल्या इब्री शब्दाचा अनुवाद “उत्सव करणे” असाही केला जाऊ शकत असल्यामुळे, आपल्या निर्माणकर्त्याच्या मते हितकारक, सुखकारक समय घालवण्यात काहीच गैर नाही हे स्पष्ट आहे. (पहा १ शमुवेल १८:६, ७.) खरे म्हणजे, देवाचे वचन आपल्याला आनंदी असण्यास व मौज करण्यास सांगते. (उपदेशक ३:२२; ९:७) अशाप्रकारे बायबल उचित प्रकारचा आनंदोत्सव करण्यास मान्यता देते.
तथापि, बायबल सर्व प्रकारच्या आनंदोत्सवास मान्यता देत नाही. प्रेषित पौल म्हणतो की, रंगेलपणा किंवा बेफाम आनंदोत्सव ही “देहाची कर्मे” आहेत व रंगेल असणाऱ्यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (गलतीकर ५:१९-२१) यास्तव, पौलाने ख्रिश्चनांना “शिष्टाचाराने चालावे; [रंगेल] . . . नसावे” अशी ताकीद दिली. (रोमकर १३:१३) तर मग प्रश्न असा येतो की, कार्निव्हल कोणत्या गटात मोडतो—प्रामाणिक आनंदोत्सवाच्या की व्यभिचारी रंगेलपणाच्या? याचे उत्तर देण्याकरता, बायबल रंगेलपणास कोणत्या दृष्टिकोनातून पाहते याचे पुढील स्पष्टीकरण आपण आधी पाहू या.
ग्रीकमध्ये “रंगेलपणा” किंवी कोमोस हा शब्द ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये तीन वेळा नेहमीच प्रतिकूल अर्थाने वापरला असल्याचे आढळतो. (रोमकर १३:१३; गलतीकर ५:२१; १ पेत्र ४:३) यात काही आश्चर्य नाही कारण कोमोस हा शब्द प्रारंभीचे ग्रीक भाषिक ख्रिस्ती चांगल्या प्रकारे परिचित असलेल्या कुप्रसिद्ध उत्सवांतून निर्माण होतो. ते कोणते बरे?
इतिहासकार वील ड्युरंट स्पष्ट करतात: “ग्रीक परिभाषेत कोमोस किंवा मौज करणे यामध्ये लोकांच्या समूहाने पवित्र लिंग [पुरुषाच्या लिंगाची प्रतिमा] घेऊन जाणे व डायोनायससला स्तुतिपर काव्य [प्रार्थना गीत] गाणे याचा समावेश होता.” ग्रीक पुराणकथेतील द्राक्षारसाचा दैवत डायोनायसस यास नंतर रोमन लोकांनी स्वीकारले व त्याला बॅक्कस असे नाम दिले. तरीही, नाव बदलल्यावर कोमोस संबंध टिकून राहिला. बायबल विद्वान डॉ. जेम्स मॅकनाईट असे लिहितात: ‘कोमोईस [कोमोस याचे अनेकवचनी रूप] हा शब्द, उत्सव व रंगेलपणाचे दैवत कोमस याच्याकडून येतो. हा रंगेलपणा बॅक्कसच्या सन्मानास्तव केला जात, ज्याला त्याकरता कोमॅस्टेस असे नाव देण्यात आले होते.’ होय, डायोनायसस व बॅक्कसकरता केलेले उत्सव रंगेलपणाचे अंतर्भागच होते. या आनंदोत्सवांची वैशिष्ट्ये कोणती होती?
रंगेलपणाचे चित्रण
ड्युरंटनुसार, डायोनायससच्या सन्मानार्थ केल्या जाणाऱ्या ग्रीक उत्सवांमध्ये, साजकरी समूह “अनियंत्रितपणे मद्य प्राशन करीत, व . . . अतिप्राशनाने तोल गमावत नसलेल्या त्यांच्यामधील व्यक्तीला मूर्ख समजत. ते बेफाम मिरवणूक काढत, . . . व पिऊन नाचत असताना इतके उन्मादित होत की पूर्णपणे अनिर्बंधित होत असत.” अशाचप्रकारे, बॅक्कसच्या (ज्यास बॅक्केनेलिया म्हणत) सन्मानार्थ केलेल्या रोमन सणांमध्ये मद्यप्राशन व कामोद्दीपक गीत आणि संगीत होते तसेच हे सण म्हणजे “अतिशय नीच कृत्यांची” दृश्ये होती, असे मॅकनाईट लिहितात. अशाप्रकारे, ग्रीक-रोमन रंगेलपणामध्ये उन्मत्त समूह, अनावर मद्यप्राशन, कामुक नृत्य व संगीत आणि अनैतिक लैंगिकता हे मूलभूत घटक होते.
आजकालच्या कार्निव्हलमध्ये रंगेलपणास उत्तेजन देणारे हे घटक आहेत का? कार्निव्हल उत्सवांबद्दलच्या वृत्तांमधील काही अवतरणे पाहा: “अतिशय गोंगाट करणारे समूह.” “मद्यप्राशन व रात्रभर मौज करण्याची चार-दिवसीय दंगामस्ती.” “रंगेल असणाऱ्या काहींचे कार्निव्हलमुळे अनेक दिवसांपर्यंत डोके जड होऊ शकते.” “तुलना केल्यास अगदी जवळचे कानठाळ्या बसवणारे आवाज ‘हेवी मेटलच्या’ गटांना फिके पाडतात.” “आज, समलिंगींविना कोणताही कार्निव्हल उत्सव काळ्या मिरीविना स्टीक ऑ पावरे या पदार्थासारखा आहे.” “कार्निव्हल संपूर्ण नग्नतेचा समानार्थी शब्द बनला आहे.” कार्निव्हलच्या नृत्यांमध्ये “हस्तमैथुनचे दृश्य . . . व इतर लैंगिक समागमाचे प्रकार” दाखवण्यात आले.
खरे म्हणजे, आजच्या कार्निव्हलमधील व त्या प्राचीन उत्सवांमधील समानता इतक्या उल्लेखनीय आहेत की, बॅक्कसचा सण साजरा करणारा एखादा मनुष्य आधुनिक दिवसातील कार्निव्हल पार्टीत जिवंत झाला तर तो अगदी त्यांच्यातलाच शोभेल. दूरचित्रवाणी निर्माता क्लुद्यु पेट्रॉल्ये यांच्या मते याविषयी आपल्याला आश्चर्य वाटू नये; ते सांगतात की, आजचे कार्निव्हल “मुळात डायोनायसस व बॅक्कसच्या उत्सवांतून निर्माण होतात व खरे पाहता, कार्निव्हल असाच असतो.” द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका म्हणतो, की कार्निव्हलचा संबंध प्राचीन रोममधील मूर्तिपूजक सॅटरनेलिया सणाशी असावा. यास्तव, कार्निव्हल वेगळ्या युगातील असला, तरी तो त्याच्या आधीच्या सणाच्या त्याच कुळातील आहे. त्या कुळाचे नाव? रंगेलपणा.
आज ख्रिश्चनांवर या माहितीचा काय परिणाम झाला पाहिजे? ग्रीक लोकांचा प्रभाव असणाऱ्या आशिया मायनरच्या राज्यांमध्ये राहणाऱ्या आरंभीच्या ख्रिश्चनांवर झाला तसाच. ख्रिस्ती होण्याआधी ते “कामासक्ति विषयवासना, मद्यासक्ति, रंगेलपणा, [कोमोईस], बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा” यात सामील होत असत. (१ पेत्र १:१; ४:३, ४) परंतु, रंगेलपणा देवाच्या नजरेत ‘अंधकाराचे काम’ आहे हे जाणून घेतल्यावर त्यांनी कार्निव्हलसारख्या उत्सवांमध्ये भाग घेण्याचे सोडून दिले.—रोमकर १३:१२-१४.
आधी उल्लेखिलेल्या मायकलने तेच केले. त्याचे कारण तो असे देतो: “माझे बायबलविषयी ज्ञान वाढत गेले तसे कार्निव्हल उत्सव व बायबल तत्त्वे ही तेल व पाण्यासारखी आहेत—ती एकजीव होतच नाहीत हे माझ्या प्रत्ययास आले.” सन १९७९ मध्ये मायकलने निर्धार केला. त्याने कार्निव्हल उत्सव साजरा करण्याचे कायमचे सोडून दिले. तुम्ही कोणती निवड कराल?
[१० पानांवरील चित्रं]
डायोनायसस (डावी आकृती) याचे चित्र असलेले पूर्व-ख्रिस्ती ग्रीक मडके
[चित्राचे श्रेय]
Courtesy of The British Museum